‘‘बंटी ऊठ अरे.. किती वेळा उठवायचं तुला? बघ किती वाजले ते.. कालसारखा उशीर होईल हां मग !’’
..शेवटी आईनं हलवल्यावर बंटीची जरा चुळबूळ झाली. ‘पाच मिनिटं.’ झोपेतच बंटी बडबडला. ‘‘नाही नाही..बघ अरे पावणेसात वाजले आज.. चल लवकर ऊठ. मी चार वेळा येऊन गेलेय खोलीत.’’ आईनं उठवणं सुरूच ठेवलं.
शेवटी चिडचिड करत बंटीची स्वारी उठली एकदाची. ‘‘रोज रोज काय गं लवकर उठायचं आणि आता शाळेला सुट्टी आहे तर तू हा सकाळचा क्लास लावून ठेवलायस?’’
छे.. वैताग नुसता. पुन्हा सगळी कामं करायची. केवढी ती कामं आपल्यावर. दात घासा, ते कपभर दूध प्या आणि लगोलग आंघोळीला पळा. दप्तर पण हल्ली आई मलाच भरायला सांगते. मोठा झालोय म्हणे मी. असा सोयीस्कर मोठा. पण काही सांगायला, आवडीचं करायला गेलो तर ऐकवतेच ना.. ‘‘बंटी, लहान आहेस तू अजून.’’ हे बरंय मोठय़ांचं. पाहिजे तेव्हा लहान आणि त्यांना पाहिजे तेव्हा मी मोठा काय!
हे म्हणजे फारच. छय़ा पण सांगणार कोणाला? ते बाबाही अशा वेळी आईचीच बाजू घेणार.
एरवी तर शाळा, संध्याकाळचा क्लास आणि मग खेळायला ग्राऊंडवर जाणं आहेच. पण सगळ्यात कंटाळा म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीतही लवकर उठणं. काय तर म्हणे कराटेचा क्लास. तो झाल्यावर दमून घरी येऊन बसतो आणि अर्धा-एक तास काय ते कार्टून बघतो तर मग चित्रकलेचा क्लास. संध्याकाळीसुद्धा आजी म्हणते सुट्टी आहे तर त्या संस्कारवर्गाला जा म्हणून. छय़ा!
आई-बाबासुद्धा एकेकाच ऑफिसला जातात आणि कुठल्या वर्गाना जात नाहीत मोठे असूनसुद्धा आणि मी मात्र ही एवढी कामं करायची.
शाळेच्या दिवसात तर बघायलाच नको. शाळेतून घरी येतोय ना येतोय तोवर संध्याकाळचा वर्ग आणि मग होमवर्क आहेच. जरा आजीकडून टीव्हीचा रिमोट घेऊन कार्टून लावतोय तेवढय़ात आई पुन्हा कटकट करणार होमवर्कची. कित्ती काम असतं मला दिवसभर.. त्या टीव्हीवरच्या जाहिरातीसारखं मलाही रोज ते सरबत दे, असं सांगणार आहे मी आईला लवकरच. छे पण सरबतानं काय होणार? सॉलिड काहीतरी आयडिया सुचली पाहिजे. सगळी कामं कशी आपोआप व्हायला पाहिजेत. म्हणजे मग मला भरपूर वेळ टीव्ही बघायला मिळेल आणि पाहिजे तितका वेळ झोपायला मिळेल.
तयार होऊ न कराटेच्या क्लासला पोचेपर्यंत बंटीच्या डोक्यात हेच विचार घोळत होते. बाबाबरोबर गाडीत बसताना तो बाबाला म्हणालादेखील, ‘‘मला खूपच काम असतं बाबा हल्ली. कंटाळा येतो.’’ बाबा त्यावर उपाय सांगायचं सोडून चक्क हसला. ‘‘मी हसतो का, असं बाबाला, तो ऑफिसमधून दमून येतो तेव्हा?’’ बंटीनं विचार केला आणि तो आणखी हिरमुसला. घरात आपली काळजी कुणालाच नाहीय, त्याच्या मनात आलं.
कराटेच्या क्लासला बाबाने बाहेरच सोडलं त्याला नेहमीसारखं आणि टाटा करून बाबा गेलासुद्धा! नेहमीसारखा तंद्रीतच बंटी जिने चढून वर गेला. वर बघतो तर क्लासला हे भलंथोरलं टाळं. मग बंटीनं खाली जाऊन पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं. खालीच क्लास दोन दिवस बंद असल्याचा भलामोठा बोर्ड झळकत होता.
