चिल्ड मेलन सलाड

साहित्य :
१ कलिंगड
१ टरबूज
ड्रेसिंगसाठी :
४ चमचे लिंबाचा रस
४ ते ६ चमचे साखर
२ चिमूटभर मीठ
१ चिमटी मिरपूड
कृती :
१) मेलन स्कूपरने कलिंगड आणि टरबुजाचे गोल आकारात स्कूप काढून घ्यावे. सवर्ि्हग बोलमध्ये हे बॉल्स अरेंज करावेत. फ्रिजमध्ये ठेवून गार करावे.
२) साखर भिजेलइतपत पाणी घालून त्याचा पाक करून घ्यावा. पाक थोडा गार झाला की त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालावे. मिक्स करून तयार सलाडवर घालावे. लगेच सव्‍‌र्ह करावे.

टीप :
यामध्ये आवडीनुसार फ्लेवरसाठी पुदिना पाने चिरून घालू शकतो. थोडे काळे मीठ घातले तरीही चालेल.
भारतात हनीडय़ू मेलन फारसे पाहायला मिळत नाही. याचा रंग लाइट पिस्ता असतो. जर ते मिळाले तर चव छान लागतेच आणि रंगसंगतीही सुरेख दिसते.

बदाम कुल्फी

साहित्य
पाऊण लिटर दूध
१/२ वाटी ताजा मावा
१/२ ते पाऊण वाटी साखर
१/२ वाटी बदामाचे काप
२ चमचे कॉर्न फ्लोअर
१/२ चमचा वेलची पूड
चिमूटभर केशर

कृती
१) बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच बदाम पूड आणि साखर घालावी.
२) साधारण अर्धे होईलइतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे, ज्यामुळे दूध भांडय़ाच्या तळाला लागणार नाही.
३) मावा हाताने मोकळा करून घ्यावा. त्यातील गुठळ्या हाताने मोडाव्यात.
४) दोन टे.स्पून गार दुधात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे, हे दूध आटवलेल्या दुधात घालावे व ढवळावे. हळूहळू दूध घट्टसर होईल.
५) दूध घट्टसर झाले की वेलची पूड, केशर आणि मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व नीट मिक्स करावे.
६) मिश्रण थोडे कोमट झाले की कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रीजरमध्ये सेट करण्यास ठेवावे.
७) कुल्फी घट्ट झाली की सव्‍‌र्ह करावी.

आंब्याचे आइस्क्रीम

साहित्य
दीड वाटी व्हिपिंग क्रीम, थंडगार
२ कप आंब्याचा रस, थंडगार
पाऊण वाटी पिठी साखर
वेलची पूड (ऐच्छिक)

कृती
१) एक मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बोल घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा.
२) गार झालेले काचेचे बोल घेऊन त्यात गार व्हिपिंग क्रीम घाला आणि फेटा.
३) क्रीम थोडे फ्लफी व्हायला लागले की २ ते ३ बॅचमध्ये साखर घालून फेटत राहा. क्रीम व्यवस्थित फ्लफी झाले की फेटणे थांबवावे.
४) यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून लाकडी कालथ्याने फोल्ड करा. वेलची पूड घालणार असल्यास आता घाला. किंवा त्याऐवजी तुम्हाला मँगो इसेन्स घालायचा असल्यास २-३ थेंब घाला. नीट मिक्स करा.
५) जर तुमच्याकडे आइस्क्रीम मशीन असेल तर त्यात हे मिश्रण घालून घोटून घ्या.
६) जर आइस्क्रीम मशीन नसेल तर हे मिश्रण फ्रीझर सेफ प्लास्टिक किंवा मेटलच्या भांडय़ात घाला. साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रीझरमधून काढा. मिक्सरमध्ये फिरवा. असे १-२ वेळा करून परत फ्रीझरमध्ये ठेवा. आइस्क्रीम सेट झाले की सव्‍‌र्ह करा.

