कर्नाटकात म्हैसूरमध्ये साजरा होणारा दसरा इतर प्रांतांपेक्षा वैशिष्टय़पूर्ण असतो. नवरात्र आणि मग विजयादशमी असे दहा दिवस म्हैसूर एका वेगळ्याच चैतन्याने रंगलेले असते.
महाराष्ट्रात विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाचं खूप महत्त्व आहे. देवीच्या घटांची स्थापना केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जातात आणि दहाव्या दिवशी दसरा हा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. सोने म्हणून आपटय़ाची पाने एकमेकांना देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी शस्त्रपूजन, सरस्वतीपूजन, शमीपूजन करण्याची प्रथा आहे. दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक. हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजण हा दिवस खरेदीसाठी राखून ठेवतात. महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा दसरा कर्नाटकातल्या म्हैसूर शहरातही तितक्याच जल्लोषात साजरा केला जातो. तिथे आपटय़ाची पाने किंवा खरेदीचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात नसला तरी तिथल्या या उत्सवाचे रूप हे भव्यच असते.
म्हैसूर हे कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. ऐतिहासिक म्हैसूर राज्याची म्हैसूर ही राजधानी होती. वाडियार घराण्याने या राजधानीत राज्य केले. म्हैसूरचा दसरा हा कर्नाटकातील शासकीय सण आहे. या सणाला कन्नडमध्ये नाडहब्ब असे म्हणतात. या दिवशी अनिष्ट प्रवृत्तींवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठीच विजयादशमीचे प्रयोजन आहे. एका आख्यायिकेनुसार चामुंडेश्वरी देवीने दैत्य महिषासुर दैत्याचा वध केला. अशा प्रकारे सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवला आणि म्हणूनच या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणतात. महिषासुराच्या नावावरूनच या प्रदेशाला म्हैसूर नाव मिळाले असे स्थानिक मानतात. म्हैसूरचा दसरा पंधराव्या शतकात विजयनगरच्या राजांनी श्रीरंगपट्टण येथे सुरू केला. वडियार राजघराण्यातील पहिला राजा वडियार यांनी ही परंपरा पुढे सुरूच ठेवली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी वडियार राजघराण्यातील दाम्पत्य म्हैसूरमधील चामुंडी पर्वतावरील चामुंडी मंदिरात श्रीचामुंडेश्वरी देवीची यथासांग पूजा करीत असे. १८०५ सालापासून तिसऱ्या कृष्णराज वडियार
दसऱ्याचा शेवट विजयादशमीच्या दिवशी होतो. याच दिवशी जगभरात प्रसिद्ध असलेली ‘जंबू सवारी’ म्हणजे हत्तींची मिरवणूक म्हैसूर शहरातून निघते. तसेच राजघराण्यातील तलवारींचीही पूजा यावेळी केली जाते. हत्ती, घोडे व उंटांची मोठी मिरवणूक या दिवशी काढली जाते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे माता चामुंडेश्वरीची मिरवणूक. ही मिरवणूक म्हणजे केवळ आकर्षणच नाही तर इथल्या लोकांची श्रद्धा आहे. सजवलेल्या हत्तीच्या पाठीवर सोन्याच्या अंबारीत देवीची मूर्ती ठेवण्यात येते. मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी देवीच्या मूर्तीची राजघराण्यातील जोडप्याकडून पूजा करण्यात येते. या मिरवणुकीचे दृश्य अतिशय प्रेक्षणीय असते. वाजतगाजत मिरवणूक नेली जाते. भाविक या मिरवणुकीचा मनमुराद आनंद घेत असतात. आपल्या आजूबाजूला जणू कोणी नाहीच अशाप्रकारे तिथली लोकं तल्लीन होऊन आनंदाने नाचत असतात. मिरवणुकीसाठी सजवलेले हत्ती अतिशय सुंदर दिसत असतात. ठिकठिकाणी केलेली रोषणाईही अनेकांचं लक्ष वेधून घेते. त्यांच्याबरोबर घोडे आणि उंटही सजवून मिरवणुकीत चालत असतात. ही मिरवणूक पाहायला हजारो लोक रस्त्याच्या कडेला उभे असतात. प्रचंड गर्दीतही मिरवणूक शिस्तीने पुढे सरकत असते. मिरवणुकीतली सगळी आकर्षणं बघण्यासाठी अनेकांची अक्षरश झुंबड लागलेली असते. म्हैसूरच्या राजवाडय़ापासून निघालेली ही मिरवणूक ‘बन्नीमंडप’च्या मदानावर ‘पनजिना काव्यायथ्थू’ने (बॅटरीच्या प्रकाशातील संचलन) संपते. तेथे शमीचे एक मोठे झाड आहे. त्याची पूजा केली जाते. याच झाडाच्या ढोलीत पांडवांनी अज्ञातवासात असताना आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. कोणतीही लढाई सुरू होण्यापूर्वी राजेलोक या झाडाची पूजा करायचे. त्यामुळे आपल्याला विजय मिळतो, अशी त्यांची श्रद्धा होती. म्हैसूरमधल्या दसरा या सणातलं मुख्य आणि मोठं आकर्षण असलेली मिरवणूक मोठय़ा जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते.
पौराणिक महत्त्व असलेल्या म्हैसूर शहरात दसरा साजरा करण्याची प्रथाही पारंपरिक आहे. येथील दसरा हा विशेष सण पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येतात. पर्यटकांसाठी तर हे खास आकर्षणच असतं. येथील म्हैसूर राजवाडा नवरात्रीच्या दहाही दिवसांत रोषणाईने लखलखत असतो. त्यामुळे हा लखलखणारा राजवाडा बघायलाही मिरवणुकीइतकीच गर्दी होत असते. भव्य असा हा राजवाडा दसऱ्याच्या दिवशी केलेल्या रोषणाईने आणखी चमकत असतो.
म्हैसूर शहरातच असलेल्या चामुंडी टेकडीवर चामुंडेश्वरीचे मंदिर आहे. वाडियार राजघराण्याच्या प्रतिनिधींकडून म्हणजे राजा-राणीकडून या देवीची विशेष पूजा केली जाते. त्यानंतरच उत्सवाला सुरुवात होते, असे मानले जाते. या पूजेनंतर विशेष दरबार भरविला जातो.
कृष्णराजा वाडियार यांनी १८०५ पासून हा विशेष दरबार भरविण्याची प्रथा सुरू केली. या दरबारात राजघराण्यातील सदस्य, विशेष निमंत्रित, अधिकारी तसे सामन्यजनही उपस्थित असतात. या राजघराण्याचे सध्याचे वारस श्रीकांतदत्ता नरसिंहराजा वाडीयार यांच्या काळातही ही प्रथा सुरू आहे. आता राजशाही संपल्याने हा दरबार खासगी स्वरूपात भरवला जातो.
म्हैसूर राजवाडय़ाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मदानावर भरणारी यात्रा हे दसऱ्याच्या सणाचे आणखी एक आकर्षण आहे. याचं वैशिष्टय़ म्हणजे ही यात्रा केवळ दसऱ्यापुरती मर्यादित न राहता डिसेंबपर्यंत सुरू असते. या यात्रेत विविध स्टॉल्स असतात. त्यात कपडे, प्लास्टिक वस्तू, किचनमधील वस्तू, कॉस्मेटिक्स, खाण्यापिण्याचे पदार्थ यांचा समावेश असतो. त्यामुळे साहजिकच तेथे लोकांची प्रचंड गर्दी होत असते. उत्सवाच्या कालावधीतील यात्रा म्हणून तिथे तत्संबंधीच्या अनेक आकर्षक वस्तूंचा मोठय़ा प्रमाणावर समावेश केला जातो. या दहा दिवसांमध्ये खव्वयांची चंगळ असते. पहिल्या दिवसांपासून ते दहाव्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हाच नैवेद्य पंचमीपर्यंत असतो. षष्ठी आणि सप्तमीला सरस्वतीची पुजा केल्यानंतर तांदूळ, खोबरं, गूळ याचा एकत्रित असा तूपातला तळलेला लालसर पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो. या पदार्थाला ‘खज्जाया’ असं म्हणतात. तर अष्टमीच्या दिवशी पुन्हा पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तिथे पुरणपोळीला ‘पुरणदहोळगे’ असं म्हणतात. नवमीच्या दिवशी मात्र काहीसा वेगळा नैवेद्या इथे असतो. नारळ, चुरमुरे, फुटाणे, खोबऱ्याचे तुकडे याचा नैवेद्या दाखवला जातो. दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी हत्तीची पूजा केली जाते. तसंच जिलेबी आणि चिरोटय़ांचा नैवेद्य दाखवला जातो. अशाप्रकारे गोडाधोडाच्या जेवणाची म्हैसूरकर मंडळी मजा घेत असतात.
रूढी-परंपरांसोबतच म्हैसूरचे लोक सांस्कृतिक ठेवाही जपून आहेत. तिथल्या लोकांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. नवरात्रीच्या दहा दिवसांत येथे संगीत व नृत्याचे कार्यक्रम होतात. या विशेष कार्यक्रमांसाठी अनेक बडे कलावंतही आवर्जून उपस्थित राहतात. नृत्य-संगीताशिवाय म्हैसूरमध्ये कुस्त्यांचाही कार्यक्रम आयोजित केला जातो. येथे होणाऱ्या कुस्त्या हाही एक आकर्षणाचा िबदू मानला जातो. कुस्त्यांच्या या विशेष कार्यक्रमासाठी जगभरातील प्रसिद्ध कुस्तीगीर येथे येत असतात. आपल्याकडे दिवाळी हा जसा सगळ्यात मोठा सण असतो तसाच तिथे दसरा हा सण मोठा असतो. आपण दिवाळीची बघतो तशीच कन्नड लोक दसऱ्याची तिथली आतुरतेने वाट बघत असतात. तर दसरा साजरा करण्यासाठी काही महिने आधीपासून तयारीला लागतात. त्यामुळे म्हैसूरमध्ये फिरायला जाणारे हा मोठा उत्सव आपल्याला बघायला मिळावा यासाठी शक्यतो दसऱ्याच्या काळातच म्हैसूरला जातात.