‘व्हॅलेंटाइन डे’ नामक प्रेमदिवस आला की त्यानिमित्ताने बाजारपेठा विविध आकर्षक वस्तूंनी सजतात. त्या चांगला गल्लाही जमवतात. प्रेमिकांच्या हक्काचा दिवस असं म्हणतात बुवा या दिवसाला. प्रेमाचा संदेश देणाऱ्या या रंगीबेरंगी वस्तू, दुकानात, हॉटेल्समध्ये विविध प्रकारच्या खास या दिवसासाठीच्या ऑफर्स, डिस्काऊंट्स, पॅकेजेस हे सारं पाहिलं की वाटतं खरंच या अशा प्रकारे व्यक्त केलेल्या प्रेमभावनेला खोली, गहिरेपण असू शकतं? किंवा ते दीर्घकाळ टिकू शकतं का? या तरल भावनेसाठी या कृत्रिम वातावरणनिर्मितीची खरंच गरज असते का? असो. या लेखाचा विषय ‘व्हॅलेंटाइन डे’ हा नाही. एकतर प्रेम हा विषय ज्या समजूतदार, योग्य वयात पुढय़ात यायला हवा ते वयच आपल्या चित्रपट दुनियेने अगदी बाल्यावस्थेत, किशोरावस्थेत हेतूपुरस्सर आणून ठेवलंय.
एखादा चित्रपट ‘शाळे’तल्या प्रेमकथेवर वा तेव्हाच्या भावनावस्थेवर प्रकाश टाकतो काय.त्या चित्रपटाला भरपूर यश, प्रसिद्धी मिळते काय.त्या चित्रपटाकडे एक सुंदर कलाविष्कार वा त्या ठरावीक वयातील भावनिक बदलांची नेमकी मांडणी म्हणून कौतुकाचा वर्षांव होतो काय.तर याचा अर्थ असा होत नाही की पुन:पुन्हा नको त्या वयात प्रेमाबद्दलचं आकर्षण, ओढ, उत्सुकता अशी जाहीरपणे चित्रपटांतून समाजासमोर मांडली जावी. ते अजिबात गरजेचं नाही. आज शालेय वयातील अनेक मुलांच्या कोवळ्या मनात नको ते विषय जाणीवपूर्वक भरवणारे असे २-३ चित्रपट पाठोपाठ झळकले आहेत. त्यांना कितीही पुरस्कार मिळाले तरीही अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे आपल्या समाजाचा कुठेतरी एक प्रकारचा ऱ्हास होतोय हे नक्की. सतत या चित्रपटांच्या जाहिराती, नाचगाणी झळकवून हे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार नक्की काय साध्य करू पाहतायत? १४-१५ वर्षांच्या कोवळ्या वयातले ते तत्सम ‘हिरो- हिरॉइन’(?) म्हणून पाहतानाही ओंगळवाणं, किळसवाणं वाटतं. प्रेम व्यक्त करायला, त्यांची गोडी अनुभवायला, एकमेकांना समजून घ्यायला, देवानं, निसर्गात परिपक्व तारुण्यावस्थेची व्यवस्था केलेली आहे. मग या चक्राला बाल्यावस्थेत आणून ठेवायचा अधिकार आपल्याला कुणी दिला?
एखादा चित्रपट यशस्वी ठरला, तो सर्वाना आवडला कारण प्रत्येकजण त्या वयातून गेलेला असतो, कमी-अधिक फरकाने प्रत्येकाठायी काही खास अनुभव त्या वयात आलेले असतात, पण म्हणून त्या नाजूक , हळूवार विषयाचं अवडंबर माजवून, धंदेवाईकपणे या तरल विषयात मार्केटिंग करणं म्हणजे निव्वळ समाजस्वास्थ्य बिघडवण्याचा शुभारंभ (?) केल्यासारखंच आहे. हे वेळेत थांबवलं नाहीतर भविष्यात त्याचे खूप दुष्परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘सेन्सॉर बोर्ड’ नावाच्या गोंडस पाटीला हल्ली काहीही अर्थ उरलेला नाही. आपल्यासारखे सामान्य लोक फक्त हळहळण्यावाचून काहीही करू शकत नाही, ही फार मोठी खंत आहे. ज्यांच्या हाती हे सारं बदलवण्याची क्षमता आहे, अधिकार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य ती सदसद्विवेकबुद्धी आहे त्यांनी हे सारं थांबवलं पाहिजे व विविध प्रलोभनांच्या जाळ्यात गुरफटलेल्या, हरवत चाललेल्या या उद्याच्या भविष्यास योग्य ती दिशा दाखवून त्याकडे उंच भरारी घेण्याचं बळ त्यांच्या पंखांत दिलं पाहिजे.
रिमा कुलकर्णी
response.lokprabha@expressindia.com