तालिबानी दहशतवादाच्या प्रत्यक्षानुभवावर आतिवास सविता यांनी लिहिलेल्या आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या
‘भय इथले..’ या पुस्तकातील एक प्रकरण..
शुक्रवार हा माझ्यासाठी अगदी निवांत दिवस असायचा. एरव्ही सुट्टीच्या दिवशी घरातली इतर बरीच कामं उरकायची असतात, पण मी इथं हॉटेलमध्ये राहत असल्याने घरकामसदृश कुठलंही काम नसायचं. ‘बाहेर उगाच आपलं फिरून येऊ’ हे शक्य नव्हतं. हमीद हा माझ्या संस्थेचा एक श्रीलंकन सल्लागार याच हॉटेलमध्ये राहायचा. तो मुस्लीम होता. त्यामुळे शुक्रवारी तो जवळच्या मशिदीत जाऊन यायचा तासभर. पंधरा दिवसांनी एकदा ऑॅफिसबरोबर आधी ठरवून आम्ही मॉलमध्ये खरेदीला जायचो. हॉटेलमध्ये रात्री फक्त ठरावीक जेवण मिळायचं आणि ते आठ डॉलर्स इतकं महाग होतं. दुपारी व्यवस्थित जेवले असले तर मला रात्री अशा भरपेट जेवणाची गरज नसायची. मॉलमधली खरेदी म्हणजे या रात्रीच्या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था- दूध, फळं, ज्यूस यांचा साठा करून ठेवणं. त्यामुळे ही खरेदी झटपट व्हायची. तशीही २० मिनिटं ही आम्हाला मॉलमधल्या खरेदीसाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा होती. त्यामुळे तिथं उगाच रेंगाळता यायचं नाही. ज्या मॉलमध्ये आम्ही जायचो, त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता, हे एकदा एका सहकाऱ्याने सांगितल्यावर मॉलमध्ये जाण्याचंही मी शक्यतो टाळायला लागले.
शुक्रवारी मी निवांत उठायचे. रोजच्यापेक्षा अर्धा तास जास्तीचा व्यायाम करायचे. भरपूर नाश्ता करायचे. वाचायचे. भारतात फोन करायचे. लिहायचे.
सोबतचे काही लोक सुरक्षा नियम मोडायचे. कधी कधी मलाही त्यात ओढायला बघायचे.
त्या शुक्रवारी सकाळी अकराच्या आसपास गुरखा रक्षकाशी हवापाण्याच्या गप्पा मारत मी उभी होते. तेवढय़ात माझी कॅनेडियन शेजारीण माझ्याकडे आली. तशी आमची ‘हाय-हॅलो’पुरतीच ओळख होती. पण आज तिचा माझ्याशी बोलायचा नूर दिसत होता.
‘‘आज काय करणार आहेस दुपारी?’’ शेजारणीने विचारलं.
‘‘विशेष काही नाही. नेहमीचंच.’’ मी उत्तरले.
‘‘मी जाणार आहे बाहेर जेवायला. येतेस का?’’
‘‘तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी ऑॅफिसची परवानगी घेतली असती. असं आयत्या वेळी नाही मला येता येणार.’’ जणू काही माझाच दोष आहे अशा नम्रपणाने मी उत्तरले.
‘‘त्यात काय विचारायचं ऑॅफिसला? माझ्या ओळखीचा एक टॅक्सीवाला आहे, तो घेऊन जाईल आपल्याला आणि परत आणून सोडेल. शंभर डॉलर्स घेईल तो. निम्मे मी देईन, निम्मे तू दे.’’ मी येणार हे गृहीत धरून बाई बोलत होत्या.
या बाईही एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सल्लागार होत्या. अपहरणाविषयी काही दिवसांपूर्वी माझ्या सहकाऱ्यांनी केलेली थट्टामस्करी आणि एकदा एक मीटिंग सोडून निघून यावं लागलं होतं मला- या घटना मी विसरले नव्हते. त्यामुळे मी शेजारणीला शांतपणे नकार दिला.
