‘‘मी उद्याच चालले आहे, नागपूरला, कायमची. पुन्हा भेट..’’ मेसेज वाचताना पाणीच आलं डोळ्यात. आठवला आमच्या भेटीचा पहिला दिवस आणि ५-६ वर्षांचा तो एकत्र केलेला प्रवास. नवीन नोकरीत ती मला भेटलेली पहिली व्यक्ती. त्या दिवसापासूनच आमचा एकत्र प्रवास सुरू झाला. कामाचा आवाका वाढत गेला तशा आम्हीही जवळ येत गेलो. तसं आमच्या वयातलं अंतर होतं ५-६ वर्षांचं. आमची कार्यपद्धती वेगळी होती. एखादा निर्णय घेताना, एखादा प्रश्न सोडवताना आमची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. एकूण आयुष्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. त्यामुळे आमचे वादही व्हायचे अनेकदा. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण त्या सगळ्यांत एक गम्मत होती. कुठल्याही गोष्टीचा दोन विरुद्ध बाजूंनी विचार पटकन व्हायचा, कारण आमच्या विचारपद्धती दोन टोकांच्या होत्या. सुरुवातीला जाणवणारं अंतर हळूहळू जाणवेनासं झालं, कठीण वाटणारे प्रश्न सोपे होत गेले, अवघड वाटणारी माणसं हाताळणं सोपं होत गेलं. काही निर्णय बरोबर ठरले, काही चुकीचे. यशे चाखली आणि अपयशेही. पण सगळ्याची जबाबदारी दोघींनी घेतली. हा प्रवास खूप मजेदार होता, वळणावळणांचा होता, आम्हाला जवळ आणणारा होता, बदलणारा होता, एकमेकींना एकमेकींकडून बरंच काही शिकवणारा होता.

आणि अचानक एक दिवस तो थांबला. हा दिवस इतक्यात येईल असं वाटलं नव्हतं. काळ इतका सरसर निघून गेला होता, की ४-५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी काल-परवाच्या वाटत होत्या. बरोबर काम करण्यातली मजा आता संपणार होती. नोकरीचे ते ८-१० तास आता एक वेगळं रिकामपणा घेऊन येणार होते, कामाचा व्याप वाढूनही. आमचे मार्गच वेगळे झाल्याची एक बोचरी जाणीव झाली. वाटलं, आता पुढची भेट कधी.. की होणारच नाही?

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटणारी ही माणसं, त्यांच्याशी जुळणारं आपलं नातं, कसं असत नाही? काहींशी एक-दोन भेटीतच सूर जुळतात, काहींशी वर्षांनुवर्षांनंतरही ते जुळत नाहीत. काहींशी गाढ मैत्री होते, तर काहींशी राहते फक्त ओळख.

भिन्न वाटांवरून चालणाऱ्या दोन व्यक्ती कुठल्याशा निमित्ताने भेटतात, जवळ येतात, एकमेकींच्या साथीने चालत राहतात. त्या एकत्र आलेल्या असतात; कोणत्याही कारणाशिवाय, की एखाद्या कारणासाठी? आयुष्य सरतं तरी कळत नाही ते कारण.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vachak lekhak