आदित्य बिवलकर / स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
२०२१ हे खऱ्या अर्थाने डिजिटल इयर म्हटलं पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे इंटरनेट आणि डिजिटल सेवांचा वाढलेला वापर, ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या शाळा यामुळे सरत्या वर्षांला डिजिटल वावर वाढला. या वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या. सरत्या वर्षांला निरोप देत असताना यातीलच काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनवीन स्मार्टफोन्सचे वर्ष

या वर्षांत मोबाइल कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. खासकरून ओप्पो, व्हिवो, सॅमसंग या कंपन्यांमध्ये विशेष चुरस होती. सॅमसंगने एम-सीरिजच्या माध्यमातून बाजारात खिशाला परवडतील असे, मात्र चांगले फिचर्स असलेले फोन आणले. अगदी ८ हजार रुपयांपासून ते ४० हजार रुपयांपर्यंतच्या या सीरिजला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याचबरोबर ओप्पोच्या स्पेशल एडिशन फोनलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. वन प्लस, अ‍ॅपल यांनी आपले प्रीमियम रेंज फोनसुद्धा बाजारात आणले. वन प्लस ९ तसेच आयफोन १३ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगलं बॅटरी लाइफ, उत्तम कॅमेरा नवीन प्रोसेसर अशी फिचर्स असलेल्या या स्मार्टफोन्सना २०२१ मध्ये ग्राहकांनी पसंती दिली.

अ‍ॅप्सचा वापर वाढला

मोबाइल अ‍ॅप्स आणि गेिमगसाठी हे वर्ष अत्यंत चांगले होते. एका सर्वेक्षणानुसार मोबाइल अ‍ॅप्सच्या वापरात या काळात २५ टक्के वाढ झाली. भारत अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात जगभरात आघाडीवर होता. एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी, मनोरंजनासाठी अ‍ॅप्स डाऊनलोड केली गेली. जगभरात साधारणपणे १३५ अब्ज डाऊनलोड्स झाली. यामध्ये गेिमग अ‍ॅप्स डाउनलोड केली जाण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. त्याखालोखाल ओटीटी, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित अ‍ॅप्स आणि त्यानंतर समाजमाध्यमांच्या अ‍ॅप्सचा क्रमांक आहे. गेिमगला वाढता प्रतिसाद बघता डेव्हलपर्सना चालना देण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात आहे. फेसबुकने अलीकडेच गेमर्स आणि डेव्हलपर्ससाठी गेिमग परिषदेचे आयोजन केले होते. याचबरोबर गूगलद्वारेसुद्धा या स्वरूपाचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे येत्या काळात गेम डेव्हलपमेंटमध्ये झपाटय़ाने वाढ होण्याची शक्यता आहे.

फेसबुक झाले मेटा

यंदा तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक चर्चा झालेली घटना म्हणजे फेसबुकने आपल्या मूळ कंपनीच्या नावात केलेला बदल. मार्क झकरबर्ग आणि त्याच्या टीमने आपण मूळ कंपनीचे नाव ‘मेटा’ असे ठेवत असल्याचे अनपेक्षितपणे जाहीर करत सर्वाना धक्का दिला होता. यावर अनेक मीम्ससुद्धा व्हायरल झाली होती. या नवीन नावामुळे कंपनी ज्या सेवा पुरवत आहे आणि ज्या क्षेत्रात काम करत आहेत, त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईल, असा विचार या वेळी मांडण्यात आला. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ही नावं कायम राहतील. हे प्लॅटफॉर्म ज्या एका छत्राखाली येतील त्या कंपनीचं नाव मेटा असेल असं फेसबुकने स्पष्ट केलं होतं.

५ जीसाठी सज्जता

५ जी नेटवर्कची प्रतीक्षा आपण सर्वच जण करत आहोत. २०२१ मध्ये ५ जी भारतात दाखल होईल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र तांत्रिक बाबी, रखडलेला लिलाव यामुळे ५ जी सेवा अद्याप उपलब्ध झालेली नाही. तरीही ५ जीच्या दृष्टीने आपण सज्ज होत आहोत. मोबाइल कंपन्या ५ जी रेडी मोबाइल फोनच्या निर्मितीवर भर देत आहेत. याशिवाय नेटवर्क प्रोव्हायडर्ससुद्धा ५ जीसाठीच्या चाचण्यांवर भर देत आहेत. व्होडाफोन, एअरटेल, जिओ यांसह एमटीएनएलद्वारे भारतातील वेगवेगळय़ा भागांमध्ये ५ जी सेवांसाठी चाचण्या केल्या जात आहेत. ५ जीसाठीचे पायाभूत सुविधा, लिलावांशी संबंधित तांत्रिक प्रक्रिया आणि घडामोडींना या वर्षांत वेग आला आहे. त्यामुळे नवीन वर्षांत आपल्याला ५ जीची भेट मिळू शकते.

विंडोज ११

मायक्रोसॉफ्टने ऑक्टॉबर २०२१मध्ये िवडोज ११ हे नवीन व्हर्जन बाजारात आणले. यामध्ये सर्वात मुख्य बदल हा युजर इंटरफेसमध्ये पाहायला मिळतो. या व्हर्जनमध्ये िवडोज ८ पासून कायम असणाऱ्या स्टार्ट मेनूमधील बदल बरेचसे स्थिरस्थावर झालेले पाहायला मिळतात. िवडोज ८ ते १० मधील स्टार्ट मेनू टाइल्स काढून त्याची जागा आता विजिट्सने घेतली आहे. तसेच व्हर्चुअल डेक्सटॉपसारखे पर्याय देण्यात आले आहेत. ज्याद्वारे आपल्या सोयीयुसार एकापेक्षा अधिक डेक्सटॉप सेटअप करून ठेवता येतात. एकंदरीत युजर इंटरफेस हा जवळजवळ अ‍ॅपलच्या मॅकिन्टोश ऑपरेटिंग सिस्टीमसदृश तयार करण्याचा प्रयत्न मायक्रोसॉफ्टने केला आहे. नवीन व्हर्जनमध्ये पॅरेन्टल कंट्रोलचीसुद्धा चांगली फीचर्स पाहायला मिळतात. जे सध्याच्या काळात निश्चितच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ‘कोर्टाना’ हे असिस्टन्ट अ‍ॅप्लिकेशनसुद्धा स्टार्ट मेनूमधून काढून टाकण्यात आले आहे. गेिमग आणि परफॉर्मन्समध्ये ऑटो एचडीआर मोड आणि रॅम बूस्टर पाहायला मिळतात. नवीन व्हर्जनमध्ये आपल्याला नजीकच्या काळात अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन सपोर्टदेखील पाहायला मिळणार आहे.

ब्लॉकचेन

या वर्षांत ब्लॉकचेन या नव्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर भारतात पाहायला मिळाला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा ५४वा दीक्षांत समारंभ नुकताच झाला. यावेळी त्यांनी ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पदवी प्रदान केल्या. टाटा स्टीलकडून गेल्या महिन्यात बांगलादेशमधील एका प्रमुख कंपनीशी झालेला निर्यात करार हा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्णत: पेपरलेस स्वरूपाचा होता. महाराष्ट्र शासनाकडून देखील लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी देणारा युनिव्हर्सल पास हा ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या क्यूआरकोड-सहित दिला गेला आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता तसेच पडताळणी सोपी झाली आहे.

ड्रोनचा वाढता वापर

भारत सरकारने ड्रोनबाबत नवीन नियमावली २०२१ मध्ये जाहीर केल्यानंतर ड्रोनचा वापर अधिकाधिक वाढताना दिसला. आजकाल सुरक्षेच्या दृष्टीने मोठय़ा भूभागावर लक्ष ठेवण्यासाठी, हेरगिरी, मोर्चे-आंदोलनांवर नजर ठेवण्यासाठी, मोठय़ा सोहळय़ांच्या चित्रीकरणासाठी, शेती, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, रस्ते निर्माण, सर्वेक्षण, मॅिपग, डेटा अ‍ॅनालिसिस, ऑनलाइन डिलिव्हरी, आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवणे, मनोरंजन क्षेत्र इत्यादींत ड्रोनचा वापर वाढला आहे. नजीकच्या काळात भारतीय बनावटीचे पहिले ड्रोन पाहायला मिळू शकते. हे ड्रोन ताशी १०० किलोमीटर वेगाने १५० किलोमीटपर्यंत जाईल. तसेच १५० किलो माल वाहतूक करू शकेल. या वर्षांत ड्रोनद्वारे हवाई हल्लेदेखील पाहायला मिळाले. त्यासाठी आता ड्रोनबरोबरच अँटीड्रोन तंत्रज्ञानदेखील विकसित केले जात आहे.

सायबर हल्ले आणि डेटा चोरी

२०२१ मध्ये टाळेबंदीच्या पाश्र्वभूमीवर इंटरनेटचा वापर वाढला त्यामुळे सायबर हल्ले आणि वापरकर्त्यांची  माहिती चोरीला गेल्याचे गुन्हे मोठय़ा प्रमाणावर घडले. फेब्रुवारी २०२१ मध्ये एअर इंडियाच्या सुमारे ४.५ दशलक्ष ग्राहकांचा डेटा चोरीला गेला होता. मोबिक्विक या डिजिटल पेमेंट गेटवेच्या लाखो वापरकर्त्यांंचा डेटा चोरीला गेला होता. हॅकर्सनी कोविड-१९ संदर्भातील डेटाबेसमधील सुमारे एक हजार ५०० रुग्णांची माहिती सरकारी संकेतस्थळावरून चोरीला गेल्याचं वृत्त होतं. मे २०२१ मध्ये डॉमिनोज या प्रसिद्ध पिझ्झा निर्मिती करणाऱ्या ब्रॅण्डच्या एक दशलक्ष ग्राहकांचा डेटा हॅकर्सनी चोरला होता. याबरोबरच अनेक आस्थापना आणि सरकारी संकेतस्थळं यांना रॅनसमवेअर, एसक्यूएल इंजेक्शन तसेच एक्सएसएस यासारख्या सायबर हल्ल्याद्वारे लक्ष केले गेले होते.

माहिती तंत्रज्ञान कायदे आणि अधिसूचना

यंदाच्या वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कायद्यांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. मार्च २०२१ ओटीटी प्लॅटफॉम्र्ससाठी आणि समाजमाध्यमांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात नोडल अधिकारांच्या नेमणुका करणे, ओटीटी प्लॅटफॉर्मने स्वत:ची संपूर्ण माहिती सक्षम अधिकाऱ्यांन पर्यंत पोहोचवणे, ओटीटी प्लॅटफॉर्मवर वयाचे र्निबध, समाजमाध्यमांनी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती तपास यंत्रणांना देणे या सूचनांचा समावेश त्यात आहे. याबरोबरच केंद्र सरकार आणि राज्य सरकारनेसुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने सायबर गुन्ह्यांची दखल घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technology good bye to digital year tantradnyan dd
First published on: 31-12-2021 at 17:43 IST