दुपारचे चार वाजत आले होते. ही माझी कॉफी प्यायची वेळ. स्वयंपाकगृहात जाऊन आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी कॉफी पिण्याइतका निवांत वेळ. हमीदही यायचा तिथं आणि मग थोडा वेळ गप्पा मारत बसायचो आम्ही. लिहीत असलेली मेल अर्धवट तशीच ठेवून मी स्वच्छतागृहात गेले.
धडाड.. धडाड..
खळ्ळ..खळ्ळ
कर्कश सायरन.
तिन्ही आवाज एकदम आले.
स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचांचा खच माझ्याभोवती पडला आहे, बाहेर बंदुकांच्या फैरी झडत आहेत आणि सायरन वाजत आहे, या तिन्ही गोष्टींची नोंद मी निमिषार्धात घेतली. हे वाक्य वाचायला तुम्ही जेवढा वेळ घेतला असेल, त्याच्या एक-दशांश वेळात मी ही नोंद घेतली.
पण आपलं मन कमालीचं हट्टी असतं. अनुभवाला नाव दिल्याशिवाय त्याला पुढं जाता येत नाही. संवेदनेची खूण ओळखण्याचा त्याचा आटापिटा असतो.
‘बहुतेक भूकंप झालेला दिसतोय..’ परिस्थितीचं आकलन करून घेण्याची मनाची धडपड.
‘‘आधी बंकर गाठ..’’ बुद्धीने प्रतिसाद नियंत्रित करण्यात पुढाकार घेतला.
स्वच्छतागृहातून बाहेर आले. खोलीतही काचांचा खच पडला होता.
सायरन वाजतच होता. बंदुकांचे आवाज येतच होते.
हेल्मेट चढवलं. जाकीट जड असल्याने घालता येत नव्हतं, ते हातात घेतलं. घाई कर.
पासपोर्ट, ओळखपत्र, पैसे असलेली छोटी पिशवी गळ्यात अडकवली.
किती सेकंदात? बहुधा दोन.
सायरन अजून वाजतोच आहे.
बंदुकांचे आवाज जवळून येताहेत का?
माहिती नाही. लवकर चल.
हा तालिबानी हल्ला आहे का?
असेल किंवा नसेलही. तू पळ.
ट्राऊझर घे हातात. बंकरमध्ये गेल्यावर घाल. आत्ता वेळ घालवू नकोस.
लॅपटॉप बंद करावा काय?
नाही, तेवढा वेळ नाही. तू पळ आता लगेच.
फोन? चार्जर?
हं, दोन्ही हॅन्डसेट घे.
वॉकी-टॉकी?
ती राहू दे. तू पळ आधी बंकरकडे.
बूट कुठे आहेत?
खिडकीजवळ. हं! काचांनी भरलेत ते. असू दे. तू अनवाणीच बंकरमध्ये जा.
बाहेर सगळीकडे काचा आहेत. खाली बघून नीट पळ. पाय पूर्ण टेकवू नकोस.
नेहमी खोलीसमोर असतात ते आपले गुरखे ठीक आहेत ना?
त्यांची काळजी तू नको करूस. पळ जोरात.
तो गुरखा पाहिलास? किती एकाग्रतेने नेम धरून उभा आहे तो.
त्याचा चेहरा विलक्षण शांत आहे.
नाही, त्याच्याशी आत्ता बोलू नकोस. तू पळ बंकरकडे.
तुला भीती वाटतेय?
माहिती नाही. पण काय झालंय नेमकं?
कळेल लवकरच.
सायरन वाजतोय अजून!
अजून?
हं, आता उजवीकडे.
तो बघ, रशीद उभाच आहे दारात.
तो न बोलता बाजूला होतो आणि मला आत जाण्याची खूण करतो.
बंकर.
कुणीतरी माझं जाकीट चढवायला मला मदत करतं.
हेल्मेट मी नुसतं अडकवलं आहे. तेही तिसरं कुणीतरी नीट बसवतंय.
फोन चौथ्याच्या हातात देऊन मी ट्राऊझर घालते.
आतमध्ये पंधराएक लोक आहेत.
हमीद कुठे आहे? हं, आला तोही.
लोक पळत पळत येताहेत.
सायरन वाजायचा थांबला आणि बंदुकींचे आवाज अधिक स्पष्ट झाले.
रशीद आणि दोन गुरखा रक्षक. आधी हजेरी झाली. आम्ही २५ लोक असायला हवे होतो इथं. त्यापैकी २२ जण होतो. तिघांचा काय पत्ता? जखमी तर नाही ना झाले? नाही. उपस्थित सहकाऱ्यांकडून दोघे जेवायला बाहेर गेले असल्याची माहिती मिळाली- ती कॅनेडियन शेजारीण आणि आणखी एक. त्यांच्या ऑॅफिसला फोन केला. आता पुढचे निरोप ते लोक देतील. एकाला गुरखा सोबत घेऊन आला. नाही, तो जखमी नव्हता. पण काय करायचं हे न सुचून खोलीत नुसता उभा होता. गुरखा प्रत्येक खोलीत जाऊन कुणी जखमी होऊन पडलं नाही ना, हे तपासत होते, त्यांना तो दिसला आणि ते त्याला बंकरमध्ये घेऊन आले.
रशीदने सिक्युरिटीला फोन करून आम्ही सगळे सुखरूप असल्याची माहिती दिली. काही आठवडय़ांपूर्वी झालेल्या ‘बंकर मॉकड्रिल’च्या वेळी रशीद आमच्या गटाचा वॉर्डन होता, हे माहिती झालं होतं. तो सांगेल तसं आम्ही वागायचं होतं, हेही सगळ्यांना माहिती होतं.
‘‘आपल्या परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. कारबॉम्बचा स्फोट ही त्याची सुरुवात होती. हल्ल्याचं लक्ष्य आपण आहोत की अन्य कुणी, ते अद्याप माहिती नाही. किती वेळ आपल्याला इथं थांबावं लागेल, ते सांगता येत नाही. त्यामुळे मोबाइलची बॅटरी पुरवून वापरा. कदाचित या जागेतून आपल्याला हलवलं जाईल. प्यायच्या पाण्याचा साठा मर्यादित आहे. कोपऱ्यात स्वच्छतागृह आहे. तातडीची वैद्यकीय मदत पाहिजे असं वाटल्यास तात्काळ मला सांगा.’’ रशीद हे सगळं इतक्या धीरगंभीरपणे, पण सहजतेने म्हणाला, की आता पुढं तो विमानाचे पायलट म्हणतात ना तसं ‘पुश बॅक अँड रिलॅक्स’ म्हणणार की काय असं मला क्षणभर वाटलं. सुदैवाने आम्हाला कोणालाही काचासुद्धा लागलेल्या नव्हत्या. त्यामुळे तातडीच्या वैद्य्कीय मदतीची गरज नव्हती.
बंकरमध्ये एक प्रकारची अवघडलेली शांतता होती. त्या शांततेत मला माझ्या हृदयाची धडधड मग स्पष्ट ऐकू आली. आम्ही सगळेजण एकमेकांना ओळखत होतो. पण या आकस्मिक हल्ल्याने सगळेजण हादरलो होते. काय बोलायचं, ते कुणाला सुचत नव्हतं. मग ज्याने-त्याने आपापल्या कार्यालयाच्या सुरक्षा अधिकाऱ्याला फोन करायला सुरुवात केली. जॉर्जला मी फोन केला. एका रिंगमध्ये फोन उचलला गेला आणि मी ‘इथं हल्ला झाला आहे’ वगैरे काही बोलायच्या आधीच त्यानं मला विचारलं, ‘‘तू आणि हमीद दोघेही बंकरमध्ये आहात ना?’’ अच्छा! म्हणजे हल्ला झाल्याला अजून तीन मिनिटंही झाली नाहीत, तर याला माहिती आहे हल्ला झाल्याची. ‘‘काही हेल्थ प्रॉब्लेम? दर अध्र्या तासाला आपण बोलत राहू. रशीद सांगेल तसं करा.’’ इतकंच बोलून त्याने फोन ठेवून दिला.
मग छोटय़ा गटात लोक आपापसात बोलायला लागले. हमीद मला म्हणाला की, तो भावाशी स्काइपवर बोलत होता. अचानक काचा पडताना पाहून ‘भूकंप’ असं वाटून तो ताबडतोब कॉटखाली जाऊन आडवा पडला. मग सेकंदभरात गोळीबाराचे आवाज ऐकल्यावर त्याला हल्ला झाल्याचं लक्षात आलं.
बंकर. अदमासे दहा बाय बाराची खोली. दोन सोफा, दोन खुच्र्या. उरलेले खाली बसले. पुन्हा एक मोठ्ठा हादरा. जणू आमच्या दारातच.
‘‘दुसरा स्फोट.’’ कुणीतरी म्हणालं.
त्या क्षणी मला एका सनातन सत्याचा साक्षात्कार झाला. मला भीती मरणाची वाटत नाही. एक ना एक दिवस तो दरवाजा उघडून त्या अनोळखी प्रदेशात पाऊल टाकायचं आहेच. खरं सांगायचं तर ‘त्या’ जगाबद्दल काहीसं कुतूहलही वाटतं. पण मृत्यूच्या त्या क्षणाकडे नेणाऱ्या वेदनेची भीती वाटते. ‘तुला वेदनारहित मरण देतो’ अशी कुणी खात्री दिली तर मला मरायचं भय वाटणार नाही. इथं अशा हल्ल्यात मेले तर ठीकच; पण कायमचं अपंगत्व आणि परावलंबित्व नको. अर्थातच मरणं आपल्या हाती नसतं, जगणं असतं- म्हणून विचार जगण्याचा करावा, हेही ओघाने आलं.
तिसऱ्या स्फोटाने आमचा बंकर हादरला.
हे किती काळ चालणार आहे? यातून सुखरूप बाहेर पडणार की नाही आपण?
सगळ्यांच्या मनात तेच प्रश्न. कुणीही हे प्रश्न विचारले नाहीत. हे प्रश्न विचारायचे नाहीत असा आमच्यात जणू एक अलिखित करार झाला होता.
तेवढय़ात एका सहकाऱ्याचा फोन वाजला. इटलीतून त्याच्या मुलाचा फोन होता. त्या मुलाने बी.बी.सी.वर हल्ल्याची बातमी ऐकली होती (ज्यात हल्ल्याचं ठिकाण स्पष्टपणे सांगितलं होतं. त्या गडबडीतही प्रसारमाध्यमांचं कौतुक वाटलं!) त्यावरून असं कळलं, की हॉटेलच्या पूर्वेला एक रस्ता सोडून असलेल्या एका इमारतीवर हल्ला झाला होता. तिथं धुमश्चक्री चालू होती. ती इमारत आमच्या हॉटेलपासून चालत तीन मिनिटांपेक्षा कमीच अंतरावर होती. आमच्या अंगणात घडामोडी होत आहेत असं आम्हाला जे वाटत होतं, ते खोटं नव्हतं तर!
तेवढय़ात आणखी कोणाच्या तरी घरून फोन आला आणि त्यांनी ‘अल् जझीरा’चा हवाला देत सांगितलं की, हल्ला हॉटेलच्या उत्तरेला एक रस्ता सोडून असलेल्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या निवासी संकुलावर झाला होता. आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेता ‘अल् जझीरा’ची बातमी जास्त बरोबर असण्याची शक्यता होती. किंवा या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हल्ले झाले असण्याचीही शक्यता होती.
बाहेर स्फोट होत असले आणि बंदुका धडाडत असल्या तरी सेलफोन मात्र सगळे व्यवस्थित चालू होते. ज्यांच्या फोनवर इंटरनेट होतं, त्यांनी शोधाशोध सुरू केली. हो, इतक्या भानगडीत वाय-फाय सेवा व्यवस्थित होती आणि त्या बंकरमधलं इंटरनेट चालू होतं. मग प्रत्येकजण वेगवेगळी माहिती सांगायला लागला. हल्ला नेमका कुठं झाला आहे, दहशतवादी आत्मघाती पथकात नेमके किती लोक आहेत, हल्ला का झाला आहे, किती लोक जखमी झाले आहेत.. याविषयी एका स्रोताची माहिती दुसऱ्या स्रोताशी थोडीफार जुळायची; पण बरीच वेगळीही असायची. आपण ज्या घटनेचा एक भाग आहोत, त्याबाबत आपल्याला सगळ्यात कमी माहिती आहे, ही जाणीव इथं आल्यापासून माझ्या सवयीची झाली होती.
त्यावेळी आणखी एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे माझा जमिनीशी तुटलेला संपर्क. म्हणजे पूर्वेकडे असलेली ती अमुक इमारत मी पाहिलेली नव्हती की उत्तरेला असणाऱ्या त्या तमुक कार्यालयावर मी कधी नजर टाकलेली नव्हती. मागच्या बाजूच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर काय आहे याचा मला अंदाज नव्हता. एखाद्या यंत्रमानवाने आखीव रस्त्यावरून इकडे-तिकडे नजर न टाकता, मिळालेल्या आज्ञेनुसार जा-ये करावी, त्या पद्धतीने गेला दीड महिना मी इकडून तिकडे जात होते. या शहराची मला काहीही माहिती नव्हती आणि या शहराशी माझं काही नातंही जुळलं नव्हतं.
अजून किती वेळ बंकरमध्ये बसावं लागेल याचा काही अंदाज येईना कुणालाच. पण मग आपोआप लोक थोडे सैलावले आणि दबक्या आवाजात गप्पा सुरू झाल्या. रशीद सतत फोनवर बोलत होता. पण ते आमच्या कानांवर पडणार नाही याची तो दक्षता घेत होता. मी पाणी प्यायला म्हणून उठले, तेवढय़ात एकजण स्वच्छतागृहातून बाहेर आला आणि ‘आतमध्ये पाणी नसल्याचं’ त्याने जाहीर केलं. मी पाणी न पिताच परत जागेवर येऊन बसले.
भारतात कुणाला फोन करून ही बातमी सांगावी की नको, याविषयी माझा अद्याप निर्णय होत नव्हता. सांगून त्यांना काळजीत टाकण्याव्यतिरिक्त काही होणार नव्हतं. अडचणीत असल्याचा फुकाचा गाजावाजा करण्यात एरव्हीही अर्थ नसतो; कारण तशी कोणतीही वाईट परिस्थिती फार काळ टिकत नसते. मला एखादी गोष्ट समजली आणि त्यावेळी मी त्या व्यक्तीला कसलीही मदत करू शकत नसेन (अंतर म्हणा, अपरिहार्यता म्हणा, आपली कुवत नसते म्हणा.. की अन्य कोणतेही कारण असो), तर मला असहाय वाटतं आणि मानसिक त्रासही होतो. म्हणून मदतीची शक्यता नसते तेव्हा दुसऱ्या कुणाला सांगत बसायचं नाही असं एक धोरण मी माझ्यापुरतं आखून घेतलं आहे. आत्ता इथले माझ्या कार्यालयातले लोकसुद्धा काही मदत करू शकत नाहीत, तर पुणे-मुंबई-दिल्लीकरांची काय कथा?
शिवाय मी दर शुक्रवारी सगळ्यांना एक ई-मेल पाठवायचे; ती पोचली नाही तर दुसऱ्या दिवशी लोकांना काळजी वाटायला लागेल. ‘तोवर मी बहुधा यातून सुखरूप बाहेरही पडले असेन. बाहेर पडले की सांगू सावकाश..’ असं म्हणत मी हातातला फोन पुन्हा खिशात टाकला.
कोपऱ्यात अचानक जरा गोंधळ झाला. पाहिलं, तर एकीला दम्याचा जोरदार अॅटॅक आला होता. रशीद धावत आला. अॅटॅकमध्ये बोलता येत नसल्याने तिने कशाबशा खाणाखुणा करत तिच्या खोलीत औषधं नेमकी कुठं आहेत ते सांगितलं. एक गुरखा आणि रशीद बाहेर गेले. त्यांना तिच्या खोलीतून आवश्यक औषधं घेऊन यायला पाच-सात मिनिटंच काय ती लागली असतील; पण तेवढय़ा वेळात बहुतेक सर्वाचे श्वास नकळत रोखले गेले होते. खोलीत पुन्हा तणाव पसरला. बंदुकांच्या फैरी पुन्हा एकदा जवळून ऐकायला येऊ लागल्या होत्या.
मी घडय़ाळावर एक नजर टाकली. दुपारचे चार वाजून पन्नास मिनिटं झाली होती. म्हणजे आम्हाला बंकरमध्ये येऊन फक्त पन्नास मिनिटं झाली होती.
कुणाला तरी थंडी वाजायला लागली. मग एका कपाटातली ब्लँकेट्स बाहेर आली. दुसऱ्या एकाला खिशात एक चॉकलेट सापडलं. ते त्याने सगळ्यांना ऑॅफर केलं. बहुतेक लोकांनी ते नाकारलं. मी मात्र एक छोटा तुकडा घेतला. तो खाऊन मला बरं वाटलं आणि तेव्हा मला अचानक ‘प्रूफ ऑॅफ लाइफ क्वेश्चन्स’च्या दरम्यान मी लिहिलेल्या गोष्टींची आठवण झाली. संकटाच्या प्रसंगी सकारात्मक विचार करावा- इतकी साधीशी, पण महत्त्वाची गोष्ट मी का विसरले होते?
मी जाणीवपूर्वक आनंदाचे क्षण आठवायला सुरुवात केली; ‘उद्या काय करायचं’ याबद्दल विचार केला; दीर्घ श्वसन केलं. हळूहळू मी स्थिरावले आणि शांत झाले. त्याच्या आधारावर पुढचे दहा तास बंकरमध्ये मला सहज काढता आले.
साडेसहाच्या सुमारास रशीदने आम्हा सगळ्यांना ‘आपण अध्र्या तासात इथून बाहेर पडतो आहोत, आपल्याला अधिक सुरक्षित स्थानी नेलं जाईल,’ अशी सूचना दिली. आवरायचं काहीच नव्हतं, त्यामुळे आम्ही फक्त ब्लँकेटच्या घडय़ा घालून ठेवल्या आणि वाट पाहत बसलो. पण साडेसात झाले तरी काही घडलं नाही. आठच्या सुमारास आम्हाला हलवण्याची योजना रद्द झाल्याचं कळलं; कारण अर्थातच आम्हाला सांगण्यात आलं नाही.
आम्ही तसेच बसून होतो. पाय अवघडले की उठून उभे राहत होतो. आणि चालायला जागा नसल्याने पुन्हा त्याच जागी बसत होतो. घडय़ाळ काहीशा संथपणाने पुढे सरकत होतं. थंडी वाजायला लागल्यावर ब्लँकेट्स अंथरली गेली. काहीजण आडवे झाले; तर काही तसेच बसून राहिले. तोवर आम्ही सात स्फोटांचे आवाज ऐकले होते. आजवरच्या आयुष्यात पाहिलेल्या हिंदी-इंग्रजी चित्रपटांत जितके बंदुकांचे आवाज ऐकले होते, त्याहून कैकपटींनी जास्त आवाज मी मागच्या पाच तासांत ऐकले होते.
नऊ वाजले. बंकरमध्ये येऊन एव्हाना आम्हाला पाच तास झाले होते. दरवाजा उघडला तेव्हा आम्ही अपेक्षेने पाहिलं; तर आमच्या हॉटेलचा व्यवस्थापक होता. झालेल्या घटनेबद्दल आणि गैरसोयीबद्दल त्याने आमची माफी मागितली. (त्याचा बिचाऱ्याचा काही दोष नव्हता त्यात. पण अफगाण अदब!) त्याच्यापाठोपाठ दोन वेटर्स काही सामान घेऊन आले. आमच्यासाठी सँडविच आणि ज्यूस आणला होता त्यांनी. भूक नव्हतीच. पण विमानाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात कसं झोपेतून उठवून खायला घालतात, तशी यावेळी प्रत्येकाने थोडं तरी खाल्लं पाहिजे अशी सक्ती होती. ते चिकन सँडविच होतं, म्हणून मी नुसता ज्यूस घेणार होते. तेवढय़ात ‘स्वच्छतागृहात पाणी नसल्याचं’ मला आठवलं आणि ज्यूस बाजूला सारून मी गपगुमान चिकन सँडविच खाल्लं.
रात्रीचे साडेदहा वाजले. सगळेजण कुणाशी ना कुणाशी सातत्याने फोनवर बोलत होते. ते पाहून मग मला ‘आपल्या जवळच्या एखाद्या तरी व्यक्तीला वस्तुस्थिती सांगायला पाहिजे’ असं प्रकर्षांने वाटलं. भारतात रात्रीचे साडेअकरा वाजले असणार. मी एका मित्राला टेक्स्ट मेसेज पाठवायचं ठरवलं. हा बरीच र्वष पत्रकारितेत होता. विविध आंदोलनांशी संबंधित होता. त्यामुळे तो हडबडून जाणार नाही याची मला खात्री होती. माझ्या निरोपाला तात्काळ उत्तर आलं. मग मी बंकरमधून सुखरूप बाहेर पडेपर्यंत आमचा संवाद चालू होता.
रात्र बंकरमध्येच काढावी लागणार हे गृहीत धरून आम्ही मिळेल तशी जागा करत आडवे झालो. पावणेबाराच्या सुमारास दार वाजलं आणि आम्ही खडबडून उठलो. गणवेशातले दोन अधिकारी होते. आता काय? त्यांनी सांगितलं, ‘आत्मघाती पथकाला आपण एका कोपऱ्यात नेलं आहे, चारी बाजूंनी घेरलं आहे. आपण आता त्यांच्यावर जोरदार हल्ला करणार आहोत. त्यामुळे आधीपेक्षा जास्त जोरात आणि जास्त प्रमाणात तुम्हाला गोळीबाराचे आवाज येतील. पण घाबरू नका. तुम्ही सुरक्षित आहात.’ एवढं बोलून ते आले तसे निघून गेले. मी मोबाइलमधल्या घडय़ाळावर पुन्हा नजर टाकली. ‘आम्ही सुरक्षित आहोत’ हे कळायला आम्हाला आठ तास लागले होते. बाहेर नेमकं काय चालू होतं, देव जाणे!
तेवढय़ात हॉटेलचा कर्मचारीवर्ग पुन्हा आला. यावेळी ते लोक काबली (पुलाव) आणि कबाब घेऊन आले होते. आम्ही थोडंसं खाऊन घेतलं आणि पुन्हा लवंडलो. साधारण पहाटे दीडच्या सुमारास बंदुकांचे आवाज थांबले. शांततेत दहा मिनिटं गेल्यावर आम्ही जायच्या तयारीने उठलो. पण प्रत्यक्षात आम्हाला बाहेर यायला पहाटेचे तीन वाजले. कारण संपूर्ण इमारत सुरक्षारक्षक पिंजून काढतात आणि आत कुणी लपलेले नाही अथवा आतमध्ये जिवंत स्फोटकं नाहीत याची खातरजमा केल्याविना कुणालाही आत जाऊ देत नाहीत.
‘कुणाला एकटय़ाला खोलीत झोपायची भीती वाटत असेल तर आपण सोबतीची व्यवस्था करू’ असं रशीद म्हणाल्यावर सगळे किंचित हसले.
सावकाश रांगेत बाहेर आलो. आधी आमच्या गुरखा मित्रांची चौकशी केली. सुदैवाने सगळे सुखरूप होते. गप्पा मारत बराच वेळ मधल्या चौकातच उभे होतो. स्वयंपाकघराच्या खिडक्यांच्या काचा त्या मधल्या चौकात सगळीकडे पसरल्या होत्या. त्याकडे मी पाहतेय हे लक्षात आल्यावर हमीद म्हणाला, ‘‘काही कारणांनी आपण आज अगदी चारच्या ठोक्याला कॉफी घ्यायला स्वयंपाकगृहात नव्हतो म्हणून वाचलो.’’
मी मान डोलावली. या ठिकाणी राहताना आता मला कधीही सुरक्षित वाटणार नाही, हे मला समजलं होतं.
आतिवास सविता
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2016 रोजी प्रकाशित
हल्ला
शुक्रवारी मी निवांत उठायचे. रोजच्यापेक्षा अर्धा तास जास्तीचा व्यायाम करायचे. भरपूर नाश्ता करायचे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-07-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ativas savita book on taliban terrorism