सूर्यास्त झाल्यानंतर मात्र मुलांची अवस्था अतिशय बिकट झाली होती.. हा खेळ खेळता खेळता आपण इथपर्यंत म्हणजे भुताच्या डोंगरार्पयंत का आलो, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मगाशीच खरे तर मागे फिरायला हवे होते, असे गावातल्या सर्व मुलांना वाटत होते. अपवाद होता तो फक्त गणेशचा. कारण त्याचा मात्र मुंबईहून आलेल्या सौमित्रवर पुरेपूर विश्वास होता. तो काहीही वाईट होऊ देणार नाही आणि सर्वाची नीट काळजी घेणार, असे गणेशला वाटत होते. अर्थात सौमित्र या सर्व लहान मुलांमध्ये तसा वयाने मोठा होता. नुकतीच दहावीची परीक्षा देऊन गावी मामाकडे आला होता. आता अवघ्या दोन महिन्यांत कॉलेजला जाणारा सौमित्र तसा धीटही होता. एरवी गावात बाहेरची कुणी मुलं येत नसतं. त्यामुळे सौमित्र आला की, गावच्या मुलांनाही जरा बरं वाटे. त्यांना दोन नवीन गोष्टी ऐकायला मिळत. काही नवीन खेळही तो दरवर्षी शिकवत असे. शिवाय मुंबईहून येताना दोन-चार नवीन बैठे खेळ देखील घेऊन येत असे. यंदा तर त्याने स्वत तयार केलेला रोबो आणला होता मुंबईहून. आणि त्यामुळे गावातली सगळीचं मुलं त्याच्या प्रेमात पडली होती. तिकडेच नेमकी गडबड झाली. कारण आता तो त्याच्या मनात येईल, तसे सर्व मुलांकडून करून घेत होता. आणि मुलेही एकत होती.. तिचं तर गडबड झाली दुपारी खेळ सुरू झाल्यावर सर्व जण सौमित्रला म्हणाले की, त्या दक्षिणेचा डोंगर भुताचा आहे. तिथे गावातलं कधीच कुणी जात नाही आणि गेलेलं परत येत नाही. त्यामुळे तिकडे नको जाऊया. पण संध्याकाळी रोबो पाहायचा असेल तर माझ्यासोबत यावंच लागेल असा हट्ट सौमित्रने धरला आणि घोळ झाला. कारण भुताच्या डोंगराच्या बरोबर अध्र्यावर सारे जण होते.. एकमेकांचा हात हातात पकडून. कारण भूत आलेच तर एकमेकांच्या सोबतीला असलेले बरे. हात हातात पकडलेला नव्हता तो फक्त गणेश आणि सौमित्रने. िपकीच्या वेणीची तर दशाच झालेली होती. कारण या दोघांनीही तिच्या लाल रिबिन्सचे तुकडे करून रस्ता चुकू नये म्हणून झुडुपांना बांधले होते..
अर्थात मनात काहीही वाटत असले तरी बोलायला मात्र जवळपास सर्वच जण घाबरत होते. परतीचा मात्र एकच होता, मगाशी सौमित्रने सांगितलेला आणि झुडुपांना रुमाल बांधलेला. काळोख पडायच्या आत मुलांनी गावात पोहोचणे आवश्यक होते. नाहीतर काही खरे नव्हते. अख्खे गाव गोळा झाले असते आणि मग काही खरे नव्हते; कारण गावातली सगळी मुलेच गायब झाल्याची बोंब झाली असती. एरवी तर पंचक्रोशीतील अनेक मंडळीही या गावात आपल्या लहान मुलांना पाठवायला तशी घाबरायचीच- कारण होतं ‘भुताचं देणं’ गावाच्या दक्षिणेला असलेला डोंगर हा भुताचा डोंगर म्हणून ओळखला जायचा. या डोंगरावर जाणे सर्व जण टाळायचे आणि आख्यायिका अशी होती की, या गावाचं त्या डोंगरातल्या भुताला काही देणं होतं. त्या डोंगरात शिरलेला माणूस किंवा मुलगा परतायचा नाही. गावाचं देणं म्हणून भूत त्या माणसाला ठेवून घेतं असा वर्षांनुवर्षांचा समज होता. नको ते बेंडलं म्हणून मग लहान मुलांना या गावी पाठवायला कुणीच धजावायचं नाही!
