बाळू मास्तर शाळेत कसे शिकवत माहीत नाही, पण आमच्या घरी आले की आम्हाला आसपास बसवून गोष्टी सांगत. आम्ही झोपाळय़ाच्या कडय़ा धरून उभं राहून, बाळू मास्तरांच्या चेहऱ्यावर नजर लावून, आ करून गोष्टी ऐकण्यात रममाण होत असू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभू आळीत बाळू मास्तरांच्या घराशेजारीच आम्हाला भाडय़ाने जागा मिळाली. मधे फक्त एक वई. वई म्हणजे कुंपण. कुंपणाला मधूनमधून आडुळशाची झुडपं. आडुळशावर पांढरीधोप मधाने भरलेली फुलं डुलायची.

बाळू मास्तरांचं खरं नाव कधी कळलंच नाही. पण आडनाव मात्र ‘राजे’ होतं. आमचंही आडनाव राजे! आमच्या शेजारी ‘राजे’ आडनावाच्या मास्तरीण बाई राहत. त्या मुलींच्या शाळेत हेडमिस्ट्रेस होत्या. आम्ही ज्यांच्या घरात जागा घेतली होती, त्यांचं आडनावही ‘राजे’च होतं. असा सगळा राजांचा सुळसुळाट होता. ते गाव ‘राजे’ आडनावाच्या लोकांचं वतनाचं गाव होतं.

बाळू मास्तर प्राथमिक शाळेत शिक्षक होते. स्थूल शरीराचे, मध्यम उंचीचे बाळू मास्तर, मळकट लेंगा- शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी असा पोशाख करायचे. गबाळेच वाटायचे. गोल चेहरा, ठीकठाक नाकडोळे असले तरी व्यक्तिमत्त्वात आकर्षकपणा नव्हता. ते वर्गात कसे शिकवीत असत, माहिती नाही. पण आमच्या घरी आले की झोपाळय़ावर बसत. आम्हा मुलांना सभोवती बसवून किती तरी गोष्टी सांगत. मास्तरांच्या अगदी जवळ ज्याला जागा मिळेल त्याला मास्तरांच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्टी ऐकायला मिळायच्या. मग आम्ही झोपाळय़ाच्या कडय़ा धरून उभं राहून, बाळू मास्तरांच्या चेहऱ्यावर नजर लावून, आ करून गोष्टी ऐकण्यात रममाण होत असू. एकेक गोष्ट एवढी मोठ्ठी असायची की आठ-आठ दिवस लागायचे ती पूर्ण व्हायला.

चार हरिणींची ती गूढ कथा सांगायला मास्तरांनी एके दिवशी सुरुवात केली- आटपाट नगर.. नगराच्या राजाचे चार पुत्र.. मोत्यांनी मढवलेल्या चेंडूने खेळत होते. खेळता खेळता चेंडू तटाबाहेर पडला.. झाले! आता काय करणार? नगराच्या हद्दीचा तट कोणी ओलांडीत नसत. पण राजकुमार काय स्वस्थ बसणार? ताबडतोब राजकुमारांनी तटाबाहेर उडय़ा मारल्या. ते चेंडू शोधू लागले. तेथे गवतात चरत असलेल्या चार हरिणी राजपुत्रांच्या चाहुलीने दचकल्या व चौखूर पळू लागल्या.

त्या देखण्या, पळणाऱ्या हरिणी पाहून राजपुत्र चेंडू शोधायचे विसरून त्या हरिणींपाठोपाठ दौडत निघाले. हरिणी चपळपणाने धावताहेत, त्यांच्या मागोमाग राजपुत्र! असे खूप वेळ चालले होते. पळता पळता हरिणी थांबल्या. राजपुत्र त्यांच्या जवळ पोहोचतात. तोच त्यांना काही दणकट रक्षकांनी पकडून कैद केलं. त्या चार हरिणी म्हणजे शापित यक्षिणी होत्या. यक्षांच्या राज्यात परके राजपुत्र आले म्हणून त्यांच्या राज्याच्या नियमाप्रमाणे त्यांना बंदी केले गेले.. गोष्ट ऐन रंगात आलेली. काय झालं पुढे?

