अंबेरी- महाराष्ट्राच्या कोकण विभागाच्या नकाशातला एक ठिपका. शांत, निवांत पहुडलेलं. कोकणात टूरिझमचं वारं फोफावलं तरी अंबेरी या चकमकाटापासून दूरच राहिलेलं. महाराष्ट्राला .. सुमारे ४५० किमीची किनारपट्टी लाभली आहे हे दरवर्षी भूगोलाच्या पुस्तकात लागणारं वाक्य मनोज रोज स्वत: अनुभवत असे. अथांग पसरलेला समुद्र, स्वच्छ आणि मऊशार वाळूने सजलेला किनारा आणि सोबतीला डोलणारी नारळाची- सुरुची झाडं. मनोज या नसर्गिक ट्रॅकवर अक्षरश: हुंदडत असे. धावण्याचं वेड त्याला लहानपणापासूनच. घरामागच्या नारळी-पोफळीच्या बागेतून सुटलं की थेट हाच ट्रॅक. मनोजचं घर आर्ट गॅलरीतल्या चित्राची आठवण करून देणारं. समोर अंगण, निरभ्र आकाशाचा, पौर्णिमेच्या रात्री फुलणाऱ्या चांदण्याचा आस्वाद घेता यावा यासाठी एक बाज स्थिरावलेली. पडवीत मोठ्ठा झोपाळा- आजोबांची आठवण करून देणारा. आता आजोबा नसले तरी येणाऱ्याजाणाऱ्याचं स्वागत करणारा. मग माजघर- याच माजघरात मनोजचा मित्र विसावलेला- टीव्ही! मनोजच्या लहानपणी अंबेरीत नुकतंच टीव्हीचं आगमन झालं होतं. आमची माती-आमची माणसं आणि संध्याकाळी सातच्या ठोक्याला लागणाऱ्या बातम्या एवढाच टीव्हीचा पसारा होता. पण मनोज मोठा होता होता टीव्हीनेही बाळसं धरलं. बाकी सगळ्यापेक्षा स्पोर्ट्स चॅनल्स म्हणजे मनोजचा जीव की प्राण. त्यातही अ‍ॅथलेटिक्स असेल तर स्वारीने ठिय्या मारलाच समजा पडद्यासमोर. मात्र स्वयंपाकघरातून मातोश्रींचा पुकारा आला तर मनोजला तो ‘खोका’ तात्पुरता बंद करावा लागत असे. टीव्हीसाठीचं आईचं हे विशेषण. आईच्या ओरडय़ापासून मनोजचं हक्काचे ठिकाण म्हणजे आजी. हे पोरगं काहीतरी वेगळं आहे याची जाण आजीला होती. नेहमीच्या धाकदपडशा तंत्राने याला सांभाळणं योग्य नाही असं ती मनोजच्या आईवडिलांना सांगे. आजी सांगतेय ते त्यांना पटायचं पण अभ्यास सोडून लागलेल्या या धावण्याच्या वेडाने आईबाबांच्या डोक्याला भुंगा लागला होता. आई घरी येणाऱ्या पेपरमधलं स्पोर्ट्सचं पान पाहतही नसे. पण मनोजच्या डोक्यात धावण्याचं खूळ शिरल्यापासून आईने उलटा पेपर वाचायला सुरुवात केली होती. मागच्या आठवडय़ात दुपारी जेवणाचा अंक संपल्यावर आईने पेपर वाचायला घेतला, शेवटूनच. तर डाव्या बाजूची पट्टी अगदी नेटकी कात्रीने कापलेली. कुठल्यातरी प्रकल्पासाठी किंवा चिकटवहीसाठी केलं असेल या भावनेने तिला बरं वाटलं. कसं बैजवार कापलं आहे, जेवढा भाग कापायचा होता तितकाच, बाकी भागाला धक्का नाही हे पाहून तिच्या समाधानात भरच पडली. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. मनोज दुपारी शाळेला गेल्यानंतर खोलीतला पसारा आवरलेला नाही हे लक्षात आल्यावर आईने तिकडे मोर्चा वळवला. खोलीतल्या कपाटाकडे पाहताच समाधानाचं रूपांतर रागात झालं. अभ्यासाच्या कपाटाच्या डाव्या बाजूला उसेन बोल्ट. हाच तो माणूस- यानेच नादाला लावला आहे मनूला. मनोजला आई लाडाने मनू म्हणत असे. पण बोल्टलाटेनंतर मनूची अडगळीच्या खोलीत रवानगी झालेली. आतापर्यंत तोंडी वर्णन चालायचं, आता फोटो लावलाय- गमने चिकटवलेला बोल्ट. गमची बाटली नीट बंद केलेय का तशीच उघडी ठेवलेय सगळीकडे चिकटाचिकट व्हायला या विचाराने तिचे डोकं आणखीनच भडकलं आणि आईचा अंदाज खरा ठरलाच- आईला समजायच्या आत बोल्टला कपाटावर लावायचा असा मनोजचा बेत होता. बोल्ट