मुंबईहून आलेला सौमित्र मात्र दरवर्षी सांगायचा, भूत वगैरे काहीही नसतं. कुणी तरी चोर- लुटारू राहत असतील आणि त्यांचे धंदे नीट चालावेत म्हणून त्यांनी आवई उठवली असावी.. पण हे मानायला कुणी तयार नव्हतं. पण यंदा मात्र सौमित्रने रोबोच्या प्रेमातं पाडून सर्वाना या डोंगरावर आणलं होतं. भूत नसतंच मुळात याची सौमित्रला खात्री असली तरी सर्वानी घरी नीट पोहोचलं पाहिजे याची मात्र त्याला काळजी होती. म्हणूनच तो सर्वाना जरा पावलं वेगानं उचला असं सांगत होता. चालताना इतर कुणालाही भीती वाटायला नको म्हणून स्वत: काही तरी सांगत चालत होता आणि मुलं त्याच्यामागून चालत होती.. मगासची ट्रिक कामी आली होती. लाल रिबिनचे तुकडे लावलेल्या मार्गाने मुलं खाली उतरत होती. बऱ्यापैकी खाली उतरल्यावर मुलांना वस्ती दिसू लागली आणि हायसं वाटलं.. सगळे जण घरी पोहोचले एकदाचे. जिवात जीव आला सर्वाच्याच. त्याच वेळेस रात्री रोबोच्या खेळासाठी गणेशच्या खळ्यात जमायचंही ठरलंच.
खरं तर आजच्या संध्याकाळच्या अनुभवाबद्दल मुलांपैकी काहींना बोलायचं होतं, पण रात्री मोठी माणसंपण खळ्यात बसली होती. त्यामुळे कुणाला काही फारसं बोलता आलं नाही, पण त्यातल्या काहींनी सौमित्रच्या हातावर टाळी दिली होती, भुताच्या डोंगरावर जाऊन यशस्वीरीत्या परत आल्याबद्दल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी खेळाच्या वेळेस बोलायचं ठरलं. डोंगरावर गेलेल्या काहींना त्या रात्री झोपच लागेना तर काहींचे हातपाय बऱ्यापैकी दुखत असल्याने झोप कधी लागली ते कळलंच नाही, तर वयाने खूपच लहान असलेल्यांना रडू कोसळत होतं. आईबाबांना कळलं तर काय या विचाराने.
दुसऱ्या दिवशी सगळे नाश्ता करून खेळायला एकत्र आले खरे, पण खेळ राहिला बाजूला आणि चर्चा सुरू झाली ती कालच्या धाडसाची. डोंगरावर जाऊन परत आलेले गावकरी म्हणून सर्वानाच आनंद झाला होता. तीच संधी साधत सौमित्र म्हणाला की, मी सांगतोय की, गेली अनेक वर्षे भूतबित काही नसतं.. आज आता परत जायचं. आता या नव्या प्रस्तावाने मात्र अनेकांना आता नवीनच पंचाईत आल्यासारखं वाटलं, पण काल रिबिनी देणारी पिंकी, गणेश आणि त्यांच्याबरोबर वयाने लहान असलेले अतुल, सुनील, सर्वेश सारेच चटकन तयार झाले. तेव्हा सौमित्रने मोठय़ा मुलांकडे पाहून म्हटले की, लहान मुले धाडसी आणि तुमची मात्र फाटली! त्यावर अहं दुखावला गेलेले तेही तयार झाले, पण आज उशीर करायचा नाही तर लवकर जायचे आणि लवकर परतायचे, असे ठरले.
