परीक्षा झाली, सुट्टी लागली. आता १६ जूनपर्यंत आरामच आराम. मध्ये केवळ निकालाचा सोपस्कार. सत्यमला बिलकूल काळजी नव्हती. आजकाल रिझल्टमध्ये नंबर दिले जात नसले तरी गुणांची गोळाबेरीज केली तर त्याचा पहिला क्रमांक ठरलेलाच. आता दहावीचं वर्ष. त्याला व्हेकेशन क्लासमध्ये टाकण्याचा आईचा विचार त्याने धुडकावूनच लावला होता. याच्या डोक्यात नेहमी शिजणाऱ्या जगावेगळ्या कल्पना म्हणजे आईबाबांसाठी धास्तीचाच विषय. तो कधी काय करेल, कुठे जाईल, कशाचा- कोणाचा- कशामुळे त्याला राग येईल, हे सगळंच अनाकलनीय. त्याच्या स्वभावाच्या या पैलूची त्यांना भयंकर धास्ती. त्याच्या जगावेगळ्या गुणांचं, वयाच्या मानाने जास्त असलेल्या समजूतदारपणाचं कौतुक करणंही त्यामुळे त्यांना सुचत नसे.
कारणही तसंच होतं म्हणा. चारचौघांमध्ये उठून दिसणारा, हसरा आणि तरतरीत नाकाचा सत्यम चारचौघांसारखा नव्हताच. त्याला सतत नावीन्याची आवड. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा स्वभाव. खऱ्या-खोटय़ाची शहानिशा करण्याचा हट्ट.. सुखवस्तू कुटुंबातील मुलं कशी लाड पुरवून घेतात, सुरक्षित चौकटीत जगतात, तसं याचं नव्हतं. कोणालाही मदत करण्यासाठी हा पुढे, कोणावर अन्याय होताना दिसला तर हा भांडणार, इतरांचं भलं-बुरं हा ठरवणार.. आता इंटरनेटही हातात आल्याने चौकसपणाला खाद्यच मिळू लागलं. इंटरनेटवरून वेगवेगळी माहिती मिळवणं हा त्याचा सध्याचा छंद होता.
असंच एकदा दुपारी सर्फिग करत असताना त्याच्या वाचनात एक लेख आला, तो वाचून हा गडबडलाच. मोठाल्या कंपन्यांची सहज मिळणारी कोल्ड्रिंक्स शरीराला घातक असतात, ती प्यायल्यानंतर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, हाडं ठिसूळ होतात, प्रतिकारशक्ती कमी होते ही माहिती त्यात होती. त्याशिवाय काही पॅकबंद, कुरकुरीत पदार्थ तर फारच वाईट असतात, त्यात चक्क प्लास्टिक असतं. ते जाळले तर भुरभुर जळतात. फास्ट फूड आणि जंक फूडमुळे शरीराची हानी होते वगैरे वगैरे.. हे त्यात प्रात्यक्षिकांसह दाखवलं होतं. त्याचं लक्ष डाव्या हाताशी असणाऱ्या कोल्ड्रिंकच्या बाटलीकडे गेलं. तेच भयंकर पेय तो पीत होता.
अरे बापरे, आपण गेले काही महिने हेच पेय पितो अधूनमधून. शिवाय महिन्यातून एकदा बर्गर, पिझ्झा वगैरेही खातो. आता संध्याकाळी आई-बाबांनाच विचारायचं असं म्हणत सत्यमने तो लेख सेव्ह केला. त्या साइटचे नाव लिहून ठेवले व संगणक बंद केला. त्यानंतर ते उरलेलं पेय टॉयलेटमध्ये ओतायला तो विसरला नाही. फ्लश केल्यावर त्याच्या लक्षात आलं की टॉयलेट अगदी स्वच्छ निघालं आहे. ‘म्हणजे यात अ‍ॅसिडही असतं की काय..’ ते पेय ओततानाच त्याला एक कल्पना सुचली आणि तो स्वत:वरच खूश झाला. सर्वाच्या शरीराला अपायकारक असणारी ही पेयं सगळीच्या सगळी अशीच ओतून टाकली तर किती मजा येईल.. मात्र त्यातील फोलपणा लगेचच त्याच्या लक्षात आला. आपण एकटेच काय, कोणीच हे पूर्णपणे थांबवू शकत नाही. मग काय करता येईल बरं.. हं, आपण मित्रांना आणि ओळखीच्यांना हे सांगू तर शकतो.. असंच करूया.. त्यासाठी काय करायचं हे ठरवलं पाहिजे. मात्र गाडी पुन्हा तिथेच अडली. ‘बघू या नंतर’, असं म्हणत तो सायकल चालवायला बाहेर पडला.