कपाटावर अवतरला पण गमची बाटली अशीच सोडलेली उघडी. जमैकाचा हिरवा-पिवळा टीशर्ट, राकट चेहरा आणि डोळे वेगात हरवून गेलेले. शर्यत जिंकल्यानंतरची त्याची उजव्या दिशेने जगाला केलेली विजयाची खास स्टाइल आणि गळ्यात लटकणारं झगमगीत सोन्याचं पदक आणि त्याचे पाय-विद्युतवेगाने पळणारे. शर्यत जिंकल्यानंतर पायांवरचा फोकस बोल्टच्या पदकावर केंद्रित झालेला. खेळातलं ओ की ठो न कळणाऱ्या माणसालाही ऊर्जा मिळेल असा होता तो फोटो. अरे मित्रा हे बघ पदक जिंकलं आणखी एक असं आपल्यालाच सांगतोय असा भास निर्माण करणारा. आईलाही या फोटोने ऊर्जा मिळालेली पण ती ओरडण्यासाठी. बोल्टचा फोटो उजव्या बाजूच्या पाढय़ांमध्ये घुसला होता.
येऊ दे संध्याकाळी- बोल्ट कसा धावतो तेच बघते. आईचा टिपेचा स्वर ऐकून आजीने जपाची माळ ओढतानाच सांगितलं- अगं उज्ज्वला- नको एवढं मनावर घेऊ. परवा पाहिला त्याला टीव्हीवर- वेडाच आहे तो. ‘पळत्या’ कुठला.. हे बोल्टचं अंबेरीतलं नाव-खास आजीने दिलेलं. परवा रात्री वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप होती- नातवाच्या हट्टापायी आजीही बसली खोक्यापुढे. मनोज सगळं सांगत होता- कुठले शूज असतात, कसे धावतात, वेळ कशी मोजतात, बंदुकीचा फैर का उडवतात असं सगळं. आजीला त्यातलं किती कळलं माहीत नाही पण ठो आवाज झाल्यावर चित्याप्रमाणे पळत सुटलेली एक आकृती तिच्या मोतीिबदू झालेल्या डोळ्यांनी टिपली. हाच का रे तू म्हणतोस तो असं म्हणेपर्यंत मनोज मोठय़ाने ओरडला- बोल्ट जिंकला. जिंकला-संपलं पण असं आजीने विचारलं. अगं आजी तेवढंच असतं पळायचं- बोल्ट जिंकला ! भारी.. टायसन गे आणि असाफा पॉवेलला काय मागे टाकलंय- सुस्साट एकदम. अरे ती क्रिकेटची मॅच दिवसभर चालते आणि हे संपलं पण म्हणतोस. त्यांची ही चर्चा सुरू असतानाच खोक्यावर आणि घरात काळोख पसरला. कोकम सरबत आणि आंबा प्रोसेसिंगसाठी बरं पडतं म्हणून गेल्या मे महिन्यात मनोजच्या बाबांनी इन्व्‍‌र्हटर आणलेला. त्यामुळे माजघरातली टय़ूब जागी होती. पण खोका बंद झालेला. श्या.. आताच लाइटला जायचं होतं..मला बघायचं होतं त्याला मेडल घेताना..आता सकाळशिवाय नाही येणार- हे मुद्दाम करतात.. क्रिकेटची मॅच असताना नाही घालवत.. त्यांना माहितेय ना- सगळी मुलं जाऊन हैदोस घालतील एमएसइबीच्या सबसेंटरवर. अरे येतील- काहीतरी बिघडलं असेल- आणि तुला शर्यत पाहायला मिळाली ना- मेडल त्यालाच देणार- तोच जिंकला ना- आजीने समजावलं. ‘उगाच आरडाओरडा नकोय , काही बिघडत नाहीये बघायला नाही मिळालं तर. त्याच्या पळण्यापेक्षा आपल्या प्रगतीपुस्तकाकडे बघा. त्यात आपण धावायचं सोडाच.. थांबलोय ते लक्षात घ्या. मुलगा मेहनती पण अभ्यासात लक्ष नसतं म्हणून खामकर गुरुजींनी बोलावलं होतं मला’ बाबांचा रुद्रावतार पाहून मनोजने रिमोट जागेवर ठेवून गुपचूप अंथरुणं घालायला सुरुवात केली. दिवसभराचा हिशेब तपासण्यासाठी बाबा झोपाळ्यावर बसले आणि लाइट आले. मघाशी झालेल्या प्रकारामुळे ते बोल्टचं मेडल पाहायचं मनोजनं रद्द केलं. नाकावर आलेली चष्म्याची काडी नीट करत स्वारीने पुन्हा टीव्ही लावलेला नाही याची बाबांनी नोंद घेतली. हे खूळ काहीतरी करून काढायला हवं डोक्यातून याच्या हे त्यांनी ठरवलं सुपारी कातरता कातरता. बाबांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले.
मनोज पाचवीत असतानाची गोष्ट. शाळेत क्रीडा स्पर्धा होत्या दरवर्षीप्रमाणे. क्रिकेट, कबड्डी, खो-खो च्या. संघात प्रवेशासाठी मुलांमध्ये चुरस होती. धावण्याच्या शर्यतीत हौश्यागवश्यांची संख्याच जास्त. मनोजने मोठय़ा फरकाने पहिला क्रमांक मिळवला. क्रिकेटमध्ये जिंकलेल्या मुलांच्या कौतुकात मनोजचं यश झाकोळलं. जिल्हास्तरावरच्या स्पर्धेसाठी त्याला पाठवण्यात आलं आणि क्रिकेटच्या टीमलाही. अव्वल संघासमोर मनोजच्या शाळेच्या टीमचा धुव्वा उडाला. पण मनोजने बाजी मारली. १०० मीटर शर्यतीत तो पहिला आला. दुकान आणि गुरांचा व्याप सोडून मनोजबरोबर जायला लागल्याने बाबा नाखूशच होते. परंतु पठ्ठय़ाने पहिला नंबर पटकावल्यावर त्यांनाही प्रचंड आनंद झाला. मनोजला खास आवडणारी मलई कुल्फीच्या दोन राऊंड झाल्या. जिल्ह्य़ाच्या ठिकाणी आलोच आहोत आणि स्वारीने ट्रॉफी पटकावलेय या आनंदात बाबांनी बोल्ट घालतो त्याच रंगाच्या टीशर्टची खरेदी केली. घरी येईपर्यंत रात्र झाली. रस्त्यावरून बापलेकांच्या मोठय़ाने रंगलेल्या गोष्टींवरूनच मनूने ट्रॉफी जिंकल्याचं आईला कळलं होतं. आजीने दृष्ट काढली, आईने ओवाळलं. मनोजने देवाला नमस्कार केला आणि आईने त्याच्या हातावर घरच्या दुधापासून केलेला ताजा गोड पेढा ठेवला. हे कधी केलंस- सकाळी तर नव्हते. तुम्ही गेल्यावर- आई म्हणाली. सारखा पळत असतोस इथेही, तिकडे वेगळं थोडंच असणारे- ट्रॉफीचं माहिती नव्हतं पण तू प्रयत्न करशील याची खात्री होती, म्हणून हे पेढे. आईआजीला सगळ्या दिवसाचा वृतान्त सांगता सांगता स्वारी झोपली. दुसऱ्या दिवशी बाबांचा दिवस लवकरच सुरू झाला, आईसुद्धा रोजच्या कामाला लागलेली. मनोजच्या डोक्यात शर्यतीचेच विचार होते. आई उठवता उठवता म्हणाली, मनू- शर्यत झाली काल, ट्रॉफीही मिळाली. पण आज अभ्यास करायला हवा. स्वाध्याय आणि व्यवसाय दोन्ही भरायचे राहिलेत. लक्षात आहे ना. मागे परसातल्या चुलीसमोर आळसावलेल्या डोळ्यांनी बसलेल्या मनोजने दात घासता घासता हो म्हटलं.
अभ्यासाचे चक्र सुरू झाले पुन्हा. शाळा, गृहपाठ यामध्ये वेळ कसा जाई कळतच नसे. आजूबाजूची मुलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट खेळतात, गप्पा मारतात त्या पण क्रिकेटच्या आणि खोक्यावर बघतातही तेच. मनोजचं मात्र वेगळं होतं. अभ्यास आटोपला की तो समुद्रावर जाई. शंखशिपले आणि वाळूच्या साहाय्याने एक किल्ला तयार करत असे. तिथून धावत सुटायचा ते दुसऱ्या किल्ल्यापर्यंत. अथांग समुद्रात सूर्य निरोप घेतोय, कोळीबांधव दिवसभराची कामं आटोपून आपल्या होडय़ांसह परतत असताना त्यांना धावणारा मनोज दिसत असे. अरे रमेशचा मनोज ना रे तू- साठीकडे झुकलेले एक आजोबा विचारतात. अरे अंधार पडला- जा आता घरला, पुरे झालं धावणंबिवणं. आजोबांची आज्ञा शिरसावंद्य मानून स्वारी घराकडे- धावतच..

सहावीच्या मुलांची ट्रिप निघाली -महाबळेश्वर आणि पाचगणी. मनोजचे आईबाबा सुरुवातीला पाठवायला तयार नव्हते. पण सगळीच मुलं जात आहेत म्हटल्यावर त्यांनी होकार भरला. जाताना ‘प्रासंगिक करार’ वाल्या एसटीत गाणी, भेंडय़ा, नकला यांना ऊत आला. महाबळेश्वरला वेण्णा लेक, सनसेट पॉइंट सगळीकडे धमाल नुसती. दुसरा दिवस पाचगणी- सगळा कंपू प्रसिद्ध टेबललँड पठारावर पोहोचला. तिकडे गेल्यावर मनोजचं वारू उधळलं. बाकी मुलं कोणी घोडय़ावरची रपेट मारतंय, कोणी एकमेकांचे फोटो काढतंय असं काय काय चाललेलं. मनोज मात्र पठाराचं एक टोक ते दुसरं टोक धावत होता. कमीत कमी वेळात शर्यत पूर्ण करण्यासाठी त्याची स्वत:शीच स्पर्धा सुरू होती. अंबेरीला समुद्रकिनारा आहे धावायला पण या पठाराची मजा काही औरच असं मनोजला वाटलं. आपण इकडेच राहायला हवं-जेणेकरून धावता येईल मनसोक्त. पण मग समुद्र नसेल- समुद्र नाही या कल्पनेने तो हिरमुसला. ऊन वाढलं तसं बाई आणि गुरुजींचा चला-चला पटापटचा धोशा वाढला आणि मंडळी निघाली. पुढच्याच आठवडय़ात गावात ग्रामदेवताच्या उत्सवाची धामधूम सुरू झाली. दोन्ही बाजूंनी आंबा-काजूची झाडं, करवंदाच्या जाळ्या आणि मधून जाणाऱ्या पाखडीतून सोमेश्वरला जायचा रस्ता होता. सोमेश्वर- अंबेरीचं श्रद्धास्थान. उत्सवाच्या निमित्ताने जत्राही असते, तेवढीच अभ्यासाला दांडी त्यामुळे गावातली सगळी मुलं उत्सव कधी येतोय याचीच वाट पाहत असत. उत्सव आटोपला आणि पुन्हा शाळा-अभ्यास सुरू झाला. मनोजच्या शाळेत एक नवीन शिक्षक आले. लातूरहून आलेले. मनोजच्या आळीतच त्यांची राहण्याची व्यवस्था झाली होती. कोकणातलं गाव-समुद्र त्यांच्यासाठी नवीन होता. मनोजनेच त्यांना सगळं गाव फिरून दाखवलं आणि समुद्रावर नेलं. नारळ-पोफळीच्या बनातून बाहेर पडून अचानक समोर आलेल्या समुद्राच्या पहिल्या दर्शनाने सर स्तिमित झाले. निसर्गाचे हे रूप डोळ्यात साठवत सर विसावले. मनोज नेहमीप्रमाणे धावायला लागला. त्याच्या धावण्यातली सफाई सरांच्या लक्षात आली. समाजशास्त्रापूर्वी सर पी.टी.चेच शिक्षक होते. याला योग्य व्यासपीठ मिळालं तर पोरगं पुढं जाईल, असा विचार सरांच्या मनात डोकावला. याच्या पालकांशी बोलायला हवं हे पक्कं करून त्यांनी मनोजला हाक मारली. अरे जायचं ना- उशीर झाला, अंधारही पडला.
पुढच्याच आठवडय़ात गावात क्रिकेट स्पर्धेची टूम निघाली. नागमोडी वळणांचे रस्ते आणि उंचसखल रचनेमुळे पुळणीवरच कृत्रिम मैदान तयार करून क्रिकेट स्पर्धेचा घाट घालण्यात आला. नाइट क्रिकेट टूर्नामेंट होणार होती. स्पर्धेच्या निमित्ताने बऱ्याच गावोगावच्या टीम्स अंबेरीत आलेल्या. काहीजणांची सोय मनोजच्या घरी करण्यात आलेली. त्यातल्या एकाने मनोजला विचारलं- काय रे आमच्या टीमकडून खेळणार का? मनोजनं तात्काळ नाही म्हटल्यावर त्या सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. अरे हो तू सोमेश्वर टीमचा सर्पोटर नाही का- आम्ही विसरलोच. सोमेश्वरच्या नावाने अंबेरीतल्या मुलांची टीम होती. कॉलेजला जाणारी, कामाला लागलेली पण क्रिकेटचं वेड असलेली अशा मुलांची टीम होती. मला धावायला आवडतं- मनोज म्हणाला. अरे मग चांगलं आहे की- बॅटिंग, बोलिंग आणि फिल्िंडग करताना लागतंच की धावायला. मनोजच्या घरी उतरलेल्या टीमचा कॅप्टन म्हणाला. तसं धावणं नाही- मला शर्यतीत धावायला आवडतं बोल्टसारखा. बोल्टचं नाव निघताच त्या कंपूचे डोळे विस्फारले. कोकणातल्या एवढय़ाशा गावात बोल्टचा फॅन भेटेल असं त्यांना अजिबातच वाटलं नव्हतं. बोल्ट- सॉलिड आहे पण अरे आपल्याकडे अ‍ॅथलेटिक्सला स्कोप नाहीये रे- कुठे स्पर्धा होतात कळत पण नाही. मी पूर्वी ट्रॅक इव्हेंटमध्ये भाग घ्यायचो. पण फार काही करता येत नाही. मग ते सोडलं आणि क्रिकेट खेळायला सुरुवात केली- मंदार म्हणाला. मनोजच्या घरी आलेल्या पाहुण्या टीमचा मेन बोलर. मनोजने त्यांचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तो निघाला समुद्राकडे. तिकडे गेलं की मनसोक्त धावता येत असे. पण आज तिकडे गोंगाट ऐकू येत होता. पुळणीवर मदान तयार केलेलं- एक शामियाना उभारलेला. लोकांना बसायला थोडय़ा खुच्र्याही होत्या. आणि याहीपेक्षा कानठळ्या बसवणारा डीजे होता. स्पोर्ट्सच्या बरोबरीने गाणी ऐकायला आवडायची मनोजला. डीजेवरही गाणीच वाजत होती पण त्या कर्कश आवाजाने त्याचे कानच किटले. आपल्या धावण्याच्या हक्काच्या जागेवर झालेलं अतिक्रमण पाहून त्याला वाईट वाटलं.
रात्रभर स्पर्धा सुरू होती. गावातलाच एक माणूस कॉमेंट्री करत होता- त्याचा आवाज मनोजच्या घरातही ऐकू येत होता. बाबा म्हणालेही- अरे जा तिकडे- आपल्या गावात एवढी मोठी स्पर्धा होतेय- बघायला तर जा. एरव्ही बाबांपुढे गप्प असणाऱ्या मनोजने तात्काळ उत्तर दिलं- गावात धावायची स्पर्धा ठेवा-बघायला कशाला, भागच घेईन त्यात आणि जिंकेनही. स्वारीचं हे प्रत्युत्तर ऐकून बाबा फक्त असो म्हणाले. काही दिवसांतच लातूरहून अंबेरीत आलेल्या जगताप सरांचं त्यांना बोलावणं आलं. आता काय दिवे लावले चिरंजीवांनी हा पहिला विचार त्यांच्या डोक्यात आला. पण अभ्यासातल्या अधोगतीसाठी सरांनी बोलावलंच नव्हतं. मनोजला धावताना मी पाहिलं आहे. त्याला नीट मार्गदर्शन मिळालं तर चांगला धावपटू होण्याची क्षमता आहे त्याच्यात. जिल्ह्य़ाच्या ठिकाणी एक प्रशिक्षण केंद्र असल्याचं कळलंय. तिकडे पाठवायचं की नाही हा निर्णय तुमचा पण माहिती तर मिळवा. काय आहे ते तर समजेल- जगताप सर म्हणाले. हे धावायचं आता सरांपर्यंत पोहोचलं होतं तर. सोमवारी दुकान बंद असायचं मनोजच्या बाबांचं. त्यादिवशी सकाळीच ते निघाले. त्यांना परतायला संध्याकाळ झाली. सर म्हणाले तसं केंद्र होतं. सरकारी होतं. तिथल्या सरांशी बोलणं झालं. तिथलं वातावरण फार उत्साहवर्धक नव्हतं आणि मुख्य म्हणजे ते निवासी केंद्र नव्हतं. मुलांची शिक्षणाची आणि राहण्याची सोय तिथे नव्हती. दिवसातले ठरावीक तास मुलांना नाममात्र शुल्कात प्रशिक्षणाची सोय होती. अंबेरीहून ५० किमी. म्हणजे रोजचे १०० किमी- साडेतीन-चार तास. शाळा आणि अभ्यासाचा वेळापत्रक सांभाळून हे कसं जमणार- बाबांनी प्रवासात येतायेताच सारासार विचार केला. रात्री मनोजच्या आईशी त्यांचं बोलणं झालं. ही असली थेरं सांभाळण्यापेक्षा अभ्यासाच्या मागे धावायला हवं आता. नार्वेकरांचा समीर बघ- दहावीनंतर काय करायचं हे नक्की ठरलंय त्याचं. अजून दोन वर्ष आहेत तरी ठरलंय. आणि मी काय म्हणतो- स्वारी अभ्यासात काही फार चमकतील असं नाही. दहावी झाल्यावर तालुक्याला कॉलेज करेल आणि हळूहळू घरचं बघेल की. दुकान आहेच- आंब्याचं प्रोसिसिंग युनिट मोठं करता येईल. आपल्या गावात अजून पर्यटकांचा राबता नसला तरी शेजारच्या नरवणे गावात आहे. तिकडे समुद्रकिनारी छोटंसं हॉटेल किंवा दुकान काढता येईल- कोकणची प्रॉडक्ट्स ठेवता येतील आणि पसा मिळेल. शिवाय गाईगुरांचा व्याप आहेत. अहो- किती पुढचा विचार करताय. मनू अजून लहान आहे. आठवीतच आहे. पुढचं पुढे बघू. अभ्यासात खूप हुशार नाही म्हणून इथेच ठेवणारात का त्याला. त्याला शिकायचं असेल ते करू द्या. आणि या सगळ्याला वेळ आहे अजून. ते धावायला पाठवण्याचं नाही ना तुमच्या मनात- हरकत नाही. लांबपण आहे ते. अभ्यासाचा पसारा वाढला की आपोआप विसरेल- आईने विषय मिटवून टाकला. अहो- दोन दिवसांत भाऊजी येणार आहेत ना मुंबईवरून. कलमाचे आंबे काढा थोडे जास्त- रसाला होतील. फणसही बघा मिळाला तर- गरे तळूया. वर्षभराने येतात जाऊबाईपण. प्रथमेशला खूप आवडतात गरे.
दुरूनच एसटीचा घरघराट ऐकू येऊ लागला. कदमांच्या दवाखान्याच्या स्टॉपवर चंची उघडून तंबाखूची गोळी लावणाऱ्या माणसांमध्ये उत्साह पसरला. सोमेश्वरच्या मंदिराला वळसा घातलेली एसटी आता मनोजच्या अशी डोळ्यासमोर दिसू लागली. पांढऱ्या-जांभळ्या रंगाच्या त्या नव्या कोऱ्या बसवर कोकणच्या लाल मातीचे फटकारे उमटले होते. दोनच मिनिटांत मुंबई-आगरगाव अशी पाटी असलेलं ते धूड थांबलं. खांद्याला सॅक, हातात दोन मोठय़ा बॅगा घेऊन काकाच पहिला खाली उतरला. पाठोपाठ काकू आणि टीशर्ट-जीन्समधला प्रथमेश. मनोजला पाहून काकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला- बबडय़ा! हे काकानं दिलेले नाव- मनोजशी काकाशी खास गट्टी होती. बाबांशी जे बोलता यायचं नाही किंवा भीती वाटायची ते काकाशी हक्काने बोलता यायचं. मुंबईकर- काय म्हणता- बऱ्याच दिवसांनी दौरा- भिकूकाकांनी साद घातली. हो- वर्षभराने येतोय. दुपारी चक्कर टाकतो. सुहास-मनोजच्या काकाने उत्तर दिलं. कसा आहेस रे मनू- काकूने विचारलं. उंच झालास खूप- काकूच्या या प्रश्नाला उत्तर द्यायला स्वारीकडे सवड नव्हती. प्रथमेश आणि तो- आता गेल्यावर पहिलं काय खेळायचं या गप्पांत दंग झाले. घरी आगतस्वागत झालं. ओल्या काजूच्या बियांची उसळ, गरम मसाल्याची आमटी, कैरीचं लोणचं, आंबेमोहोरचा भात, पोळ्या असा बेत होता. फर्मास जेवण झाल्यावर सगळ्यांनीच वामकुक्षीला प्राधान्य दिलं. पुढचे आठ दिवस नुसता कल्ला होता. मनोज आणि प्रथमेश- दिवसभर हुंदडत असायचे. काकाने दोघांना फिरवूनही आणलं. समुद्र, शिरगावची लेणी सगळं फिरून झालं. समुद्रकिनाऱ्यावर बबडय़ाचं शिस्तबद्ध धावणं काकाने नीट हेरलं. मुंबईकरांना परतायचे वेध लागले. रात्री पानसुपारीच्या वेळी काका म्हणाला, सुट्टी आहेच अजून. बबडय़ाला नेतो मुंबईला. काय रे येशील ना- मनोज एका पायावर तयार होता. धंद्याच्या व्यापामुळे आमचं तिघांचं असं कुठे जाणं होत नाही. सुट्टी शिल्लक आहे अजून- पाठवतो त्याला- बाबा म्हणाले आणि मनोजने बॅग भरायला घेतलीसुद्धा. मुंबईला गेल्यावर काय धमाल करायची याची एक यादी प्रथमेशने केली. मजल-दरमजल करत मंडळी मुंबईनगरीत अवतरली. जवळपास तीन वर्षांपूर्वी मनोज काकाकडे आला होता. त्यानंतर थेट आताच. काकाच्या बिल्डिंगसमोरच एक मोठ्ठा टॉवर उभा राहत होता. बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं. सहा बिल्डिंगच्या मध्ये गार्डन होतं. गार्डनमध्ये असणाऱ्या जॉगिंग ट्रॅकने मनोजचं लक्ष वेधलं. पण नंतर प्रथमेशने त्याला आपल्या खोलीत नेलं.

रात्री काकाने विषय काढला. मनोज तुला मी मुंबईत मुद्दाम आणलं आहे. तुला धावायला आवडतं हे मला ठाऊक आहे. त्यासाठी काय करता येईल याचा विचार मी केला आहे. तुला आवडतो ना तो बोल्ट. त्या बोल्टच्या नावाने इथं एक ट्रेनिंग सेंटर सुरू झालं आहे. तिथं प्रवेशासाठी खडतर चाचणी असते. मला सगळी माहिती नाही. आपण उद्याच सकाळी तिकडे जाऊया. मनोजला तर कधी एकदा तिकडे जातोय असं झालं. अख्खी रात्र तो त्याचाच विचार करत होता- बोल्टच्या नावाचं केंद्र-मस्त. सकाळी काकाच्या बाइकवर मागे बसून स्वारी निघाली. शहराच्या एका टोकाला ते केंद्र होतं. एक मोठी कमान होती आणि त्यावर चंदेरी अक्षरात ‘बोल्ट स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्स’ असं लिहिलं होतं. मनोजला सगळ्यात काय आवडलं असेल तर गेटवरच स्वागत करणारा बोल्टचा पुतळा- त्याच पोझमधला-शर्यत जिंकल्यानंतर असतो तसा. काका तिकडच्या प्रमुखांना भेटला. अ‍ॅथलेटिक्सच्या प्रचारासाठी जगातल्या विविध देशांत अशी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे एरव्ही अशा केंद्रांची भरमसाट फी ऐकून बोबडी वळते. पण इथे वेगळीच रचना होती. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रशिक्षण वर्गासाठी अत्यंत खडतर परीक्षा असते. धावण्याची क्षमता, शारीरिक फिटनेस, शरीरबांधणी, मानसिक कणखरता या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाहिल्या जातात. वशिला-शिफारसपत्र असलं काहीच चालत नाही इथं. हे सोपस्कार झाले की मुलाखत घेतली जाते. धावण्याच्या चाचणीचा व्हिडीओ मुख्य केंद्राला पाठवला जातो. हे सगळं झाल्यानंतर केवळ २० मुलांनाच प्रवेश देण्यात येतो. यानंतर या मुलांची शाळा-अभ्यास, राहणं-जेवणखाण सगळं त्या केंद्रातच. दिवसभराचं शिस्तबद्ध वेळापत्रक ठरलेलं. विविध स्पर्धासाठी जावं लागेल तेवढाच खर्च मुलांच्या पालकांनी करायचा. बाकी सगळ्यासाठी फेलोशिप. यंदाही ती निवड परीक्षा होणार होती आणि त्यासाठी दिवस उरलेले केवळ तीन. मनोजला तर काय करू नि काय नको असं झालं. शर्यतीचं किट, शूज, टायमिंगसाठी घडय़ाळ असं सगळं साहित्य जमलं. प्रवेश परीक्षेचा दिवस उजाडला. तिकडे गेल्यावर मनोज पाहतच राहिला. परवा सामसूम वाटणाऱ्या त्या परिसराला जत्रेचं स्वरूप आलेलं. सगळीकडे मुलं आणि त्यांचे पालक. पण कुठेही हुल्लडबाजी नव्हती- गोंधळ नाही. ज्या मुलांना इंग्रजी येत नाही त्यांच्यासाठी दुभाषाची व्यवस्था केलेली. सगळी प्रोसेस होता होता संध्याकाळ झाली- हसऱ्या चेहऱ्याने मनोज बाहेर आल्याचं पाहताच काकाचा चेहरा खुलला. हे सिक्रेट आपल्यातच ठेवायचं असं ठरवून ते घरी परतले. मुंबईत येऊन दहा दिवस झालेले. मनोजला मुंबईचा कंटाळा आलेला- सगळी ठिकाणी फिरून झाली होती. काकाने रिझव्‍‌र्हेशन केलं अंबेरीचं. रातराणीचा प्रवास करून भल्या पहाटे स्वारी गावी