‘‘मास्तर सांगा ना.. पुढे काय झालं?’’

‘‘आता पुढे काय होणार? त्यांना शिक्षा फर्मावली गेली. आणि ती पण कशी?’’

‘‘कशी?’’

‘‘कंदिलाच्या काचा तापवून मानेवर चटका देण्याची शिक्षा होती..’’

‘‘का बरं? अशी का शिक्षा?’’

‘‘कारण, भाजलेल्या जखमा बऱ्या झाल्या तरी डाग खूप काळपर्यंत राहतात. म्हणजे मानेवरचे डाग लपवताही येत नाहीत व सर्वाचं लक्ष जातं. शिवाय अशा पद्धतीची शिक्षा यक्ष राज्यातच दिली जायची व तीही यक्षिणींच्या वाटेस गेलेल्यांना बंदीवासाची खूण म्हणून. ही गोष्ट राजपुत्रांच्या बाबतीत अपमानास्पदच होती. ही गोष्ट राजाने पाहिली व तो संतापला तर प्रकरण चिघळणार होतं.. आता काय करायचं, या संभ्रमात राजपुत्र.. एवढय़ात.. वईपाशी येऊन बाळू मास्तरांची वृद्ध आई हाक देते.. ‘‘बाळ्याऽऽऽ! एऽऽ बाळ्याऽऽ, चल रे जेवायलाऽ!’’ ‘‘आलोऽऽऽ! आलोऽऽ! करीत टुणकण् उडी मारून बाळू मास्तर जायला उठले. जाता जाता म्हणाले, ‘‘उरलेली गोष्ट उद्या हं! लक्षात ठेवा कुठपर्यंत आलो ते..’’

पण दुसऱ्या दिवशी गोष्ट सांगण्यासारखी परिस्थिती नव्हती. रात्री आम्हा तिघाही भावंडांना सडकून ताप भरला. सकाळी आम्हाला देवीचे उगवण झाल्याचे निदान झालं. सत्तर वर्षांपूर्वी देवीचा आजार धार्मिक पाश्र्वभूमीवर पाह्यला जायचा. आज आपल्या देशातून देवीचा आजार हद्दपार झालेला आहे. किंबहुना हा आजार हल्लीच्या पिढीला माहीतही नाही. त्या काळी हा आजार म्हणजे देवीचा कोपच समजायचे. जी व्यक्ती या आजाराने ग्रस्त असेल, ती प्रत्यक्ष देवी समजून हरप्रकारे त्या व्यक्तीला प्रसन्न ठेवलं जायचं व ती देवीची सेवा समजत.

आम्हाला देवी आल्यात म्हणताना बाळू मास्तर धावत आले. घरात तीन झोपाळे टांगले. त्यावर केळीची पानं अंथरून आम्हाला झोपवलं. झोपाळय़ाच्या कडऱ्यांना कडुलिंबाच्या डहाळय़ा खोचल्या. गोमूत्र शिंपडून जागा पवित्र करण्यात आली. माध्यान्हीच्या देवीच्या आरतीची जय्यत तयारी झाली. पांढऱ्या चाफ्याच्या फुलांच्या माळा झोपाळय़ावरून सोडल्या. भर तापात अंगाची काहिली होत असताना बाळू मास्तरांच्या जिव्हाळय़ाच्या, आपुलकीच्या वावराने फार बरं वाटायचं.

आम्हाला जिरं व खडीसाखरेचं पाणी चमचा चमचा पाजलं जायचं. पाणी तोंडातून ओघळलं तर कापसाची मऊ सुरळी करून अलगद टिपून घ्यावं लागे. देवीच्या आजारात शरीरात उष्णता भडकते. खूप ताप येतो व त्वचेवर फोड येतात. या फोडांना ‘बाया’ असं म्हणून आदर व्यक्त करण्याची तेव्हा रूढी होती. फोड म्हणून रोगवाचक अनादराचा शब्द न वापरण्याचा दंडक असे. मी आणि माझा धाकटा भाऊ यांना जबरदस्त उगवण उठल्याने गंभीर अवस्थेत होतो.

