किशोरवय हा खरं तर मुलांचा पुनर्जन्म असतो. त्या वयात घरातून जे प्रेम, माया, ममता मिळते त्यावर मुलांचा पुढच्या आयुष्याचा डोलारा उभा राहतो. पण आपल्याच समस्यांमध्ये गुरफटून गेलेल्या काही पालकांना मुलांना समजून घेण्याची जाणीवच होत नाही आणि…

आज अवतीभवती पाहावं, तर किशोरवयीन मुलं अगदी बेजबाबदार, नीतिमूल्यं धुडकावून लावणारी, स्वार्थी आहेत; हेच चित्र खरं वाटावं असं दिसतं. समोरचं हे दृश्य अनेकदा मुलांचे आई-बाबा, त्यांचे शिक्षक, आजी-आजोबा व शेजारी, आप्त असे सामाजिक पालक यांनी इतरांसमोर मांडलेलं असतं. ते संपूर्णपणे चूक असतं, असं नाही. म्हणता येणार; पण त्या चित्राकडे, त्यातल्या प्रत्येक किशोरवयीन मुलाकडे निरखून, आस्थेनं पाहू गेल्यास त्या त्या मुलाच्या विस्कटलेल्या व्यक्तिमत्त्वाला त्याचे पालकच जबाबदार आहेत, हे लक्षात येतं. तेव्हा आता आपण क्रमाक्रमानं असे पालक व मुलांसंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका याकडे थोडं खोलात जाऊन पाहू या.
किशोरवय हा एका अर्थी मुलांचा नवा जन्म असतो. तान्हं मूल पराकोटीच्या जिज्ञासेनं अवतीभवती पाहात असतं, त्या घडामोडींचा अर्थ लावायचा प्रयत्न करत असतं, त्यावरून काही ठोकताळे मनात बांधत असतं, कारण त्याला तिथं सामावून जायची इच्छा असते. किशोरवयात हेच सारं घडत असतं, पण बालवयात आलेल्या विविध अनुभवांमुळे मुलांची पाटी कोरी नसते. त्या अनुभवांनुसार मुलं कसं वागायचं ते ठरवत असतात. जाचक, मन दुखवणारं काही वाटय़ाला आलं तर तान्हं मूल अगतिक असल्यानं रडून आपलं लक्ष वेधू जातं, मदत मागतं. किशोरवयीन मुलांना स्वत:च्या ताकदीबद्दल थोडी अधिकच खात्री वाटत असते म्हणून ती ‘अरे’ ला ‘का रे’ करू जातात. त्यामुळे ती उद्धट, बेपर्वा वाटतात. फारच वैफल्य जाणवलं अंगातल्या रगीमुळे ही मुलं वेडंवाकडं साहस करू जातात. जिवाची पर्वा न करता ती वाकडय़ा वाटेवर चालू पाहतात.
हे सारं खूप दु:खद असतं. ‘हेची फल काय मम तपाला?’ असं वैफल्य त्यांच्या आई-बाबांना वाटतं. आप्तस्वकियांची सहानुभूती त्यांना मिळत राहते. पण खरं तर त्याहून बरंच जास्त दु:ख ही बदनाम झालेली मुलं सोसत असतात. साऱ्यांचंच प्रेम, सहानुभूती गमावल्यावर ती एकाकीपणाच्या गर्तेत खोल, खोल जात राहतात. वेळीच योग्य त्या मदतीचा प्रेमळ हात न मिळाल्यास ही मुलं खरोखरच वाया जातात.
