कस्तुरीगंध : ‘समाजोन्नती’: एक अवनती-चित्र

या माणसाने नाना उद्योग केले. अशाच अनेक उद्योगांपैकी एक उद्योग त्यांनी लेखनाचा केला.

Marathi poet Vaman Mangesh Dubhashi,
वामन मंगेश दुभाषी

प्रा. विजय तापस

वामन मंगेश दुभाषी हे पु. ल. देशपांडे यांचे आजोबा. त्यांचंच टोपणनाव ‘ऋग्वेदी’! मुंबई शहरातलं विलेपारले हे उपनगर जेव्हा तंतोतंत ‘लोभसवाणं गाव’ होतं आणि त्याची ख्याती जेव्हा मराठी संस्कृतीचं आणि विद्येचं दुसरं माहेरघर अशी होती (अस्सल माहेरघर अर्थात पुण्यनगरी!), त्या गावातले पुण्यपुरुष म्हणजे वामन मंगेश दुभाषी! पारले गावाच्या बारीकसारीक हालचालींवरच नव्हे, तर तिथल्या प्रत्येक माणसाच्या श्वासोच्छ्वासावर गावातल्या ज्या धुरीणांची बारीक (पण ममताळू!) नजर असायची, त्यातले एक दुभाषी. जुन्या महाराष्ट्राचा एक विशेष म्हणजे इथलं संस्थात्मक जीवन! अतिशयोक्तीने बोलायचं तर त्या काळातल्या प्रत्येक सुशिक्षित घरात एका तरी ‘सार्वजनिक संस्थे’चा पाळणा हलायचाच. आपल्या देशाची, समाजाची, शिक्षणाची, संस्कृतीची, भाषेची, सार्वजनिक सभ्यतेची इयत्ता कशी वाढेल याचा ध्यास घेऊन जगणारा घरटी एक तरी जीव असायचाच. ‘दुभाषी’ हे कुलनाम लावणाऱ्या घरातला असा जीव म्हणजे खुद्द कुटुंबप्रमुख वामन मंगेश दुभाषी हेच होते.

ते स्वत: तेव्हाच्या पारले गावातली एक चालतीबोलती, कर्ती संस्थाच होते. गावातल्या मुलांना ‘बिघडू म्हणून कसे ते द्यायचेच नाही’ या ध्येयाने ते कायम झपाटलेले होते. पारले गावातले टिळक मंदिर असो, व्यायामशाळा असो, गीतापठण वर्ग असो, शाळा असो, कुस्तीचा आखाडा असो, पारलेश्वर मंदिर असो, कीर्तन सप्ताह असो; सगळीकडे गावपुरुष दुभाषींचा वावर असायचाच. जणू दुसरे पारलेश्वरच! पु. ल. देशपांडे यांनी आपल्या या आजोबांवर ‘गणगोत’ या लेखसंग्रहात जो लेख लिहिला आहे तो वामनरावांची जन्मकुंडली आणि कार्यकुंडलीही यथासांग उलगडणारा आहे. न्यायमूर्ती रानडे व गोपाळराव आगरकर हे त्यांचं वैचारिक विद्यापीठ होतं. टिळकांची लोकप्रियता आणि त्यांची अफाट कार्यशक्ती परमोत्कर्षांला पोहोचलेल्या काळात दुभाषींनी आगरकरांचा मार्ग ‘आपला’ म्हणावा याला खूप मोठा अर्थ आहे.

या माणसाने नाना उद्योग केले. अशाच अनेक उद्योगांपैकी एक उद्योग त्यांनी लेखनाचा केला. त्यांनी टागोरांच्या ‘गीतांजली’चा ‘अभंग गीतांजली’ म्हणून मराठी अनुवाद केला. हे भाषांतर करण्यासाठी ते बंगाली शिकले- म्हणजे बघा! सगळ्यात मोठी गंमत अशी की, ‘नाटक’ या कलेची तिळमात्र आवड नसताना, किंबहुना त्याबद्दल काहीसा तिटकाराच मनात असताना त्यांनी ‘सर्वागीण समाजोद्धार’ घडवण्याच्या अनावर आसक्तीमुळे ‘समाजोन्नती’ हे नाटक १९११ साली लिहिलं. हे नाटक म्हणजे हौसेपोटी लिहिलेला एकांक नव्हे. ते चांगलं पाच अंकी, २३ प्रवेशी, तब्बल ६१ पदं असणारं नाटक आहे. नाटकात घसघशीत १७ पात्रं आहेत. या नाटकाबद्दल बोलताना पु. ल. देशपांडेंनी म्हटलंय की, ‘‘त्यांनी तरुणपणी ‘समाजोन्नती’ नावाचे नाटक लिहिले होते. मराठी रंगभूमीच्या सुदैवाने ते कोणी बसवण्याचे धारिष्टय़ केले नाही!’’ अर्थात मी असं म्हणत नाही, म्हणणारही नाही. या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला ‘वामन मंगेश दुभाषी’ हा अध्याय अधिक चांगला कळतोच; पण ११० वर्षांपूर्वीचा समाज त्याच्या वृत्ती-प्रवृत्तींसकट पाहता, जाणता येतो, हे काय कमी आहे?  

‘समाजोन्नती’ नाटक कोणी रंगभूमीवर आणेल वा नाही याचा विचार दुभाषींनी कितपत केला होता, कुणास ठाऊक. तसा तो बहुधा केलाच नसावा. मात्र, आपल्याला ‘समाजचिंतक’ म्हणून जे जे बोलावंसं वाटतं, समाजाला जे जे पोटातून सांगावंसं वाटतं, ते ते सांगण्याची जागा म्हणजे नाटक आहे याबद्दल त्यांची खात्री होती. तोच प्रयत्न त्यांनी या नाटकात केला आहे. हे नाटक लिहिताना त्यांची भूमिका काय होती?

‘‘नाटककारांनी कल्पनासृष्टीत विहार करण्यापेक्षा आणि प्रेक्षकांची किंवा वाचकांची खुशामत करण्यापेक्षा समाजाची जी प्रत्यक्षातली स्थिती, तिचा बोध प्रेक्षकाला करून देणे आणि आहे त्या स्थितीपेक्षा अधिक उन्नत स्थिती गाठण्याची उमेद त्याच्या मनीमानसी निर्माण करणे यास महत्त्व द्यायला हवे..’’ असं ते म्हणतात. ‘‘माझे नाटक केवळ सामाजिक आहे. आजकालच्या समाजातील गोष्टी कथानकात गोविल्या असून, सर्व प्रकारच्या लोकांनी समाजाचा जीर्णोद्धार करण्याच्या पवित्र कार्यास हातभार लावणे किती आवश्यक आहे हे यात दाखविले आहे. जुन्या-नव्या पिढीतील लोकांत मतभेद असला तरी तडजोडीच्या उपायांनी समेट करणे कोठवर साध्य आहे वगैरे मुद्दय़ांचे विवेचन नाटकांत केले आहे.’’ वामनरावांच्या या प्रास्ताविकातच जणू नाटकाचं स्वरूप आणि त्याचा बोध स्पष्ट झाला आहे.

हे ही वाचा : कस्तुरीगंध : शंकराचार्याचं ‘मिशन घरवापसी’

हे ही वाचा : कस्तुरीगंध: ब्राह्मणशाहीचा बळी : ‘दुसरा पेशवा’

त्या काळातल्या समाजसुधारणावादी इतर नाटकांप्रमाणेच या नाटकातही दोन पिढय़ांमधला आचार-विचारांतला संघर्ष, स्त्रियांमधला घरातल्या स्थानानुसार निर्माण होणारा आपापसातला सत्तासंघर्ष, धर्म-रूढी-परंपरा यांचा वापर करून सर्व सुधारणांना विरोध करणारा स्वार्थाध भटभिक्षुकांचा वर्ग, धार्मिक आचरणाचा आग्रह धरणाऱ्या पुराणमतवादी मंडळींचा बाहेरख्यालीपणा, नीतीचा कानठळ्या बसवणारा घोष करणाऱ्या मंडळींचे अनैतिक व्यवहार असे अनेक विषय येतात. विधवांचा पुनर्विवाह, एकाकी स्त्रीचा होणारा सर्वागीण कोंडमारा, स्त्रियांना संधी मिळाल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला येणारा बहर, अस्पृश्य वर्गाचे प्रश्न, हुंडय़ाचा प्रश्न, बाला-जरठ विवाह, मुलेबाळे असलेल्या बिजवराची तरुण मुलींशी लग्न करण्याची लालसा, सामाजिक विषमता, आधुनिक शिक्षणाचे वैचारिक वरदान असे विषय आणि त्या विषयांच्या अनुषंगाने इतर अनेक विषय येतात. नाटकाचा विषय वरकरणी एका कुटुंबापुरता मर्यादित आहे असं समजून आपण त्याचा विचार केला तर तो नाटकावर अन्याय ठरेल.

नाटकातलं कुटुंब हा एकूण समाजाचा एकक आहे. या एककात जे जे घडतं, तेच थोडय़ाफार फरकाने प्रत्येक कुटुंबात घडत होतं किंवा घडण्याची दाट शक्यता होती. यादृष्टीने नाटय़कथानकाकडे पाहिलं तर ११० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रीय समाजाचं वैशिष्टय़पूर्ण चित्र आपल्या नजरेसमोर उभं राहील. ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ याचाच प्रत्यय हे नाटक आपल्याला देईल. नाटककाराची अपेक्षाही तीच आहे. नाटकाच्या अगदी प्रारंभीच सुधारणावादी आणि उच्चशिक्षित सदानंद म्हणतो, ‘‘आमचा समाज म्हणजे केवळ अजगर. तो हळूहळू उठणार. अजून व्हावा तसा विद्येचा प्रसार झालेला नाही. आमचा स्त्रीवर्ग तर अगदीच अज्ञानावस्थेत आहे.’’ हे वाक्य पाच अंकांतला नाटकाचा प्रवास सांगणारंच आहे. याच ओघात येणारं कमलाकर या पात्राचं भिक्षुकशाहीबद्दलचं विधानही झगझगीत आहे. ‘‘वेदशास्त्रसंपन्न कृष्णंभट पांजरपोळातल्या गाईसारखा भोळसर आणि खुळचट दिसतो खरा; पण दगलबाज, पाजी मनुष्य आहे तो. आणि हे आमचे धर्ममरतड! या अधमांना उभे जाळल्याशिवाय आमच्या समाजाची कांही धडगत दिसत नाही. शुद्ध पाषाणहृदयी कसाई हे !’’

वामनराव दुभाषी यांचं हे पहिलं आणि कदाचित एकमेव नाटक. त्यांच्या तरुण वयात हा प्रपंच त्यांनी करून बघितला. पहिलेपणाचा उत्साह नेहमीच जोरदार असतो. तसा तो इथेही आहे. एकाच नाटकात वास्तवातल्या समस्त समस्या मांडणं आवश्यक असल्याचा समज करून घेतल्यामुळे नाटक म्हणजे समस्यांची जत्रा झाली आहे. नाटकाचा पसारा ‘अनावश्यक’ वाढला आहे. त्यामुळे त्याची परिणामकारकता उणावली आहे यात शंका नाही. पण हा असा दोष त्या काळातल्या अनेक नाटकांत, अगदी नामवंत नाटककारांच्या नाटकांतही आढळून येतो. दुभाषी यांच्या या नाटकातून एक गोष्ट मात्र घडली आहे, ती म्हणजे खुद्द नाटककाराची विविध विषयांवरील मतं, त्यांच्या वैचारिक भूमिका इथे अगदी स्पष्टपणे साकार झाल्या आहेत. धर्म, धार्मिकता, कर्मकांडे याबाबत तर दुभाषींची निरीक्षणे आणि त्यांचं मूल्यमापन हे त्यांच्या काळापेक्षा कितीतरी पुढचं आहे. त्यांचं वैचारिक कुळ हे प्रार्थना समाजाच्या अंगाने उभं आहे हेही इथे लक्षात येतं. पु. ल. देशपांडे यांच्या निधर्मी, धर्मनिरपेक्ष साहित्याचा जो आविष्कार नंतरच्या काळात महाराष्ट्राने अनुभवला, त्याचं नातं त्यांच्या आजोबांच्या भूमिकांशी जुळवून पाहता येण्यासारखं आहे. ‘आपले धार्मिक उत्सव हे सारे करमणुकीचे खेळ आहेत. यांच्यामुळे समाजात नवीन तट आणि तंटे मात्र उपस्थित झाले..’ हे दुभाषींचं आकलन ११० वर्षांनंतरही ‘केवळ सत्य’ म्हणून शेष आहेच की! याच संदर्भात नाटकातला उच्चविद्याविभूषित कमलाकर म्हणतो, ‘‘मला तर असे वाटते की, ज्याप्रमाणे कित्येक ख्रिस्ती राष्ट्रांनी पोपचे स्वामित्व झुगारून देऊन धर्माच्या बाबतीत विचारस्वातंत्र्य मिळविले, त्याप्रमाणे आम्हीही आमच्या धर्माधिकाऱ्यांना पदच्युत करून आमच्या मार्गातील अडचणी काढून टांकू तर हा-हा म्हणता आमची उन्नती होईल. या रूढीच्या बेडय़ा फार भयंकर आहेत.’’

आजच्या भारतात धर्म आणि इतिहास यांना चलनाचं स्वरूप आलेलं असताना कमलाकरचे हे शब्द अधिक अन्वर्थक वाटणारे नाहीत का? नाटकाच्या अखेरीस भरतवाक्याच्या रूपात जे पद नाटककाराने घातलं आहे, त्यातल्या अखेरच्या दोन ओळी पाहा-

‘शिष्ट म्हणविती त्यांनिं रमावें निजजनउद्धरणीं,

मंगेशात्मज वामन विनवी करायुग जोडोंनी ॥’

आपण सारे शिकलेसवरलेले शिष्ट आहोत, हे निर्विवाद! पण आपल्याला ‘निजजनउद्धारा’ची आच आहे का, ते बघा बुवा! शेवटी कोणत्याही राष्ट्राच्या संपन्न दीर्घायुष्यासाठी समाजोन्नतीच महत्त्वाची ठरते असा नाटककाराचा विश्वास होता. पण तशी ती खरंच ठरते का, हा प्रश्न मागे उरतोच! vijaytapas@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about marathi poet vaman mangesh dubhashi zws

Next Story
तळाशी दिवे लागले..
फोटो गॅलरी