ख्रिसमस आणि भेटवस्तू हे नातं अनेकांच्या लहानपणापासूनच ओळखीचं आहे. यंदाच्या ख्रिसमस, नवीन वर्षांत इतर मुलांना तोच आनंद द्यायचा असेल तर मग विविध भेटवस्तूंचा विचार व्हायलाच हवा.

ख्रिसमसच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला झोपताना स्वप्न रंगवायचं. आपण झोपल्यावर सांताक्लॉज येईल आणि आपल्याला गिफ्ट देईल. सांताक्लॉज लहान मुलांना जे हवं ते देतो, हे ऐकल्यामुळे झोपण्याआधी जे जे हवं ते सगळं मनातल्या मनात बोलायचं. सगळ्या हव्या असलेल्या वस्तू एकदमच सांगून टाकायच्या, कारण त्यातली एखादी तरी मिळेल ही आशा! ही भली मोठी यादी मनात घोकून झाल्यावर झोपायचं. अशा नेमक्या वेळी झोप लागत नाही. पण झोपल्याशिवाय सांताक्लॉज येणार नाही, गिफ्ट देणार नाही, अशी आईबाबांची धमकीवजा सूचना. मग गपगुमान डोळे मिटायचे आणि झोपायचा प्रयत्न करायचा.

सकाळी डोळे उघडल्यावर सगळ्यात आधी विचार यायचा गिफ्टचाच. चेहऱ्यावर एक छोटंसं हसू यायचं. हात उशीखाली जायचे. चाचपडत हात गिफ्टपर्यंत पोहोचायचा आणि काय आनंद व्हायचा तेव्हा! हे सगळं अनेकांनी त्यांच्या लहानपणी अनुभवलं असेल. खरं तर या गिफ्टमुळे तर आनंद व्हायचाच पण ते गिफ्ट मिळेपर्यंतची प्रक्रिया जास्त एन्जॉय केली जायची. खरंच सांता येतो का इथपासून तो घराचं दार बंद असताना कुठून येत असेल इथवर सगळे प्रश्न विचारून आई-बाबांना भंडावून सोडण्यात सगळे पटाईत होते. पण ती सगळी गंमत होती गिफ्ट्स म्हणजे भेटवस्तूंची. नंतर थोडं मोठं झाल्यावर त्या भेटवस्तू आई-बाबाच आपल्या उशीखाली ठेवतात हे समजू लागतं. पण जितका काळ निरागसतेने तो आनंद अनुभवता येईल तितका अनुभवावा असं वाटतं. तर ख्रिसमस दोन दिवसांवर आणि नवीन वर्ष आठ-एक दिवसांवर आलंय. मग तुम्ही लहान असताना तुम्हाला मिळालेला आनंद तुम्ही आताच्या लहान मुलांना देणार ना.. फक्त लहान मुलांनाच नाही तर मित्र-मैत्रिणींना, घरच्यांना, नातेवाईकांना ख्रिसमसच्या निमित्ताने भेटवस्तू देणार असाल तर सुरुवात करा भेटवस्तूंच्या शोधकार्याला!

भेटवस्तू देताना आधी हे पक्कं ठरवा की, तुम्हाला ख्रिसमसचं गिफ्ट द्यायचंय की नवीन वर्षांचं. म्हणजे तशा प्रकारे भेटवस्तूंचा विचार करायला हवं. ख्रिसमचं गिफ्ट देणार असाल तर त्याचा ख्रिसमसच्या प्रतीकांशी थोडा तरी संबंध असू द्या. म्हणजे अगदी थेट त्यासंदर्भातील गिफ्ट्स तुम्ही देणार नसाल तरी ते गिफ्ट ख्रिसमसला मिळालं होतं, असं त्या व्यक्तीला नंतर आठवायला हवं. मग अशा वेळी तुम्ही काय द्याल? तर लहान मुलां-मुलींसाठी सांताक्लॉजचं सॉफ्ट टॉय, सांताक्लॉजच्या आकाराची छोटी बॅग, ख्रिसमस ट्रीच्या आकाराची कंपास पेटी, ख्रिसमस ट्रीचं मॅग्नेट, मुलींसाठी सांता किंवा ख्रिसमस ट्रीच्या आकारच्या केसांच्या क्लिप्स अशा अनेक वस्तू भेटवस्तू म्हणून देता येतील. तर यांनाच नवीन वर्षांची भेटवस्तू द्यायची असेल तर चित्रकलेचं पुस्तक, रंगपेटी, पिगी बँक, चॉकलेट्स, कार-बाइकचे छोटे मॉडेल्स, गेम्स असे अनेक पर्याय आहेत. याशिवाय काही जण स्पोर्ट्समध्ये हुशार असतील त्यांना त्या-त्या संदर्भात भेटवस्तू देण्याचा विचार जरूर करायला हवा. ख्रिसमसला मिळणाऱ्या भेटवस्तूंचं आकर्षण सगळ्यात जास्त लहान मुलांना असतं. त्यामुळे त्यांना भेटवस्तू देताना त्यांच्या आवडीनिवडीचा, सवयीचा, छंदांचा, कलागुणांचा विचार नक्की करा. काहीतरी हट के करूया या नादात लहान मुलांना फार बोजड भेटवस्तू देणं टाळायला हवं. ही लहान मुलं म्हणजे अगदी छोटय़ांपासून ते १०-१२ वर्षांपर्यंतचा वयोगट. त्यामुळे त्यांना त्यांच्या वयानुसार भेटवस्तू द्यायला हव्यात.