१७ जणांची गँग मग दुपारची विश्रांती टाळून कालच्या मार्गाने पुन्हा डोंगराच्या दिशेने चालू लागली. आज खबरदारी म्हणून खुणेसाठी आणखीही काही वस्तू सोबत घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे मध्यम आकाराचे दगड लावत ओळ करून पुढे जायचे असेही ठरले होते. सर्वानीच त्याप्रमाणे खुणेची वस्तू- दगड ठेवत पुढे जायला सुरुवात केली. सुमारे दोन तासांनंतर मात्र त्यांना पायऱ्यांसारखी रचना लागली तेव्हाच सौमित्रच्या मनात आले, इथे कदाचित लेणी असतील. कारण पायऱ्यांची रचना दगडी होती, पण त्यावरच खूप सारी झाडे आलेली होती. समोर पुढे जायचे तर झाडे कापणे आवश्यक होते. नेहमीप्रमाणे स्विस नाइफ होता सौमित्रच्या खिशात, पण त्याने झाडे-झुडपे कापणे काही शक्य नव्हते. मग सर्वानी परतायचा निर्णय घेतला..
त्या रात्री तर रोबोही बाजूला राहिला. मुलांचा आत्मविश्वासही वाढला होता आणि तिथे काय असेल त्या झाडांच्या पलीकडे याची उत्सुकताही लागून राहिली होती. डोंगरामध्येच अशा प्रकारे जेव्हा पायऱ्या खोदलेल्या दिसतात तेव्हा तिथे काही तरी नक्कीच असते हे सौमित्रने लेण्यांच्या एका सिटिवॉकमध्ये पुरातत्त्व तज्ज्ञांकडून ऐकले होते. त्याची माहितीही त्याने सर्वाना रात्रीच्या त्या चर्चेत सांगितली. आता एक महत्त्वाचा बदल झाला होता. आता फक्त मुलं नव्हे तर मुलीही हिरिरीने पुढे आल्या होत्या. त्यांनाही जबाबदाऱ्या हव्या होत्या. िपकी, चिंगी, मुन्नी सगळ्या जणी तयार होत्या. मग दुसऱ्या दिवशी सर्वानी थोडं लवकर सकाळी निघायचं आणि दुपारी उशिरा खेळून येणार असं सांगायचं असं ठरलं..
आज खरं तर रात्री कुणाच्याच डोळ्याला डोळा लागत नव्हता. त्या झाडांपलीकडे काय हा प्रश्न अनेकांना सतावत होता.. तांबडं फुटलं तेव्हा मुलं डोंगरात जायला तयारच होती. आता साधनसामग्री वाढत होती. अनेकांच्या हातात काठय़ा होत्या. एकाकडे चोरून कोयता आणि सौमित्रकडे बॅटरी. दोन दिवस ज्या मार्गाने गेले तोच मार्ग आज आता पाठ झाल्यासारखा वाटत होता. त्या झाडापर्यंत पोहोचल्यानंतर बंडय़ाने झाडावर घाव घालायला सुरुवात केली. संरक्षण म्हणून त्या वेळेस सुशीलने मारुतीस्तोत्र म्हणायला सुरुवात केली होती. काही मिनिटांतच झुडपं आडवी झाली आणि दर्शन झाले ते एका गुहेचे.. आतमध्ये मिट्ट काळोख, पण वर जाणाऱ्या पायऱ्या. सौमित्रची अटकळ खरी ठरली होती. सौमित्रवरचा सर्वाचा विश्वासही वाढत चालला होता.
