द हंगर गेम्स, कॅचिंग फायर्स आणि मॉकिंजय ही अमेरिकी लेखिका सुझ्ॉन कॉलिन्सने लिहिलेल्या तीन थरारक कांदबऱ्यांची प्रचंड लोकप्रिय अशी मालिका आहे. ही तिन्ही पुस्तकांच्या २६ दशलक्ष प्रत विकल्या गेल्या असं त्यांच्या प्रकाशकाचं म्हणणं आहे. या कादंबऱ्या ५१ भाषांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. अर्थात त्या काल्पनिक आहेत, पण त्यांची कल्पनारम्यता वाचकाला पानोपानी खिळवून ठेवते.
एके काळी उत्तर अमेरिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाची राखरांगोळी होऊन त्यातून पॅनम राष्ट्र उभं राहिलं. महापूर, वणवे, वादळं, दुष्काळाने गिळलेला भूभाग अन् त्यानंतर जे उरलं त्यासाठी घनघोर युद्ध होऊन त्यातूनच चमचमणारं कॅपिटॉल आणि त्याभोवती गोल रिंगण करून उभे असलेले तेरा डिस्ट्रिक्ट्स जन्माला आले. पॅनममुळेच ह्य सर्व डिस्ट्रिक्ट्सना शांती आणि समृद्धी लाभली.
त्यानंतर काही काळ अंधारयुग आलं. डिस्ट्रिक्ट्सनी कॅपिटॉलविरोधात बंड केलं. कॅपिटॉलने बारा डिस्ट्रिक्ट्सना पराभूत करून तेराव्या डिस्ट्रिक्टला नामशेष केलं. देशद्रोहामुळे चिरंतन शांततेसाठी तह केला गेला. त्यात नवीन नियम घालून दिले गेले. अंधारयुग कायम स्मरणात राहावं आणि पुन्हा कुणी बंडाचा विचार करू नये यासाठी ‘हंगर गेम्स’ तयार केले गेले.
‘हंगर गेम्स’ म्हणजे कॅपिटॉलविरोधात उठाव केल्याची शिक्षा म्हणून दर वर्षी प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून एक मुलगा आणि एक मुलगी खंडणीच्या स्वरूपात ह्य खेळात सहभागी होण्याकरिता पाठवायचे. त्यांना ‘ट्रिब्युट’ म्हणतात. या चोवीस मुला-मुलींना अरीना नावाच्या एका विशाल प्रदेशात राहावे लागते. ही जागा रणरणत्या वाळवंटापासून ते गोठवून टाकणाऱ्या थंडीपर्यंतच्या टोकाच्या हवामानाची आहे. या बंदिवासात राहून आपल्या उदरनिर्वाहासाठी वेळप्रसंगी जंगलातील कंदमुळं शोधून किंवा प्राणी मारून गुजराण करत प्रतिस्पध्र्यानी एकमेकांशी मरेपर्यंत लढायचे असते. शेवटी जिवंत राहणारा ‘ट्रिब्यूट विजेता’ ठरतो. ज्याला बक्षिसाच्या रूपात राहायला घर आणि भरपूर अन्नधान्य दिले जाते. ह्य सर्व ट्रिब्यूट्समधील लढाई नेहमी टीव्हीवर प्रक्षेपित केली जाते. जेणेकरून डिस्ट्रिक्टमधील सर्व जनता रोज ती लढाई पाहू शकतात.
त्यांच्याच डिस्ट्रिक्टमधून त्यांचीच मुलं घ्यायची. त्यांना बळजबरीने आपापसात लढून एकमेकांना ठार मारायला भाग पाडायचं आणि त्याच वेळी त्यांनी ह्य सर्व प्रकाराकडे खेळ म्हणून पाहायचं. अजून एखादं जरी बंड केलं तर डिस्ट्रिक्ट तेरादप्रमाणे सर्वनाश करण्याची धमकी कायमचीच. ही टांगती तलवार घेऊनच वावरायचं.
