‘इथं स्वत:ला
डोंगरासारखं फोडावं लागतं
तापलेल्या भट्टीसारखा ताव यावा लागतो
घालमेलीचा उफळा
आतल्या आत थोपवून
शांततेची भयंकर शपथ घ्यावी लागते.’
कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या कवितासंग्रहामधल्या पहिल्याच कवितेतल्या या ओळी आहेत. ‘सीझर कर म्हणतेय माती’ या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेणारी ही कवयित्री. ‘धग असतेच आसपास’ संग्रहात ६४ कविता आहेत. खेडय़ांमधला झपाटय़ाने हरवत चाललेला सामंजस्याचा उमाळा आत्यंतिक कळवळ्याने मांडणारी ही कविता म्हणजे मराठी समीक्षाशास्त्राला अचंबित करणारी गोष्ट आहे.
‘सरणावरच जातो म्हणे पीळ
आधी गार पडतो मग जळतो.
दरवेळी भाजतंच असं नाही
पण धग असतेच आसपास
आग आणि काडी फक्त निमित्ताला’
असे अद्भुत वास्तव मांडणारी ही कविता ‘आत्महत्येचं निमंत्रण दिलेल्या विहिरीला लाथाडून परतले आहे मी’ असं जगणं प्रतिकूल परिस्थितीतही सुंदर करण्याचं असीम धैर्य व्यक्त करते. ज्याच्या मुळांच्या आसपास भूगर्भामधलं पाणी लपलेलं असतं अशा औषधी गुणधर्माच्या खडबडीत वृक्षाशी (सौंदड) ही कविता अलगुजपणे बोलते. आणि ‘मला गर्भातल्या लेकींच्या गर्भाशयापर्यंत पोचायचंय’ असा वैश्विक जिव्हाळाही व्यक्त करते. प्रतिकूल परिस्थितीच्या जमिनीमध्ये घामाचं हत्यार घेऊन राब राब राबून, श्रमसंस्कृतीचा जयघोष करून लेकराबाळांच्या लाडाकोडांचे उत्सव साजरे करणाऱ्या एका मातेचं चित्रण करणारी ‘शब्दानं न बोलता’ ही कविता अक्षरश: हादरवून टाकते. डाळिंबाचं पीक परदेशात गेल्याचा आनंद गावभर वाटणारी यातली आई- पोटची पोरगी पळून गेल्यावर कशी क्रमाक्रमाने नातेसंबंधातून आणि समाजरचनेतून हद्दपार होते याचा वास्तवदर्शी लेखाजोखाही ती मांडते. या कवितेचा विलक्षण गुण असाही आहे, की ही कविता लिहिणारी माय अत्यंत सजगतेने स्वत:चाच पदर आभाळभर पसरून ही कस्पटं एकत्र झेलू पाहते. विखंड भूमिपुत्रांना त्या पदरात पेलू पाहते. धरणी-मातीशी सतत अलवार संवाद साधणारी ही कविता मातीलाच एक निर्मळ प्रश्न विचारते-
‘युगांची जन्मदाती तू
वहिवाटीवर चिवट पाथ तुझी
सांग बाई
हे मूठभर बी
तुझ्या सांगीव शास्त्रावर लावू
की माझ्या शिकावू?’
‘कोण आहेत ते, हे माहीत असूनही चंदनाची बाहुली समजून उगाळतो स्वत:ला आणि लावतो त्यांच्याच मुक्या मारावर’ (गाभाच पोखरलाय फक्त), ‘पॅकिंगमधून मिळालेला ज्यूस- जॅम चिकटला नाही भाकरीला’ (कार्यशाळेत), ‘दुसऱ्या चौकातलं उजवीकडचं गणपतीचं देऊळही तिसरीकडं उठवण्याचा ठराव झालाय.. माझ्या खुराडय़ाचं काय घेऊन बसलीस? मऊशार रंगीत भिंतीही शोषत नाहीत अंगावरचा काटा..’ (आधीसारखंच सांगत राहा) या कवितांमधली सामाजिक जाणीव आणि त्या जाणिवांचे सामूहिक निष्कर्ष थक्क करणारे आहेत. भूमी-संस्कृतीच्या वाताहतीची जीवघेणी शोकांतिका मांडताना ही कविता तिच्या अंतरीचा उमाळा सहजतेने रीता करते. या कवितेच्या अंत:करणातली कारुण्याची वसाहत मानवी नात्यांचा, विखुरलेल्या भूप्रदेशांचा सतर्क तेने मागोवा घेत राहते.
‘बरकतीचा एखादा बाजारसुद्धा
बिनभरवशाचे कित्येक हंगाम
पेलायचे बळ देतो
धोरणं गाडायची इच्छा होऊनही
विसरता आली नाही
मातीची बांधिलकी’ (रोपापासून मापापर्यंत)
यासारख्या कवितांमधले ग्रामीण वास्तव ही कवयित्री केवळ तटस्थपणे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, तर पांढरपेशी बोथट संवेदनांना एक चरचरीत चटका देऊन ती मोकळी होते.
