– अर्जुन नलवडे
माणूस, १२ महिने २४ तास एखाद्या यंत्राच्या चाकाप्रमाणे अतिवेगाने धावत सुटलेला. कशासाठी? तर, पद, प्रतिष्ठा, सत्ता, राजकारण, धर्म, संघटना, चळवळी, नोकरी, बढती, व्यवसाय, घर, गाडी, बंगला, अशा असंख्य आर्थिक, भौतिक आणि सामाजिक गोष्टींसाठी! मात्र, माणसाच्या आयुष्यात (हवं तर शरीरात म्हणा…) ‘करोना’ने प्रवेश केला आणि सगळं जिथल्या तिथे ठप्प झालं. जगात सगळीकडे संचारबंदी, टाळेबंदी सुरू झाली. घरात बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. पण, म्हणतात ना… कोणतीही गोष्ट चांगल्यासाठीच घडते, अगदी तसंच करोनासंदर्भात म्हणावं लागेल. मग, अशा धीरगंभीर वातावरणात नेमक्या कोणत्या गोष्टी चांगल्या घडल्या?
संवेदनशीलता जागृत झाली : करोनाच्या भीतीमुळे टाळेबंदी झाली आणि सामान्य स्थलांतरितांच्या हातची रोजीरोटी गेली. त्यामुळे ‘पुन्हा आपला गावच बरा गड्या…’ म्हणत बायकामुलांसाहित प्रत्येक जण डोक्यावर संसार घेऊन हजारो मैल चालत-चालत गाव जवळ करू लागला… आणि ते ही उपाशी पोटी. त्या अनवानी पायाने चालणाऱ्या माणसांची आणि त्यांच्या मुलाबाळांची भूक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात आली. तिथंच माणुसकीला पाझर फुटला. जो-तो जसं जमेल तसं आपल्या घरातलं जेवण, नाश्ता, पाणी घेऊन त्यांच्यासाठी धावून जात आहे. टाळेबंदीमुळे सरकार आर्थिक अडचणीत सापडलं, म्हणून समाजातला प्रत्येक घटक (लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत) आपापल्या परीने सरकारला आर्थिक मदत करून खारीचा वाटा उचलू लागला आहे.
स्वकियांसाठी वेळ मिळाला : एरवी, माणूस आपल्या व्यवसायात, उद्योगात, नोकरीत इतका व्यग्र असतो की, आजूबाजूला पाहायलादेखील त्यांना फुरसत मिळत नसते. पण, करोनामुळे अनिवार्यपणे घरात बसावं लागलं. पण, यातून एक गोष्ट घडली. ती म्हणजे घरातल्या प्रत्येकाला एकमेकांशी, नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी वेळच वेळ मिळाला. त्यात इंटरनेटने मोठी साथ दिली. शाळेतले मित्र, महाविद्यालायाच्या मैत्रिणी, वयस्क झालेले शिक्षक, दूरचे नातेवाईक सर्वांशी मनसोक्त गप्पा होऊ लागल्या. त्यात जुनेपुराने किस्से, हशा आणि विनोद होऊ लागले. प्रत्यक्ष नाही, पण इंटरनेटच्या आभासी जगात तरी हे सर्व जण पुन्हा एकत्र आले. भूतकाळतल्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. सर्वात महत्त्वाची बाब ही की, नोकरी-व्यवसायात व्यग्र असणाऱ्या पालकांना दररोज पाळणाघरात जाणाऱ्या मुलाला वेळ देता आला आणि त्यालाही त्याचे आईबाबा २४ तासांसाठी मिळले.
पर्यावरण स्वच्छ होऊ लागलं : वाढत्या प्रदूषणामुळे जागतिक पातळीवर पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, अजूनही आहेच. लाखो वाहनांमधून, कारखान्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडॉयऑक्साईडमुळे मोठमोठ्या शहरात श्वास घेणं मुश्किल झालेलं. घराच्या बाहेर पक्ष्यांचा किलकीलाट ऐकू येणं दुर्मिळ झालेलं. जंगलातले प्राणी आणि पक्षी बघायचे झाले तर टीव्ही ऑन करावा लागत होता किंवा प्राणी संग्रहालयात जावं लागतं होतं. करोनाने माणसाला घरातूनच बाहेर पडण्यास मज्जाव केला. त्यामुळे वाहने-कारखाने जिथल्या तिथे बंद झाली. रस्ते सुनसान झाले, माणसांची गर्दी कमी झाली, कोणी दिसेनासे झालं. त्यामुळे निसर्गातल्या पशुपक्ष्यांना मोकळा श्वास घेता येवू लागला. महानगरात्या सिमेंटच्या जंगलातदेखील आपला पिसारा फुलवत मोर निर्धास्त फिरू लागला. हरीण-काळवीटांचे कळपच्या कळप शहरांच्या गार्डनमध्ये निवांत बसलेले दिसू लागले. उंचच्या उंच इमारतींच्या खिडक्यांमध्येही चिमण्यांची किलकिलाट ऐकू येऊ लागली. शहरांच्या ज्या चौकांमध्ये वाढलेला प्रदूषणाचा आलेख हळूहळू खाली येऊ लागला. शेवटी काय तर… करोनाने माणसाला माणूस असण्याची जाणीव करून दिली.
तुम्हालाही ‘करोना’मुळे आपल्या आजूबाजूला घडलेले सकारात्मक बदल दिसले असतील. ते सकारात्मक बदल कोणते? हे ‘लोकप्रभा’ फेसबुक पेजच्या कॉमेंटबॉक्समध्ये जरूर लिहा.