लिंबाचे सरबत

साहित्य :
२ वाटय़ा लिंबाचा रस (साधारण १२ मोठी रसाची लिंबे)
५ वाटय़ा साखर
दीड ते दोन वाटय़ा पाणी
२ चमचे मीठ

कृती
१) लिंबाचा रस गाळून घ्यावा, म्हणजे बिया आणि लिंबाचा किंचित राहिलेला गर निघून फक्त लिंबाचा रस उरेल.
२) साखर आणि पाणी एका पातेल्यात एकत्र करावे. गोळीबंद पाक करावा (महत्त्वाची टीप).
३) पाक तयार झाला की गॅस बंद करावा. थोडे निवू द्यावे. तयार पाकात लिंबाचा रस घालून ५ मिनिटे ढवळावे. नंतर पूर्ण निवेस्तोवर अधूनमधून ढवळावे.
४) तयार लिंबू सरबत काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवावे.
लिंबाचे सरबत करताना १ ग्लासभर लिंबाचे सरबत बनवायचे असल्यास एका ग्लासमध्ये २ मोठे चमचे लिंबाचा पाक घालावा. गार पाणी घालावे आणि मिक्स करावे. मिठाची गरज लागल्यास किंचित मीठ घालावे. तसेच बर्फही घालू शकतो.

टीप :
१) लिंबाच्या सरबतात चिमूटभर वेलची पूड घातली तरी छान फ्लेवर येतो.
२) गोळीबंद पाक म्हणजे पाकाचा थेंब गार पाण्यात टाकल्यावर टणक गोळी तयार झाली पाहिजे. पण लिंबू सरबताला मऊसर गोळी (रऋ३ इं’’ उल्ल२्र२३ील्लू८) तयार झाली तरीही चालेल.

आइस्क्रीम कॉकटेल
साहित्य :
२ स्कूप वॅनिला आइस्क्रीम
१ स्कूप मँगो आइस्क्रीम
१/४ वाटी स्ट्रॉबेरी क्रश
थोडे आंब्याचे तुकडे
पीच मिळाल्यास त्याचे थोडे तुकडे
डेकोरेशनसाठी :
४ ते ५ पिस्ता, बदाम
२ चमचे स्ट्रॉबेरी जेलीचे तुकडे
२ चमचे ग्रीन जेलीचे तुकडे
२ चमचे टूटीफ्रूटी
२-३ ग्लेझ चेरीज (पाकवलेल्या)
१ वेफर बिस्कीट
कृती :
१) मध्यम आकाराचा उभा ग्लास घ्यावा. त्यात तळाला थोडा स्ट्रॉबेरी क्रश घालावा. त्यावर वॅनिला स्कूप घालावा.
२) त्यावर जेलीचे तुकडे, ड्रायफ्रूट्स आणि थोडा अजून स्ट्रॉबेरी क्रश घालावा. फळांचे तुकडे घालावे. थोडे परत वॅनिला आइसक्रीम घालून वर मँगो आइस्क्रीमचा स्कूप घालावा.
३) सजावटीसाठी १-२ पिस्ता, १ बदाम, टूटीफ्रूटी आणि चेरीज लावावे. कडेने वेफर बिस्कीट खोचून लगेच सव्‍‌र्ह करावे.

वरील प्रमाण एका सर्व्हिंग आहे.

कैरीचे रायते

साहित्य :
१ वाटी कैरीचा गर
१/२ वाटी गूळ
१/२ चमचा लाल तिखट
चवीपुरते मीठ
१ चमचा तेल
२ कढीपत्ता पाने
१/४ चमचा जिरे
चिमूटभर हिंग
१ लाल मिरची
कृती :
१) कूकरमध्ये २-३ वाटय़ा पाणी घालावे. कूकरच्या डब्यात पाणी न घालता अख्खी कैरी ठेवावी. २ ते ३ शिट्टय़ा करून कैरी वाफवून घ्यावी. कूकरची वाफ जिरली की लगेच कैरी बाहेर काढून गरम असतानाच त्यातील गर काढून घ्यावा.
२) या गरामध्ये गूळ कुस्करून घालावा.
३) या मिश्रणात लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालावे. तेल, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरची घालून फोडणी करावी. ही फोडणी कैरीच्या गरावर घालावी.
सर्व नीट मिक्स करून जेवणात तोंडीलावणी घ्यावे.

टीप :
१) आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.

