तमाशा १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिद्ध झाला असे मानले जाते. या लोकरंगभूमीने तमाशा हे ‘फार्सी’ नाव जरी धारण केलेले असले तरी तिचे अंतरंग मुळातूनच खास ‘मऱ्हाठी’ आहे. हा लोककला प्रकार मराठी मातीत जन्माला आला असल्यामुळे त्यातून मराठी मातीतला लोकाचार, मराठी बोलीभाषा आणि मराठी भाषेचा ठसा प्रतिबिंबित झालेला दिसतो. म्हणजेच तमाशा हा पूर्णपणे मराठी संस्कृतीतून उदयाला आलेला लोककला प्रकार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समान अशा भूप्रदेशात राहणाऱ्या, समान वेशभूषा परिधान करणाऱ्या, समान अभिरुची बाळगणाऱ्या, समान बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांनी त्यांच्या स्वतच्या मनोरंजनासाठी, त्यांनी स्वत निर्माण केलेली कला म्हणजे लोककला होय. या लोककलांचा उदय विधिनाटय़ातून झालेला असतो. भारतात एकूण साडेतीन हजार बोलीभाषा बोलल्या जातात. त्या प्रत्येक बोलीभाषेची आपली अशी स्वतंत्र लोकनाटय़े आहेत. या सगळ्या लोककला विधीतून जन्माला आलेल्या आहेत. परंतु अस्पृश्यांनी निर्माण केलेली तमाशा ही एकमेव लोककला अशी आहे की, तिचा उदय हा निखळ मनोरंजनाखातर झालेला आहे.

अस्पृश्य हा पहिल्यापासूनच सगळ्याच गोष्टींपासून वंचित केला गेला. सरंजामी राजवटीत तर त्याला मुख्य प्रवाहापासून दूर फेकले गेले होते. त्याला भजन-कीर्तनाची मनाई होती. अशा वेळी त्याने सांस्कृतिक क्रांती केली. माणसाला पोटाच्या भुकेबरोबरच सांस्कृतिक भूक असते. ही भूक भाकरीने नव्हे तर मनोरंजनाने भागविली जाते. मराठी मातीतल्या रांगडय़ा गडय़ाची ही भूक महार, मांग, गोंधळी या कलावंतांनी निर्माण केलेल्या ‘तमाशा’ लोकरंगभूमीने गेल्या तीन-साडेतीनशे वर्षांच्या काळात भागविलेली आहे. तमाशा लोकरंगभूमीच्या उदयाने त्याला मनोरंजनाचे नवे साधन मिळाले.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तरेतील मुसलमानी लष्कराच्या छावणीत उदयाला आलेल्या तमाशा लोकरंगभूमीने पुढे झपाटय़ाने वाटचाल सुरू केली. सन १६८० ते १७०७ पर्यंत दिल्लीतील फौजी मंडळी मराठी मुलखात तळ ठोकून होती. या सनिकांचे मनोरंजन इथल्या लोककलावंतांनी केले. त्याच सनिकांनी या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या फडांना ‘तमाशा’ असे नामाभिधान दिले. ‘तमाशा’ हा मूळ फार्सी शब्द असून त्याचा अर्थ जलसा किंवा मजमुआ असा होतो. तमाशाचाच एक घटक असलेल्या प्रकाराला ‘मुजरा’ असे म्हटले जाते. हा शब्दसुद्धा फार्सी भाषेतून आलेला असून ‘सलाम करणे’ असा त्याचा अर्थ होतो.

तमाशा हा शब्द फार्सी जरी असला तरी त्या नावाने ओळखला जाणारा हा कलाप्रकार उत्तरेतून मराठी मुलखात खचितच आलेला नव्हता. तमाशा ही मराठी प्रदेशातील अत्यंत लोकप्रिय लोकरंगभूमी असून तिचे स्थान महाराष्ट्रात वरचे आहे. या कलाप्रकारात मराठी भाषेचा ठसका असून, त्यातून महाराष्ट्राची परंपरा, मराठी संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलही व्यक्त होतो. तमाशा लोकरंगभूमीवर भाऊ फक्कड, पठ्ठे बापूराव, शिवा संभा, उमाबाबू यांसारख्या शाहिरांनी निर्माम केलेल्या लावणी वाङ्मयाला मराठी सारस्वतात तोड नाही. तमाशाचा खेळ बघून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती उभी राहत असेल, तर तिचे अंतरंग मुळातूनच खास मऱ्हाटी आहे हे लक्षात येईल.

ज्यावेळी संगीत मराठी रंगभूमी बहरात होती त्याच वेळी तमाशात लोकरंगभूमी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. दोन्ही रंगभूमींवर त्यासाठी देवाणघेवाण होत असे. वगात वापरली जाणारी भरजरी वेशभूषा, सुसंघटित असे कथानक आणि पेटी-तबला हे मराठी रंगभूमीने तमाशाला दिलेले वरदान आहे. संगीत मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘संगीत एकच प्याला’ हे नाटक मलाचा दगड ठरले आहे. या नाटकातील पदांना सुंद्राबाई नावाच्या तमाशा कलावतीने चाली लावलेल्या आहेत. ही मोठी ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. या नाटकातील पदांच्या चाली बठकीच्या लावणीच्या चालीवर बेतलेल्या आहेत.

लावणी हा मराठीचा स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे. तमाशा लोकरंगभूमीने सुरुवातीपासूनच तो तमाशा अविभाज्य घटक म्हणून स्वीकारला आहे. असे असले तरी लावणी तमाशात येण्याआधी ती मराठी मुलखात विद्यमान होती. लावणी जेव्हा तमाशात आली तेव्हा तमासगीरांनी तिला तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचविले आणि लोकप्रिय केले.

तमाशा लोकरंगभूमी नेहमीच प्रयोगशील राहिली आहे. पेशवाई, इंग्रजी राजवट व पुढे स्वातंत्र्योत्तर काळातही त्या बदलाचा तमाशा लोकरंगभूमीने स्वीकार केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तमाशाला सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे व अण्णाभाऊ साठे यांचे नवे तमाशे यांनी नवा आशय देण्याचा प्रयत्न केला.

तमाशा लोकरंगभूमीने आपली जीवननिष्ठा परजत ठेवली, कधी लोकप्रबोधन करीत तर कधी लोकरंजन करीत. गेल्या तीनशे-साडेतीनशे वर्षांत ती कधी वाकली नाही. आपल्या स्वतंत्र अस्तित्वाने ती जिवंत राहिली. गौळण, बतावणी, वग, शाहिरी या आविष्कार माध्यमातून उभी असलेली तमाशा लोकरंगभूमी लोकाभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे, हे अण्णा भाऊ साठे, पु. ल. देशपांडे, आंबेडकरी जलसाकार यांनी हेरले व आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी या लोकरंगभूमीचा सुरेख संग केला.

तमाशा गद्य व रुक्ष नाही, तर अभिनय, नृत्य, वादन, गायन, विनोद, रंजन अशा बहुविध अंगांनी आविष्कृत होणारा आहे. लोकनाटय़ाची विशिष्ट वाद्यो, फडाची लावणी, नाचीचे वैशिष्टय़पूर्ण नर्तन व गायनाची वेगळी ढब किंवा धाटणी ही तमाशाची वैशिष्टय़े होत. तमाशा लोकरंगभूमीवर जे जे घडते ते उच्च स्वरात असते. तमाशातील गाणे, बोलणे, हावभाव सारे उंच पट्टीत आणि सहजत्स्फूर्त असते. जीवनातील वास्तव सहजतेने निर्माण करून, स्थळकाळाची बंधने झुगारून देणारे हे मुक्तनाटय़ जीवनाशी सतत संवाद साधते.

 

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamasha ek rangada khel ganesh chandanshive