छय़ा, उगाच लवकर उठलो. असा विचार करत बंटी तिथेच पायरीवर बसला. डोकं सॅकवर टेकलं आणि आता काय करावं बरं, असा विचार करत तिथेच बसला. बाबा तर एक तासानंच न्यायला येणार नेहमीप्रमाणं, मग एक तास काय करावं?
हा विचार येईपर्यंतच बंटीची कळी खुलली. बरं झालं. आता आरामात टाइमपास करत घरी जाऊ या. नाहीतरी आई म्हणतेच मी मोठा झालोय. एकटा घरी नक्की जाऊ शकेन. नाहीतरी घरी कुणाला माझी काळजी आहे? एवढे क्लास आणि कामं लावून ठेवलीत मागे.
बंटी आपला कडेकडेनं निघाला घराच्या दिशेनं. बंटी चालत असताना फुटपाथच्या पलीकडे एक कुत्र्याचं गोंडस पिलू दिसलं. त्याला एकदा तरी जवळ घ्यावं असं वाटलं. ओरडणारी आई बरोबर नाही, या जाणिवेनं बंटी खुलला आणि सरळ रस्ता ओलांडून त्या पिल्लाकडे धावला. पण बंटी जवळ येतोय बघून पिल्लूही दूर पळालं. शेजारच्या गल्लीत शिरलं. बंटी त्याच्या मागे गेला. शेवटी एका ठिकाणी पिल्लू थांबलं. बंटीनं त्याला उचलायला हात पुढे केले, पण तेवढय़ात कुठूनसं मोठं कुत्रं आलं. ती पिल्लाची आई तर आली. तिच्या भुंकण्यानं बंटी जरा घाबरलाच. जवळच्या गल्लीत आता तोच पसार झाला.
तेवढय़ात त्याला समोर गाडीवर बर्फाचा गोळा विकणारा दिसला. पिल्लापाठी पळून तो थकला होताच. पाठीवरच्या सॅकमधलं आता गरम झालेलं गुळमट पाणी पिण्यापेक्षा तो थंडगार, लाल-केशरी गोळा खाल्ला तर किती छान. नाहीतरी आई कधी हा गाडीवरचा बर्फाचा गोळा खाऊच देत नाही. घाण असतो म्हणते. इतका गारेगार, लालेलाल गोळा घाण कसा असेल? ती देते ती पालेभाजीच घाण लागते. बंटी विचार करेपर्यंत गोळेवाला पुढे गेला होता. त्याच्या मागे बंटी धावला खरा, पण मग त्याला एकदम आठवलं, आपल्याकडे पैसे कुठे आहेत?
छय़ा, हे पण नाही हाती लागलं. काय हे. एक दिवस हे स्वातंत्र्य मिळालंय, तर एकही गोष्ट मनासारखी होत नाहीय. खरंच काहीतरी आयडिया केली पाहिजे, मॅजिक झाली पाहिजे आणि सगळं काही मनासारखं व्हायला पाहिजे यार.
सॅकमधलं पाणी काढायला बंटी रस्त्याच्या कडेला जरा थांबला तेव्हा त्याची नजर आजूबाजूला गेली. अरेच्चा, हे कुठं आलो आपण? हा रस्ता काही घरचा नाही. कुठे बरं वळलो? रस्ता चुकला की काय? आता घरी कसं जायचं? बंटीला क्षणभर रडूच कोसळणार होतं. पण आपण आता मोठे आहोत, ही जाणीव होऊन त्यानं स्वत:ला सावरलं. आसपास ओळखीचं पण कुणी दिसत नव्हतं. ही भलतीच कुठली गल्ली होती. गल्लीत फारशी गर्दीही नव्हती.
थोडा वेळ इकडे तिकडे करत बंटीनं वाट शोधायचा प्रयत्न केला पण. ‘‘छय़ा’’ एवढंच दरवेळी त्याच्या तोंडात येत होतं. दमून एका झाडाजवळ बसला. आता काय करावं? पुन्हा रडू यायला लागलं. तेवढय़ात त्याच्या पायाजवळ काहीतरी चमकलं.