उन्हं नुकतीच उतरत होती तरी भयंकर उकाडा जाणवत होता. सत्यमने नेहमीच्या रस्त्यावरून बागेच्या दिशेने सायकल पिटाळली. डोक्यात विचारचक्र सुरूच होते. काय करायचं, काय करता येईल.. जागोजागी असणारी कोल्ड्रिंक्सची दुकानं आता त्याला ठळकपणे दिसू लागली. कोणी लहान बाटलीतून पितायेत, तर कोणाला मोठी बाटली हवी, कोणी तर मोठी बाटली घरीच घेऊन जातंय. लाल, केशरी, हिरव्या, निळ्या, काळ्या, पांढऱ्या बाटल्याच बाटल्या. त्याला फारच भयंकर वाटलं ते. उकाडय़ामुळे त्याच्याही घशाला कोरड पडली होती. एरवी आपणही अशीच एखादी बाटली घेतली असती किंवा लगेच घरी जाऊन फ्रिजमध्ये तशी एखादी बाटली आहे का ते पाहिलं असतं, असा विचारही त्याच्या मनात आला. तेवढय़ात त्याला उसाचं एक गुऱ्हाळ दिसलं. गुऱ्हाळ कसलं, बाप-बेटेच जुंपले होते त्या लाकडी गुऱ्हाळाला. पोरगा त्या गुऱ्हाळात ऊस सारत होता आणि बाप दहा फेऱ्या मारून रस काढत होता. फारच अंगमेहनतीचं काम होतं ते. मुलगा साधारण त्याच्याच वयाचा. सत्यमने त्यांच्या दिशेने मोर्चा वळविला.
‘एक ग्लास किती रुपयांना’, सत्यमने विचारलं.
त्या मुलाचे बाबा म्हणाले, ‘पोरा, फक्त आठ रुपये गिलास’.
सत्यमने रस घेतला. खूप महिन्यांनंतर किंबहुना वर्षांनंतर तो उसाचा रस पीत होता. रस्त्यावरचं काही खायचं-प्यायची त्याला घरातून मुभा नव्हती. मात्र ती बाटलीबंद घातक पेयं चालतात तर उसाचा रस का नाही, या बंडखोर विचारापर्यंत तो पोहोचला होता. उकाडय़ामुळे त्या क्षणी त्याला तो रस अमृततुल्य वाटला. अर्धाअधिक ग्लास तर त्याने गटागटा पिऊन टाकला. पैसे देताना सत्यम म्हणाला, ‘काका, रस मस्तच होता हं’.
‘झ्याक होता की नाय, घे आणखी घे वाईच..’
‘अहो, नको, नको’.
‘घे रे, तुम्ही काय ते फ्री म्हणता ना, तसा घे, याचं पैसं नकोत’.
आग्रहाचा अर्धा ग्लास रसही तो प्यायला.
‘काका, तुम्हाला पाहिलं नाही कधी इथे. कुठून आलात तुम्ही?’
‘आरं पोरा, काय सांगू.. आम्ही पार लांबून गावाकडून आलो बग. म्या तिकडच्या एका कारखान्यात होतो. कारखाना बंद पडला बघ. मंग काय करायचं तर हा धंदा. आलो इकडे. माझी बाय आणि धाकला मुलगा तिकडेच हायेत, याला संग घेऊन आलो. आता पाऊस पडेपर्यंत हिथंच कुठेतरी आसरा शोदनार’.
‘बाप रे, हा शाळेत जातो की नाही आणि रोज किती रस काढता तुम्ही अशा फेऱ्या मारून?’
‘कसली शाळा घेऊन बसलास, चार बुकं शिकलाय आणि रसाचं काय, गिऱ्हाइक आलं की लागायचं फिरायला. रात्री पाठ टेकल्यावरही समदं गरगर फिरत असतं बग. चार पैसे भेटतात. करायला पायजे ना’.
‘तुझं नाव काय रे’, सत्यमने त्या पोराला विचारलं.
‘शिवा’.. त्याने ग्लास विसळता-विसळता तुटक उत्तर दिलं.
सत्यम घरी परतला. त्याच्या मनात आलं, अंगमेहनत करणाऱ्या रसवाल्याला फक्त आठ रुपये आणि त्या कोल्ड्रिंक्ससाठी पंधरा-वीस, पन्नास रुपये? बरं, शरीरासाठी रस किती तरी चांगला आणि ही पेयं पिऊन काय होणार, तर हाडं ठिसूळ आणि रक्ताचं पाणी.. खूपच वाईट आहे हे.. कोणी काही करत का नाही याविरुद्ध..
बाबांशी बोललंच पाहिजे या विषयावर.
घरी परतल्यानंतर आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे, याची सत्यमच्या बाबांना कल्पना नव्हती आणि तो तर वाटच पाहत होता बाबांची. बाबा आले, आईसुद्धा थोडय़ा वेळापूर्वी आली होती. ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्याने सत्यमने तिला छेडलं नाही.
फ्रेश झालेल्या बाबांना आई म्हणाली, ‘चहा टाकू ना’?
‘नको गं, उकडतंय किती. त्यापेक्षा कोल्ड्रिंकच घेतो फ्रिजमधलं..’ असं म्हणत बाबांनी फ्रिज उघडला. पाहतात तर काय बाटली गायब.
‘हे काय, एवढं कोल्ड्रिंक कोणी संपवलं? सत्या, दिवसभर हे उद्योग चालतात वाटतं सुट्टीत’?
‘मी थोडंसंच प्यायलो आणि उरलेलं टॉयलेटमध्ये ओतलं’.
‘क्काय?’ बाबा किंचाळले.
‘हो, ते शरीरासाठी घातक असतं ना, म्हणून’.
‘हे काय नवीन आता, हे कोणी सांगितलं तुला..’
‘हे काय, या साइटवर सगळी माहिती दिल्ये, अशा पेयांच्या दुष्परिणामांची, मला तुमच्याशी त्याच विषयावर बोलायचंय’, असं सांगत सत्यमने बाबांना त्या साइटचा वेब अ‍ॅड्रेस दाखवला.
पोराच्या या नव्या संशोधनाचं गांभीर्य बाबांच्या एव्हाना लक्षात आलं. आईसुद्धा दरवाजात येऊन उभी राहिली.
‘अरे, त्यातही प्रकार असतात, ती सगळीच पेयं काही वाईट नसतात. त्यात काही सॉफ्ट असतात, नाही का, आणि आपण नेहमी कुठे पितो’? बाबांनी प्रतिकार करण्याचा क्षीण प्रयत्न केला.
‘म्हणजे, कमी-अधिक प्रमाणात वाईटच ना? जे पेयं कमी वाईट आहे, ते सारखं प्यायलं तर त्रास होणारच ना’?
यावर काय बोलणार, अशा अर्थाने बाबांनी आईकडे पाहिलं.
‘बाळा, तुझं बरोबर आहे हं, आपण नको प्यायला हं ते यापुढे’. आईने त्याला जवळ घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
‘आई, फक्त आपण न पिऊन काय होणार, ते कोणीच पिता कामा नये. खरं तर त्यावर बंदीच घातली पाहिजे. मी तर त्यात असं वाचलं की अमेरिकेत तेच पेय वेगळ्या फॉम्र्युल्यात बनवतात आणि आपल्याकडे मात्र तीच कंपनी तेच पेय कीटकनाशकं वापरून बनवते, ही पार्शलिटी का?’
‘जाऊ दे ना, आपण कशाला हा विचार करायचा. तुला सुट्टीत काय पाहिजे ते सांग. ट्रीपला जाऊ या का, की तुला अ‍ॅडव्हेंचर कॅम्प वगैरे करायचाय’? आईचा आणखी एक निष्फळ प्रयत्न..
‘छे, छे, मी कुठेही जाणार नाही. मला याच विषयात काहीतरी करायचंय या सुटीत आणि नंतरही’.
‘म्हणजे नक्की तू काय करायचं ठरवलं आहेस?’ बाबांचा काळजीयुक्त प्रश्न.
‘तसं अजून फायनल काहीच नाही. पण मला तुम्हीचा सांगा बाबा, इतरांनी ही कोल्ड्रिंक्स पिऊ नयेत म्हणून मला काय करता येईल?’
‘अरे, तू किती लहान आहेस. आपण किती आणि कुठे पुरे पडणार? या कंपन्यांचं मार्केटिंग किती स्ट्राँग असतं माहीत नाही तुला. खेडेगावात नळाला एक वेळ पाणी नसेल, मात्र बाटलीबंद पाणी विकत मिळतं. खेडेगावांत ही शीतपेयंही आरामात मिळतात आणि या कंपन्या किती बलाढय़ आहेत माहित्ये का, आपला एकही महान नेता त्याविरोधात आंदोलन करत नाही..’
‘बाबा, मला सगळं पटतंय, पण म्हणून आपण काहीच करायचं नाही का?’
यावर आई-बाबांची खात्री पटली की हा बेटा आता स्वत:चं समाधान होईपर्यंत हात-पाय मारत बसणार.. काहीतरी उपद्व्याप करणार.
विषय बदलण्यासाठी आईने विचारलं, ‘भूक आहे ना, रोजच्यासारखा जेवणार आहेस ना’?
‘नको गं, एक पोळी कमी खाईन. दीड ग्लास उसाचा रस प्यायलोय. काय टॉप होता माहित्ये का?’ असं सांगत त्याने ते रसभरीत वर्णन केलं. ते सांगताना महागडय़ा व घातक कोल्ड्रिंक्समुळे उसाच्या रसावर, तो करणाऱ्यांवर कसा अन्याय होतो, याचा पाढाही त्याने वाचला.
सत्या रस्त्यावरचा उसाचा रस प्यायला हे ऐकूनच आईचं डोकं दुखू लागलं, मात्र यावर काही सांगायला जावं तर विषय आणखी वाढेल या सार्थ भीतीने ती आत निघून गेली. बाबा तर कधीच मौनात गेले होते आणि काय करता येईल, या विचारात सत्याची तंद्री लागली होती.
झोपतानाही त्याचा यावर विचार सुरू होता, कधी डोळा लागला कळलं नाही. सकाळी उठताना मात्र काहीतरी गवसल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. सगळ्यांची आवराआवर झाली. त्याला भरपूर सूचना करून आई-बाबा ऑफिसला गेले. सत्याला हाच एकांत हवा होता. त्याने तीन-चार मित्रांना पटापट फोन करून आधल्या दिवशीचा वृत्तान्त सांगितला. मित्रांनी तो ऐकून घेतला, मात्र आपण काही तरी करायला पाहिजे, या सत्यमच्या आग्रहाला कोणीच प्रतिसाद दिला नाही. सत्यमसाठी ते अनपेक्षित नव्हते. आता काय करायचं ते एकटय़ानेच, असं म्हणत तो कामाला लागला. सकाळी उठता-उठता सुचलेल्या कल्पनेप्रमाणे त्याने घरातले सगळे पाठकोरे कागद गोळा केले. ते व्हिजिटिंग कार्डच्या आकारात कापले. बाटलीबंद शीतपेयं, फास्टफूड, कुरकूर करणारा खाऊ शरीरासाठी किती अपायकारक असतो, याची थोडक्यात माहिती देणारा मजकूर त्याने मराठी व इंग्लिशमध्ये कच्चा लिहून काढला आणि तो मनासारखा झाल्यानंतर कागदांच्या सगळ्या तुकडय़ांवर भराभरा लिहीत सुटला. सगळ्यात शेवटी त्या माहितीचा वेब अ‍ॅड्रेस टाकायलाही तो विसरला नाही. सुवाच्य आणि दाणेदार अक्षराचा सत्यमला असा लाभ होत होता. दोन तास बसल्यानंतर चांगला मोठा गठ्ठा तयार झाला. आता त्याला मोहिमेवर निघायचं होतं, मात्र पोटात कावळे ओरडू लागल्याने त्याने आधी जेवून घेतलं.
जेवल्यानंतर भर दुपारी स्वारी निघाली. टोपी, गॉगल, सॅक, पाण्याची बाटली असा सगळा जामानिमा होता. सायकल तर पाहिजेच. जवळपासची दुकानं त्याचं आजचं लक्ष्य होतं. भरपूर शीतपेयं विकणाऱ्या एका दुकानासमोर तो आला. एक माणूस नुकताच काळ्या बाटलीतला द्रव रिचवून ढेकर देत बाहेर पडत होता. सत्यमने त्याला थांबवले.
‘काका, हे घ्या, वाचा प्लीज.’
‘काय आहे, मला नकोय कोणतीही ऑफर.’
‘अहो नाही, ऑफर वगैरे नाही, वाचा तर खरं.’
त्या माणसाने चिटोऱ्यावर नजर फिरवली.
‘व्वा, खूपच शहाणा दिसतोयस, आहेस तर एवढासा आणि आम्हाला लेक्चर देतोस रे?’
‘नाही हो, मी लेक्चर बिक्चर देत नाही, अपील करतोय, नका पिऊ हे, मलासुद्धा आवडायचं ते, कालपासून मात्र मी ते सोडलं.’
‘अस्स, बरं बरं, बघेन हं मी काय करायचं ते,’ असं म्हणत तो माणूस निघून गेला.
सत्यमला वाटलं, लोकांना आपण दुकानात शिरतानाच गाठलं पाहिजे.
घाम पुसत येणारे दोघे त्याला दिसले, एकाने तर हातात पैसेही तयार ठेवले होते.
‘काका, एक मिनीट..’ सत्यमने पुन्हा तीच टेप ऐकवली.
‘अरे वा, अक्षर छान आहे हं, तुझं आहे का?’
‘हो, थँक्स, पण त्यातलं मॅटर जास्त छान आहे.’
‘बोलायलाही हुशार आहेस की.’
‘काका वाचलंत ना ते, मग नका ना घेऊ ते कोल्ड्रिंक.’
‘चालेल, चालेल.’
‘खरंच नाही घेणार ना?’ सत्यमने आनंदाने विचारलं.
‘अजिबात नाही, फक्त आत्ताच्या आत्ता मला शहाळं किंवा लिंबू सरबत आणून दे.’
‘अहो, मी कुठून आणून देऊ , त्यापेक्षा तुम्ही पाण्याची बाटली का बाळगत नाही. माझ्याकडे आत्ता थोडं पाणी आहे, हवं का?’
‘आता हे अतीच होतंय हं, चल निघ इथून, आम्ही बघतो काय खायचं-प्यायचं ते.’
सत्यमच्या उत्साहावर पाणी पडलं. त्याने किती तरी दुकानांत अनेकांना ते कागद वाटले. काहींनी वाचले, काहींनी तर त्याकडे पाहिलंही नाही. काहींनी त्याचं कौतुकही केलं, मात्र बाटल्या संपत राहिल्या. सत्यमला जास्त वाईट वाटलं ते लोकांच्या अनास्थेचं. तो घरी परतला, प्रचंड थकव्यामुळे त्याला सोफ्यावरच झोप लागली, आई-बाबा आले तेव्हा बेलच्या आवाजाने तो जागा झाला.
‘काय, सत्या कसा काय दिवस गेला, कंटाळा नाही आला ना?’ बाबांनी विचारलं.
‘कुठे बाहेर गेला नव्हतास ना?’ आईचा नेहमीचा प्रश्न.
‘नाही, घरातच होतो दिवसभर. कंटाळा आला म्हणून इथेच पडलो सोफ्यावर.’
आईला तो थोडा थकल्यासारखा वाटला, मात्र झोपल्यामुळे चेहरा तसा दिसत असेल, अशी तिने समजूत करून घेतली.
बाबांना कालचा प्रकार आठवत होता, त्यावर त्याने पुढे काही उपद्व्याप तर केले नाहीत ना, हे त्यांना विचारायचं होतं, मात्र सत्याच तो विषय काढत नाही म्हटल्यावर तेही गप्प राहिले.
पुढे तीन दिवस सत्याने चिटोऱ्यांचं वाटप सुरूच ठेवलं. जवळच्या मॉलमध्ये, मोठय़ा फास्ट फूड सेंटरमध्ये, आजूबाजूच्या लहान-मोठय़ा दुकानांत सगळीकडे तो तहानभूक विसरून, उन्हातान्हाची पर्वा न करता हिंडला. प्रतिसाद तसाच संमिश्र. त्याची चिकाटी मात्र कमी झाली नाही. पुढचा उपाय सुचेपर्यंत असाच प्रचार करत राहायचं, सुटीत दुसरा उद्योग तरी काय आहे, असं तो स्वत:ला बजावत राहिला. मात्र सलग चार दिवसांच्या या दमछाकीमुळे शरीरावर व्हायचा तो परिणाम झालाच. सत्यमला रात्री सणकून ताप भरला. सकाळी आई उठवायला आली तेव्हा अंगातील त्राण पार गेलं होतं. त्याच्या अंगाला हात लावला आणि आई दचकलीच. तिने त्याच्या बाबांना मोठय़ाने हाक मारली.
‘सत्या बाळा, तुला किती ताप आलाय रे, काल कुठे गेला होतास का, काही खाल्लंस का बाहेर? उद्यावर रिझल्ट आला तुझा आणि मध्येच हे काय झालं?’ आईने प्रश्नांची सरबत्ती केली.
‘अगं, थांब जरा, किती प्रश्न विचारशील. जा कलोन वॉटर आणि रुमाल घेऊन ये, घडय़ा ठेवू त्याच्या कपाळावर. थर्मामीटरही आण.’
आई-बाबांची लगबग झाली. सुदैवाने रविवार असल्याने दोघं निवांत होते. सत्यमच्या उशाशी ते बसून राहिले. थोडी हुशारी वाटल्यानंतर सत्यम म्हणाला, ‘बाबा, हेल्थ कॉन्शसनेसच नाही ना आपल्याकडे.’
‘असू दे रे, येतो ताप अधूनमधून, होशील तू लगेच बरा.’
‘नाही, नाही, मी माझ्याबद्दल बोलत नाहीये.’
‘मग कोणाबद्दल बोलतोयस?’
‘तेच ते हो, परवा विषय झाला ना आपला कोल्ड्रिंकचा.’
‘ते आहेच का अजून डोक्यात.’
‘म्हणजे काय, त्याचाच तर हा परिणाम आहे..’ असं म्हणत त्याने चार दिवसांचं अनुभवकथन केलं.
ते सारं ऐकून आईची तर बोबडीच वळली. बाबा मात्र शांत होते. सत्यमला धीर देत ते म्हणाले, ‘सत्या, खरं तर तू हे सगळं आमच्यापासून लपवून ठेवलंस, याचा मला राग आलाय, तरीही सांगतो. तुझ्या वयाच्या मुलाने असं काही करणं खूप मोठी गोष्ट आहे. अरे, ही कामं तुम्हा मुलांची नाहीत रे. तुला अजून खूप शिकायचंय, करियर करायचंय, स्थिरस्थावर व्हायचंय, मग कर ना हवं ते.’
‘बाबा, तुम्ही सेटल आहात ना, मग तुम्ही आणि तुमचे मित्र का करत नाही हे?’
नोकरी-संसारात गुंतलेल्या बाबांकडे यावर उत्तर नव्हतंच आणि आई आळीपाळीने कपाळावरच्या घडय़ा बदलत राहिली, त्याचे पाय चेपत राहिली.
सत्याचा ताप संध्याकाळी थोडासा उतरला, मात्र अंगात त्राण नव्हतंच. दुसऱ्या दिवशी दोघांनी सुटी घ्यायची, त्याचा निकाल आणायला आईने जायचं आणि बाबांनी त्याच्याजवळ थांबायचं, असं ठरलं.
‘आई, मीसुद्धा येणार तुझ्याबरोबर शाळेत,’ त्याने हट्ट धरला.
‘बाळा, किती अशक्तपणा आलाय तुला, झेपणार नाही तुला. आणखी आजारी पडशील. त्यापेक्षा नंतर आपण तुझ्या मित्रांना घरी बोलावू हं.’
‘ते सगळं जाऊ दे. तू मला नेत नाहीस, तर माझं एक काम कर. मी काही कागदांवर त्या कोल्ड्रिंक्सचे दुष्परिणाम लिहिल्येत, ते तू सगळ्यांना वाट तिकडे. सरांनाही दे. माझ्या मित्रांच्या आई-बाबांनासुद्धा नक्की दे.’
‘बरं बाळा, देईन हं मी, तू आराम कर आता.’
दुसऱ्या दिवशी सत्याला हवं-नको ते पाहून आई शाळेत गेली. सत्याचा निकाल म्हणजे औपचारिकताच असे. पहिली ग्रेड ठरलेलीच. त्यामुळे ‘ओपन हाऊस’मध्ये त्याच्या नावाच्या अभिनंदनाचा फलक लिहिलेला पाहून आईला आश्चर्य वाटलं नाही. अनेक मुलांचा, पालकांचा, शिक्षकांचा तिच्याभोवती गराडा पडला. ‘सत्या का आला नाही,’ अशी एकच विचारणा झाली. आईने सगळ्यांना सगळं सांगितलं. चिटोऱ्यांचं वाटपही केलं. ते सारं ऐकून-पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुख्याध्यापक दातार कौतुकाने सारं न्याहाळत होते.
पालकांपैकी दोघं अचानक पुढे आले. ‘ताई, आमची दुकानं आहेत, त्यात आम्ही हा माल विकतो, मात्र या मुलाने आमचे डोळे उघडले. आम्हाला हे माहीत नव्हतं असं नाही, मात्र स्वार्थासाठी आम्ही ते विकत राहिलो. आता तुम्हाला आम्ही शब्द देतो, यापुढे आम्ही हा माल विकणार नाही, त्याऐवजी कोकम सरबत, ताक विकू..’ सत्याच्या आईचा कानांवर विश्वासच बसेना.
त्या चिटोऱ्यांचा आयांवर तर खूपच परिणाम झालेला दिसला. त्यांचा एकच गलका झाला. ‘या सगळ्या गोष्टी आपण नेहमीच मुलांना सांगतो, मात्र टीव्हीवरच्या जाहिराती पाहून मुलं मागणी करतात आणि आपण त्यांचे लाड पुरवतो, आता मात्र आपणच बदल घडवायचा. मुलांना विश्वसात घेऊन या गोष्टींचे दुष्परिणाम समजावून द्यायचे, महत्त्वाचं म्हणजे आपणही ते प्यायचं नाही, अगदी बर्गर आणि फ्रेंच फ्राइजवर ते फुकट मिळत असलं तरीही..’ असा सर्वसाधारण सूर महिला मंडळातून उमटला. सत्यमच्या आईला आता कोणत्याही क्षणी रडू कोसळणार होतं.
तेवढय़ात मुख्याध्यापकांनी सगळ्यांना शांत केलं. ‘पालकांनो शांत व्हा, आजचा दिवस माझ्यासाठी खूपच आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या शाळेतील एका मुलाने निरपेक्ष वृत्तीने समाजाला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासारख्या मोठय़ांच्या संवेदना बधिर झालेल्या असतात, त्यामुळेच अन्याय, दुराचार वाढतो. अशा वेळी सत्यमसारखी चळवळी मुलं आपल्याला खडबडून जागं करतात. तो अभ्यासात पुढे आहेच, मात्र या धडपडीमुळे तो आगळावेगळा ठरला आहे. आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती झाली, आता आपल्या या अव्वल नंबरचे हे सत्यमेव जयते यशस्वी होवो, आपण सारे जण त्याच्या या सत्कार्यात सहभागी होऊ या..’
सत्यमच्या आईचा ऊर भरून आला. डोळे तर केव्हाच वाहू लागले होते. घरी जाऊन हे सगळं कधी एकदा त्याला सांगते, असं तिला झालं होतं.. त्याचवेळी ग्लानीमुळे अर्धवट शुद्धीत असलेला सत्यम मनातल्या मनात पुढील योजनेचा विचार करत होता.

छोटय़ा दोस्तांनो, अगदी सत्याने केलं तेच, तसंच प्रत्येकाने कशाला करायचं नाही का? तुम्ही असं कराल का, आईसाठी तुम्ही एक वाफा भाजी लावाल? अगदी बियाणं, माती आणण्यापासून सगळं तुम्ही करायचं हं! भाजी कशी उगवते ते रोजच्या रोज लिहूनही ठेवायचं. तुम्हीच लावलेली भाजी खायला कित्ती मज्जा येईल माहितीये.. करून तर बघा..