‘टळटळीत उन्हात
झाडाझुडपात पेंगायचं सोडून
कावळा होऊन औताभोवती भिरभिरेन
औतकऱ्याच्या घामावर
पंखांची फडफड पसरेन
हंगामांच्या अधांतरी धुळीत
कुसळाच्या टोकांवर
गवताचा वास जपेन मी’ (गवताचा वास जपेन)
यांसारख्या कवितांमधलं मातीच्या सुगंधाशी लय साधणारं शब्दलालित्य चकित करणारं आहे.
श्रमसंस्कृतीचा आदर आणि कदर करतानाच जगण्यातल्या चढउताराची विफलता ही कविता अतिशय समंजसपणे व्यक्त करते.
जागतिकीकरणाच्या गोंडस नावाखाली चाणाक्षपणे गावगाडय़ाच्या मानगुटीवरती स्वार झालेले बाजारीकरण ही कविता बिनदिक्कतपणे मांडते..
‘मेथीच्या पेंडय़ा
दहाला तीन.. दहाला तीन..
ओरडून विकल्या
आणि दहा रुपयांत मूठभर मॅगी घेतली
तरी काढली नाही बाजारभावानं भाकरीची किंमत’
(काळाबरोबर चालताना)
सर्वदूर पसरलेल्या अप्पलपोटी आणि स्वार्थी भावनेच्या सार्वत्रिकीकरणातून ग्रामव्यवस्थाही सुटलेली नाही आणि तिच्या स्वत्व जपण्याच्या धडपडीलाही जीवघेणे आचके बसताहेत, याचा काळीज कालवणारा आकांत ही कविता मांडते-
‘दाव्याला हिसकं देत
शेरडी घराच्या वढीनं ओरडताना
आशेनं सांगायचं पोरगं
मामा, थोडं पैसं कमी द्या
पण सांभाळायलाच न्या.
हूं म्हणून घेतलेल्यानं
तिथल्या तिथंच
कसायाचं कमिशन खिशात घातलं
हिरमुसलं पोरगं
हळहळलं’ (चलाखीचं धडं)
वंचितांच्या वेदनेचा गोषवारा क्रमाक्रमाने आणि तरीही संयमितपणे कवेत घेणारी ही कविता आहे. या कवितेचे अर्थगर्भ दांडगेपण वाचणाऱ्याला त्याचे खुजेपण आणि मानवतावादापासून सत्वर पळू पाहणारे निर्लज्जपण आपसूकच अपरिहार्यपणे दाखवून देते. जगण्यातले समंजसपण, भवतालावर काळीज पेरणारे आपलेपण, इथल्या सामाजिक पर्यावरणावर व्याकुळतेने भाष्य करणारे माणूसपण, विश्वाच्या चिंतेचे गाठोडे सतत कुशीशी ठेवून त्याला मायेची ऊब देणारे माऊलीपण आणि जग झोपले तरी त्याच्या सुखाच्या निद्रेची अव्याहत प्रार्थना करणारे चिरंतन जागेपण ही या कवितेची प्रखर आणि खंबीर वैशिष्टय़े आहेत.
‘फाटक्या गोधडीला
खालीवर पालं घालून नव्यानं शिवावं
तसं कितीदा तुणलं आयुष्याला
तरी फाटलेपण झाकलं नाही
आशीर्वादाची ताकदच एवढी
की चरकातल्या उसागत चिरडल्यावरही
पाऊल वाकडं पडलं नाही.
जगण्याला जीव लावला
की ओव्या उसन्या घ्याव्या लागत नाहीत
म्हणून गाडून घेतलं
तणानं माना मुरगळलेल्या धानात
पाचवीलाच पुजलेल्या
न संपणाऱ्या राडय़ारपाटय़ात
राब राब राबवतात कामं
छळ छळ छळतात शब्द
मेल्यावर अस्थींतूनही घुमतील
कविता आणि कामं’ (दिल्या घरी)
खेडय़ांचे फुटलेपण आणि माणसांचे तुटलेपण यांचे दु:ख ही कविता राजरोसपणे मांडते. स्वत:शीच आक्रंदन करत रानोमाळ भटकते. या भटकण्यामागची एक स्थिरचित्त दृष्टी पापण्यांपल्याडचे दु:खी डोळे लपवून ठेवत असावी. आणि हे दडवण्याचे सामथ्र्य हीच या कवितेची खरी ताकद आहे. समूहाचा थोतांडी गलबला न सांगता ही कविता समूहाचा निर्मम कळवळा पारदर्शकपणे व्यक्त करते. आणि मुळातच ही कविता लिहिणाऱ्या कल्पना दुधाळ नावाच्या बाईचं माऊलीपण एवढं अफाट, अगाध आणि थोर आहे, की ती या सर्वदूर शेताबांधांची, माती-ढेकळांची आणि माणसा-जनावरांच्या घुंगुरवेदनेची ढोलकाठी समर्थपणे उभी करते. तिच्या या वेदनेचा ढोल आक्रस्ताळा नाही. मात्र, काठीवरती फडकणारा तिच्या संवेदनशीलतेचा हा झेंडा भल्याभल्यांना कुर्निसात करायला लावेल यात शंकाच नाही.
‘धग असतेच आसपास’
– कल्पना दुधाळ,
लोकवाङ्मय गृह,
पृष्ठे- १२०, किंमत- १५० रु.

संजय कृष्णाजी पाटील