‘‘अगं पुरे.. लग्न ताईचं आहे, तुझं नाही. त्यामुळे आधी तिची शॉपिंग होऊ देत, मग बघूयात तुझ्या शॉपिंगचं बजेट किती ठेवायचं ते.’’ घरात मोठय़ा ताई-दादाचं लग्न असेल, तर लहान भावंडांना हमखास ऐकायला मिळणारा हा संवाद असतोच. त्यातही मुलांना या बजेट शॉपिंगचा तसाही जास्त फरक पडत नाहीच. इतरांची शॉपिंग करताना आईने सहज उचललेली शेरवानी किंवा कुर्ता-धोती घातली की बास.. आपण लग्नासाठी तयार!!! हे त्यांचं गणित असतं. त्यातही फार थोडे जण आपण काय घालतोय, कसं घालतोय याचा बारकाईने विचार करतात. (हा आता आपण नवऱ्यामुलाकडून असू आणि नवरीच्या बहिणी, मैत्रिणी दिसायला सुंदर असतील, तर गोष्ट वेगळी.. नाही तर मुलीकडचे असलो, तर थोडासा ट्राय जरी करायचा प्रयत्न केला की, ‘जिजाजी’ स्टेजवर बोलावून कानात हळूच तंबी देतात, ‘‘बॉस, मी भाऊ आहे तिचा लक्षात असू द्या..’’) पण मुलींचं असं अजिबात नसतं. लग्न ताईचं असो किंवा दादाचं, लग्नात त्यांच्याइतकाच भाव आपल्यालाही मिळालाच पाहिजे, हे लक्ष्य त्यांचं ठरलेलं असतं. त्यात दादाच्या लग्नात भावी वहिनीच्या तोडीस तोड दिसण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. नाही तर घरातलं कोणी तरी पटकन बोलून जातं, ‘‘काही म्हण, पण तुझ्या वहिनीची ड्रेसिंग स्टाइल तुझ्यापेक्षा थोडी उजवीच आहे. आता तुझी जागा तिने घेतली हं..’’ त्यामुळे या सगळ्या प्रसंगातून स्वत:ला सहीसलामत सोडवून घ्यायचं असेल, तर ताई-दादाच्या शॉपिंगइतकंच आपल्या शॉपिंगकडे लक्ष देणंही महत्त्वाचं असतं.
फॅब्रिकची निवड महत्त्वाची असते
रंग एकच आणि फॅब्रिकपण एकच हवा, हा अट्टहास नको. तुम्ही फॅब्रिकची निवड प्रत्येकाच्या आवडीनुसार करायला हरकत नाही. रंगाच्या बाबतीतपण फॅब्रिकप्रमाणे रंग बदलतात, ही बाब शॉपिंग करताना लक्षात असू द्या. त्यासाठी एक रंग ठरवण्यापेक्षा एका रंगाचे वेगवेगळे टोन निवडू शकता.
हल्ली राजेशाही थाट ते वेस्टर्न स्टाइल लग्नापर्यंत विविध प्रकारच्या थीम्स लग्नामध्ये ठरवल्या जातात. लग्नाचा मूळ सोहळा पारंपरिक पद्धतीने व्हावा अशी इच्छा असते. त्यामुळे लग्नासाठी अजूनही पारंपरिक स्टाइलने तयार होण्याकडे सगळ्यांचा कल असतो; पण त्याच्याविरुद्ध रिसेप्शनला मात्र वेगवेगळ्या आणि नावीन्यपूर्वक थीम्स निवडण्याची तयारी दाखवली जाते. थीम ड्रेसिंग फक्त लग्नाच्या दिवसानिमित्त राहत नाही, तर लग्नाच्या आधीही साखरपुडा, संगीत, हळद या कार्यक्रमांमध्येही अशा थीम्स पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक दिवसाच्या थीमनुसार आपले ड्रेसिंग पाहणे आणि त्या थीममध्येही तोचतोचपणा टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते.