‘‘..आत कुणी असेल तर?’’ गणेशने प्रथमच शंका काढली. त्यावर सौमित्र म्हणाला, ‘‘आधी बॅटरीने पाहून घेतो.’’ मग त्याने आठवी-नववीतल्या जनार्दन आणि सुशांतला बरोबर घेतले. पायऱ्या चढून ते वर गेले तेव्हा सर्वानी श्वास रोखून धरले होते. बाहेरूनच बॅटरीने त्यांनी काही तरी पाहून घेतले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. मग जनार्दन आणि सुशांतने हातातल्या काठय़ा उंच पकडल्या आणि ते आत शिरले. सौमित्रने बॅटरी पकडली होती तो पुढे होता. तीन-चार मिनिटे अशीच गेल्यावर मुन्नीला गोष्टीतली वाघाची गुहा आठवली, त्यात आत गेलेले कुणीच परत येत नसे. तिने िपकीला ते सांगताच, तिने ‘सौमित्रदादा’ अशी हाक मारली. आतून ‘ओ’ आलो, असा आवाज आला. त्यावर िपकी म्हणाली, ‘‘आपला सौमित्रदादा हुशार आहे, त्याला काहीही होणार नाही.’’ थोडय़ा वेळात तिघेही परतले आणि काय सांगू काय नको, असे सर्वाना झाले होते..
‘‘ही गुहा म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नाही तर आतमध्ये अप्रतिम मूर्ती असलेली लेणी आहेत,’’ असे सौमित्रने सांगितले. त्या वेळेस एकाला त्याच्या सहावीच्या पुस्तकातली अिजठा- वेरुळची चित्रंदेखील आठवली. तशीच का, या त्याच्या प्रश्नावर सौमित्रने हो, असे उत्तर दिले. त्यावर तो जोरात म्हणाला, ‘‘म्हणजे आपले गाव अिजठा आहे!’’ त्यावर सौमित्र म्हणाला, ‘‘इथे एका भिंतीवर शिलालेखाप्रमाणे काही लिहिलेले पण आहे. पण आपल्याला त्यातली भाषा येतेय कुठे?’’ िपकीला तर शिलालेख म्हणजे काय इथपासून सारे प्रश्न पडले होते. त्यावेळेस सौमित्र म्हणाला, ‘‘अगं ही लेणी खोदण्यासाठी त्यामध्ये असलेल्या मूर्ती तयार करण्यासाठी दान देणारे आपण किती पैसे दिले, आपले नाव काय ते सर्व दगडावर कोरून ठेवतात. आपल्या गावाची माहितीपण काही जण कोरतात.’’ त्यावर एकाने विचारले, ‘‘मग आपल्या गावाचं नाव पण त्यात आहे काय?’’ सौमित्र म्हणाला, ‘‘शक्य आहे, पण ते वाचल्याशिवाय कळणार नाही. ती भाषा बहुधा ब्राह्मी असावी.’’ आतापर्यंत सर्वाना संस्कृत, हिंदूी, इंग्रजी याच भाषा माहीत होत्या. आता ही नवीन कोणती भाषा असा प्रश्न काहींना पडला होता. गणेशने प्रश्न विचारलाच त्यावर सौमित्र म्हणाला, ‘‘अरे ब्राह्मी ही लिपी आहे. म्हणजे आपण इंग्रजी किंवा हिंदूी अथवा मराठी कसे देवनागरीत लिहितो तशी लिपी.’’ ‘‘पण मग आपल्या गावात येऊन हे लिहिले कोणी? आणि मग मराठीत का नाही लिहिले?’’ या सुकेतूच्या प्रश्नावर सगळेच हसले, पण सौमित्र म्हणाला, ‘‘हसू नका. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण त्यावेळी मराठी नव्हती. फक्त पाली भाषा किंवा संस्कृत असावी आणि ब्राह्मी ही लिपी. मलापण फार माहिती नाही. पण आज आपण डेक्कन कॉलेजच्या अभिजित दांडेकर सरांना फोन लावूया. ते आर्कियॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्याकडून आपल्याला अधिक माहिती मिळेल.’’
दरम्यान, दोन-दोनच्या गटाने सर्वजण आतमध्ये जाऊन लेणी पाहून परत आले. आपल्याला काही तरी अचाट शोध लागल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. आता हे सारे गावी जाऊन सांगून टाकूया, असे हृषीकेशच्या मनात आले. त्यावर सौमित्र म्हणाला, ‘‘आताच सांगितले तर उद्या यायला मिळणार नाही. आता काहीच बोलू नका. आपण सांगितले तर लहान मुले म्हणून कुणी विश्वास ठेवणार नाही. आपण शक्य असेल तर अभिजित काकांना बोलावू पुण्यावरून.’’
