फ्रँकलिन म्हणजे एक कासव. तुमच्यासारखंच लहानसं .. खोडय़ा करणारं.. मस्ती करणारं.. रडणारं आणि हसणारंही.. त्यालाही तुमच्यासारखीच शाळा आहे. तो तुमच्यासारखाच मित्रांशी भांडतो. जरा भाव खातो. कधी कधी दादागिरीही करतो.. फ्रँकलिन तुमच्यासारखाच असल्याने तो तुम्हालाही खूप आवडेल. त्याच्या सगळ्या गोष्टींची मस्त पुस्तकं आहे. फ्रँकलिनच्या या गोष्टींमध्ये फ्रँकलिनबरोबरच आहेत अस्वल, हरीण, कोल्हा, घुबड, ससा..
‘फ्रँकलिनची भेटवस्तू’ ही ना एक मस्त गोष्ट आहे. तुमच्या आईचा वाढदिवस जवळ आला की तुम्हीही तिला जगातलं युनिक गिफ्ट देण्यासाठी खटपट करता. तसंच काहीसं फ्रँकलिनचं झालंय. त्याला त्याच्या आईच्या वाढदिवसाला एक अनोखं गिफ्ट द्यायचंय. तो खूप खूप विचार करतो. शेवटी तो आपल्या मित्रांना विचारतो. त्याचे मित्र- अस्वल, गोगलगाय, बिव्हर, हंसी आपल्या आईसाठी कोणतं गिफ्ट देतात ते सांगतात. तरीही वाढदिवसाच्या आधीच्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत त्याला काहीच सुचत नाही. तुमच्यासारखाच तोही गोंधळून जातो. मग तो ठरवतो की आपल्या मित्रांनी सांगितलेल्या सर्वच गिफ्ट आपण आईला देऊ. आणि तसे तो करतोही. त्याची आई खूप खूश होते. रात्री झोपताना फ्रँकलिन आईला मिठी मारतो. तिचा पापा घेतो आणि म्हणतो, ‘‘मला तू खूप आवडतेस.’’ त्यावर त्याची आई म्हणते, ‘‘हे चार शब्द जगातल्या कुठल्याही मस्त भेटीपेक्षा जास्त भारी आहेत.’’ तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, आपलं आपल्या आईवर प्रेम आहे, हे तिला दाखवून देण्याचा सर्वात छान उपाय आहे. मग फ्रँकलिन आईला म्हणतो, ‘मला तू आवडतेस’..
समजलं ना छोटय़ा दोस्तांनो, फ्रँकलीनसारखंच तुमच्याही आईला, तुमच्याकडून तीन शब्दांचं हे छोटंसं वाक्य गिफ्ट म्हणून हवं असतं. द्याल ना मग आईला हे छानसं गिफ्ट?
‘फ्रँकलिनच्या शाळेची ट्रिप’ म्हणजे तुमच्यासारखी प्राणिसंग्रहालयाला दिलेली भेट. फ्रँकलिन आणि त्याच्या दोस्त मंडळींच्या मनात या प्राणिसंग्रहालयाविषयी तुमच्यासारखंच कुतूहल असतं. ते प्राणिसंग्रहालयात जातात खरे, पण घुबडसर त्यांना काही सूचना देतात. सुरुवातीला घाबरून घुबडसरांना खेटूनच राहणाऱ्या फ्रँकलिनच्या मनातली भीती पळून जाते आणि प्राणिसंग्रहालयातल्या गमतीजमती कधी एकदा आईला सांगतोय असं त्याला होतं.
‘फ्रँकलिनची व्हॅलेंटाइन्स करड’ हे पुस्तक म्हणजे फ्रँकलिन आणि त्याच्या समजूतदार मित्रांमधल्या घट्ट मैत्रीची गोष्ट! ‘व्हॅलेंटाइन्स डे’ ला फ्रँकलिन आपल्या मित्रांसाठी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ची करडस् बनवतो. पण घाईगडबडीत तो तशीच दप्तरात कोंबतो आणि शाळेत जाताना त्याच्या नकळत ती दप्तरातून पडतात. शाळेत ‘व्हॅलेंटाइन्स डे’ च्या पार्टीच्या वेळी तो मोठय़ा आनंदाने ती कार्ड्स मित्रांना द्यायला जातो. पण दप्तरात ती नसतात. तो पुरता हिरमुसतो. घरी आईला फोन करतो तेव्हा त्याला कळतं की, त्याच्या दप्तरातली कार्डस् घराजवळच्या कचराकुंडीच्या शेजारी पडलीयत आणि ती खराब झालीयत. तो शाळेतल्या सामानाच्या खोलीत जाऊन रडत बसतो. घुबडसर आणि त्याचे मित्र त्याला शोधत असतात. शेवटी घुबडसर त्याला शोधत शोधत सामानाच्या खोलीत येतात आणि त्याची समजूत काढतात. फ्रँकलिनकडे त्याच्या मित्रांना द्यायला कार्डस् नसली तरीही त्याचे मित्र त्याला मोठय़ा आनंदाने कार्डस् देतात. फ्रँकलिन मित्रप्रेमाने भारावून जातो आणि घरी गेल्यावर मित्रांना द्यायला फ्रेंडशिप डेची नवीन कार्डस् तयार करतो आणि दुसऱ्या दिवशी मित्रांना वाटतो. कारण खऱ्या मित्रांसाठी फ्रेंडशिप डे कधीही होऊ शकतो, असं त्याला वाटतं.
फ्रँकलिनच्या देशात ‘थँक्स गिव्हिंग’ नावाचा सण मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. फ्रँकलीन या सणाची आतुरतेने वाट पाही. कारण या दिवशी त्याचे आजी-आजोबा घरी येत. पण यावेळी त्यांना त्यांच्या घरी येणं जमणार नव्हतं. या ‘थॅँक्सगिव्हिंग’ला कोणीच आपल्या घरी येणार नाही याचं याचं फ्रँकलिनसोबत त्याच्या आई-वडिलांनाही वाईट वाटतं. फ्रँकलिन शाळेत गेल्यावर त्याच्या घुबडसरांना आणि त्यांच्या आईला आपल्या घरी बोलावतो. त्याची आई शेजारच्या अस्वलाच्या घरी आमंत्रण देते तर बाबा उंदीरमामाला आमंत्रण देतात. असं करता करता त्यांच्या घरात खूप सारी पाहुणे मंडळी गोळा होतात. पण घर असतं लहान. मग फ्रँकलिन अंगणात जेवणाची कल्पना मांडतो आणि ती सर्वाना आवडते. अशा प्रकारे फ्रँकलिनच्या कुटुंबाची थँक्सगिव्हिंग पार्टी मस्त होते.
‘फ्रँकलिनचा शेजार’ या गोष्टीत घुबडसर शेजारच्या सर्वात आवडत्या गोष्टीचं चित्र काढायला सांगतात. फ्रँकलिनची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे त्याचा शेजार. त्याच्या शेजारील आवडत्या मंडळीचं चित्र काढून तो शाळेत नेतो.
‘फ्रँकलिनची पिटुकली बहीण’ या गोष्टीत फ्रँकलिनच्या बहिणीचा जन्म आणि वसंत ऋतू यांची छान माहिती आहे.
‘फ्रँकलिन हॉस्पिटलमध्ये भरती होतो’ या गोष्टीत कितीही भीती वाटली तरी काही गोष्टी करण्यातच खरा शूरपणा आहे, हे सांगितलं आहे. फ्रँकलिनला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर इंजेक्शन, एक्स-रे यांची खूप भीती वाटते. पण तरीही तो आवश्यक असल्याने करून घेतो.
‘फ्रँकलिनचा गुप्त क्लब’ म्हणजे त्याच्या घराजवळ लपण्याची एक छोटीशी जागा. या क्लबमध्ये मित्रांसोबत केली जाणारी मजामस्ती काही औरच!
‘फ्रँकलिनची ख्रिसमस भेट’ म्हणजे त्याने त्याच्या आत्याला स्वत: लिहिलेलं नाटक भेट म्हणून दिलं. ही अनोखी भेट त्याच्या आत्याला खूप आवडते आणि ती त्याचं विशेष कौतुक करते.
असा तुमच्याचसारखाच आहे फ्रँकलिन.. तो भेटतो फ्रँकलिनच्या मजेदार गोष्टींमधून. तुम्हाला या गोष्टी वाचतना आपण फ्रँकलीनच्या नाही तर आपल्याच गोष्टी वाचतो आहोत असं वाटेल तुम्हाला. या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत, लेखिका पोलेत बूज्र्वा यांनी आणि झक्कास चित्रं काढली आहेत, चित्रकार ब्रेन्डा क्लार्क यांनी.
फ्रँकलिनच्या या जगाची सफर करणार ना तुम्ही?
लेखिका – पोलेत बूज्र्वा
चित्रकार – ब्रेन्डा क्लार्क
अनुवाद – मंजूषा आमडेकर
चित्रे – ब्रेन्डा क्लार्क
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
मूल्य – प्रत्येकी ५० रुपये.