छोटीशीच पण चमकदार वस्तू होती ती. बंटीनं उचलून पाहिलं आणि तो एकदम चकितच झाला. एक पिवळ्या रंगाचा निमुळता दिवा होता तो. हो दिवाच होता बहुतेक, त्यानं घरी नाही पण टीव्हीत ही वस्तू पाहिली होती. अलादिनचा असतो ना तसा दिवा. अलादिनच्या दिव्यातून जिनी बाहेर येतो. यातून येईल का? बंटीनं जरा फुंकर मारून दिव्यावरची धूळ झटकली. जरा विचार करून दिवा घासून पाहिला.. आणि काय आश्चर्य .. दिव्यातून धूर आला आणि जिनी आला की बाहेर.
बंटी दचकलाच सुरुवातीला. ‘हुकूम मेरे आका’ असं जिनीनं झुकून म्हटल्यावर मात्र त्याला हसू फुटलं. पण अजूनही चेहऱ्यावर आश्चर्य होतंच. ‘‘जिनी.. तू खरंच जिनी आहेस?’’ ‘‘हो. काय करू तुमच्यासाठी?’’ जिनीनं चक्क मराठीत विचारलं. बंटी म्हणाला, ‘‘टीव्हीतला जिनी तर हिंदीत बोलतो. तुला मराठी कसं येतं?’’ ‘‘मला सगळ्या भाषा शिकाव्या लागतात. ते कामच आहे माझं. ज्या भाषेत ऑर्डर येईल, त्या भाषेतच मला उत्तर द्यावं लागतं.’’ ‘‘अरे बाप रे, म्हणजे तुला किती भाषा येतात?’’
‘‘पुष्कळ.. पण ते जाऊ द्या. आधी तुमचं काम बोला. मी असा कामाशिवाय फार वेळ राहू शकत नाही.’’
‘‘अरे वेडाच आहेस जिनी तू. मला तर कामं करायचा, सकाळी उठायचाच कंटाळा येतो. तू माझ्यासाठी माझी कामं करशील का?’’
‘‘हो. करेन की. तुला पाहिजे तिथे नेईन, हवं ते देईन.’’
‘‘मला आत्ता बर्फाचा गोळा पाहिजे.’’ जिनीनं लगेच एक रंबीबेरंगी गोळा आणून समोर ठेवला. बंटीनं खूश होऊ न तो फस्त केला.
‘‘लवकर काम सांग पुढचं.’’ जिनी म्हणाला. बंटीनं त्याला त्याचं गाव वगैरे विचारलं. ‘‘जिनी, मला ना.. सकाळी उठायचा कंटाळा येतो आणि सगळ्या कामांचा. माझी कामं आपोआप होतील असं काही आहे का?’’ जिनी म्हणाला, ‘‘आमच्या जादूच्या दुनियेत आलास तर मनात येईल ते होईल.’’
‘‘सही! मग मला तुमच्या जादूच्या दुनियेत घेऊन चल. तिथे मला काही काम करायला नको.’’
‘‘जशी आज्ञा’’
बंटीसमोर अचानक अंधार पसरला. तो घाबरून ओरडणार इतक्यात एकदम थंड हवा आली आणि डोळ्यांसमोर प्रकाश पसरला. बंटीला दिसलं तो एका उडत्या चटईवर बसला होता. बंटीला मजा वाटली. थोडय़ा वेळानं चटई अलगद खाली उतरली. हिरवीगार जमीन, फळांनी लगडलेली झाडं अशा अनोळखी गावी बंटी आला होता. आता इथे काय करणार, आपण नक्की आलोय कुठं? बंटी खाली-वर बघत हिंडत राहिला. तेवढय़ात त्याला त्याच्या वयाची एक मुलगी एका सशाबरोबर बोलताना दिसली. त्याला जरा धीर आला. बंटी तिच्याकडे गेला आणि तिला हॅलो केलं. तिनंही त्याला हाय म्हटलं आणि ससोबाशी बोलण्यात गुंतली. शेवटी बंटीनं तिला आपलं नाव सांगितलं आणि तिचं विचारलं. ‘‘मी इथं नवीन आहे.’’ बंटी म्हणाला. त्यावर ती मुलगी गोड हसली आणि म्हणाली, ‘‘माझं नाव अॅलिस आणि या गावाला वंडरलँड म्हणतात.’’
‘‘ओह.. अॅलिस मी तुला ओळखतो. मला वंडरलँडपण माहिती आहे. मस्तच. तू काय करतेयस इकडे?’’
‘‘बंटी, अरे मला हम्टी डम्प्टीची मदत करायला जायचंय लवकरच. म्हणूनच मी या ससोबाबरोबर थोडा प्लॅन करतेय. सॉरी मला थोडं काम आहे. मी आत्ता तुझ्याबरोबर जास्त बोलू शकत नाही.’’
अॅलिस तिथून गेली. त्या नवलाईच्या नगरीत आता मात्र बंटीला बोअर झालं. तो चालत चालत समुद्रकिनारी आला. तिथे एका दगडावर बसला आणि टीव्ही बघावासा वाटतोय असं मनातल्या मनात म्हणाला. हा विचार मनात यायचा अवकाश, समोर टीव्ही आणि रिमोट हजर झाला. बंटीनं टीव्ही बघितला. पण लवकरच त्याला कार्टून बघायचा कंटाळा आला. त्याचं लक्ष टीव्हीपुढून आपोआप हटलं आणि त्याच वेळी दूरवर समुद्रातून एक मोठं जहाज त्याला येताना दिसलं. बंटीचं कुतूहल वाढलं. या वंडरलँडमध्ये कोण आलंय आता? जहाज जवळ आलं तसं त्याला माणसं दिसली. एक उंच धिप्पाड माणूस डोक्यावर उंच टोपी घालून इतरांना सूचना देत होता. तो या जहाजाचा मॉनिटर असावा, बंटीनं विचार केला.
त्या मॉनिटरचा वेश कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होताच. जहाज किनाऱ्याला लागताच बंटी तिथे गेला आणि त्यानं त्या मॉनिटरशी बोलण्याचा प्रयत्न केला. ‘‘हाय, मी बंटी. फोर्थमध्ये आहे. तू या जहाजाचा मॉनिटर आहेस ना?’’ त्यानं धीटपणं त्याला विचारलंदेखील. त्यावर थोडा वेळ आपलं काम थांबवून तो टोपीवाला म्हणाला, ‘‘फोर्थ..ते कुठं आहे, नवीन गाव दिसतंय आणि काय म्हणालास तू? मॉनिटर? छे.. माझं नाव सिंदबाद. मी सध्या वंडरलँडच्या दौऱ्यावर आलोय.’’
‘‘ओह.. सिंदबाद द सेलर.. तरीच मला तुझी ही कॅप कुठेतरी पाहिल्यासारखी वाटली. मस्तच. मला नेशील तुझ्याबरोबर सफरीवर?’’
‘‘नेईन ना.. तुला काय काम करता येतं? म्हणजे जहाजावर तू काय करणार?’’
‘‘काम? तिथेही काम करावं लागेल? मला तर कामाचा कंटाळा आहे.’’
‘‘अरे मग तू माझ्या काय कामाचा? असो.. चल आम्हाला पुढे सरकायचं आहे. मी एका सुंदर स्त्रीच्या शोधात आहे सध्या. ती जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे म्हणे आणि ती राहते तो प्रदेश पण युनिक आहे. तो बघायचाय मला.’’
‘‘सिंदबाद, मला ने ना त्या देशात. मला पण बघायचाय. तू सांगशील ते काम मी करेन.’’ बंटी म्हणाला. आता त्याला सागर सफरीवर जायचंच होतं.
सिंदबादबरोबर बंटी निघाला. जहाजावर स्वत:चं काम तर करायला लागायचंच, पण इतरही कष्टाची कामं बरीच होती. सूर्योदयाच्या आत भोंगा वाजायचा. बंटी कंटाळला त्या जहाजाच्या सफरीला. आता दिवा घासावा का, अशा विचारात असतानाच सिंदबाद आनंदानं ओरडला.. दिसलं, बेट दिसलं. त्याच्या हातातल्या दुर्बिणीतून किनाऱ्यावरचा प्रदेश बंटीला दाखवत तो म्हणाला.
जहाज नांगराला लागलं आणि ते जमिनीवर उतरले. तेवढय़ात तिथे काही माणसांची चाहूल लागली. बघतात तर काय? अगदी टिल्ली माणसं होती ती. बंटीपेक्षाही बुटकी. मोठी माणसं, म्हातारी माणसं सगळी एवढी- एवढीशी. सिंदबादच्या स्वागताला उभी होती. बंटीनं हळूच सिंदबादला विचारलं, ‘‘हे काय?’’ ‘‘अरे, हाच तर तो प्रदेश, मी शोधात होतो. बुटक्यांचा देश. इथेच राहते ती जगातली सुंदर स्त्री. राजकन्या.’’ तेवढय़ात एक बुटका म्हणाला, ‘‘हिमगौरीलाही कळवलंय तुम्ही येणार असल्याचं.’’
