आमच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शूट फारसं बाहेर नसलं तरी उकाडा नक्कीच जाणवतो. याचा त्रास होऊ नये म्हणून मी आहारात ताकाचा जास्तीत जास्त समावेश करून घेतो. चहा, कॉफी पिणं शक्यतो टाळतो. त्यातही ग्रीन टीला प्राधान्य देतो. जेवण योग्य प्रमाणात आणि वेळेवर होण्याला मी महत्त्व देतो. उष्णतेचा त्रास होत असल्याने तो कमी करण्यासाठी मी जास्त काळजी घ्यायला लागलो. उन्हाळ्यात गुलकंदही खातो. आम्ही शूट करत असलो तरी आमचं रात्री जेवण वेळेवर व्हावं यासाठी मालिकेचे निर्माते संजय जाधव रोज संध्याकाळी सात वाजता सेटवर घरगुती जेवणाचा डबा पाठवतात. जेवण वेळेवर होण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. घरगुती जेवणाकडे माझा कल असतो. वाळ्याचं सरबत, सब्जा, ताक पिणं या गोष्टी मी नेटाने पाळतो. मीही आमरसाचा चाहता. त्यामुळे त्याचा आनंद मीही घेतोच. उन्हाळा सुरू झाला की मे महिन्याची सुट्टी, कैऱ्या, दुपारचं उन्हात खेळणं अशा सगळ्या गोष्टी आठवतात. आम्ही क्रिकेट खास एकाच गोष्टीसाठी खेळायचो. क्रिकेट खेळताना बॉल पलीकडच्या कंपाउंडमध्ये कधी जातोय आणि आम्ही तो घ्यायला जाण्याच्या निमित्ताने तिथल्या कैऱ्या तोडून कधी खातोय, याचीच वाट आम्ही बघायचो.
कलाकारांच्या कामाचं स्वरूप काहीसं निराळं असल्यामुळे कुठल्याही ऋतूत आहाराबाबत काळजी घ्यावीच लागते. पण, विशेषत: उन्हाळ्यात जास्त काळजीने आहार घ्यावा लागतो हे खरंय. उन्हाळ्यात घामाने शरीरातलं पाणी खूप कमी होतं. त्यामुळे पाणी पिण्याचं प्रमाण वाढवलं जातं. सारखं फक्त पाणी प्यायलं जात नसेल तर लिंबू पाणी, लिंबू सरबत, नारळ पाणी अशा द्रवरूप पदार्थाना मी प्राधान्य देते. या पदार्थामध्ये एक नंबरवर असते ते म्हणजे ताक. जेवणात तर ताक किंवा सोलकढी असायलाच हवी. सध्या मी डाएट करत असल्यामुळे भात खाणं बंद आहे. जेवणात
रस्सा भाजीला प्राधान्य असते. आता उन्हाळ्यात आहाराबाबत अशी काळजी घेताना थोडं मागे वळून बघितलं की, लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी अठवते. सुट्टी सुरू झाली की, मी बलसाडला माझ्या मामाकडे जायचे. आंबा म्हणजे माझा वीक पाँइंट. त्या वेळी मनसोक्त आंबे खायचे. पण, त्यागच करावा लागतो. कधी तरी एखाद्या वेळी खाल्ला तर हरकत नसते. पण, त्याचा अतिरेक होणार नाही याची काळजी मात्र मी नक्कीच घेते. मला असं वाटतं की, खाण्यावर र्निबध असावेत पण, त्यासोबतच व्यायामही महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही व्यायाम करत असाल आणि कधीतरी र्निबध असलेले पदार्थ खाल्ले तर ते सहज पचू शकतात. मुळातच मी खवय्यी असल्यामुळे मला खाण्यापिण्याच्या बाबतीत संयम ठेवावा लागतो. कठीणही जातं अनेकदा पण, काही मिळवण्यासाठी तडजोड करावीच लागते. आधी मी कोल्ड ड्रिंक्स खूप प्यायचे. आता या कोल्ड ड्रिंक्सची जागा ताकाने घेतली आहे.
जिभेचे चोचले पुरवताना आम्हा कलाकारांना भान ठेवावं लागतं. कारण आमचा चेहरा सतत स्क्रीनसमोर येत असतो. प्रेक्षकांसमोर कलाकाराचा चेहरा ताजातवाना दिसणं गरजेचं असतं. म्हणून आहाराबाबत जागरूक असलेलं केव्हाही चांगलं. सेटवर माझ्याकडे घरगुती डबा असतो. त्यात सॅलेडचाही समावेश असतो. दिवसभरात किमान दोन फळं मी खातेच. पाण्याच्या प्रमाणाकडेही लक्ष असावं. उन्हाळ्यात द्रवरूपी पदार्थाचं जास्तीत जास्त सेवन करते. त्यातही कोकम सरबत, सब्जा यांचं प्रमाण अधिक असतं. या दोन्ही गोष्टी मी नेहमी माझ्यासोबत ठेवते. रात्री आठ वाजता जेवणं ही वेळ आदर्श आहे. पण, नाटकाच्या प्रयोगांच्या वेळी जेवणाची ही वेळ पाळणं कठीण असतं. प्रयोग संपल्यानंतर जेवावं लागतं. पण, प्रयोग संपल्यानंतर घरी येईपर्यंतचा प्रवासाचा वेळ जेवण पचायला पुरेसा असतो. त्यामुळे अडचण येत नाही. उपाशीपोटी झोपणंही मला पटत नाही. चहा-कॉफी घेणं प्रमाणात असावं. मी मात्र त्यापेक्षा कोकम सरबताला प्राधान्य देते. मला आवडणारे पदार्थ मी पूर्णपणे बंद करत नाही; मात्र त्याचं प्रमाण कमी नक्कीच करते किंवा त्यात पर्याय शोधते. मला मांसाहारी जेवण खूप आवडतं. पण, ते उन्हाळ्यात जास्त खाणं चांगलं नाही. अशा वेळी चिकन ग्रिल्ड, फिश ग्रिल्ड असे पर्याय मी शोधते. रोज नाश्ता करताना एक आंबा खाण्याची माझी सवय होती. आता मात्र त्याचं प्रमाण थोडंसं कमी केलंय. आम्ही नाशिकला वाडय़ात राहायचो. आम्ही सगळे एकत्र बसून आंबे खायचो. दोन-तीन किलोचा रस काढायचो. शाळेत असताना त्या भागात बर्फाचा गोळेवाला असायचा. रोज तो खायची इच्छा व्हायची. पण, शाळेत असल्यामुळे पुरेसे पैसे नसायचे. मग आम्ही परीक्षा संपली की, ठरवून एक दिवशी तो बर्फाचा गोळा खायचो. तीच आमची परीक्षा संपल्याची पार्टी असायची.
डेली सोपचं वेळापत्रक वेगळं असतं. काही वेळा बरेच तास शूटिंग सुरू असतं. त्यामुळे डेली सोप करताना व्यायाम किंवा आहारात विशेष काही करण्यासाठी वेगळा वेळ काढता येत नाही. मग अशा वेळी मिळालेल्या मोकळ्या वेळेतच व्यायाम करावा. तसंच आहाराचं वेळापत्रकही त्यानुसारच तयार करावं असं मी मानतो. मी मालिकेत काम करत असल्यामुळे मला वेगळा वेळ काढणं शक्य होत नाही. तरी रोज सकाळी मी पंधरा ते वीस मिनिटं का होईना धावायला जातो. तसंच ब्रेकमध्ये आम्ही सेटवर क्रिकेट खेळत असतो. मध्यंतरी मी झुंबाला जायचो. सध्या मी बॅटमिंटन खेळतो. व्यायाम किंवा कुठल्या ना कुठल्या अॅक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी असतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्याची मी काळजी घेत असतो. डाएट करणं मला जमत नाही. पण, अनावश्यक खाणं टाळतो. तसंच व्यायाम करत असल्यामुळे डाएट न केल्याचा परिणाम होत नाही. मात्र उन्हाळ्यात मी पाण्याविषयी फार जागरूक असतो. भरपूर फळं खातो. कारण फळांमुळे ताजेपणा मिळतो. प्रसन्नही वाटतं. फार तेलकट, तुपकट खात नाही. सकाळी नाश्त्यामध्ये तेलकट पदार्थ असले की दिवसभर त्याचे परिणाम होत असतात. पण, त्याऐवजी फळं खाल्ली तर शरीरास उपयुक्त ठरतं. विशेषत: कलिंगडामुळे थंडावा मिळतो. कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यातली अतिशय पौष्टिक