सौमित्र आई-बाबांचा एकुलता एक मुलगा. मुंबईतल्या एका चांगल्या शाळेत जाणारा. स्वभावानं प्रेमळ, सर्वाना मदत करू जाणारा. परवा मला म्हणाला, ‘‘मला आजकाल घरीच जावंसं वाटत नाही. बाबा त्यांच्या व्यवसायातील ताणांमुळे सदैव चिडलेले. घरी येताच मला नाही नाही ते बोलतात. सतत सांगतात, ‘‘मी इथं जेवढा घाम गाळतो तेवढं या शहरात कुणीच काम करत नाही. मी सर्वाधिक यशस्वी माणूस आहे. मी तुझ्यासारखा, तुझ्या आईसारखा आळशी नाही. तुला आयुष्यात काही करून दाखवायचं आहे की तुझ्या मामामासाखं वाया जायचंय?’’ यावर मी काय बोलणार? मी छान मार्कस् मिळवतो, चित्रं काढतो, बाग बनवतो. शाळेत मुलांत, शिक्षकांत मी लोकप्रिय आहे. मग मी चांगला बनण्यासाठी प्रयत्न करतोय, हे बाबांना का दिसत नाही? मला आणि आईला घालूनपाडून बोलताना त्यांना तीच सवय लागली आहे. परवा माझे आजोबा आई यंदा माहेरी आली नाही म्हणून गावाहून एवढय़ा उन्हातान्हातून आले. त्यांचा पाहुणचार राहिला बाजूला. बाबा त्यांना इतकं अद्वातद्वा बोलले की, ते रडत रडत परत गेले. आई नंतर चार दिवस जेवू शकत नव्हती. ती बाबांच्या आजारी आईची सेवा प्रेमानं करते, माझ्या आत्या तिला वाटेल तसं बोलतात, हुकूम सोडतात, तरी ती त्यांना दुखवत नाही. ते बाबांच्या लक्षात येत नाही. कधी विषय निघालाच तर बाबा त्यांची बाजू घेतात. मला कळत नाही की, बाबांच्या इतर नातेवाइकांप्रमाणे मी आणि आई त्यांचे जवळचे नातेवाईक आहोत असं बाबांना का वाटत नाही? मला आजकाल या रागानं धुमसणाऱ्या घरापासून दूर निघून जावंसं वाटतं.’’
सौमित्रच्या बाबांनी या घडीला स्वच्छ नजरेनं जगाकडे पाह्यला हवं. जे सौमित्रला जमतंय ते त्यांच्या बाबांना जमणार नाही का? या उद्योगनगरीत कितीतरी कर्तृत्ववान माणसं आहेत. त्यांच्याकडे कौतुकानं पाह्यलं तर बाबांना त्यांच्या यशाचा गर्व करावासा वाटणार नाही. त्यांचा अहंकार नाहीसा हाईल. तेव्हा मग त्यांना वैयक्तिक पातळीवरील स्वत:चं नातेसंबंध जोपासण्यातलं अपयश जाणवू शकेल आणि ते स्वत:च्या स्वभावाला मुरड घालू शकतील.
ते जर त्यांनी नाही केलं, तर काय होईल? अशांत घरात आज ते आणि सौमित्रची आई यांचं नातं खिळखिळं झालंच आहे. पण पुढे सौमित्र बाहेरची वाट शोधेल. तिथं प्रेमाचा शोध तो घेईल. या शहरात सौमित्र नशीबवान असेल, तरच एखादा छान मित्र आणि त्याचं कुटुंब सौमित्रला पोटभर प्रेम देतील. सौमित्र चांगलाच राहील. पण ही शक्यता लाखात एकाच्या वाटय़ाला येणारी.
आजघडीचं वास्तव पाहिलं, तर वेगळय़ाच शक्यता खऱ्या ठरणं अधिक संभवनीय आहे. सौमित्रचं अभ्यासातलं लक्ष मग उडेल. वाईट संगतीचं आकर्षण अशा मुलांना प्रकर्षांनं वाटतं. त्या संगतीत तो किती आणि कसा भरकटेल ते कुणी सांगावं?
नकुल हा एक सुखवस्तू कुटुंबातला मुलगा. त्याची आई आणि बाबा बाहेरच्या जगात सर्वाना आदरणीय वाटतात. बाबा मोठे ऑफिसर होते आणि आई शिक्षिका. वडील तापट स्वभावाचे, शिस्तशीर असे त्यांच्या आप्तांना वाटतं. शाळेत सर्वाची आवडती शिक्षिका असणारी त्याची आई पण तिची घरात वावरणारी प्रतिमा अगदी या उलट. घरकामात पराकोटीची बेपर्वाई. वडील सांगू गेले, तर स्वत:ची चूकच नाही असं ठामपणे वाटल्यानं आरडाओरडा करणारी. घरातल्यांपेक्षा मैत्रिणी, करमणुकीचे कार्यक्रम यात रमणारी. या आत्ममग्नपणाच्या जोडीला मुलांकडून उत्तम शालेय यशाची अपेक्षा करणारी. त्यांचा अभ्यास घेताना तिचं सर्वस्वी वेगळं रूप प्रकटे. ती मुलावर सतत चिडलेली. हातात मिळेल ते लाटणं, केरसुणी घेऊन त्याला मारझोड करणारी. परीक्षेचा निकाल लागल्यावर मुलाची कठोर निर्भर्त्सना करणारी. सर्वात वरकडी म्हणजे प्रत्येक रागाच्या उद्रेकानंतर स्वत:च रडून रडून इतरांची सहानुभूती मिळवू पाहणारी. बाहेरच्या जगात वावरताना इतरांचं दु:ख पाहून हिचे डोळे दुथडी वाहू लागत. त्यामुळे साऱ्यांना ती खूप संवेदनशील, हळवी वाटे. त्यांची सहानुभूती मिळवणं मग तिला सोपं जाई. मग त्या जगातले सारेच तिच्या नवऱ्याला, मुलाला नावं ठेवत. मुलाला तर सारे उपदेशच करत बसत. यातून निष्पन्न काय झालं? किशोर वयात नकुल उद्धट बनला. तो बेजबाबदारपणे वागू लागला. त्यानं शिक्षण पूर्ण केलं. पण तो पुढे व्यसनाधीन झाला. त्याच्या बायको-मुलांची परवड झाली.
