जुन्या अलंकारांचा शोध घेताना सोवनी यांना लोकांचे कसकसे अनुभव आले हे प्रकरण तर मुळातून वाचण्यासारखं आहे. काही ठिकाणी संबंधित लोकांनी स्वत:च्या जबाबदारीवर धोका पत्करून सोवनी यांच्या अभ्यासाला हातभार लावला. सोवनी चित्तांग या पारंपरिक पण आता कालबाह्य़ झालेल्या दागिन्याच्या शोधात होते. तर एका बँक अधिकाऱ्यांनी त्यांना चित्तांग दाखवला. बँकेतली वर्दळ कमी झाल्यावर त्यांनी एका कपाटातून एक थैली काढली. तिच्यावरचं लाखेचं सील उघडलं. सोवनी यांना तो दागिना हाताळू दिला. त्याचं चित्र काढू दिलं. तेवढा वेळ ते अधिकारी तिथे थांबले. सोवनी यांचं काम झाल्यावर त्यांनी तशाच दुसऱ्या थैलीत तो दागिना ठेवला. पुन्हा लाखेनं ती थैली सील केली आणि कपाटात ठेवून दिली. ही म्हटलं तर नियमबाह्य़ गोष्ट होती. पण सोवनी यांच्या अभ्यासाचं महत्त्व लक्षात घेऊन त्या अधिकाऱ्यांनी तो धोका पत्करला होता. याउलट एका बडं प्रस्थ असलेल्या कुटुंबात सोवनी यांना दागिने बघायला, डिझाइन काढायला परवानगी दिली गेली. घरातले सगळे दागिने त्यांच्यासमोर आणून ठेवले गेले. आणि दुसऱ्या मिनिटाला सगळे दागिने पुन्हा उचलून आत नेले गेले आणि पुन्हा केव्हा तरी या असं सांगण्यात आलं. सोवनी यांना घरी नेऊन दागिने दाखवण्याच्या निमित्ताने दागिन्यांचं प्रदर्शनच मांडण्याचा तो प्रकार होता. तरीही सोवनी यांनी आपली चिकाटी न सोडता दागिन्यांची माहिती गोळा करण्याचं काम थांबवलं नाही. त्यांच्या या अथक परिश्रमांमुळेच आपल्या पारंपरिक दागिन्यांची सचित्र माहिती आज पुस्तकाच्या रूपात पुढच्या पिढय़ांना उपलब्ध झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2014 रोजी प्रकाशित
सोने आणि दागिने विशेषांक : आपल्या पारंपरिक दागिन्यांच्या शोधात…
‘आपले मराठी अलंकार’ हे डॉ. म. वि. सोवनी यांचं पुस्तक म्हणजे मूळचा त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध आहे. त्याचं नंतर पुस्तकात रूपांतर करण्यात आलं आहे.

First published on: 03-10-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold and ornaments special