पेय. चवही उत्तम आणि आरोग्यास हितकारकही असं पन्हं मी सेटवर घेऊन जातो. तसंच सेटवर वेगवेगळ्या प्रकारची सरबतंही मिळतात. त्यामुळे त्याचाही निश्चितच फायदा होतो. उन्हाची झळ जाणवायला लागली की काही पूर्वीचे दिवसही आठवतात. माझं आजोळ अंमळनेरचं. तिथलं घर वाडय़ासारखं होतं. दुपार झाली की, तिथे बर्फाचा गोळेवाला यायचा. त्याची विशिष्ट वेळ असायची. मग धावत जाऊन पन्नास पैशांचा तो गोळा खायचा, हे आमचं ठरलेलं असायचं. ते आता आठवलं की चेहऱ्यावर हसू उमटतं. आता जुहू चौपाटीवर गेलं की वीस-पंचवीस रुपयांचा तो बर्फाचा गोळा खाताना बालपणीचा तो पन्नास पैशांचा गोळा हमखास आठवतो.
उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी स्वत:च काळजी घ्यायला हवी. बाहेर कितीही ऊन असलं तरी शरीर आतून थंड ठेवणं हे आपल्याच हातात असतं. यावर भरपूर पाणी पिणं हा उत्तम उपाय आहे. पाणी पिण्याचं विशिष्ट एक वेळापत्रक आखलं की ते नक्कीच जमतं. दिवसभरात माझं तीन लिटर पाणी पिऊन व्हायला हवं, असा मीच मला नियम घालून घेतला आहे. सकाळी आठ वाजता कामाला सुरुवात होत असेल तर सकाळी साधारण अकरा वाजेपर्यंत एक लिटर पाणी संपवते. मग त्यानंतर दीड-दोन वाजेपर्यंत आणखी एक लिटर पाणी पिते. दुपारी जेवण झाल्यानंतर फार पाणी प्यायलं जात नाही. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणखी एक लिटर पाणी संपवते. रात्री मात्र फार पाणी पीत नाही. असं रीतसर वेळापत्रक आखून घेतलं की, अवघड वाटणारी ही गोष्ट सहज शक्य होते. मला मुळातच जंक फूड आवडत नाही. त्यामुळे त्यावर ताबा ठेवण्यासाठी जादा कष्ट घ्यावे लागले नाहीत. माझं चहा, कॉफी घेण्याचं प्रमाण कमी असतं. शक्य झाल्यास ते बंदच करावं. यापेक्षा मी ग्रीन टीला प्राधान्य देते. त्याचा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगला उपयोग होतो. अगदीच चहा-कॉफीची इच्छा झाली तर गरम पाणी प्यावं. घरगुती जेवणाला प्राधान्य असतं. रोज सेटवर पोळी, भाजी, वरण, भात असा मी डबा नेते. सकाळी पोटभर नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी सात-आठ वाजता पुन्हा पोट भरेल असे मी स्नॅक्स खाते. रात्री शक्यतो मी जेवत नाही. या सगळ्या आहाराच्या वेळापत्रकात उन्हाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते. कारण उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून दक्ष राहावं लागतं. विशेषत: आंब्याच्या बाबतीत. पण, उन्हाळा, सुट्टी म्हटलं की, मला शाळेचे दिवस हमखास आठवतात. या दिवसांत प्रत्येक शाळेबाहेर एक तरी चिंचा, बोरं, कैरी विकणारा असतोच. मी हे सगळं नेहमी घ्यायचे. कंटाळवाणा तास असला की ते वर्गात खायचे आणि मित्र-मैत्रिणींनाही द्यायचे. पण, कितीही लपवलं तरी आईला माझे हे सगळे प्रताप कळायचेच. याला कारण म्हणजे माझा शाळेचा गणवेश. तो धुताना खिशात सांडलेल्या मिठामुळे तिला कळायचे. ही आठवण माझ्या खूप जवळची आहे. मी आजही हे सगळं विकत घेते. पण, आता त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे ही समज आली आहे. उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून मी या दिवसांमध्ये गुलकंद आणि सब्जा माझ्यासोबत नेत असते.