बाळू मास्तर आमच्या घरी जास्तीत जास्त वेळ असत. आमच्या झोपाळय़ांना हलक्या झोपा घालणं, धूप, उदबत्त्या, कापूर यांचा सतत वापर करून वातावरण सुगंधी, र्निजतूक ठेवणं, आमच्या अंगावरून कडुलिंबाचा पाला फिरवीत राहणे, त्याने अंगाला कंद येत नाही व कंद आली तरी निवारण होते. बाळू मास्तर आमच्या आजारात आम्हाला खूप जपायचे.

रात्री भैरूच्या पाडय़ावरील भजनी मंडळी यायची. ढोलकीच्या तालावर पहाटेपर्यंत भजनं रंगायची. खास करून बायांची- देवींची गाणी असायची. रात्री एका ठरावीक तालावर ढोलकी घुमायला लागली की साऱ्या गावाला कळायचं देवीचे रुग्ण गावात आहेत. गाण्यांतून देवीचे बालकुमार लडिवाळ रूप, लाडिक रूप; पायात तोरडय़ा, गळय़ात हिरवी दूड (पोत), हिरवा परकर- पोलका घालून दुडदुडणारी, मोराच्या मागे धावणारी लाडिक लोभस कन्या; गोंडे लावलेली चोळी, टोपपदरी इरकल नेसलेली, साखळय़ा, मोहनमाळा ल्यालेली, ओठात तांबूल रंगवलेली, सोज्वळ-शालीन, तरुणी असे रूप गुंफलेले असे.

आरत्या-भजनांना येऊन शेजारीपाजारी सोबत करीत. सोबतीची फार गरज भासे. देवीची रुग्णाईत मुलं खूपदा जिवानिशी वाचत नसत. यमाच्या घिरटय़ा पडलेल्या त्या घरात माणसांची गजबज, वावर आधार वाटे. बाळू मास्तर त्यांचे दोन-चार विद्यार्थी घेऊन सतत आमच्याकडे येत-जात असत.

आम्हाला देवी आल्यात म्हणताना बाळू मास्तर धावत आले. घरात तीन झोपाळे टांगले. त्यावर केळीची पानं अंथरून आम्हाला झोपवलं. झोपाळय़ाच्या कडऱ्यांना कडुलिंबाच्या डहाळय़ा खोचल्या.

माझ्या दोन्ही भावांना पाणी घालण्याचा (आंघोळ) कार्यक्रम झाला. धाकटा जास्त ग्रस्त होता. पण ठरावीक काळात बरा झाला. त्याच्या अंगावरील उगवणावर (फोड) खपल्या धरल्या, पण माझी परिस्थिती थोडी गंभीर होती. मी वाटेल तो हट्ट धरी. वाटेल त्या वस्तूंची मागणी करी. एकदा मी बाळू मास्तरांकडे सोनचाफ्याची फुलंच हवीत म्हणाले. आता त्या आडगावच्या खेडय़ात ऐन फाल्गुनात सोनचाफा कुठून मिळणार? बाळू मास्तर मला म्हणाले, ‘‘सू! (ते मला ‘सू’च म्हणत) तुम्ही (मी देवीच तेव्हा म्हणून तुम्ही) सोनचाफा मागितला.. आम्ही धन्य झालो! आणतो. पण संध्याकाळी सव्‍‌र्हिस मोटार येईपर्यंत धीर धरायचा हं देवी?’’