थीम ठरवताना नक्की सर्वात पहिल्यांदा तुमचा समारंभ कुठे आहे आणि कधी आहे, हे पाहणे गरजेचे असते. त्यानुसार नवरा-नवरीचे कपडे ठरवणे गरजचे आहे. म्हणजे सकाळी एखाद्या ओपन स्पेसमध्ये हळदीचा किंवा लग्नाचा कार्यक्रम असेल, तर पेस्टल शेड्स निवडाव्यात. सुंदर पॅलेसमध्ये पार्टी असेल, तर एलिगंट
कपडय़ांच्या स्टाइलमध्येही हल्ली खूप बदल दिसून येतात. नेहमीच्या साडय़ांची जागा आता लेहेंगा, अनारकली यांनी घेतली आहे. हल्ली रिसेप्शनसाठी मुली बिनदिक्कत अनारकलीज घालतात. लग्नाला घेतली जाणारी साडी परत नेसता येईलच याची शक्यता कमी असते. त्यामुळे ती कपाटामध्ये तशीच पडून राहते. त्याऐवजी लेहेंगा साडीसारखे पर्याय निवडले की भविष्यात ते साडी वेगळी आणि लेहेंगा वेगळा असे घालता येतात. साडीचा ब्लाऊज मल्टिकलर असावा, जेणेकरून नंतर तो इतर साडय़ांसोबतही घालता येऊ शकतो. त्या जागी क्रॉप टॉपचा वापरही करता येऊ शकतो. लेहेंगाच्या चोलीसोबतही हेच करता येऊ शकते. मल्टिकलर किंवा एखाद्या बेस कलरच्या चोलीनंतर साडीवर ब्लाऊज म्हणूनही वापरता येऊ शकते. दुपट्टा भरजरीत असला की तो नंतर एखाद्या दुसऱ्या ड्रेसवरही घेता येऊ शकतो. अशा छोटय़ामोठय़ा शकला लावून तुम्ही तुमच्या लग्नाचे कपडे री-यूझ करू शकता. मुलांसाठीही कित्येकदा लग्नात घेतलेला कोट किंवा शेरवानी काही वर्षांनी फॅशनमधून गेली म्हणून तशीच पडून राहते, पण त्याऐवजी फॅन्सी कोट घेण्यापेक्षा एखादा असा कोट निवडावा, जो नंतर समारंभात किंवा मीटिंगमध्ये घालता येऊ शकतो. त्याच्या आतील शर्ट मात्र थोडे महागडे घेण्यास हरकत नाही. पण सिल्कचे एम्ब्रॉयडर शर्ट घेण्यापेक्षा छान एलिगंट शर्ट निवडल्यास ते री-यूझ करणे हे जास्त सोपे असते. लग्नाचे शूज निवडतानाही ही काळजी घेणे आवश्यक असते. त्या दिवशी कोणते शूज चांगले दिसतील हे बघण्यापेक्षा, नंतर तुम्ही ते शूज परत वापरू शकता की नाही हे पडताळणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे नाजूक शूज घेण्यापेक्षा गोल्डन सिलेटोज, वेजेस निवडा. हिल्स निवडताना तुमची आणि नवऱ्याची उंची नक्की तपासून घ्या. कित्येकदा हिल्स जास्त झाल्या म्हणून नवरी नवऱ्यापेक्षा मोठी दिसते. जास्त मोठय़ा हिल्स घेणं उभं राहण्याच्या दृष्टीनेही धोक्याचे आहे. सुरुवातीला हिल्स घालायला मजा येते, पण रिसेप्शनसारख्या समारंभात सतत एका जागेवर उभं राहून पाय दुखून येतात. अशा वेळी कमी हिल्सचे शूज घातले तरी चालू शकते. तसेही ते शूज तुमच्या ड्रेसमधून कितपत दिसणार आहेत याचा विचार करून ते निवडा. मुलांनीही नंतर कधीही वापरात न येणारी मोजडी घेण्यापेक्षा छान कोल्हापुरी चपला घेतल्यास त्या नंतर वापरातही येतात. फॉर्मल शूजच्या बाबतीतही नंतर त्यांचा होणारा वापर हा जास्त महत्त्वाचा आहे.