परतली. मग खूप मजा केली ना- आईने विचारलं. हो- धमाल एकदम. बऱ्याच दिवसापासून दुरावलेल्या समुद्रावर मनोज निघाला. तिकडे हुंदडल्यावर त्याला बरं वाटलं. नववीचं वर्ष सुरू होणार होतं- कठीण वर्ष म्हणून अभ्यास शाळेआधीच सुरू झालेला. नवीन दप्तर, वह्य़ापुस्तकं, छत्री घेण्याची धांदल उडाली. मध्ये इतके दिवस उलटले की मनोज त्या बोल्ट केंद्राचं विसरूनच गेला. वळवाचा पाऊस दाखल झाला होता. प्रचंड उकडत होतं दोन दिवस- आणि एक दिवस घरातला फोन खणखणला. सोमवार असल्याने बाबा घरी होते. त्यांनीच उचलला. पलीकडचा माणूस काय बोलतोय यावर त्यांचा विश्वासच बसेना. पण त्या माणसाने सगळं टप्प्याटप्याने सांगितलं. २०-२५ मिनिटांनंतर बाबांनी फोन ठेवला. नाकावरची चष्म्याची काडी नीट करत त्यांनी कपाळावरचा घाम पुसला आणि मनोजकडे पाहत ते म्हणाले- स्वारी धावायला जाणार तर मुंबईत.. मनोजला काहीच कळलं नाही पण लक्षात येताच त्याने उडीच मारली. अ‍ॅडम डोरोथी नावाच्या गृहस्थांचा फोन होता. मनोजने प्रवेशचाचणीचे सगळे टप्पे यशस्वीपणे पार केले होते. आपल्याला काहीही न सांगता हे सगळं झालं याचा बाबांना राग आला पण काकाच घेऊन गेला केंद्रावर म्हटल्यावर बाबांचा राग निवळला. सुहास उत्साहाच्या भरात काही करणार नाही याची बाबांना खात्री होती. प्रवेशचाचणी उत्तीर्ण झालेल्यांना दहा दिवसांत सगळा जामानिमा घेऊन केंद्रात दाखल व्हायचं होतं. मनू आता मुंबईत जाणार हे कळल्यावर आईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. आजी मात्र खूश झाली- अरे तो अभ्यासाच्या कपाटावर आहे त्याच्या केंद्रात जाणारेस ना- आजीने विचारलं आणि स्वारीने होकार दिला. काकाला फोन झाला आणि त्यालाही प्रचंड आनंद झाला. तुला आवडतं ते करायला मिळणार आहे ना- मग खुशाल जा असं बाबांनी सांगितलं. कपडे-अभ्यास-औषधं या सगळ्याच्या मिळून पाच बॅगा झाल्या. आंब्याची साटं- बेसनलाडू, अशा सुक्या खाण्याची मोठ्ठी पिशवी भरली. स्वारीला नेण्यासाठी मुंबईहून खास काका आला. काय मग- सिक्रेटने मजा आणली ना- पण आता तिकडे सांगतील तसं वागायचं- अभ्यासही नीट करायचा. काही लागलं तर मी आहेच. आई खाऊची आणखी एक बरणी देत होती पण काकाच म्हणाला- अगं वहिनी आम्हाला नेता येईल एवढंच सामान असू दे. दुसऱ्या दिवशी सकाळची बस होती- रात्री जेवणं झाल्यावर गप्पा रंगल्या. काका सगळी परीक्षेची प्रोसेस सांगत होता. मनोजला तर कधी जातोय असं झालं- आजीचं ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण झालं आणि ती म्हणाली- अंबेरीचा बोल्ट- खूश ना आता? आजीचे उद्गार ऐकून एकच हास्यकल्लोळ उडाला. अंबेरीचा बोल्ट केव्हाच पोहोचला त्या केंद्रात- धावतच..

मनोजला बोल्ट आवडायचा तसा तुम्हाला कोण आवडतो? तुमचा आवडता प्लेअर कोण? तो तुम्हाला भेटला तर.. काय बोलाल त्याच्याशी? आम्हाला नक्की कळवा.