सोनचाफा आणण्यासाठी बाळू मास्तर सव्‍‌र्हिस मोटारने कल्याणला गेले. येताना परडीभर सोनचाफ्याची फुलं घेऊन आले. त्या काळी (७०-७१ वर्षांपूर्वी) देशात जपानी खेळणी यायची तसेच चीनच्या वस्तूही उपलब्ध व्हायच्या. त्यात चिनीमातीच्या बरण्या, काही खेळणी असायची. मी आईजवळ बाहुली मागितली. हट्टच धरला. मला चिनी काचेची बाहुली दिली. ती पांढरी स्वच्छ काचेची बाहुली.. डोक्यावर काळेभोर जावळ. पण बाहुलीच्या अंगावर वस्त्र असल्याचं अंगभूत डिझाईन नव्हतं. ती नग्न बाहुली मला जराही आवडली नाही. मी ती रागाने भिरकावून दिली.

बाळू मास्तर होतेच. ते धावत आले. ‘‘सूऽऽ! काय झालं? नाही आवडली तुम्हाला बाहुली? मग कशी हवी बाहुली?’’

मी खुणा करून त्यांना जपानी कचकडय़ाची बसती बाहुली हवी हे सांगितलं. (मला बोलता येत नव्हतं.. वाचा गेली होती.) पुन्हा बाळू मास्तर कल्याणला. त्यांनी एक सुंदर बाहुली आणली. चमकदार मखमलीचे अंगभर कपडे त्या बाहुलीला घातले. आईने लष्करी पोतीचे (सोनेरी रंगाचे चमकदार काचेचे मणी.. हल्ली नामशेष आहेत की काय.. माहीत नाही) सुंदर दागिने करून घातले. ही बाहुली मला फार फार आवडली.

मी खुणेनं ऊँ.ऊँ.. टँू..टँू.. करून ते सर्वाना सांगितलं.. माझी वाचा गेली.. त्याचीपण एक कथाच घडली. घरात बटाटे पाहिले आणि मी आईजवळ बटाटय़ाची भजी पाहिजेत असं म्हणाले. आई म्हणाली, ‘‘बाळाऽऽ भजी चालणार नाहीत तुला, फोड पिकतील, ठणका लागेल!’’

झालं. मी रडायला लागले. तेवढय़ात बाळ मास्तर व शेजारच्या राजेबाई आल्या. ‘‘सू का रडताहेत? काय झालं?’’

सर्व वृत्तान्त त्यांना कळला. राजेबाई आईला रागावल्या. म्हणाल्या, ‘‘सुधाच्या आईऽऽ! वेडबिड लागलं की काय तुम्हाला? बायांचा अपमान झाला. मुकाटय़ाने बटाटय़ाची भजी करा!’’

‘‘देवींच्या उगवणाला फोड म्हणू नये.. तो बायांचा फार अपमान होतो!’’ बाळू मास्तर म्हणाले, ‘‘क्षमा मागा.. पाया पडा!’’

बाळू मास्तर, राजेबाई शिक्षण क्षेत्रातल्या असूनसुद्धा असं सांगत आहेत, तर यात काहीतरी तथ्य असेल असं मानून आईने ताटभर बटाटय़ाची भजी केली. आरतीला आलेल्या सर्वाना मी माझ्या हाताने सर्व भजी वाटून टाकली. पण स्वत: एकही खाल्लं नाही.

उन्हाळय़ाच्या सुट्टीत बाळू मास्तर आम्हा मुलांना त्यांच्या शेतावर सहलीला न्यायचे. जाताना वाटेत माळरानाला आंबे-जांभळांची झाडं असायची. करवंदीच्या जाळय़ा पांढऱ्या सुगंधी फुलांनी दरवळलेल्या तशा करवंदांनी भरलेल्या असायच्या. तोरणं, आठुरणं, पापडय़ा हे सगळं खायला बाळू मास्तरांनी शिकवलं. वाऱ्याच्या झुळकेसरशी जांभळं भुळुभुळु गळून पडायची. पाडाचे आंबे टपाटपा टपकायचे. सुट्टीला आलेली मास्तरांची भाचरं रानात हिंडताना नवखी वाटायची. मग मास्तर त्यांना हसत हसत चिडवायचे. रडकुंडीला आलेली त्यांची भाची म्हणायची, ‘‘हे रे काय मामा? मुंबईला कुठे अशी रानं आहेत?’’