थीम ड्रेसिंगमध्ये नवरा आणि नवरीच्या कपडय़ांपेक्षा बाराती किंवा त्यांच्या घरच्यांच्या कपडय़ांकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते. कारण लग्नामध्ये नवरा-नवरीचे कपडे भरजरीत आणि ‘सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन’ असणार हे साहजिकच आहे, पण त्यांच्या घरातल्यांचे ड्रेसिंग चुकले, तर मात्र सगळ्यांची फजिती होण्याची शक्यता जास्त असते. मुळात थीम कोणतीही असो, पण कपडय़ांच्या निवडीकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. सर्वप्रथम कपडय़ांच्या रंगाची निवड महत्त्वाची. मुख्यत्वे बहिणी किंवा मैत्रिणींनी नवरीच्या ड्रेसच्या रंगाच्या कॉन्ट्रास शेड्स निवडणे कधीही उत्तम. पण त्यातही ब्राइट रंगाऐवजी पेस्टल शेड्स निवडाव्यात. लग्न त्यांचे आहे, त्यामुळे आपल्याला ब्राइट शेड्स कितीही आवडत असल्या, तरी थीम ड्रेसिंगमध्ये मात्र त्यांना दूर ठेवणेच उत्तम. गुलाबी, नारंगी, हिरवा, पिवळा, निळ्या रंगाच्या फ्रेश शेड्स, बेज, बिस्कीट, ग्रे अशा शेड्स तुम्ही वापरू शकतात. त्यातही तुम्हाला ब्राइट शेड्स हव्याच असतील, तर ड्रेसचा मुख्य फोकस पेस्टल शेड्स
ठेवून कमीअधिक प्रमाणात तुम्ही ब्राइट शेड्स वापरू शकता. उदाहरणार्थ, लेहेंगामध्ये चोली किंवा लेहेंगा ब्राइट रंगाचा घेऊन बाकी पेस्टल शेडमध्ये असू द्या. पांढऱ्या, काळ्या रंगाचा वापरही इथे तुम्हाला मस्त करून घेता येईल.
एकमेकांच्या देहयष्टीचा विचार करा
ड्रेस डिझाइन करताना सर्वप्रथम तुमच्या गटातील प्रत्येकाच्या देहयष्टीचा विचार करा. त्या एका दिवसासाठी त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून काढायचा प्रयत्न करू नका. त्याने त्यांना लग्न एन्जॉय करता येणार नाही. जाडय़ा मुलींना शॉर्ट चोली घालता येत नाही. त्यामुळे त्यांची टमी दिसते. शॉर्ट हाइट आणि हेवी मुलांना धोती अजिबात सूट होत नाही. या छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा विचार ड्रेस डिझाइन करताना केला पाहिजे.