आवळ्याचे सरबत

साहित्य :
७ ते ८ आवळे ल्ल १ चमचा किसलेले आले ल्ल साखर ल्ल २ चमचे लिंबाचा रस

कृती :
१) आवळे कुकरमध्ये वाफवून घ्यावे. बिया काढून फक्त गर घ्यावा.
२) गराच्या दीडपट साखर घ्यावी. (गोड जास्त आवडत असल्यास साखर थोडी जास्त घेतली तरी चालेल)
३) साखर, आवळ्याचा गर, आले आणि लिंबाचा रस एकत्र करून घट्टसर पल्प बनवा.
हा पल्प प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावा.
सरबत बनवताना २ ते ३ चमचे पल्प घेऊन त्यात २ चिमटी मीठ घालावे. आणि ग्लासभर पाणी घालावे.

टिपा :
आवळ्याचे बारीक कण नको असल्यास पल्प चाळणीत गाळून घेतला तरी चालेल.
पल्प कोरडय़ा बरणीत भरावा. तसेच पल्प काढण्यासाठीही कोरडा चमचा वापरावा.
हा पल्प फ्रीझरमध्येही स्टोअर करता येतो. बर्फाच्या ट्रेमध्ये पल्प भरून फ्रीझ करावे. पल्प गोठला की ट्रेमधून काढून हे क्युब्ज प्लास्टिक झिपलॉक पिशवीत ठेवावे. आणि परत फ्रीझरमध्ये ठेवावे. जेव्हा लागेल तेव्हा एक-दोन क्युब्ज वापरून सरबत बनवता येईल. (जर वीजकपात/ लोडशेडिंग असेल तर ही पद्धत अवलंबू नका. फ्रिजमध्येच बरणीत भरून ठेवा. कारण पल्प गोठून वितळला आणि परत गोठला की त्याची चव उतरते.)

फालुदा

साहित्य :
८ स्कूप्स वॅनिला आइसक्रीम
१ ते दीड वाटी रोझ सिरप
२ चमचे सब्जा बी
१/२ लिटर थंड दूध
१ पॅकेट फालुदा शेवया
४ चमचे ड्राय फ्रूट्स, छोटे तुकडे
स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली
१/२ वाटी टूटी-फ्रूटीचे तुकडे
सजावटीसाठी चेरी

कृती :
१) फालुदा बनवायच्या किमान ५ तास आधी जेली बनवून फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावी. जेली बनवण्यासाठी जेली पावडर आणून पाकिटावरील कृती वाचून जेली बनवावी.
२) सब्जा बी फालुदा बनवण्याच्या किमान २ ते ४ तास आधीच १ वाटी पाण्यात भिजवून ठेवाव्यात.
३) १ लिटर पाणी उकळवावे त्यात फालुदाच्या शेवया घालून ४ ते ५ मिनिटे शिजवाव्यात. गरम पाणी काढून टाकावे व थंड पाणी घालून दुसऱ्या भांडय़ात थंड पाण्यासकट ठेवून द्यावे.
४) दूध आणि रोझ सिरप मिक्स करून घ्यावे. गोडपणा जर कमी वाटत असेल तर अजून थोडे रोझ सिरप घालावे. ढवळून तयार ठेवावे.
५) फालुदा बनवायच्या वेळेस ४ ग्लास घ्यावे. त्यात भिजवलेले सब्जा बी, जेली, शिजवलेल्या शेवया, आइस्क्रीमचा १ स्कूप, दूध आणि परत त्यावर १ स्कूप वॅनिला आइस्क्रीम घालावे. ड्रायफ्रूट्स आणि चेरीने सजवावे. लगेच सव्‍‌र्ह करावे. सव्‍‌र्ह करताना ग्लासमध्ये १ स्ट्रॉ आणि चमचा घालून द्यावा.

टीप : फालुदाच्या मधल्या लेयरमध्ये स्ट्रॉबेरी, द्राक्षं, अननसाचे तुकडे इत्यादी आंबटगोड चवीची फळे घातल्यास फालुदा दिसायला आकर्षक तसेच चवीला स्वादिष्ट लागतो.

कोहळ्याचे सांडगे
साहित्य :
२ किलो कोहळा ल्ल मीठ ल्ल हिंग ल्ल २ वाटय़ा घट्ट ताक

कृती :
१) कोहळा मधोमध चिरून आतील बियांचा भाग काढून टाकावा. कोहळ्याचे एक इंचाचे तुकडे करावेत. त्याला थोडं मीठ आणि हिंग चोळावे. प्लास्टिक पेपरवर पसरवून उन्हात वाळवावेत. १ ते २ दिवसांचे ऊन दाखवावे.
२) ताकात मीठ आणि थोडे हिंग घालावे. रात्री कोहळ्याचे तुकडे ताकात बुडवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे तुकडे वाळवायला पसरवा. चांगली ३-४ ऊन्हं दाखवावीत. खडखडीत वाळले की डब्यात भरून ठेवा.
तोंडीलावणी म्हणून हे तुकडे तेलात तळून घ्या.

टीप :
यामध्ये चवीसाठी आवडत असल्यास थोडे हिरवे तिखट, जिरेपूड घालू शकतो.
ताक चांगले आंबट असावे.

डाळींचे सांडगे

साहित्य :
१/२ वाटी चणा डाळ
१/४ वाटी मूगडाळ
२ चमचे उडीद डाळ
३ ते ४ मिरच्या, मध्यम तुकडे
८-१० लसूण पाकळ्या, मध्यम चिरून
१/२ टी स्पून जीरे
१/४ टी स्पून मीठ
कृती :
१) चणाडाळ, मूगडाळ, आणि उडीद डाळ पाण्यात रात्रभर भिजत घालावी.
२) नंतर पाणी काढून टाकावे. त्यात मिरची, लसूण, जिरे आणि मीठ घालावे. मिक्सरवर बारीक वाटावे.
३) वाटलेल्या डाळीची चव पाहावी. लागले तर मीठ घालावे. प्लास्टिकच्या कागदावर छोटे छोटे सांडगे घालावे.
४) उन्हात खडखडीत वाळवावे. साधारण २ ते ३ दिवसांचे कडक ऊन दाखवावे. वाळवलेले सांडगे भरून ठेवावेत. हे सांडगे मंद आचेवर तळून घ्यावेत. तळलेल्या सांडग्याची रस्सा भाजी करता येते.

किसाची आवळा सुपारी

साहित्य
१ किलो डोंगरी आवळे
४० ग्रॅम आले
१ चमचा जिरेपूड
चवीपुरते मीठ
कृती :
१) आवळे किसणीवर किसून घ्यावे. थोडेसे मीठ हलक्या हाताने लावून घ्यावे. मीठ कमीच लावावे, कारण आवळे वाळल्यावर चवीला मीठ पुढे लागते.
२) आले किसून घ्यावे. किसलेले आवळे, जिरेपूड आणि आले हलक्या हाताने मिक्स करावे. हे मिश्रण प्लास्टिकच्या पेपरवर पसरवावे. पातळ आणि समान थर करावा, म्हणजे लवकर वाळायला मदत होते.
३) आवळ्याचा कीस खडखडीत वाळेस्तोवर ऊन दाखवावे. काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीत हा कीस भरून ठेवावा.

कैरीचे सार

साहित्य :
१ कैरी
गूळ
१ चमचा तूप
१/४ चमचा जिरे
२ चिमटीभर हिंग
३ ते ४ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या ठेचून घ्याव्यात
१/४ वाटी कोथिंबीर
२ चमचे ओले खोबरे
चवीपुरते मीठ

कृती :
१) कैरी कुकरमध्ये दोन शिट्टय़ा करून वाफवून घ्यावी. कुकरची वाफ जिरल्यावर वाफवलेली कैरी बाहेर काढून कोमटसर असतानाच सोलून घ्यावी. नंतर आतील गर घट्ट असेल तर किसून घ्यावा.
२) जेवढा गर असेल तेवढा गूळ घालावा (किंचित कमी चालेल). हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करावे. कैरीच्या गराला दोरे असतील तर गर गाळून घ्यावा.
३) कढईत तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरचीचा ठेचा घालून फोडणी करावी. त्यामध्ये कैरीचा गर घालून गरजेइतपत पाणी घालावे. खोबरं आणि मीठ घालून उकळी काढावी.
उकळी काढून झाल्यावर चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सव्‍‌र्ह करावे.
हे कैरीचे सार गरमागरम तूप-भाताबरोबर छान लागते. तसेच नुसते प्यायलाही मस्तच!!

टीप :
कैरीला आंबटपणा कमी असेल तर गुळाचे प्रमाण कमी करावे.

साबुदाण्याच्या चकल्या

साहित्य :
१ वाटी साबुदाणा
बटाटे
१ वाटी वरी तांदूळ
जिरे
भरड वाटलेली मिरची
मीठ
कृती :
१) साबुदाणा भिजवावा. बटाटे शिजवून सोलून घ्यावेत. बटाटे व्यवस्थित कुस्करून घ्यावेत. जेवढा भिजलेला साबुदाणा असेल तेवढा बटाटय़ाचा लगदा घ्यावा. (१ वाटी साबुदाणा भिजून साधारण अडीच वाटी होतो. तेव्हा बटाटय़ाचा लगदा अडीच वाटय़ा घ्यावा.)
२) वरी तांदूळ दुप्पट पाणी घालून शिजवून घ्यावे.
३) भिजलेला साबुदाणा, बटाटय़ाचा लगदा आणि शिजलेला वरी तांदूळ यात जिरे भरड वाटलेली मिरची आणि मीठ घालून मळून घ्यावे. मिठाचे प्रमाण किंचित कमीच ठेवावे. म्हणजे मिश्रणाला मिठाची चव थोडी कमीच लागावी. कारण सपक मीठ घातले की चकल्या सुकल्यावर त्या खारट होतात.
४) चकलीच्या सोऱ्याला आतून तुपाचा हात लावून घ्यावा. मिश्रण सोऱ्यात भरून प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडाव्यात. चकल्या लहान आकाराच्या असाव्यात.
५) उन्हात वाळवाव्यात. एक बाजू झाली की पालटून दुसरी बाजू वाळवावी.

टीप :
जर साबुदाणा दिसायला नको असेल तर सर्व मिश्रण पूरणयंत्रातून बारीक करावे आणि मग चकल्या पाडाव्यात.

काकडीचे सूप

साहित्य :
२ मोठय़ा काकडय़ा
१/२ चमचा हिरवी मिरची पेस्ट
२ चिमटी मिरपूड
२ चमचे ऑलिव ऑइल
१/४ वाटी कांदा, बारीक चिरून
२ लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरून
१ चमचा लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
१) काकडय़ा सोलून घ्याव्यात. देठं काढून पातळ गोल चकत्या कराव्यात. दोन्ही काकडय़ांची चव पाहावी कारण कधीकधी काकडी कडवट असते.
२) पातेल्यात तेल गरम करावे. त्यात लसूण परतावी. नंतर कांदा परतावा.
३) कांदा नीट शिजला की काकडीच्या चकत्या आणि थोडे मीठ घालावे. मीडियम आणि लो च्या मध्ये आच ठेवावी. झाकण ठेवून १० मिनिटे काकडी शिजू द्यावी. १० मिनिटांनी काकडी एकदम मऊ झालेली असेल.
४) हे मिश्रण मिक्सरमध्ये घालावे. मिरची पेस्ट, लिंबू रस आणि मिरपूड घालून एकदम बारीक करावे. मिश्रणाचा पातळपणा अ‍ॅडजस्ट करावा लागला तरच २-३ चमचे पाणी घालावे.
सूप कोमटसर सव्‍‌र्ह करावे किंवा २ तास फ्रिजमध्ये ठेवून कोल्ड सूप म्हणून सव्‍‌र्ह करावे. सव्‍‌र्ह करताना बारीक चिरलेली काकडी आणि कोथिंबीर यांनी सजवावे.

पिकलेल्या आंब्याचा मोरंबा

साहित्य
२ वाटय़ा हापूस आंब्याचे लहान पिसेस (टीप १ आणि २)
४ वाटय़ा साखर
५ ते ६ लवंगा

कृती
१) मध्यम आकाराचे नॉनस्टिक पातेले घ्यावे. त्यात आंब्याचे तुकडे आणि साखर एकत्र करून मध्यम आचेवर गरम करत ठेवावे.
२) आंब्याचे तुकडे, लवंगा आणि साखर उकळवावे. साखर वितळली की गरजेपुरती कन्सिस्टन्सी येईस्तोवर आटवावे. खूप जास्तही आटवू नये कारण थंड झाल्यावर मोरंबा अजून घट्ट होतो.
तयार मोरंबा काचेच्या बरणीत भरून ठेवावा.

