स्टाइल, फॅशन हे फक्त मोठय़ांसाठी असतं असं जर कोणाला वाटत असेल तर सांभाळून. बच्चेकंपनी पण यात मागे नाही. त्यामुळे बच्चेलोक, तुमच्या स्टाइलचे फंडे सांगायला ओम, सानिका आणि मैथिली हे तिघे खास आलेत. बघा तुमचे आणि त्यांचे फंडे जुळताहेत का? तुमच्या घरातील मोठय़ा लोकांना पण सांगा हे वाचायला. काय..
‘हाय, एव्हरीवन..कसे आहात? आज आम्ही पुस्तकामध्ये काय करतोय असा प्रश्न पडला असेल तुम्हाला? ते सांगतोच, पण आधी आमची ओळख तुम्हाला करून देतो. मी ओम आणि या सानिका आणि मैथिली. आम्ही तिघे बेस्ट फ्रेंड आहोत. एकाच सोसायटीतले आणि एकाच शाळेत जातो. सुट्टी लागली म्हणून आज खेळायला आलो तर ही सानिका तोंड फुगवून बसलेली. तूच सांग सानिका काय झालं.’
‘या आईबाबांना काही कळतच नाही. माझ्या सिस्टरची एंगेजमेंट आहे. मी त्यांना म्हटलं माझी शॉपिंग माझ्याशिवाय करायची नाही. तर परीक्षेचं कारण देऊन मला बिझी केलं आणि बोर ड्रेस घेऊन आले माझ्यासाठी. काय तो कलर आणि नुसत्या टिकल्या टिकल्या आहेत त्यावर. माझं फूल इम्प्रेशन जाणार त्यामुळे. म्हणून चिडली आहे मी.’
‘कधी कधी ही मोठी लोक इम्पॉसिबल होऊन जातात. आता आमचे कपडे कसे हवे हे विचारा ना आम्हाला. उगाच चुकीचे कपडे आणून आमच्या इज्जतचा फालुदा करता. तुम्हाला पण सेम अनुभव असेल ना? त्यामुळे आम्ही विचार केला की आज बोलूयाच. आम्हाला समजलं की, या वेळी हे पुस्तक आपल्यासाठी स्पेशल असणार आहे. म्हणून म्हटलं इथेच बोलूयात.’
‘ए, ओम थांब जरा, सुरुवात माझ्यापासून झाली आहे ना मग माझा नंबर पहिला. तर मी सानिका हे कळलंच तुम्हाला. आता सुरुवात त्या ड्रेसपासूनच करूयात. तसा बरा आहे तो. पण मला दीपिकाचा ‘ये जवानी है दीवानी’ मधला रेड ड्रेस हवा होता. शॉर्ट चोली आणि लहेंगा पँट. मी तो ‘दिल्लीवली गर्लफ्रेंड’चा डान्स पण करणार होती त्यावर. आता सगळा प्लॅन फ्लॉप.’
‘सानिका चांगला आहे गं, तो अनारकली ड्रेस. माधुरीने ‘डेढ इश्किया’मध्ये तसाच पिंक अनारकली घातला होता. असं मला आई म्हणाली. काय हे..त्यांना सांगा आता माधुरीचा जमाना गेला. आता दीपिकाचा जमाना आहे. काय मस्त कपडे घालते ती. मला तिच्यासारखंच दिसायचं. म्हणून तर तिच्यासारखं मी पण शर्ट जीन्समध्ये ‘इन’ करते आणि बेल्ट वापरते. तिच्यासारखा मोठा गॉगल घेतलाय मी. शाळेतल्या गॅदरिंगला मी रामलीलामध्ये तिने घातलेला तसा घागरा घालून मस्त ‘नगाडा डान्स’ केला होता. मला तिच्यासारखं दिसायला आवडतं.. बोल्ड अँड ब्युटीफुल. आता आई नाही का तिच्या एका साडीमागे बाबांना चार दुकानं फिरायला लावत, मग जरा माझ्यासाठी हा विचार करा ना. आमच्या वर्गातली ती केतकी आहे ना, तिला कतरिना आवडते. तिचे सगळे कपडे सेम टू सेम कतरिनासारखे असतात. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला ती कतरिनासारखी बार्बी डॉल बनून आली होती. आता सांगा अशा वेळी मी नाइन्टीजमधली माधुरी बनली तर सगळे मला काकूबाई नाही का म्हणणार. तशी माधुरी डान्ससाठी अजूनही आवडते आम्हाला, पण कपडे नको तिच्यासारखे.’
‘मला करीनासारखं स्टायलिश राहायला आवडतं. हाय मी मैथिली. मला करीना आवडते. ती ‘हीरोईन’मध्ये कसली सॉलिड दिसली होती. मी तिचे आतापर्यंतचे पेपरमधले सगळे फोटोज कापून ठेवले आहेत. आईला सांगितलं, कपडे घेताना आधी ती डायरी चेक करत जा. मागे मी तिच्यासारखी रेड लिपस्टिक लावायचा हट्ट केला तर आई ओरडली होती. लहान मुलांनी लिपस्टिक नसते लावायची म्हणून. त्याशिवाय लूक कम्प्लिट कसा होणार सांगा? मग मी लावलीच.’
‘अपुन का फंडा क्लीयर है बॉस. मला या पोरींसारखे नखरे करायला आवडत नाही. अपना तो एकच हीरो, सल्लूभाई. तो लूझ पँट आणि गंजी घालून ‘ढिंक चिका’ करतो तेव्हा कसला फाडू दिसतो. मी पण त्या दिवशी दादाच्या बर्थ डेला तसा डान्स करून पाचशे रुपये कमवले. दादाकडे सलमानसारखं सेम ब्लू ब्रेसलेट आहे. मला देत नाही तो. भाव खातो. पण मी हट्ट केला म्हणून बर्थ डेच्या दिवशी घालू दिलं त्यांनी. मला ना सलमानसारखी बॉडी बनवायची आहे. मग मी पण टी-शर्ट काढून बॉडी शो ऑफ करीन. तशी मला अक्षयकुमारची स्टाइल पण आवडते. त्याचा ‘बॉस’ मुव्ही आठवतोय? मुव्ही बंडल होता, पण त्याचं काउल टी-शर्ट भारी होतं. रावडी राठोडसारखं टी-शर्टवर शर्ट घालून मी ‘अपून का झटका, ४४० वोल्ट का धक्का’ असं म्हणतो तेव्हा ती शेजारची आण्टी क्यूट म्हणून गाल खेचते. या मोठय़ा लोकांना गाल खेचण्यात काय आनंद मिळतो कळत नाही यार.’
‘मला ना छान कम्फर्टेबल राहायला आवडतं. म्हणून तर मला दीपिका आवडते. जीन्स- टी-शर्ट आणि एक छानसं वॉच.. बस हाच माझा लूक. मला हिल्स नाही आवडत. पाय दुखतात त्यांनी. बॅलेरिनाज माझ्या फेव्हरेट आहेत. मेकअप पण फारसा नाही आवडत. पिंक लिपस्टिक माझी फेव्हरेट आहे. मला ना तिच्यासारखी हाइट हवी आहे. म्हणून मी तिच्यासारखं बॅडमिंटन खेळते. तिचा ‘ये जवानी.’ मधला लूक मला फार आवडला. ते अनारकली ड्रेस भरलेले असतात आणि त्यामुळे खूप खाज पण येते. कलरफुल घागरा मस्त. ‘रामलीला’मध्ये पण कसले मोठ्ठे घागरे तिने घातले होते. इझी टू वेअर. मी कुठेतरी वाचलेलं की तिचा फेव्हरेट कलर व्हाइट आहे. तेच तिचं मला पटत नाही. मला ऑरेंज कलर आवडतो. लांब केस पण नाही आवडत मला. शॉर्ट हेअरकट आवडतो.’
‘आणि मी हिच्या कम्प्लिट ऑपोझिट आहे. मला ना शॉर्ट ड्रेसेस आवडतात, करीनासारखे. आणि हाय हिल्स. माझ्याकडे फुल कलेक्शन आहे हाय हिल्सचं. मला लाँग हेअर्स आवडतात. कोणाला सांगू नका, पण मला केसांना हायलाइट्स करायचेत. तिचा आणि माझा फेव्हरेट कलर पण सेम आहे, रेड. मला स्कर्ट्स पण खूप आवडतात. पण जीन्स नाही आवडत. ती खूप घट्ट असते. आता मला करीनासारखा गाऊन घ्यायचा आहे. आईला सांगितलं, मला बर्थ डेला हवाय. ती मॅग्झिनच्या कव्हर पेजवर कसली फाडू दिसते. माझ्याकडे सेम तिने कव्हर पेजवर घातलेला तसा ड्रेस होता. एकदा माझ्या ताईने माझा सेम पोझमध्ये फोटो काढला आणि तसं कव्हर बनवलं. आत्तापण दोन्ही कव्हर पेजेस माझ्या रूममध्ये आहेत. एकात मी दुसऱ्यात ती. माझी ताई ग्रेट आहे. मला इंडियन ड्रेस नाही आवडत, पण साडी आवडते. मी खूपदा घातली आहे. गॅदरिंगला साडी नेसून डान्स पण केलाय.’
‘मी तुम्हाला सांगतो, माझ्या आईबाबांना स्टाइलमधलं काही कळत नाही. शॉपिंगला जाताना मी त्यांना सांगतो मला नक्की काय हवंय. नाही तर त्यांना कळतच नाही मॅट शाइन कोणतं आणि ब्राइट कोणतं. मला कोट्स घालायला आवडतात. पण माझ्या पसंतीचे. जीन्सपेक्षा मला बर्मुडाज आवडतात. पण घरच्यांना ते गावठी वाटतं. म्हणे ‘शॉर्ट पँट’ घाल. आता काय मी छोटा बच्चा आहे का? टी-शर्ट्स मला खूप आवडतात. स्पेशली छोटा भीम, बेन टेन, स्पाइडर मॅनवाले. आता सलमान आवडतो म्हणून त्याचा फोटो असलेला टी-शर्ट मी घालत नाही. ते खरं गावठी आहे. सलमानसारखं गंजी घालायला मला आवडतं. त्याच्यासारखे लूज कुर्ताज आणि सलवार पण आवडतात. मी अक्षयसारखं कराटे शिकतोय. एकदा ते जमलं की बास, फुल टू हीरो. स्पाइक्स करायला मला आवडतात, पण शाळेत केस शॉर्ट ठेवा म्हणतात. त्यात कसे होणार स्पाइक्स? सुट्टीत मी केस वाढवणार.’
‘भिडू लोक बरोबर बोललो ना आम्ही. हीच आपली स्टाइल आहे की नाही. चलो, आमच्या खेळायचा टाइम झालाय. आम्ही निघालो. बाय..’

हाय फ्रेंडस्.. तुम्हाला पण आवडतं ना, अशी मस्त फॅशन करायला आणि एकदम टॉप दिसायला? मग तुमच्यासाठी एखादी नवी फॅशन तुम्हीच शोधून काढा बरं.. आणि हो आम्हाला कळवायलाही विसरू नका.