धम्माल
नेहमीप्रमाणे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झोके घेत माकड तळ्याच्या कडेने प्रधान वाघाच्या गुहेकडे निघाला होता. बजबजपूरमध्ये शाळा सुरू झाल्यापासून आटपाटनगरहून रोज एक वर्तमानपत्र माकडाने आणण्यास सुरुवात केली होती. रोज सकाळी प्रधान वाघास वर्तमानपत्र दाखवून मग ते शाळेत इतर प्राण्यांना वाचण्यासाठी ठेवले जाई. आताही एका हातात वर्तमानपत्र घेऊन माकड घाईघाईने गुहेकडेच निघाला होता. तेवढय़ात तळ्यातून कुणीतरी ‘माकडदादा’ अशी हाक मारली. माकडाने खाली बघितले तर तळ्याकाठी पाण्याच्या पृष्ठभागावर आपला भलामोठा जबडा पसरवून मगर आपल्याला बोलावत असल्याचे त्याने पाहिले. एका हातात वर्तमानपत्र आणि एका हाताने फांदी धरलेल्या माकडाला मगरीला त्या अवस्थेत पाहून खूप भीती वाटली. झाडावर नीट बसत आधी त्याने स्वत:ला सावरले.
‘‘काय झालं मगरताई?’’ त्याने विचारलं.
‘‘दादा, तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, जरा खाली येता का?’’ मगरीने विनवणी केली.
माकड थोडे विचारात पडले. या मगरीचे आपल्याकडे काय बरं काम असेल? किती दिवस उपाशी आहे कुणास ठाऊक? तिला आपल्याशी बोलायचे आहे की स्वत:च्या न्याहरीची सोय करायची आहे? त्याने धोका पत्करला नाही. ‘‘मगरताई तुम्ही बोला, मला इथे बसूनही ऐकू येतंय.’’ तो म्हणाला.
मगर काय समजायचं ते समजली. तिला वाईट वाटले. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. ‘‘मला माहितेय, तुमचा कुणाचाच माझ्यावर विश्वास नाहीए. नसू देत, पण तिथे बसून का होईना मी काय बोलतेय, ते नीट ऐका!’’
आपण मगरीवर अविश्वास दाखवून तिचे मन दुखावले याबद्दल माकडाला वाईट वाटले. मात्र त्याने योग्य तेच केले होते. कारण जेव्हा स्वत:च्या जिवाचा प्रश्न येतो, तेव्हा कोणताही धोका पत्करायचा नसतो.
‘‘माकडदादा, बजबजपूरच्या संरक्षणासाठी आपण करीत असलेले सर्व प्रयत्न पाहून आनंद वाटला. म्हणूनच म्हटलं त्या संदर्भात एकदा बोलावं.’’
‘‘बोला ना ताई. त्या विषयी तुमच्याही काही सूचना असतील, तर त्यांचाही विचार केला जाईल.’’ माकडाने आश्वासन दिले.
माकड आपलं म्हणणं नीट ऐकून घेतोय, हे पाहून मगरीला जरा बरं वाटलं. पाण्याबाहेर येत माकड ज्या झाडावर बसले होते, त्याखालीच कातळावर तिने आपला भलामोठा देह पसरून ठेवला.
 ‘‘माकडदादा, बजबजपूरच्या मधोमध वाहणारे हे तळे म्हणजे येथील प्राण्यांचे जीवन आहे. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर तर इतरवेळी सर्व प्राण्यांना पाण्यासाठी याच तळ्यावर अवलंबून राहावे लागते,’’ मगरीने सांगितले.
‘‘हो ताई, ते मला माहितेय,’’ माकड म्हणाले.
‘‘हो. पण आता तळे पूर्वीसारखे स्वच्छ, नितळ राहिले नाही माकडदादा. पूर्वी पृष्ठभागावरून पाण्यातल्या तळातलं स्पष्ट दिसायचं. आता पाणी आपली पारदर्शकता गमावून बसलंय. पाण्याला कसला तरी उग्र वासही येतो. या पाण्यामुळे माशांच्या काही प्रजातीही नष्ट झाल्या आहेत. काही माशांची वाढ खुंटली. परवा तर एकाचवेळी तीन-चारशे मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत होते. पूर्वी तळ्याच्या तळाशी निरनिराळ्या वनस्पती होत्या. आमच्या आजारपणात तेच औषध होतं. त्या साऱ्या वनौषधी आता नष्ट झाल्या आहेत. मी म्हणून या पाण्यात आजवर टिकून राहिली, पण परिस्थिती अशीच राहिली तर माझाही फार काळ टिकाव लागणार नाही. माकडदादा काहीतरी करा. तळ्यातील प्रदूषणाचे आक्रमण रोखा!’’ दगडावर बसलेली मगर आता उन्हामुळे कोरडी ठणठणीत झाली होती. तिचे फक्त डोळे ओले होते. ते धूर्त, लबाड मगरीचे खोटे अश्रू नव्हते, तर तळ्यातील एका शक्तिमान जिवाची खरीखुरी खंत होती.
आपण अविश्वास दाखवून मगरीपासून चार हात लांब राहिल्याबद्दल माकडाला खूप वाईट वाटले. तो झाडावरून उतरला. मगरीजवळ येत त्याने तिच्या खडबडीत पाठीवर हात ठेवला. ‘‘मगरताई, तुम्ही काळजी करू नका. तळ्याचे प्रदूषण  ही साऱ्या बजबजपूरची समस्या आहे. मी आताच प्रधान वाघांशी या विषयावर बोलतो आणि तातडीने उपाय करण्याची त्यांना विनंती करतो.’’ मगरीचा निरोप घेऊन माकड प्रधान वाघाच्या गुहेकडे निघाला.
इकडे गुहेवरच्या दगडावर बसून प्रधान वाघ माकडाची वाट पाहत होता. आता त्यालाही वर्तमानपत्राची चांगलीच सवय झाली होती. रोजच्या ताज्या बातम्या वाचल्याशिवाय त्याला चैन पडायची नाही. मगरीशी बोलण्यात वेळ गेल्याने माकडाला आज गुहेपाशी पोहोचायला थोडा उशीर झाला.
‘‘पेपरमध्ये नसणारी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलोय!’’ प्रधान वाघासमोर वर्तमानपत्र ठेवून माकड म्हणाला.
‘‘तुला उशीर झाला, तेव्हाच आज काहीतरी विशेष असणार हे मी ओळखले होते.’’ घाईघाईने वर्तमानपत्राच्या हेडलाइन्स पाहत प्रधान वाघाने वर्तमानपत्र मिटले. ‘‘यातला छापून आलेला मजकूर काही कुठे पळून जाणार नाही. सावकाश वाचेन. आधी मला तुझी बातमी सांग.’’ प्रधान वाघास आपली उत्सुकता अधिक ताणायची नव्हती.
‘‘आता इकडे येताना वाटेत मगर भेटली. बजबजपूरच्या तळ्याची अवस्था फार गंभीर असल्याचे सांगत होती. आपण तातडीने काहीतरी उपाययोजना करावी, अशी विनंती तिने केली आहे.’’ माकडाने फार लांबड न लावता थोडक्यात महत्त्वाचे सांगून टाकले.
प्रधान वाघासाठी ही बातमी नवी नव्हती. दिवसेंदिवस तळ्यातल्या पाण्याचा बदलता रंग त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नव्हता. उत्तररात्री तळ्याच्या काठाने येताना त्या पाण्याचा उग्र वासही त्याला जाणवला होता. गजराजचा मित्र नागेश त्या पाण्याचे नमुने कसल्याशा काचेच्या नळ्यांमधून गोळा करायचा, हेही त्याला ठाऊक होते. त्यामुळे तळ्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नागेशचा सल्ला घेणे त्याला उचित वाटले.
‘‘आता तुला दुसरे काही काम आहे का?’’ त्याने माकडाला विचारले.
‘‘सध्या येऊन जाऊन शाळेशिवाय दुसरा कोणताही उद्योग नाही. इथून जाणार ते थेट शाळेत.’’ माकड म्हणाले.
‘‘मग त्या आधी माझे एक काम कर. गजराजांना मी बोलावलंय म्हणून सांग. मी फोन केला असता, पण ते साहेब यावेळी त्यांच्या स्विमिंग टँकमध्ये असतील.’’ प्रधान वाघाने सांगितले.
अध्र्या तासातच गजराज आणि नागेश दोघेही प्रधान वाघाच्या गुहेजवळ आले. गजराजासोबत नागेशला पाहून अर्थातच वाघास आनंद झाला.
‘‘गुड मॉर्निग प्रधानजी!’’ गजराजने सोंडेने प्रधान वाघास अभिवादन केले.
वाघानेही पुढचा एक पंजा उंचावत गजराज आणि नागेशचे स्वागत केले.
प्रधान वाघ : खरे तर आपण दोघे मिळून आज नागेशकडे जाऊ या, असं मी सांगणार होतो.
गजराज : म्हणजे विहिरीनेच तहानल्याच्या घरी जाण्यासारखे झाले.
प्रधान वाघ : अगदी बरोबर बोललास गजराज. कारण प्रश्न तळ्याचा म्हणजे तहानेशी संबंधितच आहे.
नागेश : मी गेल्याच आठवडय़ात तळ्यातल्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवून दिलेत. त्याचा अहवाल लवकरच येईल, पण खबरदारी म्हणून सर्व प्राण्यांनी पाणी गाळून प्यावे, अशी माझी सर्वाना विनंती आहे.
गजराज : ते कठीण आहे नागेश. युगानुयुगे थेट तळ्यात तोंड घालून पाणी प्यायची प्राण्यांची सवय. पाणी गाळायचे कसे, आणि ठेवायचे कुठे?
नागेश : कधी केलं नाहीत, म्हणून तुम्हाला कठीण वाटतंय. प्रयत्न केलात तर सगळे जमू शकेल. आपण काहीतरी युक्ती काढू. कारण अपाय होण्याआधी उपाय केलेला बरा.
प्रधान वाघ : सकाळी मगर माकडाला भेटली होती. तिने अपायग्रस्तांच्या व्यथा मांडल्या आहेत. काही लहान माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. पूर्वी तळ्यात आढळणाऱ्या वनस्पतीही आता गायब आहेत. मोठय़ा माशांनाही प्रदूषणामुळे श्वास घेणे मुश्कील झाले आहे.
नागेश : मगरीने सांगितलेली ही व्यथा माझ्या अहवालातही आहे.
तळ्यातले प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेऊन गजराज आणि नागेश गुहेतून बाहेर पडले. नागेश आणि गजराज यांच्याप्रमाणे बजबजपूरमध्ये आणखी एक दोस्तांची जोडी एकत्र फिरताना दिसू लागली होती. ती म्हणजे माकड आणि गाढव. जसे दोन समछंदींचे सूर जुळतात, तसेच समदु:खीही एकाच वेदनेच्या नात्याने जोडले जात असतात. माकड आणि गाढवाचे दु:ख सारखेच होते. आटपाटनगरमधल्या माणसांनी त्यांचा केवळ वापर करून घेतला होता. माकडं मदारीच्या तालावर नाचत होती तर गाढवं दगड-माती वाहत होती. त्याच दिवशी संध्याकाळी माकडाने गाढवाला मगरीने सांगितलेली तळ्याची अवस्था सांगितली. गाढव म्हणाले, ‘‘उद्या सकाळी लवकर उठ. तळे स्वच्छ करण्याची एक आयडिया तुला दाखवितो.’’
‘‘अरे मग चांगल्या कामासाठी उद्या कशाला? आताच जाऊ या.’’ माकड उत्साहाने म्हणाले.
‘‘आता उशीर झालाय. आपल्याला खूप लांब जावे लागेल. शिवाय आता तिथे माणसांची वर्दळ असण्याचाही संभव आहे.’’ गाढव म्हणाले.
‘‘ठीक आहे तर, उद्या सकाळी उजाडण्यापूर्वीच आपण निघू या.’’ माकडाने दुसऱ्या दिवशीचा बेत ठरवून टाकला.

सकाळी लवकर सूर्य उगवण्याची वाट न पाहता गाढव आणि माकड तळ्याच्या काठाने आटपाटनगरकडे जाऊ लागले. लख्ख उजाडले तेव्हा बजबजपूरची दाट झाडी मागे टाकून ते माळरान प्रदेशात आले. या भागात येऊन डाँकीने मोठीच जोखीम पत्करली होती. कारण इकडे माणसांचा वावर असतो. माकडालाही याची कल्पना होती. तो हळू आवाजात म्हणालाही, ‘‘डाँकीदा, जरा जपून!’’
डाँकी म्हणाला, ‘‘आपल्याला फार वेळ थांबायचे नाही. अगदी पाच मिनिटांचेच काम आहे.’’
थोडय़ाच वेळात ते एका दलदलीच्या ठिकाणी आले. तिथे तळ्याचे पात्र बरेच अरुंद होते.
‘‘माकडदादा, आपण ज्याला तळे समजतो, ती प्रत्यक्षात एक मोठी नदी आहे. आटपाटनगरला अर्धवर्तुळाकार वळसा घालून ही नदी पुढे बजबजपूरमधून वाहत जाते. तिचे तोंड आणि शेपूट कुठे कुणास ठाऊक, पण पाणी का खराब होते, ते मला माहिती आहे.’’ डाँकी म्हणाला.
माकडाला काठावर टेहळणी करायला सांगून डाँकी नदीच्या पात्रात उतरला. काही काळ निरीक्षण केल्यावर त्याने माकडाला खाली बोलावले.
‘‘माकडदादा, आटपाटनगरहून वाहत येणारी ही काळपट नागमोडी रेघ पाहिलीस. ती रेघ म्हणजे आटपाटनगरचे सारे सांडपाणी वाहून आणणारे गटार आहे. आटपाटनगरमधील हे सारे घाण पाणी थेट नदीत सोडले जाते. माणसं किती हुशार आहेत बघ, वस्तीपलीकडच्या नदीपात्रात त्यांनी नाल्याचे पाणी सोडून दिले आहे.’’
आता माकडाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. पुढे काय करायचे ते त्याला सांगावे लागले नाही. शेजारचे पाच-सहा भलेमोठे दगड त्याने नाल्याच्या पात्रात टाकून त्याचे तोंड बंद करून टाकले. डाँकीने त्याला आणखी काही दगड टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे भराभर काम उरकून ते वर आले. त्यांची आजची कामगिरी पूर्ण यशस्वी झाली होती. सांडपाण्याच्या नाल्यातील एक थेंबही नदीत मिसळणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली होती.
मग तिथे फार काळ न रेंगाळता झपझप पावले टाकत ते आल्या वाटेने माघारी परतले. माकडाला खूपच आनंद झाला. पाण्याचा प्रश्न इतक्या चटकन निकाली लागेल, असे त्याला अजिबात वाटले नव्हते. डाँकीच्या हुशारीचे त्याला कौतुक वाटले. आपल्या या नव्या मित्राचा त्याला अभिमानही वाटला.
‘‘डॉँकीदा, आज तू खूप मोठे काम केले आहे. त्याबद्दल प्रधान वाघ तुला निश्चितच शाबासकी देतील.’’ तो म्हणाला.
‘‘माकडदादा, आपण फार काही विशेष केलेले नाही. माणसं आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत. आज नाही तर उद्या, त्यांना या विषयी समजेल. दगडी टाकून जसे पात्र बंद करता येते, तसेच त्या दगडी काढून नाल्याचा प्रवाह सुरूही करता येतो,’’ डाँकीने सांगितले.
‘‘मग हा लपंडाव आपण रोज खेळत राहायचा का?’’ माकडाने विचारले.
‘‘नाही. काही दिवसच असले उपाय चालतील. तोपर्यंत नागेश आटपाटनगरमधील रहिवाशांशी बोलून त्यांना एक तर नाल्याचा प्रवाह बदलण्यास सांगेल अथवा शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणी सोडण्यास भाग पाडेल.’’ -डाँकी.
माकड : पण माणसं ऐकतील?
डाँकी :  चांगली गोष्ट समजायला वेळ लागतो, पण चिकाटीने प्रयत्न केला की शेवटी सत्याचाच विजय होतो. बजबजपूर राहिले तरच आटपाटनगर टिकेल हे एकदा माणसांच्या लक्षात आले की ते असं करणार नाहीत. आता नागेशसारख्या काही व्यक्तींना हे वास्तव कळून चुकले आहे. उद्या ते सर्वाना समजेल, अशी आपण आशा करू या!
दुपार झाल्याने प्रधान वाघाच्या गुहेकडे जाण्याचा बेत त्यांनी रद्द केला. त्याऐवजी वडाच्या सावलीत विश्रांती घेणे डाँकीने पसंत केले. नेहमीप्रमाणे माकडाने त्याची आवडती फळे आणली. त्या फळांचा आस्वाद घेत संध्याकाळपर्यंत ते दोघे मित्र मनसोक्त गप्पा मारत राहिले.