मालिका दर्जेदार, क्रिएटिव्ह, ‘वेगळी’ कशी होईल यासाठी त्यावर अनेक प्रयोग केले जातात. अनेकदा हिंदी सिनेमांचं अनुकरणही केलं जातं. अनुकरण करणंही तसं जुनंच. अशीच हिंदी सिनेमांतली जुनी परंपरा अलीकडे हिंदी मालिकांमध्ये रुजू झाली. हिंदी सिनेमांप्रमाणे मालिकांमध्येही आईच्या भूमिकेचा चेहरा मराठी दिसू लागला. ही लाट आता पुन्हा एकदा हिंदी मालिकांमध्ये दिसतेय. ‘आई मराठीच हवी’ असा जणू नियमच आहे तिथे. मालिकेचा बाज हा पंजाबी, गुजराती, बंगाली असला तरी आईच्या भूमिकेत मात्र मराठीच चेहरा हवा. हिंदीतलं हे चित्र जुनं असलं तरी आता ते पुन्हा एकदा स्पष्टपणे प्रेक्षकांना दिसू लागलंय. शुभांगी गोखले, निशिगंधा वाड, क्षिती जोग, स्नेहा वाघ, उषा नाडकर्णी, मानसी साळवी, सविता प्रभुणे, नीना कुलकर्णी या मराठी आई हिंदीत कोणाची माँ आहेत तर कोणाची बिजी.!
कालांतराने बदलांप्रमाणे कलाकारांची मोठी फौजही दिसू लागली. यामध्ये मराठी चेहऱ्यांची संख्याही वाढली. यात प्रामुख्याने नायक किंवा नायिकेच्या आईच्या भूमिकेत मराठी चेहरा दिसायचा. या ट्रेंडची ती सुरुवात होती. मधल्या काही वर्षांत मोजक्याच मालिकांमध्ये हा ट्रेंड दिसत होता. पण आता पुन्हा अनेक मालिकांमध्ये ही लाट मोठय़ा प्रमाणावर पसरताना दिसू लागली आहे. ‘खुशियों की गुल्लख आशी’, ‘हम हैं ना’, ‘ये है महोब्बते’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘एव्हरेस्ट’, ‘वीरा’ अशा मालिकांमध्ये आईच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री दिसून येत आहेत.
हिंदी सिनेमांमध्ये तर मराठी आईची मोठी परंपराच आहे. यात समावेश होतो तो सीमा देव, सुलोचना चव्हाण, रीमा, रोहिणी हट्टंगडी, स्मिता जयकर, नीना कुलकर्णी, स्वाती चिटणीस अशा लोकप्रिय अभिनेत्रींचा. हिंदी सिनेमांत ‘गाजर का हलवा’, ‘गोबी के पराठे’ करणाऱ्या आई या अनेकदा मराठीच असायच्या. हा हिंदी-मराठीचा खेळ आजही सुरू आहे. फरक इतकाच की आता हिंदी सिनेमांसोबत हिंदी मालिकांमध्येही हा ट्रेंड रुजू झालाय. खरं तर हा ट्रेंड तसा पूर्वीच सुरू झालाय. आता पुन्हा नव्याने ही लाट पसरतेय. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका विसरणं अशक्य. ‘अगं बाई.. आबा..’ असं ऐकल्यावर किंवा वाचल्यावर उभी राहते ती टिपरेंच्या घरातली आई, अर्थातच श्यामला. श्यामला साकारणाऱ्या शुभांगी गोखले नंतर दिसल्या त्या ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये. सध्या त्या ‘हम हैं ना’ या मालिकेत नायकाच्या आईच्या भूमिकेत आहेत.
