‘‘चल यार, बोर होतंय, या मुली परत आपलं कपडे, ज्वेलरीबद्दल बोलायला लागल्या. आता यांच्यात आपलं काय काम? आपण एक कटिंग मारून येऊयात.’’ कॉलेजच्या कट्टय़ावर कपडे, फॅशन, ट्रेंड्सबद्दल चर्चा सुरू झाली की, ग्रुपमधल्या मुलांची हीच प्रतिक्रिया असते आणि त्यात त्यांना हेही ठाऊक असतं की, फक्त कटिंग काय, रात्रीचं जेवूनपण आलो तरी, या मुली इथे याच विषयावर बोलत असणार. मग काय बापुडा जीव कोपऱ्यात मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसून राहतो. त्यात आता तर फेस्टिव्हल सीझन आलंय, त्यामुळे तर विचारायलाच नको. स्वतच्या कपडय़ांपासून ते थेट बििल्डगमध्ये चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या ‘सो कॉल्ड अॅटिटय़ूडवाल्या मुलीच्या’ हिल्सपर्यंत सगळ्यांची चर्चा होणार. त्यामुळे या दिवसांमध्ये मुलं या चर्चापासून दूर राहणंच पसंत करतात; पण बॉस आता हे चालणार नाही. या सीझनमध्ये मुलींना इम्प्रेस करायचं असेल तर आईने आणलेला कुर्ता आणि बाबाआदमच्या जमान्यातली सफेद सलवार घालून वेळ मारून नेता येणार नाही.
कारण सध्या तरी तमाम भारतवर्षांतील मुलींवर पाकिस्तानमधील सुपरस्टार फवाद खान आणि त्याच्या राजिबडय़ा रूपाची मोहिनी पडली आहे. त्याच्यासमोर सध्या तरी आपल्या रणबीर कपूर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांचीपण हवा टाइट झाली आहे. त्यामुळे त्यात पठ्ठय़ा ‘खुबसूरत’ चित्रपटामध्ये चक्क एका राजकुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला या नवरात्र- दिवाळीच्या मौसमामध्ये आपली सेटिंग लावायची असेल तर रुबाबदार दिसावंच लागेल. त्याला पर्याय नाही.. घाबरू नका, आधी कपाळावरचा तो घाम पुसा, आज तुमच्या मदतीसाठी मुलांच्या ग्रुिमगच्या काही टिप्स आपण बघणार आहोत. कपडय़ांपासून मेकअपपर्यंत काय काय या सीझनमध्ये मस्ट आहे त्याची उजळणी करना बनता है बॉस.
सुरुवात करूयात कपडय़ांपासून. आधीच सांगितल्याप्रमाणे हा सीझन आहे राजिबडय़ा, देखण्या, शाही लुकचा. त्यामुळे शेरवानी इज मस्ट. त्यात डार्क, अर्दी रंग निवडा. डार्क म्हणजे ब्लॅक या समजुतीच्या पुढे जा जरा आणि थोडे प्रयोग करा. ब्राऊन, चॉकलेट, नेव्ही, मेहंदी, ग्रे, मरून शेड्स ट्राय करा; पण शेरवानी आणि फेस्टिव्हल हे दोन शब्द एकत्र आले म्हणजे गुज्जू स्टाइल झगमगीत जरदोसी एम्ब्रॉयडरी केलेले शेरवानी तुम्ही घेणार असाल, तर सेटिंग सोडूनच द्या. मुली तुमच्या आसपास उभ्या राहतील हा विचारही मनातून काढून टाका. छान, सोबर एखाददुसरी डिटेिलग असलेली शेरवानी सध्या ट्रेंडमध्ये आहे. बरं, दर वेळी शेरवानीसोबत चुडीदारच हवा असं काही नाही. धोती, सलवारपण ट्राय करू शकता. शेरवानीची लेंग्थ लांब असू द्यात. शेरवानीला पर्याय म्हणून छान कुर्तापण ट्राय करू शकता. लाँग लेंग्थ कुर्त्यांची नेकलाइन डीप असेल तर क्या बात. रणबीरचा ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ गाण्यातला किंवा वरुण-सिद्धार्थचा ‘राधा तेरी चुनरी’ गाण्यातला कुर्ता आठवतोय? तसा कुर्ता ट्राय करायचा असेल तर तुमची बॉडी मेंटेन्ड असली पाहिजे. सडपातळ देहयष्टीचे किंवा ओव्हरवेट असाल तर या कुर्त्यांच्या फंदात पडू नका. नेहरू जॅकेट्ससुद्धा या सीझनमध्ये हिट आहेत. चुडीदार, सलवार किंवा धोतीचा रंग लाइट असू द्यात. बेज, ग्रे, क्रीम शेड्स ट्राय करा.
ट्रॅडिशनल लुक नको असेल, तर थ्री पीस सूट किंवा बाइकर लुकचा पर्यायसुद्धा आहे तुमच्याकडे. छान लेदर जॅकेट, टी-शर्ट आणि क्लासी डेनिम कधीही उत्तम. नेहमीच्या शर्ट, डेनिम लुकला ब्लेझर वापरून ट्विस्ट आणू शकता. यंदाच्या सीझनमध्ये टाय सिंपल, पण छोटे झाले आहेत. रणबीरचा ‘बत्तमिज दिल’मधला टाय बघून तुम्हाला अंदाज येईल मी काय सांगतेय ते. बो मात्र सध्या तरी कपाटातच ठेवा.
मुलांच्या अॅक्सेसरीज म्हटलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर शूज येतात. नेहमीच्या लेदरच्या शूजना सध्या बाजारात छान पर्याय आले आहेत. ते नक्कीच ट्राय करा. स्निकर्सचा पर्यायसुद्धा आहे, मॅट गोल्ड, सिल्व्हर रंगाचे स्निकर्स सध्या बाजारात आले आहेत. ट्रॅडिशनल लुकवर स्टाइलिश चप्पल घालायलासुद्धा हरकत नाही; पण शूज जास्त फंकी होणार नाहीत याची काळजी घ्या.
शूजनंतर वॉलेट्स. मुली तुमचं वॉलेट फक्त किती पसे आहेत यासाठी बघत नाही, तर त्यांच्या चार मत्रिणींमध्ये मिरवण्याजोगे तुमचे वॉलेट इंटरेस्टिंग आहे की नाही हे पण तपासतात. सो छान वॉलेट असणं मस्ट आहे. लेदरचं मस्त वॉलेट यंदा घ्याच. परत त्यात स्टड्स, एम्ब्रॉयडरीची फारशी भेसळ नको. वॉलेट शंभर रुपयांचं असो किंवा हजार रुपयांचं, वॉलेट हे वॉलेट राहणार हा अॅटिटय़ूड पुरे झाला.
यासोबत शेरवानी किंवा कोटाच्या खिशाला एखादे लाल गुलाब असेल तर क्या बात. ऐनवेळेस कुठे गुलाब शोधायला जाणार असा विचार येत असेल, तर बॉस सध्या बाजारात खोटे, पण हुबेहूब खरे दिसणारे गुलाब मिळताहेत. नक्कीच घ्या. त्याशिवाय सिल्कचा रुमाल तर आहेच. सध्या एकाच रुमालाला वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळे रंग असे सिल्कचे रुमाल मिळतात. जेणेकरून शर्टनुसार रुमालाचा रंग बदलता येतो आणि सात-आठ रुमाल खरेदी करायचा त्राससुद्धा वाचतो. काहीच नाही तर बहिणीच्या ज्वेलरी बॉक्समधून एखादा ब्रोच चोरा. आता त्या बदल्यात तिला काय खंडणी द्यावी लागेल हे माहीत नाही; पण कुंदनचा ब्रोचसुद्धा शेरवानीवर मस्त दिसतो.
मेकअप सिम्पल असू द्यात, पण डोक्यावरचे केस वाढवा, दाढीचे नको. स्क्रब सध्या फॅशनमध्ये आहेत; पण म्हणून दाढीचे जंगल वाढवू नका. खरंच दाढी तुमच्या चेहऱ्याला सूट होत असेल तर गोष्ट वेगळी. झुपकेदार मिशा ठेवू शकता; पण सलूनमध्ये (सलून म्हटलंय, हेअर कटिंगवाला नव्हे) जाऊन त्या नीट ट्रिम करायला विसरू नका. केसांचे लांब कल्ले सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे केस छान वाढवून मग त्यांना शेप द्या. जेलने सेट केलेले केस पहिल्या नजरेत मुलींना घायाळ करतात.
तर मग वाट कसली बघताय, व्हा सज्ज, या सीझनमध्ये मुलींच्या मनावर राज्य करायला; पण हे सगळं करताना परफ्यूम विसरू नका. हो पण परफ्यूम्सच. जाहिरातीत मुलींना मागे फिरवणारे डिओज कधी तुमची हवा काढतील कळणार नाही आणि सुंदर, मिश्कील, खटय़ाळ हसू असू द्यात चेहऱ्यावर, मग तुमचं काम नक्कीच होईल. इतका खटाटोप केल्यावर किती जणींना प्रेमात पाडताय हे आम्हाला सांगायला मात्र विसरू नका.
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2014 रोजी प्रकाशित
रॅम्पवॉक : शाही राजकुमाराचा रुबाबदार थाट
फॅशनेबल कपडे घालून मिरवायचं ते मुलींनीच हा जुना फंडा झाला. मुलांनाही आता मस्त राहायला, फॅशन्स करायला आवडतं. म्हणूनच मुलांच्या फॅशनविश्वाची ही सैर..

First published on: 19-09-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion