प्रोची आणि काम्या अशा पुटिन या राजाच्या दोन राण्या होत्या बरं का बालदोस्तांनो. पैकी काम्या ही मुळी श्रीमंत राजघराण्यातच जन्माला आली होती. सुंदर तर इतकी की नुसते बघताच खूश होऊन लोक म्हणत. ‘वा! राणी असावी तर अशी!’
पुटिन राजा मोठा चतुर होता. लोकांची मने जिंकून घेण्यासाठी त्याने प्रजेपैकीच एक अगदी गरीब आणि अनाथ तरुणी आपली बायको म्हणून निवडली होती. तीच प्रोची.
लोक म्हणू लागले, ‘‘वा! राजा असावा तर असा! पाहा पाहा, लोकांची किती पर्वा आहे याला! गरीब, अनाथ प्रोचीला ‘राणी’ केली. धन्य! धन्य!’’
पण बालदोस्तांनो, राणीच्या महालात प्रोची मात्र फार एकटी पडली होती. सारी सुखे हात जोडून समोर उभी होती, पण काम्या तिच्यासंगे बोलत नसे. राजा पुटिन तिच्या महालात पाऊलसुद्धा टाकीत नसे. तुम्हाला कुणी एकटं पाडलं तर तुम्हीसुद्धा किती कष्टी होता ना माझ्या लाडक्या दोस्तांनो! तशी राणी प्रोची फार फार दु:खी होती.
‘‘राजा, तू माझ्याशी बोलत का नाहीस? मग तू माझ्याशी लग्न तरी का केलेस? कशासाठी?’’ तिने एकदा राजाची वाट अडवून विचारलेच.
‘‘अगोदर राजमहालाचे नियम शिका. महाराज म्हणायला शिका. स्वत:चे रूप, विद्या..बघा, आणि लग्न म्हणाल तर मी ते आपल्याशी लोकप्रियतेसाठी केले.’’ असं म्हणत त्याने प्रोचीला जवळ जवळ ढकलूनच बाजूला केले. प्रोचीकडे बघून काम्या खदखदून हसली. ‘‘प्रोची, अगं तू दळिद्री नि काळुंदी! राजा तुला कसा पसंत करणार? अडाणी कुठची!’’
राजा पुटिनच्या हातात हात गुंफू न काम्या तिथून निघून गेली. प्रोची फार शरमिंदी झाली. आपले हे लग्न राजाने केवळ प्रजेचे मन जिंकण्यासाठी केले आहे हे जेव्हा तिला कळले तेव्हा आपली दासी नोरिटा हिला प्रोची म्हणाली, ‘‘कशाला गं मी इथे राहू? मी असे अपमानित जिणे का गं जगू? नोरिटा, मी गरीब नि अनाथ असले तरी स्वाभिमानी आहे. मी एक चिठ्ठी देते, ती राजाला दे. मी हा महाल, हे वैभव, सगळं स्वखुशीने सोडून जातेय..’’
तिने खरोखरच त्या वैभवाचा त्याचा केला. माझ्या लाडक्या बालदोस्तांनो, आपल्याकडे एक म्हण आहे की लुळय़ा-पांगळय़ा श्रीमंतीपेक्षा हट्टी कट्टी गरिबी बरी! तिलाही ती अपमानित श्रीमंती नको वाटली.
प्रोची राजमहाल सोडून दूर दूर रानावनात गेली. तेथे एक पडीक वाडा होता नि त्या पडिक वाडय़ात एक धर्मगरू आपल्या काही अनुयायांसह राहात होता. ‘‘फादर, मी पुटिन राजाची राणी होते. नावडती राणी. मी आता त्या पदाचा त्याग केला आहे. मला उत्तम मार्ग दाखवा फादर. सत्याचा, शांतीचा, सुखाचा मार्ग.’’
‘‘जरूर! जरूर! तुझं नाव काय बाळ?’’
‘‘प्रोची! प्रोची, फादर!’’
‘‘आता मी सांगतो ते शांतचित्ताने ऐक प्रोची. आजपासून तू याच ठिकाणी राहशील.’’
‘‘फादर, मलाही आश्रयाची नि आधाराची फार गरज आहे. पण मला फुकट आधार नको आहे फादर. आपण सांगाल ते काम अगदी कष्टमय असले तरी मी करेन. मी आता पुटिन राजाची राणी नाही. सर्व सुखांचा त्याग केलाय मी फादर. स्वत:च्या इच्छेने मी आता एक सर्वसामान्य तरुणी आहे.’’
‘‘ऐक मुली, तुझा निर्धार उत्तम आहे. पण प्रथम मी सांगतो ती दिनचर्या पाळायची.’’
‘‘सांगा फादर. मी आज्ञापालन करेन. आपली उत्तम विद्यार्थिनी बनायचे आहे मला.’’
‘‘पहाटे पाच वाजता उठायचे. समोर जो पहाड दिसतो आहे तेथे जलद चढायचे. पहाडाच्या शिरोभागापर्यंत जाऊन सूर्याचे बिंब दिसेपर्यंत मन एकाग्र करावयाचे. तो केशरी गोळा आकाशात दिसू लागताच त्याच्याशी एकरूप होऊन तेजाची प्रार्थना करायची. सूर्य सतत उद्योग करतो. तीच प्रेरणा घ्यायची आणि मग खाली परत यायचे. स्वच्छ स्नान आणि मग फलाहार. मग आपल्या या वास्तूचा सर्व परिसर स्वच्छ झाडून लखलखीत करायचा. मग आपल्या धर्मग्रंथाची पारायणे करायची. धर्मगं्रथात प्रेम, करुणा, क्षमाशीलता, सद्भाव आणि सदाचरण यांचा वारंवार उल्लेख येतो. आपले जीवन या पंचगुणांनी काठोकाठ भरावे म्हणून प्रयत्नशील व्हावयाचे. एवढेच नव्हे तर या पंचगुणांचा आजूबाजूच्या गावात जाऊन प्रसार आणि प्रचार करावयाचा. सायंकाळी स्वच्छ स्नान, भोजन सूर्यास्तापूर्वी करावयाचे आणि मग सुंदर सुंदर गीते गात प्रभूची स्तुती करावयाची. कबूल?’’
‘‘सारे सारे कबूल फादर. पण दुपारी भोजन?’’
‘‘जर राहवले नाही तर पेज, डाळींची सत्त्वे, फळे आणि कोशिंबीर खायची. फ्रुट सॅलडही उत्तम.’’
माझ्या लाडक्या बालदोस्तांनो, प्रोचीने साऱ्या नियमांचे उत्तम पालन केले. तिच्या रोज जलद पहाड चढण्यामुळे अंगावरली अनावश्यक चरबी सरसर ओसरली. रोज केलेल्या सूर्याच्या प्रार्थनेमुळे तिच्या कांतीवर तेज चढले, कारण तिला ‘व्हिटॅमिन डी’ मिळत होते. फलहार, फळांची कोशिंबीर, पेज या तेल तूप नसलेल्या आहाराने शरीर तेज तर्रार झाले. सडसडीत राहिले आणि डाळींच्या सुपामुळे प्रथिने मिळत गेली. धर्मशास्त्राचा अभ्यास करताना मुखास नि वाणीस तेज प्राप्त झाले आणि मनाचा आरसा लखलखीत झाला. राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार हे पाचही शत्रू मनापासून दूर पळून गेले. प्रेमाचा पुरस्कार गोवोगावी करणारी प्रोची फार फार लोकप्रिय झाली. इतकी की तिची ही लोकप्रियता राजाच्या कानी खबऱ्यांनी घातली नि राजा न राहवून वनात प्रोचीचे एक धर्मकीर्तन ऐकायला आला. त्याने वेशांतर केले होते. आणि घोंगडे पांघरलेला धनगर झाला होता तो. त्याने प्रोचीला विचारले, ‘‘किती तेजस्वी, सुंदर दिसतेस तू.’’
‘‘माणसाचे मन सुंदर झाले की त्याचे तनही सुंदर दिसू लागते पाहाणाऱ्याच्या डोळय़ांना राजन.’’ ती म्हणाली.
‘‘म्हणजे तू मला ओळखलेस?’’
‘‘होय राजा पुटिन. सुखी राहा. आता माझ्या मनात तुजबद्दल राग नाही. आहे फक्त शांत भाव.’’ त्याने विनवण्या केल्या तरी ती परत गेली नाही. राजाही परत जाताना शहाणा होऊन गेला.
माझ्या लाडक्या बालदोस्तांनो, प्रेम ही एक फार मोठी दौलत आहे, जी कितीही खर्चली तरी कमीच होत नाही नि आरोग्य ही तर आयुष्याचीच ठेव. प्रोचीसारखेच तुम्हीही या दोन गुणांनी युक्त व्हा हं लाडक्यांनो!
(रुपांतरित रशियन लोककथा)
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
नावडतीची गोष्ट
प्रोची आणि काम्या अशा पुटिन या राजाच्या दोन राण्या होत्या बरं का बालदोस्तांनो. पैकी काम्या ही मुळी श्रीमंत राजघराण्यातच जन्माला आली होती.

First published on: 16-05-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids special