सुनिता कुलकर्णी
एखाद्या गोष्टीचं अती झालं की काही वेळा तिच्यामधलं गांभीर्यच निघून जातं. असंच काहीसं करोना व्हायरसच्या बाबतीत झालं आहे की काय असं आता वाटायला लागलं आहे. सगळं चालतंबोलतं जग ठप्प करून टाकणाऱ्या या विषाणूचा प्रसार रोखणारी एखादी लस येईल, तिचा संसर्ग झालेले रुग्ण बरे होतील असं एखादं औषध येईल याची सगळं जग आतुरतेने वाट बघत असताना करोनासंदर्भातली अशी काही संशोधनं प्रसिद्धीमाध्यमातून पुढे येताना दिसतात की हसायला येतं.
आता हेच बघा ना, चीनमधे झोंगॉन इथल्या वुहान विद्यापीठ आणि हुबेल क्लिनिकल रीसर्च सेंटर फॉर प्रिनेटल डायग्नोसिस अॅण्ड बर्थ हेल्थ या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार म्हणे करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुरूषांमधली प्रजननक्षमता कमी होण्याची शक्यता असते. या संशोधकांनी करोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या २० ते ५४ या वयोगटातल्या ८१ पुरूषांच्या रक्ताचे नमुने तपासून हा निष्कर्ष काढला आहे आणि या मुद्द्यावर अधिक संशोधन होण्याची गरज व्यक्त केली आहे.
तर अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीचे संशोधन प्रमुख कार्लोस वेम्बिअर यांनी त्यांच्या चमूसह केलेल्या संशोधनातून असा निष्कर्ष काढला आहे की, टक्कल पडलेल्या लोकांना करोनाचा संसर्ग होण्याचं आणि त्यातून त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण अँड्रोजेन हे हार्मोन केस गळण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि करोना संसर्गात या हार्मोनची जोड सापडली आहे. त्यांच्या मते अँड्रोजेन हे हार्मोन शरीरात करोनासाठी प्रवेशद्वार म्हणून काम करते. स्पेनची राजधानी माद्रिद येथील तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या १२२ रुग्णांपैकी ७९ रुग्णांना टक्कल होतं असं त्यांचा अभ्यास सांगतो. त्यांचा हा अभ्यास अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटॉलॉजीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
रेस्पिरेटरी फिजिऑलॉजी अॅण्ड न्यूरॉलॉजी या जर्नलचा हवाला देऊन वॉशिंग्टन पोस्टने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. तिच्यामध्ये असं म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया, कॅनडा तसंच स्वीत्झर्लण्ड येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं आढळून आलं आहे की बोलिव्हिया, इक्वेडोर आणि तिबेट इथल्या करोनाच्या प्रसाराबाबतच्या आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास केला असता तिबेटमध्ये करोनाच्या प्रसाराचे प्रमाण चीनच्या तुलनेत लक्षणीय पातळीवर कमी होते. ते बोलेव्हियापेक्षा तिपटीने आणि इक्वाडोरपेक्षा चौपट कमी होते. कुस्को या पेरू या देशामधल्या समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या शहरात करोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचं प्रमाण अगदीच कमी होतं. त्यामुळे समुद्रसपाटीपासून तीन हजार किंवा त्यापेक्षा अधिक मीटरवर राहणाऱ्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी आहे असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.
करोनावर अधिकाधिक संशोधन होण्याची गरज कुणीच नाकारणार नाही. ते होऊन लौकरात लौकर विषाणू आणि औषध दोन्ही सापडो अशीच सगळ्या जगाची इच्छा आहे. पण अशाही परिस्थितीत करोनामुळे पुरुषांची प्रजननशक्ती कमी होते, टक्कल पडलेल्यांना करोनाचा धोका अधिक असे निष्कर्ष मजेशीर वाटतात हे मात्र खरं.