कलाकाराला अनेकदा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांप्रमाणे दिसावं लागतं. त्यामुळे त्यांच्या आहारात तसंतसं बदल होत असतात. पण, मला वाटतं की माणसाने सगळं खावं पण, व्यायाम नक्की करावा. कारण व्यायाम केल्याने कोणत्याही प्रकारचा आहार सहज पचू शकतो. उन्हाळ्यात मात्र आहाराविषयक थोडी जागरूकता असायला हवी हे खरंय. त्यामुळे मी माझ्या आहारात ताक, कोकम सरबत याचं प्रमाण वाढवतो. तसंच पाणी भरपूर पितो. एरवीही भरपूर पाणी पिणं उत्तम असतंच पण, उन्हाळ्यात त्याचं प्रमाण वाढवावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपचन होऊ नये यासाठी काळजी मी घेतो. त्यासाठी रात्री लवकर जेवण्याचा माझा प्रयत्न असतो. साधारणत: साडेसात-आठ ही रात्रीच्या जेवणाची आदर्श वेळ आहे. ही वेळ मी बऱ्यापैकी पाळतो. फळं खाण्याचा नियम वर्षभर मी स्वत:ला घालून घेतला आहे. त्यामुळे फळांचा समावेश आहारात असणं मला आवश्यक वाटतं. उन्हाळ्यातलं खास फळ म्हणजे आंबा. आंबा खाल्ल्याने अनेकांना उष्णतेचा त्रास होतो. सुदैवाने मला तो त्रास आजतागायत झालेला नाही. त्यामुळे इच्छा झाली की मी आंबा खातो. त्याचा अतिरेक मात्र करत नाही. आंबा, कैरी यावरून मला बालपण नक्कीच आठवतं. आमच्या घराच्या बाजूलाच एक कैरीचं झाड होतं. इतर वेळी आम्हाला कोणी त्या झाडाच्या कैऱ्या तोडू द्यायचं नाही. मग आम्ही नीट प्लॅन करायचो. दुपार झाली की शांततेत सगळे घराबाहेर पडायचो आणि त्या झाडावरच्या कैऱ्या तोडायचो. नंतर एका जागी बसून त्या फस्त करायचो. घराबाहेर पडतानाच मीठ वगैरे खिशात घालून आणायचो. या चोरून खाल्लेल्या कैऱ्यांची मजा काही औरच होती.
