सरत्या पावसाळ्याचे दिवस होते. बरेच दिवस आभाळात दाटून राहिलेले काळ्या ढगांचे आवरण दूर होऊन सूर्यदेवाचा चेहरा दिसू लागला होता. त्याच्या किरणांनी पाना-फुलांवर रेंगाळलेले दवबिंदू मोत्यासारखे चमकत होते. त्या सोनेरी उन्हाने बजबजपूरवर गेल्या काही दिवसांपासून पडलेला दाट धुक्याचा वेढा विरळ होण्यास सुरुवात झाली होती. धुवाधार पावसाने बंद झालेला पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू झाला होता.
गुहेबाहेर पडलेल्या वाघाने सृष्टीचे हे बदलते रूप पाहिले आणि राज्यात एक फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे त्याच्या संचारावरही मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे बाहेर लख्ख उन पडल्याचे पाहून तो घाईघाईने बाहेर पडला. तेवढय़ात गुहेपासून काही अंतरावरील झुडपातून कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून असल्याचे त्याच्या लक्षात आले. तरीही धूर्तपणे आपल्या काहीही कळलेले नाही, असे भासवीत तो पुढे चालत राहिला. मात्र त्याचा मूड आता पूर्णपणे बदलला होता. त्याच्या गुहेकडे टक लावून पाहणारे ते डोळे त्याचा पिच्छा सोडत नव्हते. सभा चौकाच्या पलिकडच्या तळ्यात गजराज नेहमीप्रमाणे आपल्या कळपातील हत्तींबरोबर खेळत होता. एरव्ही वाघाने त्याला डिस्टर्ब केले नसते, पण त्या विचित्र टेहळणीची गोष्ट कधी एकदा त्याच्या कानावर घालतोय, असे त्याला झाले होते. सभा चौकातल्या वडाच्या पारावर वाघ बसलेला पाहून गजराजही घाईघाईने पाण्याबाहेर आला. सोंड उचावून लांबूनच त्याने वाघाचे स्वागत केले.
‘‘नमस्कार राजे! आज कुठपर्यंत दौरा? पावसाने उघडीप दिलेय, तर या एकदा राज्याची सैर करून,’’ गजराज म्हणाला.
‘‘त्यासाठीच तर सकाळीच निघालोय, पण इकडे येता येता एक विचित्र प्रकार पाहिला, म्हटलं आधी तो तुला सांगावा म्हणून आलो.’’ वाघाने झुडपातील त्या रहस्यमय नजरेविषयी गजराजला सांगितले.
ज्याच्याकडे चोरटय़ा नजरेने पाहतानाही इतरांच्या हृदयात धडकी भरते, त्या वाघाच्या गुहेकडे टक लावून पाहणाऱ्या त्या नजरेविषयी ऐकून गजराजालाही आश्चर्य वाटले.
‘‘राजे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही निर्धास्त मनाने राज्यात फेरफटका मारून या. मी पाहतो कोण आहे ते.’’ गजराजने नेहमीप्रमाणे त्या अनामिक संकटाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
वाघ पुढे निघून गेला आणि गजराज कळपाला तिथेच सोडून वाघाच्या गुहेच्या दिशेने निघाला. काळ्या पहाडाखालच्या गुहेपाशी पोचायला त्याला फार वेळ लागला नाही. गुहेच्या अगदी समोर उभे राहून त्याने नीट निरखून पाहिले. तेव्हा गुहेकडे पाळत ठेवून असलेली ती नजर त्याने लगेच ओळखली. सहज फेरफटका मारतोय असे भासवीत तो त्या अनामिक नजरेच्या अगदी मागच्या बाजूला आला. मात्र त्या झुडपात कुणीही नव्हते. काही क्षण त्याला आश्चर्य वाटले, पण लगेचच वाघाप्रमाणे आपल्यालाही भास झाल्याचे लक्षात येताच त्याला हसू आले. साधे वाळके पान पडले तरी आभाळ पडल्याची बोंब ठोकणाऱ्या सशाला आपण किती हसलो होतो, हेही त्याला आठवले. ससा वाळक्या पानाला आभाळ समजला आणि आपण उन्हात चमकणाऱ्या एका दवबिंदूला डोळा समजलो. वाघाला ही गंमत कधी एकदा सांगतोय, असे त्याला झाले. पुन्हा कळपापाशी आल्यावर त्याने वाघाशी मोबाइलवरून संपर्क साधला.
‘‘हॅलो, कुठे आहात?’’
‘‘आता पिंपळेश्वर बनात आहे, तिथून पुढे नदीपर्यंत फेरफटका मारून संध्याकाळी परत येतो,’’ वाघ म्हणाला.
‘‘पुढे जाऊ नका, लगेच माघारी या.’’ -गजराज म्हणाला.
‘‘का रे, काय विशेष?’’ वाघाने आश्चर्याने विचारले.
‘‘तुमच्यावर रोखून पाहणाऱ्या नजरेचे रहस्य उलगडले आहे,’’ गजराजने उत्साहाने सांगितले.
वाघालाही आश्चर्य वाटले. त्याचेही नाहीतरी काही खास काम नव्हतेच, त्यामुळे तो लगेच माघारी फिरला.
दुपारी पोटपूजा आटोपून सभाचौकातील पाराखाली गजराज वाघाची वाट पाहत बसला. काही वेळातच वाघ तिथे येऊन पोचला.