तरुणची कहाणी आणखी वेगळी. त्याचं कुटुंब खूपच श्रीमंत. आजोबांचा मोठा उद्योग-व्यवसाय. तरुणचा मोठा काका खूप हुशार, कर्तबगार. त्या कर्तबगारीतून येणारं कर्तेपण त्याच्या बोलण्यावागण्यातून सतत दिसे. तरुणचा बाबा अगदीच सामान्य बुद्धीचा. शिक्षणात अयशस्वी झाला. याला कारण त्याची आई. त्याच्या आईनं त्याचे कधीही लाड, कौतुक केलं नाही. सतत त्याची तुलना मोठय़ा भावाशी करून त्याचा पाणउतारा ती करत राहिली. त्यामुळे तरुणच्या बाबामध्ये प्रचंड न्यूनगंड आला. तरुणची आई गरीबाघरची. ती सासरच्या श्रीमंतीनं आणि सासूच्या सवतसुभ्यानं दडपूनच गेली. जावेशी सतत भांडणं, धुसफूस. लहानपणी तरुणला काका, आजोबा खूप आवडत. आजीही त्याचे लाड करायची. पण त्याचे आई-बाबा सतत त्यांच्या डोक्यावर कसलं ना कसलं खापर फोडताना तो पाही. तो पार गोंधळून जाई. हळूहळू तो किशोरवयात आला, तोवर त्याच्या आई-बाबांनी इथल्या व्यवसायातला हिस्सा विकूत ते परगावी स्थायिक झाले. त्याच्या आई-बाबांना सावरणारे, मुलावर मायेची पाखर घालणारं कुणीच तिथं नव्हतं. स्वत:च्या अपयशाचं खापर फोडायला त्याच्या आईला तिथं सासू, सासरे, दीर, जाऊ कुणीच नव्हतं. त्याच्या बाबांना व्यवसाय जमेना. तरुणचं अभ्यासातलं लक्ष उडतंयसं पाहून आजोबांनी त्याला त्यांच्याकडे आणलं. काका-काकूनं त्याचं शिक्षण पार पाडलं. तरुण आज नोकरी करतोय. पण तो सदैव गोंधळलेल्या मन:स्थितीत वावरत असतो. त्याच्या ठायी त्याच्या सर्व पालकांबाबत वैफल्याचीच भावना आहे. कृतज्ञता तर त्याच्या ठायी रुजलेलीच नाही. त्यामुळे तो जगाकडे अविश्वासानं पाहतो. त्याला निरपेक्ष प्रेमाचा अनुभव बालवयात न मिळाल्यानं किशोरवयात दैववशात त्याला लाभलेली आजोबा, काका-काकूंची मायेची पाखर त्याच्यात आतवर पोहोचलीच नाही. तो स्वार्थी, आप्पलपोटा झालेला आहे. त्याला सारं जग त्याच्या स्वत:च्या अपेक्षा पूर्ण करायलाच बांधिल आहे, असं वाटतं. त्याचा त्यापायी सदैव भ्रमनिरास होत राहतो. त्याचा आत्मविश्वास पार खच्ची झाला आहे. आपल्याला काहीही करणं नीट जमणारच नाही असं त्याला वाटतं. त्याचा दोष तो नशीबाला देतो.

किशोरवयातील मुलांशी वागताना पालकांनी स्वत:तील त्रुटी प्रयत्नपूर्वक काढून टाकल्या तर त्या प्रयत्नांतून मुलांना पालकांची त्याच्यावरच्या प्रेमातली बांधीलकी प्रत्ययाला येते.