आपल्या वयापेक्षा मोठय़ा वयाच्या भूमिका करण्याची वेळ आली तर हिंदीतल्या काही नायिका या मालिका सोडतात किंवा अवाजवी मागण्या करतात. पण याला अपवाद ठरल्या आहेत आपल्या दोन मराठमोळ्या तरुणी. क्षिती जोग आणि स्नेहा वाघ. क्षिती ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत तिच्या खऱ्या वयाइतक्या मुलाच्या आईची भूमिका करतेय. याआधी तिने ‘नव्या’ या मालिकेतही नायिकेच्या आईची भूमिका केली आहे. याविषयी क्षिती सांगते की, ‘हिंदीत मी अनेक वर्षांपासून काम करतेय. हिंदीमध्ये मराठी आई दिसण्याचा ट्रेंड हा हिंदी सिनेमांपासूनच आहे. त्याला पसंतीही मिळते हे आधीच सिद्ध झालंय. आताही मालिकांमध्ये मराठी अभिनेत्री आईच्या भूमिकेत दिसतात ही आनंदाचीच बाब आहे. मराठी अभिनेत्रींमध्ये मुळातच सोज्वलता, गोडवा असतो.’ हिंदीत मोठय़ा वयाच्या भूमिका करत असतानाच क्षितीने मराठीत ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘तू तिथे मी’ अशा मालिकांमध्ये तिच्याच वयाच्या भूमिका केल्या आहेत. ‘भूमिकेचं वय हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कधीच नव्हता. त्याबाबत मी फारसा विचारही केला नाही. महत्त्वाचं काय तर त्या भूमिकेचं मालिकेतलं वजन किती आहे ते. अर्थात मालिकेत केवळ एक आई आहे आणि ती स्वयंपाक करतेय एवढचं तिचं काम असेल तर मात्र माझा त्याला विरोध आहे’, असं ती सांगते. हिंदी असली तरी मालिका विविध प्रादेशिक बाजावर असते. त्या वेळी दिग्दर्शकावर विश्वास ठेवून त्या त्या भाषांवर अभ्यास करून ती भूमिका पार पाडल्याचं ती सांगते. तर ‘वीरा’ या मालिकेतल्या स्नेहाचंही तसंच काहीसं. स्नेहा वीरा आणि रणविजयच्या आईच्या भूमिकेत आहेत. याआधी स्नेहाने हिंदी मालिकेत मुख्य भूमिका केल्या असल्या तरी या मालिकेत तिने वठवलेली आई प्रेक्षकांना जास्त भावते. ‘वीरा’ मालिकेचे निर्माते यश पटनायक सांगतात की, ‘मालिकेतल्या आईच्या भूमिकेसाठी निवड करताना मराठी अभिनेत्रीच हवी असा अट्टहास नसतो. पण, बऱ्याच मराठी अभिनेत्रींना रंगभूमीची पाश्र्वभूमी असते. तसंच प्रादेशिक सिनेमे, मालिकाही केलेल्या असतात. त्यांच्या अभिनयावर विश्वास असतो. हिंदीत मराठी अभिनेत्री आईच्या भूमिकेत असण्याला मी ट्रेंड म्हणणार नाही. ते मुद्दामून घडवून आणलेलं नक्कीच नसतं. ते आपसूक होत जातं.’
‘एव्हरेस्ट’ ही मालिका सध्याचं आकर्षण बनली आहे. लोकेशन, नवे कलाकार, विषय, बिग बजेट, बिग बॅनर या सगळ्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. यातही नायिकेच्या आईच्या भूमिकेत किशोरी शहाणे मराठमोळा चेहरा बघायला मिळतोय. या भूमिकेविषयी त्या सांगतात की, ‘चांगली भूमिका असली की वय बघू नये. याआधीही मी हिंदी मालिकांमध्ये थोडय़ा वयस्कर भूमिका केल्या आहेत. माझ्या लेखी मी साकारत असलेल्या भूमिकेला वजन असावं. ‘एव्हरेस्ट’चा विषय मला आवडला. त्यातली मी साकारत असलेली भूमिका माझ्यासाठीही नवीन होती. त्यामुळे मी हे काम स्वीकारलं.’ हिंदी मालिकांमधल्या आईमागे मराठी चेहऱ्याच्या या ट्रेंडबद्दल त्यांचं मत त्यांनी मांडलं, ‘मराठी चेहऱ्यांमध्ये सोज्वळपणा असतो. मातृत्व झळकत असतं. आपल्या संस्कृतीचं दर्शनही त्यामधून होत असतं. म्हणून कदाचित अशा भूमिकांसाठी मराठी नायिकांची निवड होत असावी. दुसरं म्हणजे आपण घरात जसं वावरतो. सहज, साधं, तसंच स्क्रीनवरही असतो. यात कुठेही कृत्रिमपणा नसतो. आणि हेच नेमकं मालिकेसाठी योग्य असावं.’ हिंदी मालिका असली तरी राजस्थानी, पंजाबी, गुजराती असा बाज मात्र वेगवेगळा असतो. अशा वेळी व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागतो. ‘एव्हरेस्ट’मध्ये त्यांची भूमिका ही मिलिटरीच्या एका माणसाच्या बायकोची आहे. त्यामुळे शांत, गंभीर अशा स्वभावाची आई रेखाटण्याची जबाबदारी असल्याचं त्या सांगतात.
मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या निशिगंधा वाड या लोकप्रिय अभिनेत्रीने हिंदी इंडस्ट्रीतही नाव कमावलं. नंतर मराठी-हिंदी मालिकांमध्ये त्या दिसू लागल्या. त्यात साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांकडून वाहवाही मिळाली. ‘खुशियों की गुल्लक आशी’ या नव्या मालिकेतही त्या आईच्या भूमिकेत आहेत. ‘ही पंरपरा आपल्याकडे सिनेमांपासून आलेली आहे. माझ्या पिढीच्या प्रतीक्षा लोणकर, किशोरी शहाणे; तर आमच्या आधीच्या नीना कुलकर्णी, स्वाती चिटणीस, वंदना गुप्ते, भारती अचरेकर यांनीही हिंदी मालिकांमध्ये आईची भूमिका केली आहे. मला वाटतं, मराठी चेहरा खूप मायाळू असतो. त्यातून आईच्या भूमिकेसाठी चेहरा मराठी असेल तर आनंदच. ती भूमिका ममत्वाशी जोडली जाते आणि ती मालिकेची जमेची बाजू ठरते’, असं निशिगंधा वाड सांगतात. ‘खुशियों की..’ या मालिकेत अवास्तव, खोटेपणा, भंपकपणा नसल्याचं त्या सांगतात. तसंच याआधीही त्यांनी हिंदी मालिकांसह काही सिनेमांमध्येही आईची भूमिका केली आहे.
खाष्ट सासू हा हिंदी मालिकांचा यूएसपी असतो. जेवढा सासूकडून सुनेचा छळवाद जास्त तितकी मालिकेची लांबीही जास्त. पण खाष्ट सासूप्रमाणे खाष्ट आईच्या भूमिकेत दिसल्या त्या उषा नाडकर्णी. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतली मानवची आई म्हणजे मालिकेची जान होती. थोडी खलनायिकी छटा असली तरी त्या आईच्या भूमिकेत प्रेक्षकांना भावल्या. यापूर्वी ‘दो दिल बंधे एक डोरी से’मधली मुलांच्या चांगल्यासाठी धडपड करणारी आई रंगवणाऱ्या शुभांगी लाटकर, ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएगी’ मधल्या तीन मुलींची आई वठवलेली सुप्रिया पिळगांवकर, ‘खामोशियाँ’मध्ये घरंदाज आईची व्यक्तिरेखा रेखाटलेल्या मृणाल कुलकर्णी, ‘पवित्र रिश्ता’मध्ये साधी-भोळी आई साकारलेल्या सविता प्रभुणे, ‘प्यार का दर्द है मीठा-मीठा प्यारा प्यारा’मधली कठोर आई म्हणजे मानसी साळवी.. या सगळ्या आई मालिका संपली असली तरी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. एकुणात, प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता हिंदी मालिकांमधला ‘आई मराठीच हवी’ हा अलिखित नियम आता लिखित होईल की काय असं वाटू लागलंय..!