ड्रेसवरची एम्ब्रॉयडरी हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे तिची निवडही काळजीपूर्वक करायला हवी. हेवी बीड वर्क, जरी वर्क, जरदोसी हे सगळं नवरीसाठी राखीव ठेवलेलं बरं. तुमच्या ड्रेसवर मिनिमल एम्ब्रॉयडरी असणे उत्तम. याखेरीज जर तुम्ही एम्ब्रॉयडरीचे शौकीन असलाच, तर मूड ऑफ करून घ्यायची गरज नाही. सेल्फ कलरमध्ये किंवा ड्रेसच्या एक शेड डार्क किंवा लाइट शेडमध्ये तुम्ही एम्ब्रॉयडरी करून घेऊ शकता. थ्रेड वर्कचा पर्यायही आहेच तुमच्याकडे. मुलांच्या ड्रेसिंगमध्येही प्रिंट्स, पॅटन्स शक्यतो मिनिमल स्वरूपाचे
आता प्रश्न येतो मूळ लग्नाचा. तर त्या वेळी घागरा साडी, साडी, स्टिच साडी, लेहेंगा हे प्रकार आहेच तुमच्यासमोर. साडी हा सगळ्या मुलींसाठी लग्नात घालण्यासाठी युनिव्हर्सल पर्याय असतो. पण उगाच सिल्क, टसरच्या काठपदराच्या, भरजरीत साडय़ा नेसण्यापेक्षा छान नेट, लेस फॅब्रिक, शिफॉनच्या साडय़ा वापरायला काहीच हरकत नाही. इथेही ब्लाऊज घालण्यापेक्षा क्रॉप टॉप घालता येऊ शकतो. शिवाय सध्या साडीसोबत जॅकेट, बेल्ट घालण्याचा ट्रेंड आहे, त्याचा वापर इथे नक्कीच करता येतो. हल्ली मराठी लग्नातही लेहेंगा आवर्जून घातला जातो. पण नेहमीचा लेहेंगा घालण्याऐवजी सध्या लाँग चोली आणि लेहेंगा, सिल्क शर्ट आणि लेहेंगा असे प्रकार पाहायला मिळतात. ते नक्कीच ट्राय करा. याखेरीज नेहमीची साडी नेसण्यापेक्षा स्टिच साडीचा पर्यायही आहे. तुमच्या ड्रेसला जास्त घेरा असला तरी चालेल, पण तो बल्की नसेल याची काळजी मात्र घ्या. त्यासाठी फॅब्रिक फ्रीफ्लोई असले पाहिजे. मूळ लग्नात मुलांसाठी सध्या डीप नेक कुर्ता आणि धोती ट्रेंडमध्ये आहे. त्यासोबत स्ट्रेट सलवार वापरू शकता. कुर्त्यांवर जॅकेट किंवा स्टोल घेऊन एक वेगळे स्टेटमेंट करता येते.
लग्नाच्या किमान एका समारंभात वेस्टर्न ड्रेसिंग ही थीम सध्या पाहायला मिळतेच. काहीच नाही तर रिसेप्शनमध्ये तर नक्कीच वेस्टर्न कपडे घातले जातात. त्यामुळे गाऊन तयार ठेवणे गरजेचे आहे. शॉर्ट ड्रेस विथ लाँग टेल असंही ट्राय करू शकता. मुलांना वेस्टर्न ड्रेसिंगमध्ये जास्त ऑप्शन मिळत नाहीत. पण फॉर्मल ब्लॅक सूटची थीम असेल तर ब्राइट रंगाचा टाय, कफ्लिंग, सॉक्स, बो पार्टीमध्ये इनोव्हेटिव्ह बो घालू शकता. शर्ट्स-मध्येपण थोडं खेळायला हरकत नाही.
होलसेल मार्केट जिंदाबाद!
कापडाच्या शॉपिंगपासून ते ज्वेलरीपर्यंत काहीही विकत घेण्यासाठी होलसेल मार्केटला काहीच पर्याय नाही. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा एकच सेट घ्यायचा नसून किमान ४-५ सेट घ्यायचे आहेत. नेहमीच्या दुकानामध्ये एकाच पद्धतीचे सेट इतक्या क्वांटिटीमध्ये घेणे शक्य नसते. त्यामुळे होलसेल मार्केट बेस्ट. त्यात परत बजेटचा प्रश्न आहेच की.. पैशांच्या सेव्हिंगमध्ये होलसेल मार्केटला पर्याय नाही.
