सोशल मीडियाच्या युगात खरंच गुणवत्ता असेल तर कोणाला कधी आणि कशी प्रसिद्धी मिळेल, सांगता येत नाही. असाच एक १८ वर्षांचा मुलगा रात्रीत आपल्या लवचिक नृत्याच्या जोरावार प्रसिद्ध झाला. त्याचे नृत्य पाहून सर्वसामान्यांपासून बॉलिवुडच्या सिनेतारकांपर्यंत सर्व जण त्याचे चाहते झाले.

या मुलाचे नाव आहे युवराज सिंग. युवराज खरं तर ‘बाबा जॅक्सन’ नावाने टिकटॉकवर प्रसिद्ध आहे.याचे शरीर इतके लवचिक आहे की, कुठूही कसाही तो आपल्या अवयवांना वळवू शकतो. हुबेहूब मायकल जॅक्सनसारखे नृत्य करत असल्यामुळे त्याने आपले नाव बाबा जॅक्सन असे ठवले आहे. डान्स करण्याची प्रेरणा त्याला टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ चित्रपटातून मिळाली. तेव्हापासून त्याने नृत्याचा सराव सुरू केला. त्याची हातापायांची हाडं गाण्याच्या आणि संगीताच्या ठेक्यावर अशा काही पद्धतीने तो डुलवतो की, पाहणारे फक्त पाहतच राहतात.

अमिताभ बच्चन, डान्सर रेमो डिझुजा, अभिनेता वरुण धवन, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, या सर्वांनी बाबा जॅक्सनचे कौतुक केले आहे. मध्यंतरी त्याने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता, त्याच्या चाहत्यांनी खूप उत्सुकता दाखविली होती. मात्र, त्यात त्याची निवड झाली नाही. पण, नाराज न होता पुन्हा येऊन या शोमध्ये विजेता होऊन दाखवितो, असा आत्मविश्वाास त्याने बोलून दाखविला. बाबा जॅक्सन सध्या दिल्लीमध्ये एका खासगी नृत्यवर्गामध्ये धडे घेत आहे.