आपण पाहिले ते काही तरी खासच होते, असे सर्व मुलांना वाटले होते. पण आताच बोलायचे नाही, असेही सौमित्रदादाने सांगितले होते. म्हणून सर्वाना गप्प बसायचे ठरवले. संध्याकाळी एसटीडीवरून अभिजित काकाने सौमित्रकडून माहिती ऐकल्यानंतर तर तो म्हणाला, मी रात्रीचीच गाडी पकडून येतो. इथे कॉलेजला पण सुट्टी आहे. मग रात्रीच्या मीटिंगमध्ये सौमित्रने अभिजित काकाची माहिती सांगितली, तो पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये लेण्यांविषयी अभ्यास करतो आणि शिकवतो पण. लेण्यांचापण अभ्यास केला जातो हे ऐकून अनेकांना आश्चर्यच वाटले.. आता प्रतीक्षा होती अभिजित काकांची!
दुसऱ्या दिवशी सकाळीच सात वाजता अभिजित काका गावी हजर होता. त्याला एकदम घराच्या दरवाजात पाहून सर्वानाच आश्चर्य वाटले. पण तो घरात सर्वानाच परिचयाचा होता. सुट्टी लागली सरप्राइज म्हणून थेट आलो, असे सांगताना त्याने मध्येच सौमित्रला डोळा मारला.. आंघोळपांघोळ, नाश्ता झाल्यावर मुलांसोबत तो बाहेर पडला ते थेट लेण्यांच्या दिशेने. जाताना सौमित्रने त्याला सर्व माहिती आणि आतापर्यंतचे प्रयत्नही सांगितले. काकाने सोबत टॅब्लेट आणले होते. आणि त्यावर तो सतत जीपीएसने लोकेशन तपासत होता. लेणी पाहून झाल्यावर त्याने सर्व मुलांना एका रांगेत उभे करून साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला, ‘‘मुलांनो हे सारे अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही एक नवीन आश्चर्य शोधून काढले आहे. तुम्हाला कल्पना नाही की, तुम्ही किती महत्त्वाचा शोध घेतलाय ते. या खूप अप्रतिम बुद्धलेणी आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या गावाचे नावही त्यात आहे. आता आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि या लेणी पाचव्या शतकापासून आहेत.’’
‘‘काका, ही एवढी सगळी माहिती तुम्हाला कशी मिळाली?’’ एकाने प्रश्न विचारला.
त्यावर काका म्हणाला, ‘‘अरे इथे ही सारी माहिती दगडामध्ये कोरलेली आहे. फक्त ती ब्राह्मी लिपीत आहे. ती मला वाचता येते इतकेच. त्यातच गावाचे नाव आहे ‘समण’.’’
गणेश म्हणाला, ‘‘काका, सगळ्या नावांना अर्थ असतो म्हणतात मग आमच्या गावाच्याच नावाला का अर्थ नाही?’’
‘‘कोण म्हणतं, असं?’’ काकाने विचारलं.. काका पुढे म्हणाला, ‘‘अरे हे पाली भाषेमधलं नाव आहे. समण म्हणजे आपल्या मराठी भाषेत श्रमण. श्रमण म्हणजे बौद्ध भिक्खू किंवा बौद्ध धर्मातील साधू. ते इथे राहत होते म्हणूनच या ठिकाणाला समण असे नाव पडलेले असणार.’’
आपल्या गावाच्या नावाला काही अर्थ आहे, हे त्या दिवशी फक्त गणेशला नाही तर अनेकांना प्रथमच कळले. गणेशला तर आनंद याचा झाला की, गावकऱ्यांना जे माहीत नव्हतं ते त्याला आज कळलं होतं.