‘‘काय रे काय होतं ते?’’ त्याला हे रहस्य जाणून घेण्याची घाई झाली होती.
‘‘दवबिंदू.’’ गजराजने हसत हसत सांगितले.
दोघेही गुहेकडे परतले, तेव्हा उन्हं उतरणीला लागली होती. चारी बाजूंनी दाटून येणाऱ्या सावलीने संध्याकाळची चाहूल लागली होती. गुहेच्या प्रवेशद्वारापाशी येऊन त्या दोघांनी पुन्हा एकदा समोर पाहिलं. सकाळ इतक्या ठळकपणे नाही, पण ती नजर अजूनही त्यांना न्याहाळीत होती.
‘‘खरं सांगू का? सकाळी मी खूप घाबरलो होतो,’’ वाघ म्हणाला. मग त्या दोघांनी राज्याच्या एकूण कारभाराविषयी चर्चा केली.
आता पावसाळा संपल्यामुळे लवकरच सर्व प्राण्यांची महासभा घेण्याचेही त्यांनी ठरविले. वाघाचा निरोप घेऊन गजराज कळपाकडे येण्यास वळला. तितक्यात पुन्हा त्या नजरेने त्याचे लक्ष वेधून घेतले.
सकाळचे दवबिंदू दुपारच्या रणरणत्या उन्हात सहसा टिकत नाहीत. मग गुहेसमोरचा हा टपोरी दवबिंदू आता अगदी संध्याकाळ झाली तरी कसा? असा प्रश्न पडून तो पुन्हा माघारी फिरला. गजराज परत आल्याचे पाहून वाघालाही आश्चर्य वाटले.
‘‘काय झालं गजराज?’’ वाघाने विचारले.
‘‘काही नाही. डोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या दवबिंदूबाबत आश्चर्य वाटले. कारण दवबिंदूंचा खेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात. दुपारी ही शोभा टिकत नाही. संध्याकाळी तर नाहीच नाही. आता काळोख पडायला आला तरी गुहेसमोरच्या झुडपातील हा दवबिंदू टिकला कसा?’’ गजराजने शंका उपस्थित केली.
‘‘मग तुला काय म्हणायचे आहे?’’ वाघाने विचारले.
‘‘झुडपातील ती रहस्यमय नजर दवबिंदू नक्कीच नाही. दुसरे काहीतरी आहे.’’ गजराजने आपल्या मनातील शंका व्यक्त केली.
वाघाने चटकन गुहेतून मोबाइल आणला आणि माकडला मिस कॉल दिला. अगदी पाच मिनिटांमध्ये माकड गुहेपाशी हजर झाला. वाघ आणि गजराज यांना एकत्र पाहून काहीतरी गंभीर समस्या असावी, हे त्याने ओळखले.

दोघांनीही माकडला त्या रहस्यमय नजरेविषयी सांगितले. माकडही डोळे बारीक करून झुडपाच्या दिशेने पाहू लागला. त्या अंधारातही कुणीतरी गुहेकडे रोखून पाहत असल्याचे त्याला दिसले. चटकन तो त्या दिशेला गेला. त्या रहस्यमय नजरेचे जवळून निरीक्षण करून तो अगदी हसत हसत गुहेकडे परत आला.
‘‘अभिनंदन राजेसाहेब! आता तुम्ही स्टार होणार.तुमची दिनचर्या टी.व्ही.च्या माध्यमातून सारे जग पाहणार,’’ माकडाने रहस्यमय नजरेची उकल केली.
‘‘म्हणजे?’’ वाघाच्या डोक्यात अजून प्रकाश पडला नव्हता.
‘‘अहो, ती नजर म्हणजे छुपा कॅमेरा आहे. आटपाटनगरमधील कुणा चित्रपट दिग्दर्शकाने लावलेला. बहुतेक तुमच्या दिनचर्येवर एखादा लघुपट तयार करण्याची ही योजना असून त्यासाठीच हा चित्रीकरणाचा खटाटोप सुरू आहे,’’ माकडाने अगदी खुलासेवार सांगितलं.
‘‘अभिनंदन राजे, तुम्ही आता स्टार होणार!’’ गजराजनेही वाघाचे कौतुक केले.
आपल्या दिनचर्येवर आधारित कुणीतरी चित्रपट तयार करीत असल्याचे कळल्यावर वाघाला अर्थातच आनंद झाला, पण त्यापेक्षा सकाळपासून मनात दाटून राहिलेले शंकेचे मळभ दूर झाले याचे त्याला समाधान वाटले.
‘‘राजे, एक मात्र लक्षात ठेवा.. कॅमेऱ्याच्या पहाऱ्याविषयी आपल्याला समजलंय, हे मात्र आटपाटनगरवासियांना अजिबात कळू देऊ नका. कारण अज्ञानात सुख असतं..! माकडाच्या या विनोदावर वाघ आणि गजराज दोघेही मनसोक्त हसले.

दोस्तो, तुम्हाला कॅमेऱ्यासमोर असायला खूप आवडतं ते आम्हाला माहितीये. पण समजा तुमच्या घराच्या हॉलमध्येच कॅमेरा लावून ठेवला तर.. तुम्हाला काय वाटतं? काय होईल? लिहून पाठवणार ना आमच्याकडे?