टिपा :
खूप जास्त पिकलेला आंबा वापरू नये. जास्त पिकलेला आंबा शिजताना विरघळतो, फोडी अख्ख्या राहत नाहीत.
आंबा सोलून २ सेंमी तुकडे करावे. आतील बाठ काढून टाकावी.
लवंगेऐवजी वेलचीही घालू शकतो.
कन्सिस्टन्सी पातळ ठेवली तरी चालेल, फक्त मोरंबा फ्रिजमध्ये ठेवावा.

स्ट्रॉबेरी मिल्कशेक

साहित्य
१५ स्ट्रॉबेरीज
२ वाटय़ा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम
१/२ वाटी थंड दूध
२ चमचे मिल्क पावडर
१ ते २ टीस्पून साखर
कृती :
१) मिल्क पावडर दुधात नीट मिक्स करावी.
२) दूध पावडर + दूध, साखर, चिरलेल्या स्ट्रॉबेरीज, आणि आईस्क्रीम मिक्सरमध्ये फिरवावे.
३) २ ग्लासेसमध्ये ओतावे. स्ट्रॉबेरीच्या चकतीने डेकोरेट करावे. लगेच सव्‍‌र्ह करावे.

टिपा :
स्ट्रॉबेरीवर बारीक बिया असतात. त्या कधी कधी मिक्सरवर बारीक वाटल्या जात नाहीत. अशा वेळी स्ट्रॉबेरी सुरीने हलकेच सोलून घ्यावे.
मिल्कशेक तयार झाल्यावर स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे त्यात घालावेत. मिल्कशेक पिताना मधेमधे चांगले लागतात.
स्ट्रॉबेरी मिल्कशेक ग्लासमध्ये ओतल्यावर वरती आईस्क्रीमचा स्कूप किंवा थोडे व्हिप्ड क्रीम घालू शकतो.

मँगो लस्सी

साहित्य :
१ वाटी दुध
दीड वाटी दही
१ वाटी आंब्याचा रस
४ चमचे साखर
१/४ चमचा वेलचीपूड (ऐच्छिक)
सजावटीसाठी बदाम पिस्त्याचा भरडसर चुरा
कृती :
१) दूध, दही, मँगो पल्प, साखर आणि वेलचीपूड एकत्र मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावी.
२ सवर्ि्हग ग्लासेसमध्ये लस्सी ओतावी. वरून पिस्ता बदामची पूड घालून सजवावे. फ्रिजमध्ये गार करावी आणि मग सव्‍‌र्ह करावी.

टिपा :
रेडीमेड मँगो पल्पमध्ये बऱ्यापैकी साखर असते. म्हणून ४ चमचे साखर वापरली आहे. घरी आमरस बनवून तोही लस्सीसाठी वापरता येतो. भरपूर गर असलेले २ हापूस आंबे घ्यावे. साल आणि आतील कोय काढावी. गर मिक्सरमध्ये बारीक वाटावा. जर गरामध्ये आंब्यातील तंतू असतील तर रस गाळून घ्यावा. आणि वरील कृतीप्रमाणे लस्सी बनवावी. आमरस घरी बनवल्याने लस्सीमध्ये साखर अजून घालावी लागेल.
शक्यतो पूर्ण स्निग्धांश (ा४’’ों३) असलेले दही वापरावे. घरी विरजले असल्यास उत्तम. ग्रोसरी स्टोअर्समध्ये जे ’६ ऋं३ किंवाों३ो१ी दही मिळते त्याचे टेक्स्चर कधी कधी गुळगुळीत असते त्यामुळे लस्सी चांगली लागत नाही.
लस्सीचा पातळ-घट्टपणा आवडीनुसार ठेवावा. त्याप्रमाणे दुधाचे प्रमाण कमी किंवा जास्त करावे.