खरं तर मला तिखट पदार्थ खूप आवडतात. पण, उन्हाळ्यात अशा तिखट, तेलकट पदार्थाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात अशा पदार्थापासून मी चार हात लांबच असतो. तसंच सध्याचं हवामान विचित्र आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचंच आहे. शूटिंगच्या निमित्ताने मी कुठे बाहेर असलो तर फळं, ज्यूस, सरबतं अशा पदार्थावर जास्त भर देतो. आहारात द्रवरूपी पदार्थाचा जास्तीत जास्त समावेश होईल याकडे मी लक्ष देतो. मांसाहार आवडतो. पण, तेही मी उन्हाळ्यात पूर्णपणे टाळतो. चिकन, मटणपेक्षा मी उकडलेले मासे खाण्यास प्राधान्य देतो. उकडलेल्या भाज्या, मूग, सॅलेड याचंही प्रमाण अधिक असतं. आंब्यापेक्षा मला कलिंगड, द्राक्ष खाण्यात जास्त रस असतो. तसंच ताडगोळे कुठे मिळताहेत का याचाही माझा शोध सुरू असतो. विशेषत: उन्हाळ्यात आवडणारे पदार्थ खाण्यापेक्षा आरोग्यासाठी जे हितकारक आहे ते खाण्याकडे माझा कल असतो. उष्ण पदार्थ उन्हाळ्यात टाळावेत असं म्हणतात. पण, आंबा हा फळांचाच नाही तर या ऋतूचाही राजाच आहे. आंबा, आमरस, कैरी अशा सगळ्यासंबंधी उन्हाळ्याच्या खूप आठवणी आहेत. लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीतला उन्हाळा फार जाणवायचाच नाही. पण, तेव्हा भरपूर आंबे खायचो. आजीच्या हातचं कैरीचं पन्हं म्हणजे मेजवानी असायची. उन्हाळी सुट्टी आणि बर्फाच्या गोळ्याची आठवण होणार नाही असं शक्यच नाही. दुपार झाली की ठरलेला एक बर्फाचा गोळेवाला आमच्या घराजवळ यायचा. मग आम्ही सगळे मित्र तिथे जायचो. काला खट्टा हा फ्लेवर आमचा ठरलेला असायचा. ही सगळी धमाल आठवणं सुखकारक आहे. तेव्हा त्याचा मनमुराद आनंद घेता यायचा पण, आता त्यावर थोडा ताबा ठेवावा लागतो.
मालिकेच्या शूटिंगच्या शिफ्ट्स भरपूर तासांच्या असतात. कामाचे तास जास्त असल्यामुळे अर्थातच आहाराबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. खरं तर सगळं खायला पाहिजे अशा मताची मी आहे. पण, उन्हाळ्यात आहाराविषयक जागरूक असायला हवं. म्हणूनच मी आहारात ताक, कोकम सरबत अशा द्रवरूपी पदार्थाचा अधिकाधिक समावेश करते. उष्ण पदार्थ खाणं टाळते. खरं तर आंबा उष्ण आहे. पण, तरीही उन्हाळ्यात तो खावा. कारण त्यात व्हिटॅमिन ए असतं. आणि वर्षांतून तो एकदाच येतो. उन्हाळ्यात फारशी भूक लागत नाही. अशा वेळी हलकंफुलकं खाण्याकडे माझा कल असतो. घरगुती पोळी-भाजीचा डब्याला मी प्राधान्य देते. चहा टाळण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. त्याऐवजी ग्रीन टी पिणं केव्हाही चांगलं. आम्ही सेटवर सगळेच डबा आणतो. त्यामुळे आपसूकच घरगुती जेवणाचा आस्वाद घेता येतो. तसंच वेगवेगळ्या प्रकारची सॅलेड्स बनवून खातो. मालिकेचं वेळापत्रक खूप व्यग्र असलं तरी जेवणाची वेळ पाळण्याचा माझा प्रयत्न असतो. पण, मला वाटतं जेवणाची वेळ पाळता आली नाही तरी आहार मात्र पौष्टिक असावा जेणेकरून वेळ न पाळण्याचे दुष्परिणाम होत नाहीत. खाण्यापिण्याच्या बाबतीत आता इतका विचार केला जातो. पण, मागे वळून पाहिलं तर बालपणीच्या गमतीजमती आठवतात. माझी आजी कैरीचं पन्हं करून ठेवायची. मग सतत येता-जाता मी ते पन्हं पीत असायचे. आजी माझ्यासाठी आमरस-पुरीचाही बेत आखायची. मीही त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायचे. माझ्या शाळेच्या आवारात एक बर्फाचा गोळेवाला असायचा. तिथे जाऊन आम्ही सगळ्या मैत्रिणी गोळा खायचो. आमच्याकडे असतील ते पैसे पुरवून आम्ही मजा करायचो. गोळा खाल्ल्यावर तोंडाला रंग लागायचा. तसं तोंड घेऊन घरी गेलो तर घरचे ओरडतील या भीतीपोटी तो रंग जाईपर्यंत आम्ही घरी जायचो नाही. ही सगळी मजा नेहमी आठवते.
शब्दांकन : चैताली जोशी