किशोरवयीन मुलांचं वर्तन हे असं त्यांच्या बालवयात घरात झालेल्या जडणघडणीवर अवलंबून असतं. बालवयाचं एक फार छान असतं. या वयात मुलांचं विश्व हे त्याच्या घरापुरतंच असतं. त्यातच त्याचं जग सामावलेलं असतं. घरातले कुटुंबीय, आप्त त्याचे आदर्श असतात. या मुलांच्या जडणघडणीवर त्याच्या पालनकर्त्यां पालकांचा परिणाम सर्वाधिक होत राहतो. मुलांचे आई-वडील हे मुलांचे सर्वाधिक महत्त्वाचे पालक असतात. मुलांचं निकोप संगोपन ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते.
घर हेच जग असलं की, या वयात तिथली नातीगोती, माणसाचे परस्परांशी व्यक्त होणारे नातेसंबंध, त्यातील प्रेम, राग, लोभ, क्षमाशीलता अशा सर्व बऱ्यावाईट भावनांबाबतची समज यातून मुलं त्यांच्या वर्तणुकीबाबत आडाखे बांधत असतात. घरातले नातेसंबंध समंजस, प्रेमळ, प्रत्येकाला त्याच्या/तिच्या गुणदोषांसकट स्वीकारणारे, परस्परांच्या स्वातंत्र्याची कदर करत कर्तृत्वाला वाव देणारे असले की, मुलांच्या मनात बाह्य जगाविषयी एक विश्वसनीय चित्रण साकारत जातं, असे सर्व अनुभव वारंवार येत गेले की त्याचेच ठसे मुलांच्या मेंदूत पक्के होतात. म्हणजेच प्रत्येक प्रसंगात त्या त्या अनुभवाची नोंदणी मेंदू तात्पुरता स्मृतीत करतो. पण वारंवार असेच अनुभव आले की स्वस्थता लाभताच (झोपेत ही स्वस्थता लाभते) मेंदू त्या तात्पुरत्या स्मृतीची दीर्घकालीन स्मृतीत नोंद आणि साठवण करतो. हे पक्के ठसे बहु प्रसवा मुलांच्या दीर्घ स्मृतीच्या आठवणीत सगळा दैनंदिन जीवनसंघर्ष आनंदमय आठवणींनी भरलेला असला की, मुलं कुठल्याही परिस्थितीत आनंदात राहतात. आनंददायी हितकारक पर्याय त्यांना सहज दिसतो. मुलं किशोरवयात जेव्हा स्वत:च्या नजरेनं जग पाहू लागतात, त्याचा अर्थ, संगती लावू पाहतात, तेव्हा त्यांचा त्या त्या घटनेचा मुलांचा प्रतिसाद मुलांपाशी बालवयात जमलेल्या स्मृतीनुसार असा ठरत जातो.
किशोरवयाची एक महत्त्वाची खासियत या टप्प्यावर पालकांनी समजून घ्यायला हवी. अनेक पालक दुराग्रही, आत्मकेंद्री, बेपर्वा असतात, पण त्यांचं स्वत:च्या मुलांवर खूप प्रेम असतं. मुलांवर आपल्या स्वभावाचे असे दुष्परिणाम होतात असं शास्त्र जेव्हा त्यांना सांगू जातं, तेव्हा ते व्याकूळ होतात. पण शास्त्र असंही सांगतं की, किशोरवय हा जणू नवा जन्म आहे. किशोरवयातील मुलांशी वागताना पालकांनी स्वत:तील वर सांगितलेल्या त्रुटी प्रयत्नपूर्वक काढून टाकल्या तर त्या प्रयत्नांतून मुलांना पालकांची त्याच्यावरच्या प्रेमातली बांधीलकी (कमिटमेंट) प्रत्ययाला येते. इथवर पालकांच्या वर्तणुकीमुळे मुलांवर झालेल्या आघातांची कायम नोंद असलेले त्यांच्या मेंदूतील ठसे या प्रत्ययामुळे पुसले जातात. आपल्या मुलांचं किशोरवयाच्या टप्प्यावरचं संगोपन पालकांना स्वत:ला अधिक चांगलं माणूस बनायची संधी देतं. ती त्यांनी घेतली तर मुलांशी त्यांचं नातं प्रेमपूर्ण बनत जातं. घरात शांती, समता प्रस्थापित होते. ही मुलं प्रौढ वयात येतात. तेव्हा त्यांचं प्रेमभरलं कुटुंब ती साकारताना दिसली की, त्यांच्या उतारवयातल्या आई-वडिलांना आपलं जगणं कृतार्थ झालंसं वाटतं.