कोल्ड कॉफी

साहित्य :
दोन वाटय़ा थंडगार दूध (किंवा हाफ अँड हाफ)
पाउण वाटी कंडेन्स मिल्क (आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो.)
१ चमचा इन्स्टंट कॉफी
थोडे बर्फाचे तुकडे

कृती :
१) २ चमचे कोमट दुधात कॉफी मिक्स करून घ्यावी. नंतर हे मिश्रण थंड दुधात घालावे.
२) कॉफी मिश्रित थंड दूध, कंडेन्स मिल्क ब्लेंडरमध्ये घालून घुसळून घ्यावे. (गोडपणा कमीजास्त हवा असेल तर त्यानुसार कंडेन्स मिल्कचे प्रमाण कमीजास्त करावे.)
३) दोन सवर्ि्हग ग्लासेस घ्यावेत. त्यात बर्फाचे तुकडे घालावे. त्यावर कॉफी ओतावी. वाटल्यास वरून थोडी कॉफी पावडर भुरभुरावी. लगेच सव्‍‌र्ह करावे.

टीप :
आवडीनुसार कंडेन्स मिल्क आणि कॉफीचे प्रमाण अ‍ॅडजस्ट करावे.

मस्क मेलन ज्यूस

साहित्य:
५ वाटय़ा खरबुजाच्या मध्यम फोडी (टीप)
१ वाटी संत्र्याचा ज्युस
१ चमचा लिंबाचा रस
१/२ चमचा किसलेले आले
किंचीत काळं मीठ
चवीपुरती साखर (ऐच्छिक)
कृती
१) खरबुजाच्या फोडी, संत्र्याचा रस, लिंबू रस, आलं आणि थोडं काळं मीठ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं.
२) मोठय़ा गाळण्याने किंवा स्वच्छ सुती कपडय़ाने व्यवस्थित गाळून घ्यावं. गाळण्यामध्ये जो चोथा उरला असेल तो दाब देऊन निट पिळून घ्यावा.
३) तयार ज्युसची चव पाहावी. शक्यतो साखर घालू नये, पण लागल्यास १ ते २ चमचे घालावी.
ज्युस फ्रिजमध्ये गार करावा किंवा लगेच प्यायचा असल्यास बर्फाचे २-३ तुकडे घालून सव्‍‌र्ह करावा.

टिपा
रेडिमेड संत्र्याचा ज्युस वापरल्यास साखर घालावी लागत नाही. पण जर तुम्ही घरीच संत्र्याचा रस काढणार असाल तर चांगली रसदार संत्री वापरावी तसेच थोडी साखर घालावी.
खरबुज व्यवस्थित पिकलेलं व गोड असावे म्हणजे चव छान लागेल. खरबुज कापताना आधी दोन भाग करावे, बिया काढून टाकाव्यात, सालं काढावीत आणि गराच्या फोडी कराव्यात.
जर घरी ज्युसर असेल तर तो वापरून छान ज्युस होईल.
आवडत असल्यास फ्रेश हर्ब्स जसे पुदीना, बेसिल वगैरेची
२-४ पाने चुरडून घालू शकतो.

आंब्याची कुल्फी

साहित्य
१ वाटी आंब्याचा रस
पाऊण वाटी साय
१ वाटी मिल्क पावडर
१ वाटी साखर
१ वाटी दूध
कृती
१) सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून काढावे.
२) प्लास्टिकच्या भांडय़ात भरून फ्रिजरमध्ये ठेवावे.
हे आइस्क्रीम थोडे कुल्फीसारखे होते.

उन्हाळी टिपा
कलिंगडाचा लाल भाग काढून खाली जो पांढरा भाग राहतो त्याचे मध्यम तुकडे करून कोहळ्याच्या सांडग्याप्रमाणे सांडगे करता येतात.
आईसक्रीम अल्युमिनियमच्या डब्यात सेट केल्यास लवकर सेट होते.
फणसातील आठळ्या उकडून आमटीत घालता येतात. तसेच उकडलेल्या आठळ्यांची भाजीसुद्धा करता येते.
भात उरला असल्यास त्यात तिखट, मीठ आवडीनुसार मसाले घालून मऊ मळावे आणि चकल्या पाडाव्यात. या चकल्या उन्हात खडखडीत वाळवून ठेवाव्यात. तोंडीलावणी म्हणून तळून खायला छान लागतात.
ल्ल लोणच्याला फोडणी घालताना फोडणी आधी गार होऊ द्यावी आणि मगच घालावी.
वैदेही भावे