अॅक्सेसरीजच्या बाबतीत जितकं मिनिमल राहता येईल तितकं उत्तम. कारण नवऱ्यामुलींची ज्वेलरीच बऱ्यापैकी हेवी असते. त्यात तुमचीही हेवी ज्वेलरी असेल, तर तो ओवरडोस होईल. त्यापेक्षा कमीतकमी पण उठून दिसणारी ज्वेलरी असू द्यात. इअरकफ सध्या ट्रेंडमध्ये आहेत, त्याचा वापर करून घेऊ शकता. सध्या मोठय़ा कडय़ांची फॅशन दिसून येते. रंगीत बांगडय़ा घालण्यापेक्षा एक किंवा दोन कडेही घालू शकता, नेकलेसचा उपयोग गळ्यात घालण्यापेक्षा केसात हेडगिअर म्हणून करून पाहा किंवा मोठा मांगटिक्का घालू शकता. जेणेकरून तुम्ही नेकपीसला रजा देऊ शकता. सध्या इअररिंगसोबत वेळ लावायचा ट्रेंड आहे किंवा बांगडी आणि रिंग जोडलेली ब्रेसलेट्स, मिडरिंग असे प्रकार पाहायला मिळतात. या छोटय़ा अॅक्सेसरीज तुमच्या लुकमध्ये मोठा फरक आणू शकतात. चौघी-पाच बहिणी एकत्र येऊन छान टेम्पररी टॅटूपण काढून
मेकअप नवरीचा किंवा तिच्या बहिणींचा, कोणाचाही असो, पण तो थोडा असावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य फाऊंडेशन बेस निवडणे. कित्येकदा फोटोमध्ये गोरे दिसावे, म्हणून लाइट फाऊंडेशन बेस लावला जातो. पण त्यामुळे फोटोज पांढरेफिट्ट येतात. त्यामुळे हा बेस कलरयोग्य असणे गरजेचे आहे. सध्या शिमर आय मेकअपचा ट्रेंड आहे. त्यामुळे आय मेकअपवर फोकस ठेवून बाकीचा मेकअप सटल ठेवू शकता. कित्येकदा जास्त मेकअप पोक्त दिसू शकतो. त्यामुळे मेकअपच्या बाबतीत ब्राइट आणि सुटसुटीत मेकअप कधीही उत्तम. लीपशेडसुद्धा बदल करू शकते. ब्राइट शेडचा लीप कलर छान दिसतो, पण ऑरेंज, हॉट पिंक असे डोळ्यांत भरणारे रंग शक्यतो टाळावेत. हेअरस्टाइलच्या बाबतीतही उगाच मोठी अवघड दिसणारी हेअरस्टाइल करण्यापेक्षा सुटसुटीत, सोपी हेअरस्टाइल निवडा. कधी तरी सुंदरपणे बांधलेली फिशटेल वेणीही भाव खाऊन जाते. त्यामुळे जास्त खोटे विग वापरण्यापेक्षा तुमच्या खऱ्या केसांचा जास्तीत जास्त वापर करून घ्या. केसांना कलर करतानाही नंतरचे ऑफिस कल्चर, तुमच्या जॉबचा प्रकार याचा विचार करून मग कलर निवडा. स्ट्रेटनिंग, कलर्सच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो.
पण, हे सगळं करताना तुमच्यासारखाच ड्रेस अजून किमान पाच ते सहाजण घालणार आहेत हे गणित लक्षात असू द्यात. त्यामुळे अगदी कार्बन कॉपी ड्रेसेस बनवण्यापेक्षा कलर, पॅटर्न यातील एकच गोष्ट कॉमन असेल याची काळजी घ्या. रंग एक निवडलात तर प्रत्येकीच्या ड्रेसचे पॅटर्न वेगळे असणे महत्त्वाचे. अगदी साडीपासून ते अनारकलीपर्यंत सगळे पॅटर्न यात असू द्यात आणि पॅटर्न एक असेल तर मात्र रंग अगदी वेगवेगळे असलेच पाहिजेत. एकाच रंगाच्या दोन-तीन शेड घेणे टाळाच. फार तर तुम्ही ज्वेलरी एकाच प्रकारची घालू शकता. पण तीसुद्धा कमीत कमी असू द्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व डिझाइन करायला डिझायनर आणि टेलर लागणार. सो, त्यांना शोधायची खटपट आधी करा. किमान दोन महिने आधीपासून तुम्हाला या तयारीला लागणे गरजेचे आहे. आता वाचत बसू नका, लागा तयारीला.. अभी अॅक्शन टाइम है बॉस…