ख्रिसमस जवळ आला की, मुलांना काय गिफ्ट द्यायचं हे प्रत्येक पालकांसमोरचं प्रश्नचिन्ह असतं. ख्रिसमसचं गिफ्ट इतर गिफ्टपेक्षा वेगळं कसं ठरेल याचाही नंतर विचार करावाच लागतो. मग अशा वेळी त्या गिफ्टमध्ये स्नो मॅन, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज असं काहीतरी असायलाच हवं, असा नियमच असतो. ख्रिसमसची हीच प्रतीकं कप, टी शर्ट यांवर प्रिंट करून ते गिफ्ट दिलं जातं. सध्या या गोष्टींचा ट्रेण्ड आहे. तसंच या वस्तूंवर लाल रंग मस्ट आहे. कारण त्याशिवाय ख्रिसमस फिल येत नाही. लहान मुलांच्या खेळण्यांमध्येही बरंच वैविध्य आलंय. एज्युकेशन विथ गेम्स हा फंडा सध्या सर्वत्र दिसतोय. म्हणजे गेम्स खेळत असताना त्यांना काहीतरी शिकता येईल असे गेम्स गिफ्ट म्हणून देण्याचाही सध्या ट्रेण्ड दिसून येतोय. अशा गेम्सना प्रचंड मागणी असल्यामुळे यात अधिकाधिक वैविध्य येत आहे. लहान मुलांसाठी आणखी एका वस्तूची सध्या चलती आहे. कारमधून जाताना मागच्या सीटच्या मागे एक फ्लॅप असतो. कारमध्ये बसल्यावर काही खायचे असल्यास तो समोर ठेवून लहान मुलं खाऊ शकतात. या फ्लॅपमध्ये कप्पेही असतात. या कप्प्यांमध्ये रंगपेटय़ा, वही, पुस्तकं, एखादं खेळणं असं ठेवता येतं. हा फ्लॅप बाहेरही नेता येतो. म्हणजेच फ्लॅप कम बॅग अशी टू इन वन गंमत मुलांसाठी सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी आता हाही एक पर्याय आहे.

तुम्ही जर ख्रिसमस पार्टीला कोणाच्या घरी जाणार असाल तर त्यांच्याकडेही एखादं गिफ्ट घेऊन जायला हरकत नाही. पण ते घेताना त्यांचं राहणीमान, त्यांची आवड आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बजेट या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणं गरजेचं आहे. अशा पार्टीला जाताना तुम्ही दोन पण आकर्षक आणि आवडणारी गिफ्ट्स घेऊन जाऊ शकता. ख्रिसमस आणि नवीन वर्ष या दोन्हीच्या निमित्ताने दोन गिफ्ट्स तुम्हाला देता येतील. ख्रिसमससाठी तुम्ही एखादी वाईन आणि नवीन वर्षांसाठी शुभेच्छांचं एखादं शोपीस असं गिफ्ट करू शकता. नवीन वर्षांचं गिफ्ट द्यायचं नसेल तर वाईनसोबत एखादा केकही नेता येईल. वाईन नको असेल तर त्याऐवजी ख्रिसमस स्पेशल केक उत्तम पर्याय आहे. एरवीपेक्षा हा केक वेगळा असेल याकडे मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कोणाच्या तरी घरी जाताना शक्यतो एकच पण चांगलं गिफ्ट घेऊन जावं. प्रत्येकाच्या वय आणि आवडीनुसार वेगवेगळं गिफ्ट देण्यात वेळ, पैसे सगळंच बघावं लागतं. त्यापेक्षा त्या घराला उपयोगी पडेल असं गिफ्ट देणं केव्हाही चांगलंच.

तरुणाईमध्येही आता गिफ्ट्सच्या देवणाघेवाणीचा ट्रेण्ड सुरू आहे. काहीजण अजूनही शिकत असल्यामुळे ते त्यांच्या बजेटनुसार गिफ्टिंग करतात. तर काही कमवत असल्यामुळे त्यांच्या बजेटमुळे त्यांच्याकडे थोडे जास्त पर्याय असतात. भेटवस्तू एखाद्याच्या वापरात येत राहावी, असा विचार आजच्या तरुणाईमध्ये दिसतो. त्यामुळे कोणाला काय घ्यायचं आहे, असं थेट विचारूनच यंगिस्तानात काहींचा गिफ्टिंगचा सिलसिला सुरू असतो. काहींमध्ये सरप्राइज करण्याची परंपरा आजही आहे. पण तेव्हाही त्या व्यक्तीला काय हवंय, काय आवडतं किंवा कशाचा उपयोग होईल याची माहिती काढली जाते. तरुणाईमध्येही कस्टमाइज्ड मग्स म्हणजे हवी असलेली डिझाइन-फोटो प्रिंट केलेला कप, कस्टमाइज्ड टी शर्ट्स यांनाही मागणी असते. हॅण्डमेड वस्तूंचाही सध्या ट्रेण्ड दिसून येतो. पेपर क्विलिंग, डीआयवाय (डू इट युअरसेल्फ), आइस्क्रीम स्टीक्स, स्टोन डिझाइन अशा अनेक वेगवेगळ्या आर्ट्सच्या तयार केलेल्या वस्तूंचाही सध्या तरुण पिढीत ट्रेण्ड आहे. अनेक तरुण मंडळी या आर्ट्सच्या वस्तू घरच्या घरी तयार करतात. त्यामुळे त्यांनी स्वत: केलेल्या वस्तू ते गिफ्ट म्हणून देतात. पण ज्यांना ते करता येत नाहीत असे तरुण-तरुणी अशा वस्तूंची ऑर्डर देतात. अशा हॅण्डमेड वस्तूंचं वैशिष्टय़ असं की ते स्वस्त ते महाग अशा सगळ्या बजेटमध्ये असतात. म्हणूनच तरुणाई याकडे वळते. कस्टमाइज्ड पेंडंट हेसुद्धा सध्या युवा पिढीत इन आहे. स्वत:चं नाव, फोटो असं वापरून पेंडंट बनवलं जातं.

नवीन वर्षांच्या गिफ्ट्समध्ये सध्या डायरीचासुद्धा समावेश आहे. खरं तर सध्याच्या मोबाइलच्या जमान्यात डायरी लिहिलं जात नाही, असं म्हणतात. जे काही डोक्यात असतं किंवा लिहावंसं वाटतं ते मोबाइल, आयपॅड, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर लिहिलं जातं. मग डायरी हवीच कशाला? पण ही डायरी आता यु टर्न घेताना दिसतेय. काही जण नवीन वर्षांचं गिफ्ट म्हणून डायरीला प्राधान्य देऊ लागले आहेत. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची असेल आणि ती व्यक्ती जर उत्तम लिहिणारी असेल तर डायरी हा योग्य पर्याय आहे. त्यात नवीन वर्षांचा फिल असेल तर उत्तमच! याशिवाय चॉकलेट्स, केक, ग्रिटिंग कार्ड हे आहेतच. पण या तिन्ही गोष्टी तुम्ही स्वत: केल्या असतील तर त्या भेटवस्तूला चार चाँद लागलेच म्हणून समजा. चॉकलेट्स आणि ग्रिटिंग कार्ड यांचं रॅपिंग हेही आकर्षण ठरू शकेल. वेगवेगळ्या डिझाइनच्या लेस, रंगबेरंगी कागद, टिकल्या असं वापरून ती भेटवस्तू सजवू शकता. फार बटबटीत नको असेल तर एक सोबर डिझाइनची लेस आकर्षक पद्धतीने बांधून तुमची भेटवस्तू उठावदार दिसेल.

चला तर मग.. कोणाला कोणती भेटवस्तू द्यायची हे व्यवस्थित ठरवा. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेत त्या भेटवस्तू द्या. भेटवस्तू देताना सध्याचा ट्रेण्ड, फॅशन इन असलेल्या गोष्टी, उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचाही विचार करा. पण एक गोष्ट आवर्जून करा; या भेटवस्तू ख्रिसमसची चिन्हं असलेल्या डिझाइन पेपरमध्ये रॅप करा. असा पेपर मिळाला नाही, तर एका पांढऱ्या कागदावर अशी चिन्हं जमतील तशी काढा आणि रंगवा. भेटवस्तूला एकदम ख्रिसमस लुक आला की तुमची भेटवस्तू होईल एकदम परफेक्ट!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com