‘‘कय झालं?’’
‘‘बाळ रडतंय.’’
‘‘अगं, मग ग्राइप वॉटर दे त्याला. तू लहान होतीस तेव्हा मीही तुला तेच देत होते.’’
अवघड प्रश्नाचे किती सोपे उत्तर! प्रत्यक्ष आयुष्यात उत्तरे एवढी सोपी नसतात. ‘बाळ रडतंय’ हा कधी कधी आमच्याही अंगावर काटा आणणारा प्रसंग असतो.
पंचवीस वर्षांपूर्वीचा एक प्रसंग! बाळ सतत आणि न थांबता रडतंय म्हणून एक कुटुंब लहानशा खेडय़ातून
अशीच अगदी परवाची गोष्ट. सर्दी, खोकला, ताप, धाप लागली होती म्हणून सहा महिन्यांच्या एका मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तीन मुलींवर मुलगा झाला म्हणून वडील बालाजीला केस अर्पण करायला गेले होते. तीन दिवस झाले होते. आता बाळ बरे होते. मी सकाळचा राऊंड घेतला तेव्हा आईने नुकतेच बाळाला दूध पाजले होते आणि ती त्याचा डायपर बदलत होती. बाळ छान होते. मी राऊंड संपवून ओ. पी. डी. सुरू केली. एक-दोन पेशंट तपासले असतील-नसतील तोच सिस्टर धावत खाली आल्या. म्हणाल्या, ‘चार नंबरमधल्या बाळाला एकदम खूप धाप लागलीय.’ मी लगेच वर गेले. बाळ चांगलेच कण्हत होते. त्याचा श्वासाचा वेग वाढला होता. रक्तातील ऑक्सिजन (spo) ८०टक्के झाला होता. पाच मिनिटांपूर्वी चांगल्या असणाऱ्या बाळाला अचानक काय झाले? मी त्याला ऑक्सिजन लावला. सलाइन जोडले. एक वाफारा दिला. काही इंजेक्शन्स दिली. मला वाटले, बाळाने नुकतेच दूध घेतले होते, कदाचित त्याला उलटी आली असेल आणि श्वासनलिकेत दूध जाऊन बाळ गुदमरलं असेल. याला आम्ही ‘अॅस्पिरेशन’ (Aspiration) म्हणतो. मी एक्स-रे काढला. तोही ठीक होता.
अर्धा तास झाला. बाळाची परिस्थिती आणखीनच बिघडली. मी त्याला मोठय़ा हॉस्पिटलमध्ये न्यायचे ठरवले. आईबरोबर कोणीच नव्हते. तरी बाई धीराची होती. अशा वेळी रडारड न करून तिने माझ्यावर मोठेच उपकार केले होते. मी रिक्षा बोलावली. आई, बाळ, ऑक्सिजन सिलेंडर, तिचे सामान आणि मी अशी सगळी वरात आमच्या चैतन्य हॉस्पिटलमध्ये (कराडमधील लहान मुलांचे अद्ययावत हॉस्पिटल) गेलो. तिथे गेल्यावरही मी बाळाजवळ उभीच होते. ऑक्सिजन, सक्शन, वाफारा, औषधे सारे काही झाले. अर्धा तास झाला. परिस्थिती जैसे थे! यातून बाळ वाचेल असे मला वाटेना. मला असहाय वाटू लागले. मी त्याला एकदा उभे केले. एकदा आडवे केले. दूध-पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु बाळाला मुळी श्वासच घेता येत नव्हता. जोरजोरात कण्हण्याशिवाय ते काहीही करू शकत नव्हते. मी त्याचे कपडे सैल केले. डायपर काढला आणि त्याला आईच्या खांद्यावर टाकून पाठीवरून हात फिरवत राहिले. काय झाले कोण जाणे, पण बाळाचे कण्हणे हळूहळू थांबले. श्वासाचा वेग थोडा कमी झाला. रक्तातील ऑक्सिजन वाढू लागला. बाळ जणू मृत्युरेषेला स्पर्श करून परत येत होते.
पण कशामुळे? मी विचार करत राहिले. बऱ्याच वेळाने मला जाणवले, आईने बाळाला डायपर लावला आणि पाच-दहा मिनिटांत बाळाला धाप लागली. आता मी डायपर काढला आणि पाच-दहा मिनिटांत बाळाची धाप थांबली. डायपर खूप घट्ट लावला गेला असणार. डायपर काढतानाही मला तो घट्ट लागलेला जाणवले होते. आधीच न्युमोनियाने क्षमता कमी झालेल्या फुप्फुसाला एवढा अडथळाही पुरेसा होता. एकाच वेळी कमालीचा थकवा आणि कमालीचा आनंद अनुभवत मी परत ओ. पी. डी.त आले आणि पुढचा पेशंट तपासू लागले.
दुसऱ्या दिवशीच बाळाचे वडील परत आले. बालाजीनेच आपल्या मुलाला जीवदान दिले, यात नवरा-बायकोला कोणतीही शंका नव्हती. लवकरात लवकर बाळाला बालाजीच्या पायावर घालायचे त्यांनी पक्के ठरवले होते.
There are always two choices, Two Paths to take… One is easy and it’s only reward, is that it is easy.