पॅनम देशाच्या दूरच्या कॅपिटॉलमधून डिस्ट्रिक्टवर राज्य करणारे लोक असतात. त्यातील खेळ आयोजक खेळाचे नियम ठरवतात. आत्तापर्यंतच्या विजेत्यांची महापौर नावं घोषित करून नवीन ट्रिब्यूट निवडण्यास परवानगी देतात. प्रथेप्रमाणे सर्वप्रथम मुलींच्या नावाच्या चिठ्ठय़ा असलेल्या काचेच्या भांडय़ापासून एक चिठ्ठी काढली जाते. ज्यावर ‘प्रिमरोझ एव्हरडीन’ असे नाव असते. आपली १२ वर्षांची लहान बहीण ट्रिब्यूट म्हणून, बळी पडणार ह्य काळजीने ‘कॅटनीस एव्हरडीन’ तिच्या ऐवजी स्वत:ला स्वेच्छेने ट्रिब्यूट म्हणून स्वत: हंगर गेम्समध्ये सहभागी होते.
‘कॅटनीस एव्हरडीन’ सीममध्ये राहणारी अतिशय गरीब कुटुंबातील, जंगलात शिकार करणारी आणि ती शिकार हॉबमध्ये विकून त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करणारी मुलगी असते. धनुष्यबाण चालविण्यात ती पटाईत असते. मुलांमध्ये ‘पिटा’ ह्य बेकरी चालकाच्या मुलाची निवड ट्रीब्यूट म्हणून होते. ज्याला पाच वर्षांचा असतानाच कॅटनीस पाहताक्षणी आवडू लागलेली असते.
ह्य दोघांच्या अरिनातील इतर ट्रिब्यूट्सबरोबरचा थरारक लढा ह्य पुस्तकात वर्णन केला आहे. ही लढाई लढत असताना सर्व ट्रिब्यूट्सना रात्री आकाशात त्या दिवशी मृत्यू पावलेल्यांचे चेहरे नाव घोषित करून दाखविले जातात. तसेच टीव्हीवरल्या अहवालात इतर आकडेवारीसोबत प्रत्येक ट्रिब्यूटने मारलेल्या व्यक्तींची यादी देतात. आपापसात पैज लावण्यात या आकडेवारीची लोकांना मदत होते.
कल्पनारम्य कथानकाने परिपूर्ण असलेली ही कांदबरी एकदा वाचायला घेतल्यावर प्रत्येक प्रकरणागणिक वाचकाची उत्सुकता ताणत जाते. वेगवान, रंजक, भयानक, भीती व थरार वाढवणारे प्रसंग डोळ्यासमोर हुबेहूब उभे राहतात. कथेला खिळवून ठेवण्याचे सामथ्र्य, वाचकाच्या संवेदनशीलतेचा विचार, त्यातील जादूई चमत्कार ह्या सर्व वैशिष्टय़ांमुळे कुमारवर्गाने ही कादंबरी अक्षरश: डोक्यावर घेतली आहे. प्रत्येक दृश्य डोळ्यासमोर जिवंत उभं करण्याची ओघवती वेगवान खुमासदार शैली हे ह्य़ा कादंबरीच्या यशाचे बलस्थान आहे.
या कादंबऱ्या बेस्ट सेलर आहेतच, पण त्यांच्यावर निघालेले चित्रपटही तितक्याच आवडीने बघितले गेले.
८ पुस्तकाचे नाव : ‘द हंगर गेम्स’
मूळ लेखक : सुझ्ॉन कॉलिन्स
अनुवाद : सुमिता बोरसे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : ३२१
मूल्य : ३००/- रुपये.
response.lokprabha@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2016 रोजी प्रकाशित
कल्पनातीत थरारयुद्ध
दृश्य डोळ्यासमोर जिवंत उभं करण्याची ओघवती वेगवान खुमासदार शैली हे ह्य़ा कादंबरीच्या यशाचे बलस्थान आहे.
Written by लोकप्रभा टीम
Updated:

First published on: 25-03-2016 at 00:46 IST
मराठीतील सर्व पुस्तकाचं पान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The hunger games mockingjay catching fire foreign writer book