मग मास्तर म्हणायचे, ‘‘उगाऽऽ उगाऽऽ! चुकलंच आमचं बरं का राणू.. आता चूक सुधारू या.. आपण तुझ्यासाठी इथलाच एक नवरा शोधू. शोधलाय! खंडय़ा नाव आहे त्याचं. थोडं फेफरं येतं त्याला, पण नोकरी छान करतो. कल्याणला.. हातियात (हॉटेलात) कपबशा धुतो!’’

मग राणू अशी चिडायची निरगुडीचा फोक काढून मास्तरांना मारायला धावायची. ‘‘मामिटल्या खापिटल्या, तुझी बायको कशी आहे रे? फेफटी, नकटी, काळी ढुस्स्! मोठ्ठी घूस! चहामध्ये घालते तिखट मीठ.. खिरीत ढकलते बेसन पीठ!’’ थांब आजीलाच नाव सांगते. मग आजी म्हणेल, ‘‘बाळय़ाऽऽ! इकडे ये पाहूऽऽ, काढ उठाबशा! शंभर छानशा.’’

रात्रीच्या जेवणाआधी बाळू मास्तर आमच्याकडे एक खेप टाकून जायचे. आम्ही पोरं धावत जाऊन त्यांना बिलगायचो. मग आम्ही सर्व झोपाळय़ावर बसायचो. मास्तर म्हणायचे, ‘‘हे युग संपत आलंय.. कलियुग हे.. हे संपता संपता कलंकी महाराज अवतार घेणार..!’’

आम्ही विचारायचो, मास्तर कलियुग म्हणजे काय? मास्तर सांगायचे, कलियुग म्हणजे माणसाची नीती बिघडवणारे युग! खोटे बोलणे, वागणे.. भांडणे- कलह करणे, भांडण जुंपवून देणे, दुसऱ्याला फसवणे, लुबाडणे, जीव घेणे असे प्रकार या युगात माणसं करतात. हिंसा, अत्याचार, कमालीचा स्वार्थीपणा निर्लज्जपणे करतात. मग देवालाही कंटाळा येतो. पृथ्वीचा नाश करावा असं त्याला वाटतं. नेमक्या त्याच वेळी या युगाचे स्वामी कलंकी महाराज अवतार घेणार आहेत. ते असे पांढऱ्या शुभ्र घोडय़ावर बसून येणार आहेत. त्यांच्या डोक्यावर पूर्ण टक्कल असेल..!’’ वगैरे वगैरे..

आम्हाला प्रश्न पडायचे, कलंकी येणार.. पृथ्वीचा नाश.. मग आपण काय करायचे? आम्ही ऑऽऽ करून त्या गूढरम्य अगम्य गोष्टी ऐकत असू..

पुढे आम्ही ते गाव सोडले. बाळू मास्तरांचे लग्न झाल्याचे समजले.. पुढे काही दिवसांतच बाळू मास्तर टीचर्स ट्रेनिंगसाठी राजापूरला गेले. ट्रेनिंग पूर्ण होण्याअगोदरच टॉयफॉईडचे निमित्त होऊन बाळू मास्तरांचे निधन झाले. त्या गोष्टीला आता सत्तर र्वष उलटून गेलीत. आजही बाळू मास्तरांच्या खूप गोष्टी आठवतात. बाळू मास्तर म्हणजे अवतीभवती मुले घेऊन बसलेले पूज्य साने गुरुजीच जणू!

असं वाटतं.. त्यांची वृद्ध माता आजही वईपाशी येऊन साद घालीत असेल, ‘‘बाळ्याऽऽऽ, चल रेऽऽ जेवायला!’’ आमचे लाड करणारे, आम्हाला निसर्गाजवळ जाण्याचं वेड लावून बाळू मास्तर गेले. त्याला सुमारे सहा तपं उलटलीत. चार हरिणींची गोष्ट मात्र अर्धीच राहिली. ती कोणालाही पूर्ण करता आली नाही.

– वनिता देशमुख

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story
First published on: 21-11-2014 at 01:23 IST