सुखद निर्णय

विभावरी आपल्या बंगल्याच्या गच्चीवर उभी होती. संध्याकाळचे सात वाजले होते. दिवस लहान असल्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता. घरात ती एकटीच होती. तिचे आई-वडील क्लबच्या फंक्शनला गेले होते.

विभावरी आपल्या बंगल्याच्या गच्चीवर उभी होती. संध्याकाळचे सात वाजले होते. दिवस लहान असल्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता. घरात ती एकटीच होती. तिचे आई-वडील क्लबच्या फंक्शनला गेले होते. तिचा भाऊ मिलिटरीत कॅप्टनच्या हुद्दय़ावर जम्मू येथे राहत होता. पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन तो आपल्या आई-वडिलांच्या घरी आला होता.
परिसर अतिशय रम्य दिसत होता. चंद्राचे आगमन झाले होते. दिवस पौर्णिमेचा असल्यामुळे गच्चीवरून अतिशय लोभस व आकर्षक पूर्ण चंद्राचे दर्शन घडत होते. चांदण्या रात्री बंगल्यासमोर असलेली बाग अतिशय रम्य दिसत होती. मनमोहक फुलांचा सुगंध परिसरात दरवळत होता. अशा नयनरम्य व शांत वातावरणात नुकताच वॉश घेऊन आलेली विभावरी फारच ताजीतवानी व आकर्षक दिसत होती.
त्या नयनरम्य शांत वातावरणात गच्चीवर उभ्या असलेल्या विभावरीने एक गाडी बंगल्याच्या गेटसमोर उभी असलेली पाहिली. गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश त्या अंधारात उठून दिसू लागला. त्याच वेळेला गाडीचा हॉर्न वाजला. दारावरचा गार्ड लगबगीने गेट उघडायला पुढे आला. त्याने गेट उघडले. गाडीतील व्यक्तीचे आणि गार्डचे जुजबी बोलणे झाले व गाडी सरळ मार्गाने उजेड टाकत आत पोर्चमध्ये आली. क्षणभरात गाडीचे हेडलाइट बंद झाले व त्या पांढऱ्या शुभ्र मोठय़ा गाडीतून एक तरुण गाडीचे दार उघडून बाहेर आला. ती व्यक्ती प्रथमदर्शनी उंचपुरी दिसत होती. गाडीला लॉक करून तो तरुण आकर्षक पावले टाकत दारावर आला. विभावरी धावत खाली आली. घरातल्या नोकराने दार उघडले. विभावरीला समोर उभी असलेली बघून त्या व्यक्तीने थोडे स्माइल करून सांगितले, मी मेजर आदेश जोगळेकर. कॅप्टन अरुण वैद्यचा मित्र. अरुण घरी आहे का? विभावरी उद्गारली, अरुण काही कामासाठी बाहेर गेला आहे. त्याला घरी यायला वेळ होईल आपण आत या. आदेश घरात आला, हात पुढे करून त्याने तिच्याशी हस्तांदोलन केले व मंद स्मित करून व थोडे पुढे झुकून, व्हेरी ग्लॅड टू मीट यू! असे म्हणून एक इन्व्हिटेशन कार्ड पुढे केले. विभावरी त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने व आकर्षक आविर्भावाने भारावून गेली.
आदेशच्या डोळ्यात तेज, नम्रता व आकर्षकता होती. आदेश युनिफॉर्ममध्ये आला होता त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिकच उठून दिसत होते. दोघांची नजरानजर झाली. विभावरीही गोरीपान व सुंदर होती. उंच, सफेद सॅटीनचा, मोठी लाल रंगाची फुले असलेला सलवार खमीजवर तिने त्याच रंगाचा दुपट्टा घेतला होता व तिचे सुंदर केस तिने पाठीवर मोकळे सोडले होते. त्यामुळे ती अधिकच फ्रेश दिसत होती.
अरुणला देण्यासाठी त्याने इन्व्हिटेशन कार्ड दिले व सर्वाना यायला सांगून त्याने तिचा निरोप घेतला. त्याच्या बोलण्यामध्ये खूप आर्जव होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेली विभावरी त्याच्याकडे एकटक बघत राहिली. आदेश परत फिरला व तशीच रुबाबात पावले टाकत तो गाडीकडे निघून गेला. बघता बघता गाडी पोर्चमधून निघून गेली. परंतु विभावरी आपले भान विसरून त्या बंद होणाऱ्या गेटकडे बघत राहिली. क्षणभरात तिने स्वत:ला सावरले. ती आपल्या बेडरूममध्ये आली. ती आपल्या ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहिली व आरशात स्वत:ला निरखू लागली. स्वत:च्या प्रसन्न व सुंदर व्यक्तिमत्त्वाकडे बघून ती स्वत:वरच खूश झाली. आता तिला दिवसरात्र स्वत:ला पाहण्याचा छंद जडला. वेगवेगळे ड्रेसिंग करून ती बाहेर पडू लागली आणि आदेशच्या विचारात रंगू लागली.