मग काका म्हणाले, ‘‘हे सारे आपण लवकरच गावकऱ्यांना पण सांगू.’’ मग मुलांनी त्यांना ‘भुताचं देणं’ची आठवण करून दिली. त्यावर काका म्हणाला, ‘‘तुम्हाला मार पडणार नाही, याची जबाबदारी माझी.. आता आणखी मदत करावी लागणार. करणार का?’’’
त्यावर सगळेजण एकसुरात ओरडले, ‘‘हो!’’
मग काका म्हणाला, ‘‘मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं द्या. गावामध्ये तुम्हाला नेहमीच्या नाण्यांपेक्षा त्याच आकाराचं पण वेगळं नाण्यासारखं दिसणारं काही सापडलयं का?’’
सर्वाचंच लक्ष तेव्हा सर्वेशकडे गेलं.. एकाने सांगितलं, ‘‘याच्या घरी याने गोळा केलीय तसं काही तरी ती नाणीच आहेत, असं तो सांगतो.’’
त्यावर सर्वेश म्हणाला, ‘‘मी आणून दाखवतो तुम्हाला. मग तुम्ही सांगा.’’
मग काकांनी टॅब्लेटवर स्तुपासारखी काही रचना दाखवली आणि असे काही आपल्या गावात सापडतं का, अशी विचारणा केली. त्यावर मुलं म्हणाली, ‘‘शाळेमागच्या शेताडीच असंच काही तरी पडलंय.’’ िपकी म्हणाली, ‘‘डोंगरात पण दोन-तीन ठिकाणी आहे.’’ शाळेमागचं जे काही आहे, ते लगेचच पाहायचं अस्ांं ठरलं. असा सर्वाचाच उत्साह वाढलेला होता. दीड तासाने सगळे पोहोचले तेव्हा दुपारचे ऊन मी म्हणत होते. तरीही सर्वानी शाळेमागची शेताडी गाठली.. अभिजितकाकाचा अंदाज खरा ठरला होता. इथे स्तुपाचे अवशेष होते. मग तर त्याला डोंगरातील अवशेष पहायचीही उत्सुकता होती. पण रात्रभरच्या प्रवासाच्या दगदगीने तोही हैराण झाला होता आणि एव्हाना मुलंही दमली होती. मग संध्याकाळी पुन्हा भेटायचा प्लान ठरला.
घरात सगळेच हैराण होते. अभिजित आला आणि मुलांबरोबर गायबही झाला. गावात पण एका मुलाला शोधत आई आली तर मुलं नव्हतीच. त्यामुळे अनेक पालक घाबरेघुबरे झाले होते. पण नंतर शाळेजवळ अभिजित काकासोबत मुलांना पाहून अनेकांच्या जिवात जीव आला. मग काकाच म्हणाला, ‘‘बॉल मागे गेला तो शोधायला सगळे शाळेमागे गेले होते!’’ ..सुटलो एकदाचे, नाहीतर आज काही खरे नव्हते, असेच सगळ्यांच्या मनात आले.
मग संध्याकाळी पुन्हा सर्वजण बाहेर पडले तेव्हा िपकीने बाजूच्याच डोंगरातले अवशेषही दाखवले होते. मग पुन्हा संध्याकाळी काकाने त्याच्या कॉलेजमध्ये फोन केला. दुसऱ्या दिवशी त्याचे चार मित्र गावात येऊन दाखल झाले. सकाळी पुन्हा वरात निघाली लेणी पाहायला. आज मात्र दुपारी लवकर परत आले. तेव्हा काकाचा मित्र म्हणाला, ‘‘इथे अजूनही काही सापडायला हवे. पण आता गावकऱ्यांची मदत आवश्यक आहे.’’