बंटीचं विचारचक्र चालायला लागलं आता. गेल्या वर्षी आईनं तिच्या लहानपणचं एक पुस्तक दिलं होतं. त्यात होता हा बुटक्यांचा प्रदेश.. सात बुटक्यांची गोष्ट होती ती. ‘‘त्या जगातल्या सुंदर स्त्रीचं नाव स्नोव्हाईट तर नाही ना?’’ सिंदबाद खूश होऊन म्हणाला, ‘‘बरोब्बर.’’
तेव्हा बंटीच्या डोक्यात लाइट पेटला. हिमगौरी आणि सात बुटके आणि गेल्या सुट्टीत वाचलेला गलिव्हर त्याला या राज्यात भेटणार होते.
हे सगळे बंटीला भेटले. त्यांनी त्याचा पाहुणचार केला. पण बंटीशी तासन्तास बोलायला, त्याच्याबरोबर खेळायला काही कुणी नव्हतं. आता मात्र बंटीची उत्सुकता संपली आणि त्याला आई- बाबा- आजीची आठवण आली.
हे सगळे किती कामात आहेत. प्रत्येकाजवळ काही ना काही करायला आहे. कुणीच रिकामं नाही. आपण मात्र काम नको म्हणून इथं तिथं फिरतोय. आता घरी कसं जायचं? आई काय म्हणेल? बाबा ओरडेल का? त्याला आता खरंच घरची आठवण आली. लवकर उठवते, तरी आई ,किती लाड करते आपले? आजी किती गप्पा मारते, आपल्याला वाटेल तेव्हा ती खेळतेसुद्धा. बाबा पण काम बाजूला ठेवून माझा होमवर्क करायला मदत करतो. त्याला आठवलं. भरून आलं.
आता त्याला घरची खूपच आठवण आली. कराटे क्लासमधला निखिल आठवला. तिथं जावंसं वाटलं. चित्रकलेच्या क्लासची मिनीला तो ससा काढून दाखवणार होता. आत्ता खरं तर चित्रकलेच्या क्लासला गेलं पाहिजे. किती वेगवेगळी गावं आणि माणसं पाहिली आपण, प्राणीसुद्धा.. सगळ्यांची चित्र काढून आईला दाखवली पाहिजेत.
आई, बाबा.. त्याला आठवण आली जादूच्या दिव्याची. झटकन सॅकमधून जादूचा दिवा काढला. भरभर घासला. जिनी प्रकट होताच त्याला म्हणाला, ‘‘मला आधी घरी घेऊन चल.’’ ‘‘हुकूम मेरे आका’’ असे शब्द ऐकले आणि डोळ्यांपुढे पुन्हा अंधार पसरला. अचानक जिनी मोठय़ानं आपल्याला बंटी म्हणून हाका मारतोय असं वाटलं. जादूची चटई हलतेय की काय? त्यानं डोळे उघडले तर समोर बाबा. ते पायरीवर जवळ घेऊ न विचारत होते, ‘‘अरे, झोप लागली काय रे? सॉरी बंटी.. मला माहितीच नव्हतं क्लासला सुट्टी आहे ते.. शहाणा आमचा बंटी एकटा बसला तासभर. आता तू पाहिजे ते माग. तुला खाऊ घेतो आणि इतर क्लासला दांडी. घरी जाऊन पुन्हा झोप हवं तर आणि मग तुला हवा तर टीव्ही बघ.’’ बाबा सांगत होते.
‘‘नको बाबा. मला चित्रकलेच्या क्लासला जायचंय आणि बरीच चित्रं काढायचीत. आता माझी सगळी कामं मी न कंटाळता करणारेय. मला खाऊ सुद्धा नकोय आता. घरी जाऊ न आईनं केलेली पोळी-भाजीच खाईन.’’
बाबा बंटीच्या या नव्या अवताराकडे बघतंच राहिले. त्यांना काय माहिती बंटी तासाभरात कुठे कुठे फिरून कुणाकुणाला भेटून आला होता.
जिनीनं बंटीला बरोब्बर घरी आणून सोडलं.
