प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कला, साहित्य, काव्य या क्षेत्रांचा एकमेकांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. साहित्य-काव्य या प्रकारांना मुखपृष्ठ, बोधचित्रे या प्रकाराने नटवून कलाकार ते अधिक वाचनीय करतो; पण साहित्याचे क्षेत्र वाचक संख्येने अधिक असल्याने त्यांचे नाव सर्वतोमुखी होते. त्या तुलनेने कला क्षेत्र मर्यादित असते. तिच्या निर्मितीचा आनंद प्रत्येक रसिक अनुभवतो; पण तरीही कित्येकदा त्यामागील कलाकार मात्र तितकासा प्रसिद्धीला येत नाही. किंबहुना साहित्यिक पुढील कित्येक पिढय़ा आपल्या लेखनाद्वारे ज्ञात असतो; पण कलाकार त्याच्या कलाकृती अमर असूनही कित्येकदा विस्मृतीत जातो.

अशीच एक पिता-पुत्राची जोडी कला व साहित्य क्षेत्रात अजरामर झाली. तीही जन्माने ब्रिटिश असूनही भारतीय संस्कृतीशी त्यांचे नाते जुळले. हे पिता-पुत्र म्हणजे जगप्रसिद्ध साहित्यिक- कवी, नोबेल पारितोषिक विजेते रुडयार्ड किपलिंग व त्यांचे वडील नामांकित चित्रकार-कला शिक्षक, वास्तुविशारद, शिल्पकार जॉन लॉकवूड किपलिंग हे होत! या लॉकवूड किपलिंग यांचे भारतातील आगमनही मोठे आश्चर्यकारक होते. अंगी विविध कला असणाऱ्या लॉकवूड यांचा जन्म १८३७ सालचा. त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी लंडनच्या हाईड पार्कमध्ये कला हस्तव्यवसायाचे एक भव्य प्रदर्शन भरले होते. ते कला प्रदर्शन लहानग्या लॉकवूडने पाहिले व तेथेच त्यांनी शिल्पकार होण्याचा निश्चय केला. प्रत्यक्षात लॉकवूड यांना शिल्पकलेइतकीच चित्रकलाही साध्य होती. त्यात ते पारंगत होते; पण त्यांची वाटचाल मात्र स्वत:चे ध्येय मानलेल्या शिल्पकलेच्या मार्गाने सुरू झाली. यात त्यांना गती मिळाली. पुढे त्यांनी बर्सलेम येथील ‘पिंडर बोर्न’ या चिनी मातीच्या भांडय़ांच्या कारखान्यात नक्षीकाम करण्याचे काम पत्करले. तेथे त्यांनी टेराकोटामध्ये अनेक वैशिष्टय़पूर्ण अशी संकल्पने, उठावशिल्पे केली. पुढे ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मध्ये त्यांना वास्तुविशारद-शिल्पकार या पदावर काम मिळाले. तेथे काम करताना त्यांच्या नावाचा बराच बोलबाला झाला.

जे प्रदर्शन पाहून लॉकवूड यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले, त्याच प्रदर्शनाने प्रभावित होऊन मुंबईतील धनाढय़ व्यापारी, कलाप्रेमी आणि एक मान्यवर व्यक्ती सर जमशेटजी जिजीभाई यांनी ही कला आपल्या देशातील कलावंत तरुणांना आत्मसात व्हावी म्हणून, त्या काळी ईस्ट इंडिया कंपनीकडे एक लाख रुपये हवाली केले व त्यातूनच २ मार्च १८५७ रोजी भारताला भूषणावह असलेली ‘सर जमशेटजी जिजीभाई स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’ ही संस्था जन्माला आली. जेम्स पेटन या लंडनमधील ‘गॅलरी ऑफ फाइन आर्ट’च्या अनुभवी कलाकारावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. पेटनच्या पाठोपाठ विल्यम टेरी या चित्रकाराला सदर शाळेचा ताबा देण्यात आला. एक निष्णात चित्रकार तसेच लाकडावर कोरीवकाम करण्यात वाकबगार असलेल्या टेरी यांना आपल्या कौशल्याची जाण असूनही आपण मुंबईच्या संस्कृतीशी काही प्रमाणात तोकडे पडत असल्याची जाणीव झाली. त्यांनी असा एक सहकारी शोधण्यासाठी इंग्लंडची वारी केली. तेथील पाहणीत त्यांना लॉकवूड किपलिंग यांच्याशी संबंध आला. तेथेच त्यांनी लॉकवूड यांना सर जे.जे.च्या स्थापत्य-शिल्प विभागाचा विभाग प्रमुख म्हणून नेमण्याचे नक्की केले.

जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश करताच लॉकवूड यांनी येथील समाजजीवनाचा, संस्कृतीचा अभ्यास करून आपल्या कलाकृतीद्वारे संपूर्ण भारतीय आविष्कार दाखविण्यास प्रारंभ केला. ते भारतीय जीवनशैली व संस्कृतीशी इतके समरस झाले की त्या काळात तयार होत असलेल्या क्रॉफर्ड (आताचे महात्मा फुले) मार्केटवर प्रवेशद्वारावरील संगमरवरी उठावशिल्प बनवण्याचे काम त्यांना मिळाले. आणि लॉकवूड यांनी मोठय़ा कल्पकतेने ते पूर्णत्वास नेले. मंडईत भाजी खरेदी करण्यास आलेले स्त्री-पुरुष, शेजारीच आशाळभूत नजरेने काम मिळण्याची अपेक्षा करणारा पाटीवाला, कोपऱ्यात दोरी विणत बसलेली महिला, मध्ये असलेली फळांची टोपली, स्त्री-पुरुषांचे पेहराव, त्यांच्या आकृत्यांमधील प्रमाणबद्धता व सुलभता, येथील वातावरण, मंडईची जागा, तेथील लोकांचा वावर अशा सर्वच गोष्टी विचारात घेऊन किपलिंगनी ते शिल्प साकारले. मोठय़ा कल्पकतेने व सौंदर्यदृष्टीने हे अर्धवर्तुळाकार शिल्प त्यांनी साकारले आहे. 

पाठोपाठ छत्रपती शिवाजी टर्मिनल्सच्या इमारतीवरील असंख्य शिल्पे हीदेखील लॉकवूड किपलिंग यांचीच निर्मिती. त्या इमारतीचे वास्तुविशारद स्टीव्हन्स यांनी केलेल्या आराखडय़ानुसार स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी या इमारतीवर असंख्य शिल्पाकृती निर्माण केल्या आहेत, त्याला जगाच्या कला इतिहासात तोड नाही. साधे पाण्याचा निचरा करणारे पाइपदेखील त्यांनी पुराणातील गॉर्गाईल पशूंच्या शिल्पातून दाखवले आहेत. असाच प्रयोग त्यांनी महात्मा फुले मंडईमध्ये जो कारंजा बनवला त्यासाठीही केला. मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरवरील शिल्पाकृतींचे जनकही किपलिंगच!

संपूर्णपणे पाश्चात्त्य विचारसरणीवर व कलासंस्कृतीवर वाढलेल्या लॉकवूड किपलिंगनी येथे येताच तिचा संपूर्णपणे त्याग केला. ते पूर्णपणे भारतीय कला-संस्कृतीशी समरस झाले. त्यासाठी त्यांनी भारतीय समाजाच्या संस्कृतीचा, राहणीमानाचा, पेहरावाचा, भाषांचा अभ्यास केला. या स्कूल ऑफ आर्टच्या प्रांगणातच त्यांचा सुपुत्र रुडयार्ड हा ३० डिसेंबर १८६५ मध्ये जन्माला आला. १८६३ साली ‘रुडयार्ड’ या लहानशा खेडय़ात ‘रुडयार्ड लेक’वर लॉकवूड यांची त्यांच्या भावी पत्नीशी प्रथम भेट झाली. पुढे त्याचे रूपांतर विवाहात झाले. आणि या प्रथम भेटीची आठवण म्हणून त्यांनी मुलाचे नाव ‘रुडयार्ड’ ठेवले.

भारतीय संस्कृती व कलेचा अभ्यास करताना लॉकवूड येथील गणेशाच्या रूपाने प्रभावित झाले. त्यामुळे ते अनेक वेळा सोंडेमध्ये कमळ धरलेला हत्ती हे गणेश रूप म्हणून वापरीत असत. पुढे लेखक-कवी म्हणून गाजलेल्या त्यांच्या पुत्रावर- रुयार्डवरदेखील याचा प्रभाव पडल्याने त्यांनीही आपल्या पुस्तकावर स्वस्तिक वापरला. तसेच त्याच्या नावे अस्तित्वात आलेल्या ‘किपलिंग सोसायटी’चे प्रतीक म्हणूनही लॉकवूड ज्या पद्धतीने हत्तीचे मुख गणेश म्हणून वापरीत तोच हत्ती वापरण्यात आला. १८७१ मध्ये इंग्लंडमध्ये जागतिक प्रदर्शन भरविण्यात आले, त्या वेळी भारतातील विविध कलाकृतींची निवड करण्याचे काम सरकारने लॉकवूड किपलिंग यांच्यावर सोपविले. त्यासाठी त्यांनी अक्षरश: संपूर्ण भारतात पायपीट करून अनेक कलाकृती जमवून त्या इंग्लंडमध्ये पाठवल्या. तसेच त्यासाठी अनेक चित्रे रंगवली, तीही अस्सल भारतीय धाटणीची. भारतीय हस्तकलाकार, येथील शिल्प, या भागातील निसर्ग यांची स्केचेस करून पाठवली. यातील बरीचशी स्केचेस आजही व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत; पण पुढे येथील व्यवस्थापनाबरोबर मतभेद झाल्याने किपलिंगनी मुंबई सोडली व १८७५ साली लाहोर येथील ‘मायो स्कूल ऑफ आर्ट’ या कलाशाळेचे प्रमुख म्हणून त्यांनी पद स्वीकारले. तसेच तेथील म्युझियमचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. लाहोरला गेल्यावर किपलिंग यांनी तेथील लोककलांना प्रोत्साहन देऊन त्यात अनेक कलाकारांना प्रशिक्षित केले. १८७७ मध्ये जेव्हा महाराणी व्हिक्टोरिया ही भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित झाली, तेव्हा भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड लिटन यांनी दिल्ली येथे एक मोठी शाही मेजवानी आयोजित केली होती. त्या वेळी समारंभाची सजावट व सैनिकांचे गणवेशदेखील किपलिंग यांनी संकल्पित केले.

लॉकवूड किपलिंग यांनी रुडयार्ड या आपल्या पुत्राच्या पुस्तकासाठीच बहुतेक चित्रे काढली आहेत. दोघांचेही संबंध अत्यंत सौहार्दाचे होते. त्यांचा प्रभाव मुलांवरही बराच पडला होता. त्यामुळे रुडयार्डने आपल्या ‘किम’ या कादंबरीची सुरुवात लाहोरच्या ‘अजब घर’ नावाने संबोधल्या जाणाऱ्या म्युझियमपासूनच केली आहे. जॉन लॉकवूड यांचा स्वभाव अतिशय संयमी, सौजन्यपूर्ण व प्रेमादराने वागण्याचा होता. त्यांचे कलेबद्दलचे ज्ञान, अफाट वाचन, अमर्याद प्रवास, जगातील प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवण्याची प्रवृत्ती हे त्यांचे खास वैशिष्टय़ होते. १९१० साली त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली आणि लॉकवूड खचून गेले. त्याच वेळी त्यांच्या लाडक्या पुत्राच्या लेखांचे पुस्तक ‘रिवार्डस अँड फेरीज्’ यासाठी त्यांनी खास चित्रे काढली होती; पण ते प्रकाशित होण्यापूर्वीच २६ जानेवारी १९११ मध्ये लॉकवूड किपलिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने इंग्लंडमध्ये निधन झाले. भारतीय कलासंस्कृतीचा एक आधारस्तंभ निखळला.

लॉकवूडच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलासाठी बनवलेल्या चार टेराकोटाच्या प्लाकपैकी एक त्यांचा मित्र एडवर्ड बॉक यांना लाल रेशमी आवरणात आच्छादून पाठवली. त्या प्लाकवर कमळ धरलेल्या गणेशाची प्रतिकृती व सोबत स्वस्तिक चिन्ह अंतर्भूत केले होते. यासोबत रुडयार्डने लिहिले, ‘‘माझ्या वडिलांशी जे सदैव कृतज्ञ होते, त्यापैकी आपण एक असल्याने त्यांची एक लहानशी स्मृती, जी माझ्यासाठी बनवली होती ती पाठवीत आहे. त्यावरील स्वस्तिक चिन्ह तुम्हाला अधिकाधिक यश देवो!’’ आज रुडयार्ड किपलिंग हे नाव घेताच क्षणात त्यांचे लेख, त्यांची पुस्तके, जगभर गाजलेले त्यांचे जंगलबुक, त्यांच्या कविता, शिवाय साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळवलेला पहिला ब्रिटिश साहित्यिक म्हणून चटकन लोकांच्या ध्यानात येतात; पण तेच जॉन लॉकवूड किपलिंग म्हटले की, आज किती जणांना आठवत असतील? मग ते दररोज छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून आत-बाहेर करणारे लक्षावधी प्रवासी असोत, मुंबई विद्यापीठातील राजाबाई टॉवरमधील वाचनालयात जाणारे स्नातक असोत, महात्मा फुले मंडईत रोज खरेदीला जाणारे ग्राहक असोत.. जॉन लॉकवूड किपलिंग त्यांना अनभिज्ञ असतील; पण या मुंबईला घडवणाऱ्या शिल्पकारांपैकी एक अजोड शिल्पकार म्हणून त्यांची दखल या शहराला घ्यावीच लागेल!

rajapost@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about illustrator and museum curator john lockwood kipling zws