आमंत्रण पत्रिकेप्रमाणे पार्टीचा दिवस उजाडला. विभावरीच्या भावाने विभावरीला घेऊन पार्टीला जाण्याचा बेत ठरविला. विभावरीनेही तात्काळ आपली संमती दिली. पार्टीला जाण्यासाठी सर्व मेकअप करून तिने गुलाबी रंगाचा शरारा परिधान केला. त्या मुलायम शराऱ्यात स्टेपकट केलेली विभावरी अतिशय खुलून दिसू लागली. तिने पायात त्याच रंगाचे गुलाबी हिल्स असलेले सँडल्स घातले. आदेशला भेटण्याच्या सुखस्वप्नात ती रंगून गेली.
भावाबरोबर ती पार्टी हॉलमध्ये आली. सुगंधी फुलांनी सजविलेल्या हॉलमुळे व सुगंधयुक्त सुवासामुळे तेथील वातावरण हे अधिकच विलोभनीय झाले होते. सगळीकडे अपटुडेट ड्रेसमधील तरुण व आकर्षक विविध ड्रेसमधील सुंदर तरुणींमुळे वातावरण अधिकच उठून दिसत होते.
तेवढय़ात विभावरीचे लक्ष लांबून येत असलेल्या आदेशकडे गेले. त्याने सफेद शर्ट, नेव्ही ब्यू कलरची पॅन्ट व लाल टाय घातला होता. त्याच्याबरोबर मध्यम उंचीची, सडपातळ व गोरी सुंदर स्त्री होती. तिने मोतिया रंगाची साडी नेसली होती व त्याच रंगाचा स्ट्रिप असलेल्या ब्लाऊज घातला होता. तिच्या कानात हिऱ्याचे लांब इयररिंग व गळ्यात चमकणारे हिऱ्याचे मंगळसूत्र व हातात हिऱ्याच्या बांगडय़ा होत्या. ती फारच लोभस दिसत होती. सोनेरी उंच टाचांच्या चपलांमुळे तिची चाल अतिशय डौलदार दिसत होती. बघता बघता ते दोघे विभावरी व तिचा भाऊ कॅप्टन अरुण वैद्य यांच्याजवळ आले. अरुणशी हस्तांदोलन करून मेजर आदेशने त्याच्याबरोबर असणाऱ्या स्त्रीचा परिचय करून दिला, ही माझी पत्नी सोनाक्षी. आमचे लग्न एक महिन्यापूर्वी झाले असून त्याप्रीत्यर्थ ही पार्टी देत आहे.
आदेशचे हे वाक्य ऐकून विभावरीवर मानसिक आघात झाला. तिच्या पायातील त्राण गेले. तिच्या हातापायांना मुंग्या येऊ लागल्या, डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना तिने महत्प्रयासाने थोपवून धरले. तिचे हातपाय त्या मानसिक आघातामुळे थरथरू लागले. तिच्या सुखस्वप्नांचा, मनोरथांचा चुराडा झाला. त्यामुळे ती काही क्षण अपमानितसुद्धा झाली; पण स्वत:ची मानसिक अवस्था लपवून तिने सोनाक्षीला हस्तांदोलन केले व सोनाक्षीनेसुद्धा मंद-मंद हसून त्या हस्तांदोलनाचा स्वीकार केला. दु:खी विभावरी हस्तांदोलन करून स्तब्ध उभी होती. तेवढय़ात तिचा भाऊ तिला घेऊन एका व्यक्तीजवळ येऊन थांबला. मध्यम उंचीची व मजबूत बांधा असणारी ती व्यक्ती तिशीच्या घरातील होती. त्या व्यक्तीच्या हातात श्ॉम्पेनचा ग्लास होता. त्या व्यक्तीने लाइट ब्लू रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली होती. तसेच सफेद रंगाचा टाय लावून ती व्यक्ती सर्वाबरोबर बोलत उभी होती.
कॅप्टन अरुणने विभावरीला त्या व्यक्तीचा परिचय करून दिला. हे डॉक्टर सुदेश गुप्ते, हे हार्ट स्पेशलिस्ट असून यांचे कफ परेडला स्वत:चे नर्सिग होम आहे. हे लहान वयात अतिशय यशस्वी डॉक्टर असून हे माझे व आदेशचे मित्र आहेत. डॉ. सुदेशने विभावरीला नमस्ते करताना किंचित मंद स्मित केले. विभावरीनेही त्यांना नमस्ते केले. तिचे लक्ष त्यांच्या निर्मळ व स्वच्छ भाव असलेल्या डोळ्यांकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर सुशिक्षितपणाचे, सज्जनतेचे व शांत स्वभावाचे तेज होते. त्यांच्या आवाजात आत्मविश्वास होता. त्यांच्या चेहऱ्यावरील सज्जनता, शांती व निर्मळ आविर्भावाने का कोण जाणे पण तिला खूप बरे वाटले. रात्रभराच्या अंधारातून पहाटेच्या वेळेला निर्मळ स्वच्छ दवबिंदू पाहून जसे शांत व प्रसन्न वाटते, त्याचप्रमाणे तिलाही खूप शांत वाटले.
अशातच पार्टी संपली, तिच्या भावाने घरी परतताना तिच्यापुढे डॉ. सुदेशशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तिला निर्णय घेण्यासाठी एक-दोन दिवस वेळ दिला. विभावरी आता काही क्षणांपूर्वी असलेली विभावरी न राहता तिच्यामध्ये धीर गंभीरपणा आला व मनोमन तिने या निर्णयाला होकार दिला.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Happy decision

Next Story
जेरुसलेम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी