महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यजवळील हद्दीपासून २० कि. मी. अंतरावरील मध्य प्रदेशात असलेल्या बुरहाणपूरबद्दल बालपणापासूनच एक उत्सुकता होती. त्याच्या नामवैचित्र्याबरोबरच या शहराशी निगडित ऐतिहासिक घटनांचे संदर्भही त्याला कारण होते. शहाजहानची प्रिय पत्नी मुमताजमहल ही आपल्या पित्याच्या घरी बुरहाणपूर येथे मृत्यू पावली. तिचे शव काही महिने बुरहाणपुरातील आहुखाना येथे ठेवण्यात आले होते. नंतर ते आग्य्राला हलवून तिथे शहाजहानने तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ ताजमहाल बांधला.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात असताना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पुढाऱ्यांनी तसेच अनेक पत्रकारांनीही या चळवळीत हिरीरीने भाग घेतला होता. मला इतर पुढाऱ्यांपेक्षा दैनिक ‘मराठा’तील अग्रलेखांतून महाराष्ट्रप्रेमी जनतेच्या ज्या वेगळ्या मागणीचा रोज उच्चार केला जात असे, ती मागणी आजही चांगलीच लक्षात राहिली आहे. ती मागणी थोडक्यात अशी  होती : ‘जळगाव, कारवार, निपाणी, बुरहाणपूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ या मागणीमागे बुरहाणपूर या मध्य प्रदेशातील गावाला आणि तेथे वास्तव्यास असलेल्या बहुसंख्य मराठी कुटुंबांना महाराष्ट्रात सामावून घेण्याची कळकळ होती. विद्यार्थीदशेतील आमच्यासारख्यांना कर्नाटकातील सीमेजवळची गावे ऐकून थोडी तरी माहिती झाली होती. पण बुरहाणपूर हे नाव आम्हाला लहानपणी एका वेगळ्याच ठिकाणी आढळत असे. १९५५ च्या आसपास (आमच्या बालपणाच्या काळात) एखादा सिनेमा सुटल्यावर सिनेमागृहाबाहेर काही मुलं त्या चित्रपटातील गाण्यांची पुस्तकं- गायन चोपडी विकताना दिसायची. त्या छोटय़ा पुस्तिकेच्या अखेरीस प्रकाशक म्हणून हमखास ‘बुरहाणपूरवाला’ हे नाव असे.
फार पूर्वी म्हणजे इ. स. १६०० च्या सुमारास उत्तर हिंदुस्थानातून दक्षिण हिंदुस्थानात जाण्याचा मार्ग याच बुरहाणपूरवरून जात असे. त्यामुळेच या शहराला ‘दख्खनचे द्वार’ समजले जात असे. मोगलांच्या काळी अलिगढ ते दिल्ली या भागाला ‘हिंदुस्थान’ म्हणत असत. त्यामुळे बुरहाणपूरहूनच हिंदुस्थानचा दक्षिण भाग सुरू होतो असं म्हटलं जात असे.
महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्याजवळील हद्दीपासून २० किलोमीटर दूर असलेल्या बुरहाणपूरचं एवढंच वैशिष्टय़ नाही, तर वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी चौदाव्या बाळंतपणात आपल्या पित्याच्या घरी बुरहाणपूर येथे मृत्यू पावलेली हिंदुस्थानची महाराणी आणि शहाजहानची प्रिय पत्नी मुमताजमहल हिचे शव ताजमहालच्या तळघरात ठेवण्याआधी याच बुरहाणपूर येथील आहुखाना इथे काही महिने चिरनिद्रा घेत होते. असं म्हटलं जातं की, शहाजहानच्या मनात खरं तर आपल्या लाडक्या पत्नीसाठी बुरहाणपूर इथेच एक संगमरवरातील सुंदर स्मारक बांधायचे होते. पण राजस्थानातील दगड इतका दूर वाहून आणण्यापेक्षा राजस्थानजवळच्या आग्रा शहरी यमुनेकाठी मुमताजचं स्मारक उभं करायचं त्याने विचारांती ठरवलं असावं. म्हणूनच पुढे डिसेंबर १६३१ मध्ये तिचं आहुखानामध्ये ठेवलेलं शव सोन्याच्या शवपेटीतून आग्रा येथे हलवले गेले, हे सत्य फारच कमी लोकांना ज्ञात असेल.      
असे हे बुरहाणपूर आणि त्या शहरापासून २० किलोमीटर उत्तरेस लढाईच्या दृष्टीने अगदी मोक्याच्या स्थानी असलेला असिरगढ किल्ला दोन-तीन दिवसांच्या छोटय़ा सहलीत पाहायचा असं ठरवून आम्ही मित्रांनी एक दिवस अमृतसर एक्स्प्रेसने बुरहाणपूर गाठलं.               
इ. स. ७५३ ते ९८२ या काळात बुरहाणपूर इथे राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते. नंतर मध्ययुगात या शहराला महत्त्व प्राप्त झाले. बुरहाणपूर त्यावेळी ज्या खानदेश प्रांतात होते, त्या खानदेश प्रांतावर इ. स. १६०० पर्यंत फारुकी वंशाचे राज्य होते. त्याच वंशातील नासिरखानाने इ. स. १४०० च्या सुमारास या शहराची स्थापना करून त्याभोवती भक्कम तटबंदी उभारली. आजही त्या तटबंदीपकी बरीचशी तटबंदी बुरहाणपूर गावात फेरफटका मारताना सहजी दृष्टीस पडते. अशीच गावभर दिसणारी तटबंदी आम्हाला कर्नाटकातील बिदर शहरातून फिरताना दिसली होती. नासिरखानने श्रेष्ठ सूफी संत बुराहानउद्दीन यांच्या नावाने या शहराचे नामकरण केले. मूळच्या ब्रह्मपूरचे ‘बुरहाणपूर’ झाले असाही एक मतप्रवाह आहे. बुरहाणपूर ही सुमारे २०० वष्रे फारुकी वंशीय राजांची राजधानी होती. १४५७- १५०१ या काळातील मिराएना आदिलशाह दुसरा या सुलतानाने शहरात सिटी पॅलेस म्हणून आज ओळखला जाणारा किल्ला तापी नदीच्या अलीकडील तीरावर बांधला. तसेच गावातही अनेक महाल उभारले.
इ. स. १६०१ मध्ये मुघल सम्राट अकबराने त्याच्या कारकीर्दीत हे शहर खानदेश प्रांताला जोडले. तेव्हापासून बरीच वष्रे बुरहाणपूर हे खानदेश प्रांताची राजधानी होते. नंतरच्या काळात- म्हणजे १६०० ते १६३५ च्या दरम्यान हे मोगलांच्या खानदेशी सुभ्याचे मुख्य ठाणे होते. पेशवाईत मात्र बुरहाणपूर मराठय़ांच्या ताब्यात होते. पेशव्यांचे- म्हणजे ग्वाल्हेरच्या िशद्यांचे शेवटचे सरदार असलेल्या भुस्कुटे यांचा वाडा बुरहाणपूरमध्ये आहे. पुढे १८६० मध्ये ब्रिटिशांच्या अमलात बुरहाणपूर ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आलं. या शहराचा ‘बगिचांचे शहर’ म्हणून जरी पूर्वी उल्लेख झाला असला तरी शहरात बगीचा मात्र आम्हाला अभावानेच दिसला, हेही खरे.  
शहरदर्शनासाठी  गावातून फिरताना आम्हाला कापडाच्या मागांचे आवाज अधूनमधून ऐकू येत होते. त्याविषयी विचारता आमचे मार्गदर्शक नितीन मेढी यांनी सांगितले की, या शहरात यंत्रचलित व हातमागावरील कापडाचा उद्योग मोठय़ा प्रमाणावर चालतो. येथील जरीयुक्त किनखाप तर पूर्वीपासूनच प्रसिद्ध असून ही कला बऱ्याच प्रमाणात इथे टिकून आहे. मात्र, कापूस व तेलबिया यांचा व्यापार येथे महत्त्वाचा आहे. येथील मोगलकालीन जमिनीखालील पाणीपुरवठा व्यवस्था (खुनी भंडारा) काही सुधारणांसह आजतागायत चालू आहे. अशी अफलातून योजना जगात फक्त इराण आणि बुरहाणपूर या दोनच ठिकाणी अस्तित्वात आहे, असे मार्गदर्शकाने बोलण्याच्या ओघात सांगितले. या पाणीपुरवठा व्यवस्थेत जमिनीखालून गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वानुसार शहरभर पाणी खेळवले जाते. तेथील लिफ्ट दुरुस्तीच्या कामासाठी बंद पडल्याने आम्हाला मात्र ‘खुनी भंडारा’ हे ठिकाण पाहता आले  नाही.  
मुंबईपासून उत्तरेस ५४० कि. मी. अंतरावर असलेलं मध्य प्रदेशातील  बुरहाणपूर हे तापी (तिथे हिला ‘ताप्ती’ असे म्हणतात.) नदीच्या उत्तरेस वसलेले आहे. शहरदर्शनात पन्नासएक बारीकसारीक चिल्लर ठिकाणं पाहण्यापेक्षा येथील महत्त्वाची तेवढी स्थळंच  बघण्याचं आम्ही ठरवलं. तापी नदीच्या काठी, पण उंचावर असलेल्या शाही किल्ल्यात प्रथम आम्ही गेलो. आता हमामखाना, गच्चीवरचे उघडेबोडके असलेले दिवाण-ई-आम व दिवाण-ई-खास या महालांशिवाय तिथे विशेष बघण्यासारखे काही नाही. याच हमामखान्यात शहाजहांची बेगम सौंदर्यसम्राज्ञी मुमताजमहल (मूळ नाव : अर्जुमंद बानू) स्नान करीत असे. येथील हौदात खुनी भंडारा येथून पाणी आणण्याची सोय केली होती. हौदात येणाऱ्या पाण्याने तिचे अल्पसे मनोरंजन व्हावे आणि एकूणच हमामखान्याची शोभा वाढावी म्हणून पडणाऱ्या पाण्याला धबधब्याचा परिणाम देण्यासाठी ते हौदात पडण्यापूर्वी पूर्व-पश्चिम दिशेच्या िभतीत खाचा असलेल्या दगडी पाटावरून खेळविले जात असे. हौदावरील तक्तपोशीला सुंदर रंगीत नक्षीकाम आहे. या नक्षीकामात नसíगक रंग वापरल्याने ते अजूनही बऱ्यापकी शाबूत आहेत. यातील एका कलाकृतीतून शहाजहानला ताजमहालची कल्पना सुचली असावी असं आम्हाला सांगण्यात आलं. पण बिहारमधील सासराम येथील अफगाण दिल्लीश्वर शेरशहाच्या कबरीवरून ताजमहल बांधला गेल्याचं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे.  
नंतर आम्ही आहुखाना हे स्थळ.. जिथे शहाजहानची प्रिय पत्नी मुमताजमहलला प्रथम पुरले होते- ते पाहण्यासाठी तापी नदीच्या पलतीरी असलेल्या जैनाबाद येथे जाण्याकरता निघालो. शिकारीच्या दरम्यानचे विश्रांतीस्थान म्हणजे आहूखाना होय. तापीच्या दुसऱ्या तीरावर जैनाबाद मोहल्ला आहे. येथील मीनाबाजारातून एकदा शहाजहान बादशहा फेरफटका मारत होता. तेव्हा त्याचे लक्ष बाजारात रेशीम आणि माणकं विकायला बसलेल्या सुंदर तरुणीकडे.. अर्जुमंद बानूकडे गेलं. तिच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या बादशहाने तिची आपली तिसरी पत्नी व पट्टराणी म्हणून निवड केली. पुढे चौदाव्या बाळंतपणात तिचा बुरहाणपूरला माहेरीच मृत्यू झाल्यावर पहिले सहा महिने तिचं इथेच दफन केलं गेलं होतं. एकेकाळी शिकारीच्या वेळचं विश्रांतीस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुमटाकार छत असलेल्या आहुखाना या बठय़ा वास्तूसमोरील एका घरात मुमताजमहल हिला मृत्यूपश्चात ठेवलं गेलं होतं. या ऐतिहासिक वास्तूला धक्का लागू नये म्हणून या आवाराभोवतालचा परिसर पूर्वीपासूनच रिकामा ठेवला आहे.  
औरंगजेबच्या दरबारी मिर्झा राजे जयसिंगांसारखा अद्वितीय वीर, कुशल राजनीतिज्ञ आणि पराक्रमी योद्धा होता. इ. स. १६६० च्या सुमारास जेव्हा शिवाजी महाराजांचं एकामागून एक गड घेणं सुरू होतं आणि ते औरंगजेबास दाद देईनासे झाले होते तेव्हा औरंगजेबाने पंधरा लाखांची फौज याच राजे जयसिंगाच्या हाताखाली देऊन त्याला महाराजांशी सामना करण्यासाठी पाठवलं. जयसिंगाच्या फौजेला यश मिळू लागलं व त्याने मराठय़ांनी घेतलेले किल्ले परत मिळविण्याचा सपाटा लावला आणि अखेर शिवाजीमहाराजांना पुरंदर येथे तहासाठी बोलणी करण्यास भाग पाडलं. १६६५ साली झालेल्या या तहानुसार शिवाजीमहाराजांना जिंकलेले २३ किल्ले परत करावे लागलेच; शिवाय आग्ऱ्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी येण्याचंही कबूल करावं लागलं. राजे जयसिंगाच्या या यशस्वी कामगिरीची कृतज्ञ जाणीव औरंगजेबाने ठेवली आणि इ. स. १६६६ ला बुरहाणपूरनजीक स्वर्गवासी झालेल्या मिर्झा राजे जयसिंगांची तापी आणि मोहना नदीच्या संगमावर समाधी उभारली गेली. ही समाधी पाहण्यासारखी आहे. नदीच्या निकट असल्याने स्मारकाचा जोत बऱ्यापकी उंच आहे. सुमारे ३२ खांबांवर ही छत्री (समाधी) उभी आहे. खांबांवर सुरेख वेलबुट्टी आहे. या खांबांची पण एक गंमत आहे. ती म्हणजे ते मोजायला गेलात तर दर वेळेस त्यांची बेरीज वेगळी येते. छताला असलेल्या मध्यवर्ती घुमटाखेरीज असलेले सभोवतालचे छोटे घुमटही मोहक दिसतात.  पूर्वी बुरहाणपूर शहरात सर्वासाठी एकच मशीद शहराच्या एका टोकाला होती. म्हणून शहराच्या मध्यभागी इ. स. १५९५ मध्ये जामा मशीद बांधली गेली. या मशिदीचे मिनार १३५ फूट उंच आहेत. हिचं वैशिष्टय़ म्हणजे तिची रचना थेट दिल्लीच्या जामा मशिदीसारखीच आहे. छताला असलेल्या घुमटाला पेलणारे दोन्ही दिशांतील सत्तरेक खांब अगदी एका रेषेत उभे आहेत. मशिदीच्या मध्यभागी मेहराबाभोवतालचं नाजूक नक्षीकाम थक्क करणारं आहे. मशिदीत एका ठिकाणी तिच्या बांधकामाची तारीख वगरे संस्कृतमध्ये लिहिलेली आहे, हे विशेष.
बुरहाणपूरनजीक असलेल्या लोधीपुरात बोहरी समाजाचं तीर्थस्थान आहे. शिंदे घराण्याची ग्वाल्हेरमध्ये सत्ता असताना त्यांनी बोहरी समाजाला ११ एकर जमीन या दरगाह-ए-हकिमीसाठी दान केली होती.    
जो किल्ला सर केल्याशिवाय दक्षिण हिंदुस्थानात प्रवेश अशक्य होता, तो सातपुडा पर्वतरांगांतील असिरगढ पाहायला आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो. खांडव्यावरून उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व बसेस बुरहाणपूरपासून २० कि. मी. अंतरावरील असिरगढ इथे थांबा घेतात. तरुण पर्यटक बसने येऊन पुढे गढ पायी पाहतात. सत्तरी पार केलेल्या आम्हा मित्रांसाठी मोटार हेच सोयीस्कर साधन होतं. पायथ्यापासून साडेआठशे फूट उंच असल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वाटेकडे पहाऱ्यासारखं लक्ष ठेवण्यास हा किल्ला म्हणूनच अत्यंत उपयुक्त होता. अहिर वंशातील असा अहिर याने तो बांधला. याच वंशाच्या लोकांनी पुढे अहिराणी बोलीभाषा सुरू केली. गडावर जामा मशीद, फाशीची जागा, ब्रिटिशांच्या वेळच्या मोडक्या छावण्या आदी वास्तू तेवढय़ा उरल्या आहेत. गडावरील शंकर मंदिरात अश्वत्थामा रोज पहाटे पूजा करून जातो, अशी गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या अहिर लोकांमध्ये समजूत आहे.  
बुरहाणपूरची मिठाई दूरवर प्रसिद्ध असावी असं या शहरात मिठाईची बरीच दुकानं दिसली त्यावरून वाटतं. तेथील गजक, मावा आणि बंगाली या मिठायांविषयी आम्ही ऐकलं होतं. तीळात बनविलेली गजक मिठाई आम्ही आठवणीने बुरहाणपूरची भेट म्हणून घरी आणली.
नामवैचित्र्यामुळे औत्सुक्याचा विषय ठरलेलं बुरहाणपूर प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याबद्दलचं आमचं कुतूहल बऱ्याच अंशी शमलं. एका ऐतिहासिक शहराचं हे दर्शन आमच्या ज्ञानात भर घालणारं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burhanpur mughal empire deccani entrance