मैफील साधारणत: उर्दू शायरीचीच असते असा माझा समज होता. त्यापूर्वी म्हणजे एकतीस वर्षांपूर्वी माझ्या एका मुस्लीम मित्राच्या लग्नानंतर घरी मुशायरा ठेवला होता. ज्याच्यासमोर शमादानमध्ये तेवत ठेवलेली मेणबत्ती येईल त्याला काही ना काही सादर करावे लागे. त्या वेळी हेच गाणे माझ्या मदतीस आले. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून परत एक गाणे म्हणावे लागले ते होते ‘शामे गम की कसम.’ सांगायची गोष्ट म्हणजे त्या वेळी मैफिलीत वा मुशायऱ्यात काही म्हटले तरी चालायचे आणि श्रोते सहनही करायचे.
शास्त्रोक्त ज्ञानाच्या अज्ञानापोटी मला गप्पांच्या मैफिली जास्त आवडतात. बाबा आमटेंच्या आनंदवनात हे सुख अमाप अनुभवले. माझ्या मोठय़ा भावाचे मित्र, राम शेवाळकर यांच्या गप्पा कुठेही रंगत, जेवताना तर जास्तच. त्या व महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून वध्र्याला उतरवून
पु. ल. देशपांडे व सुनीताबाई यांना आमच्या गावावरून वरोऱ्याला विलासबरोबर जाताना त्या दोन तासांत रंगलेल्या गप्पा या दोन्ही माझा एक बहुमोल ठेवा आहे. याशिवाय आमच्या घरी दोन दिवस मुक्कामाला असताना सुरेश भटांनी गप्पा करीतच मध्यरात्री नव्या कविताही म्हटल्या होत्या. या साऱ्या आठवणींत कोणी आयोजक टांग अडवायला नसल्याने चिरस्मरणीय झाल्यात. लताबाई म्हणून तर गेल्या,
महफील मे जल उठी शमा परवाने के लिये।
प्रीत बनी है दुनिया मे मर जाने के लिये॥
तरी त्या परवान्यासारखे हम नहीं मरेंगे आणि शमा म्हणजे ती ज्योत आमच्या हृदयात टिकावी म्हणून प्रयत्नच करीत राहू.