‘दशावतार’ ही कला म्हणजे कोकणच्या मातीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे. कर्नाटकातील ‘यक्षगान’ परंपरेशी साधम्र्य असणाऱ्या या कलाप्रकारात कालानुरूप काही बदल मात्र होण्याची नितांत गरज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा कोकणच्या मातीत कोकणी माणसानं आजमितीपर्यंत आवर्जून जपलेला आहे. दशावतार हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तो कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा आहे.

थंडीची चाहूल लागली म्हणजे कोकणातील ‘जत्रां’ना सुरुवात होते. काही ठिकाणी या जत्रांना ‘दहीकाला’ असे म्हणतात. नोव्हेंबर महिन्यापासून या जत्रा चढत्या भाजणीने सुरू असतात. सिंधुदुर्गातील राजापूरपासून थेट वेंगुल्र्यापर्यंत दशावतारी नाटके केली जातात. दशावताराचं रंगमंचीय आविष्करण पाहण्यासाठी कोकणी माणूस नेहमीच उत्सुक असतो. म्हणूनच दशावतार हा कोकणी माणसांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरू नये.

विष्णूचे दहा अवतार म्हणजे दशावतार. पण यापैकी वामन, परशुराम, राम व कृष्ण या चार अवतारांचीच रंगमंचीय आवृत्ती आपण पाहत असतो. दशावतार हा कर्नाटकातून कोकणात आला असावा, असा एक समज आहे. कारण कर्नाटकचे यक्षगान व कोकणचा दशावतार यात बरेचसे साम्य आहे.

दशावतार सादर करणाऱ्या प्रमुख कंपन्यांचा मुख्य आधार आहे तो दरवर्षी गावच्या देवळांत होणाऱ्या जत्रा. त्यातही काही कंपन्या वर्षांनुवर्षे विशिष्ट गावांतील जत्रेला बांधलेल्या असतात. काही वर्षांपूर्वी दशावतार सादर करणाऱ्या मोजक्याच कंपन्या होत्या, पण अलीकडे यात बऱ्यापैकी भर पडली आहे, तरीही वालावलकर, पार्सेकर, मोचेमाडकर व चेंदवणकर या नावाची मोहिनी रसिकांवर आजही आहे. या कंपन्यांचं अनुकरण करून कालांतराने नव्या कंपन्या उदयास आल्या आणि दशावतार अधिकाधिक लोकाभिमुख झाला. वर उल्लेखिलेल्या कंपन्यांची काही खास वैशिष्टय़े आहेत. त्यात रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, संवादफेक,  संगीत कथानक, युद्धनृत्य आणि सादरीकरण या बाबींचा समावेश आहे. रसिकांच्या वैयक्तिक आवडीनुसार दशावतारी नाटकातील ते ‘नाटय़’ अनुभवण्यास रसिक एकाच रात्री एकापेक्षा अनेक दशावतारी नाटके पाहणे पसंत करतात. त्यातही नामांकित कंपन्यांतील कसबी कलाकार कथावस्तूप्रमाणे राजा-राणी, ऋ षी, राक्षस, कृष्ण, नारद आणि देवदेवतांची पौराणिक आणि रामायणकालीन ‘रूपे’ कशा पद्धतीने सादर करतात हे पाहण्यासाठी दर्दी रसिक जिवाचं रान करतात.

रसिकांना वर्षांनुवर्षे आपल्या अभिनयाची मोहिनी घालणाऱ्या दशावतारी कलाकारांची या कलेतून मिळणारी आर्थिक मिळकत मात्र तुटपुंजीच आहे. कंपनीतील प्रमुख पात्रांना मिळणारे मानधन समाधानकार असले तरी दुय्यम कलाकारांची बिदारगी अपुरीच आहे. अर्थात कंपन्यांचं आर्थिक बजेटही याला कराणीभूत आहे.  मात्र असे असूनही कलाकार कलेच्या श्रद्धेपोटी निष्ठेने काम करीत आहेत.

दशावतारी नाटकांचे सादरीकरण वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या पद्धतीने आजही केले जाते. दशावतारी नाटकात प्रथम गणपतीस्तवन मग सुमधुर, ऋ द्धी-सिद्धी, सरस्वती, ब्रह्मदेव आणि संकासुर यांचे प्रवेश होतात आणि त्यानंतर मुख्य कथानक सुरू होते. दशावतारी नाटकाची लिखित संहिता नसते. स्वत:ची रंगभूषा करायला बसण्यापूर्वी नटमंडळींना रामायण, महाभारत आणि पुराण यातील सादर करावयाचे कथानक सांगितले जाते, त्यानुसार त्या कथानकातील पात्रे रंगमंचावर स्वत:चे संवाद बोलत असतात. इथे दखल घेण्याजोगी बाब म्हणजे लिखित संवाद नसूनही रंगमंचावर दोन किंवा तीन पात्रे एकत्र असूनही त्यांचा आपापसातील संवादाचा गोंधळ होत नाही. दशावतारी नटाचे हेच खरे कौशल्य मानले जाते.

तथापि रंगभूमीच्या अभ्यासकांना सद्य:स्थितीत दशावतारी नाटकांच्या सादरीकरणात काही त्रुटी जाणवतात, त्या ध्यानात घेऊन संबंधित बदल आत्मसात करण्यावर भर द्यावा असे वाटते.

अ)  लिखित स्वरूपाची संहिता नसल्याने कथानक आणि त्यांचा सादर होणारा रंगमंचीय आविष्कार यात तफावत जाणवते.

ब) पात्राचे संवाद हे त्या त्या कलाकारांच्या अभ्यासावर व आकलनावर अवलंबून असतात. परिणामी समोरचा कलाकार त्याच कुवतीचा नसेल तर दोन कलाकारांच्या संवादशैलीतील फरक जाणकार प्रेक्षकांच्या ध्यानात येतो.

क) रंगमंचावर कलाकाराने कुठे व कसे उभे राहावे, संवाद बोलताना शारीरिक व वाचिक, अभिनय कसा असावा याचं मार्गदर्शन रंगीत तालमीअभावी कमी पडत असल्याने अनेक प्रसंगांतील कलाकारांचा रंगमंचीय वावर खटकतो.

ड) लिखित संहिता नसल्याने कथानकाचा होणारा प्रयोग हा बांधेसूद आणि घोटीव होईलच याची हमी नसते. परिणामी कित्येक वेळा नाटय़ाविष्कारात रंगत येत नाही आणि प्रयोग कलाकारांच्या हातून निसटतो. नाटकाची घडण किंवा सिनेमाची पटकथा असं ज्याला आपण म्हणतो तिची गरज दशावतारी नाटकालापण आहे.

इ) कथानकाची मांडणी निदरेष आणि परिपूर्ण असावी, कारण अलीकडचा प्रेक्षक अधिक सुजाण असतो.

फ) पूर्वीच्या काळी माइकची सोय नव्हती म्हणून दशावतारी नटाला स्वत:चे संवाद मोठय़ाने बोलावे लागत, पण आज त्या पट्टीत संवाद म्हणायची गरज नसते. तथापि बऱ्याचदा काही नटमंडळींना याचा विसर पडतो आणि त्यांचे संवाद कर्कशरूप धारण करतात. स्वत:च्या आवाजाचा ‘पोत’ ध्यानात घेऊन संवाद म्हटल्यास ते प्रभावी ठरतील.

ग) भगवान परशुरामाच्या सातव्या अवतारातील कथानके अधिक प्रमाणात मांडली जावीत.

आधुनिक रंगभूमीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना जाणवलेली वरील निरीक्षणे आहेत. ही टीका नव्हे किंवा दशावतार सादर करणाऱ्या कंपन्या आणि कलाकार यांचे दोषदर्शन किंवा टीका करण्याचा हेतू यामागे नाही, उलट दशावतारी नाटकाची गुणवत्ता वाढीस लागावी हा आहे.

कोकणचा दशावतार व तो सादर करणारे कलाकार हे कोकणातील मातीचा उत्तुंग आविष्कार आहेत. कोकणवासीयांचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे ही कला यापुढेही चढत्या भाजणीत वृद्धिंगत होत राहील यात तिळमात्र शंका नाही.
अरविंद चव्हाण – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dashavatar konkan