संध्याकाळी काकाने गावकऱ्यांशी बोलायचे ठरले. नाहीतरी आज गावसभा होणार होती. काही तरी अर्जंट होते म्हणून गावसभा बोलावली होती.. सभा सुरू झाली.. तेव्हा एका गावकऱ्याने मात्र चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, काल गाय गेली म्हणून शोधायला तो दक्षिणेच्या डोंगरात गेलो होता तेव्हा भुताने झाडाला बांधलेले रिबिनीचे तुकडे आणि दगडांची रांग त्याने पाहिली. आता गावाचे काही खरे नाही, असेही तो म्हणाला.
हे सारे ऐकताना बाजूला एका कोपऱ्यात बसलेली मुलं हसायला लागली. ते पाहून गावकरी चिडले. तेव्हा अभिकाका मध्ये पडला आणि त्याने गावकऱ्यांना झाला प्रकार समजावून सांगितला. ती दगडांची रांग आणि रिबिनी हे मुलांचे उद्योग आहेत हे कळल्यानंतर गावकरी चिडले, पण काकाने मात्र त्यांना सारा प्रकार उलगडून सांगितला. सकाळी लेणी पाहायला चला, असे आवताण दिले. काकाने लेण्यात जे वाचले ते अनेक गावकऱ्यांनाही अद्भुत वाटले. मुलांना तर अंगावर दोन मूठ मांस अधिक चढले होते. दुसऱ्या दिवशी काही गावकरी भीतच होते. तेव्हा काका म्हणाला, ‘‘अहो मुलं गेले काही दिवस रोज जाऊन परत येतातयत. तुम्ही काय घाबरता?’’ मग सगळे तयार झाले. ही लेणी गावकऱ्यांसाठीदेखील नवलाईच होती.
मग लेणींजवळच काकाने सभा घेतली. डोंगरात आणि शाळेजवळचे स्तुपाचे अवशेष त्याचे फोटो दाखवले. माहिती सांगितली. गावाचे नाव कसे पडले ते म्हणजे श्रमण ते समण असा प्रवास सांगितला आणि ही लेणी गावकऱ्यांचा ठेवा आहेत, असे ठासून सांगितले. ही एवढी छान आहेत की, परदेशी लोकांनाही आवडतील. ती मंडळी आली तर गावातल्या अनेकांना कामे मिळतील, पैसे मिळतील. शिवाय गावाचे नाव होईल ते वेगळेच. शिवाय काल दाखविलेल्या नाण्यांचेही म्युझियम करायचे ठरले. गावकरी मदत करणार असतील तर पुरातत्त्व संशोधकही मदत करतील, असे त्याने जाहीर केले. गावकऱ्यांच्या वतीने सरपंच पुढे आले त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. संध्याकाळी गावसभा आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात असे ठरले. दुसऱ्या दिवशी तर स्तुपासाठी खास तयार केलेल्या मोल्डेड ब्रिक्स म्हणजे अर्धवर्तुळावर आकारातील वीटा शाळेमागे सापडल्या. थोडे खणल्यानंतर तर काही छोटेखानी स्तूपही सापडले.. तिसऱ्या दिवशी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून आणखी दहा संशोधकांची फळी येऊन दाखल झाली आणि पाठोपाठ पत्रकारही!
मग दोन दिवसांनी गावातच सरपंचांच्या चावडीवर पत्रकार परिषद पार पम्डली. त्यात सरपंचांनी लेणींचा शोध लावल्याबद्दल सर्वच्या सर्व १७ मुलांचा सत्कार केला. अर्थातच त्यात अग्रभागी होता, सौमित्र! दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात सर्व मुलांचा एकत्रित फोटो पहिल्या पानावर होता, आणि खाली मथळा होता, ‘भुताचं देणं, छे छे हे तर सुंदर लेणं!’
(या लेखातील सर्व छायाचित्रे प्रातिनिधिक आहेत.)
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
भूताचं देणं.. नव्हे लेणं!
सूर्यास्त झाल्यानंतर मात्र मुलांची अवस्था अतिशय बिकट झाली होती.. हा खेळ खेळता खेळता आपण इथपर्यंत म्हणजे भुताच्या डोंगरार्पयंत का आलो, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

First published on: 16-05-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids special