एकेकाळी रसिकांना आपल्या भावगीत गायनाने मंत्रमुग्ध करणारे गायक गजाननराव वाटवे यांचे जन्मशताब्दी वर्ष ८ जूनपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या लडिवाळ गायकीचे हे स्मरण..
प्रत्येक गाण्याचा आपला आपला प्रांत असतो. त्या प्रांतात ते गाणे दादागिरी गाजवते. त्या काळात जेव्हा नाटय़गीतांची मराठी गायनसृष्टीत अशीच दादागिरी सुरू होती आणि कविता हा केवळ वाचून दाखविण्याचा वा एकसुरी आवाजात ऐकविण्याचा प्रकार होता, तेव्हा मराठी गायनसृष्टीला एक वेगळे स्वप्न पडू लागले. कवितेतील भावनांना सुरांचा साज चढवला तर ती अधिक बोलकी, प्रभावी होते असा साक्षात्कार ज्या सुरांमुळे मराठी स्वरसृष्टीला झाला त्या सुराचे नाव- गजानन वाटवे. गजाननरावांनी ज्या ज्या कवितांना सूर दिला त्यातून मराठीत भावगीत नावाचा गायनप्रकार अमाप लोकप्रिय झाला..
आग्र्याचा ताजमहाल पाहणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्या काळी आणि आताच्या पिढीच्या आधीच्या पिढीत ज्या ज्या मराठी कुटुंबांनी ताजमहालाचे दर्शन घेतले, त्या वेळी ते मोहक रूप डोळ्यांत साठविताना प्रत्येकाच्या ओठावर ताजमहालचा इतिहास ‘सूरमय’ झाला असेल यात शंका नाही. त्या सुरांचे शब्द, लय आणि भाव ज्या कवितेतून जिवंत झाले ती कविता गजानन वाटवे यांच्या स्वरांनी अजरामर झाली होती. ‘बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल, यमुनाकाठी ताजमहाल’ हे गीत आळवत एका पिढीने ताजमहालाच्या सौंदर्याला दाद दिली. गजानन वाटवे यांच्यामुळे भावगीतांची दुनिया मनोरंजनाच्या नव्याने बहरणाऱ्या सृष्टीतही आपला टवटवीतपणा टिकवून राहिली. एवढेच नव्हे तर भावगीत हा गायनप्रकार अधिकाधिक बहरत गेला. आजच्या पिढीला कदाचित माहीत नसेल, परंतु याचे श्रेय गजानन वाटवे यांना द्यायलाच हवे. कारण भावगीताच्या दुनियेतील एक काळ गजाननराव वाटवे यांनी गाजवला. सुसंस्कृत, मध्यमवर्गीय मराठी मनांना त्यांच्या तरल सुरांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अगदी गेल्या शतकातील साठच्या दशकापर्यंत भुरळ घातली होती. १९४० ते १९५५ या काळात मराठी गीतसृष्टी वाटवे यांच्या सुरांनी अक्षरश: बहरून गेली होती. त्याकाळी गजाननरावांच्या मैफिलीतील तो जादुई स्वर कानांत साठविण्यासाठी तरुणाईच्या झुंडी लोटायच्या, त्यांच्या भावुक स्वरांच्या जादूत तल्लीन व्हायच्या आणि त्या सुरांच्या लहरींवर हिंदोळे घेतच घरी परतायच्या.
गजानन वाटवे यांनी ज्या पिढीला आपल्या सुरांच्या आनंदाने मुग्ध केले, त्या पिढीने त्यांच्या त्या ऋणाचे भान राखत त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. हा प्रसंग २००७ च्या आसपासचा! पुण्यात हा कार्यक्रम ठरला तेव्हा गजाननराव वाटवे यांनी नव्वदीत प्रवेश केला होता. नजर काहीशी मंदावली होती. कानही काम करेनासे झाले होते. पण मन आणि स्मरणशक्ती मात्र तल्लख होती. त्या कार्यक्रमात साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्याशी त्यांची भेट झाली आणि जुन्या आठवणींमध्ये गजाननराव रमून गेले. एका उत्कट क्षणी त्यांनी पिंगेंचा हात हातात घेतला आणि आपल्या जगण्याचे रहस्यच त्यांनी बोलता बोलता उलगडून दाखविले. आपल्या कृश हातात पिंगे यांचा हात धरून तो कुरवाळत वाटवे म्हणाले, ‘तब्बल ६५ वर्षे मी मराठीतल्या भावसंपन्न गीतांना चाली लावल्या. ती गीते निष्ठेनं गायलो. कारण कविता हे माझे पहिले प्रेम होते. उत्कट कविता त्यामधील भावासह मला रसिकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. त्या कविता मी घराघरांत पोहोचविल्या. जन्मभर मला रसिक लाभले. मला कुणीही नाकारले नाही. तृप्त रसिक समोर आहेत म्हणून आज मी जिवंत आहे. अन्यथा माझी काय गत झाली असती?’ हे बोलताना गजाननरावांच्या अधू नजरेसमोर आपल्या नव्वद वर्षांचा संपूर्ण जीवनपट तरळला असणार यात शंका नाही.
वयाच्या १३-१४ व्या वर्षी सुरांच्या ओढीने झपाटलेला एक मुलगा वडिलांची नजर चुकवून एका पिशवीत गरजेपुरते भरलेले कपडे काखोटीला मारून घरातून बाहेर पडला आणि बेळगावच्या स्टेशनवर पुण्याची गाडी पकडून अंग चोरून तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसून पुण्यनगरीत दाखल झाला. पुण्यात गुरू शोधायचा आणि संगीतसाधना करायची, हे एकच ध्येय त्या लहानग्याच्या मनी होते. पुण्यातील पहिल्या आठ दिवसांच्या खडतर वास्तव्यानंतर संगीतसाधनेसाठी सुरू झालेल्या अग्निपरीक्षेला धीराने सामोरे जात केलेल्या अद्भुत स्वरसाधनेनंतर मराठी गायनविश्वात एका भावगीत गायकाचा उदय झाला. त्यानंतर या गायकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, हिराबाई बडोदेकर या गायक कलावंतांच्या स्वर्गीय आवाजाने त्या काळात लोकांना भारून टाकले होते. पण तो रसिकवर्ग केवळ शास्त्रीय संगीताच्या जाणकारांचा होता. केवळ सुरांच्या हिंदोळ्यावर बसून श्रवणसुखाचा अवर्णनीय आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य रसिकांपासून हे दिग्गज सूर काहीसे अंतर राखून होते. ते ‘गाणे’ होते, पण त्यात ‘कविता’ नव्हती. त्यामुळे कवितेचा भाव आणि आशय थेट हृदयापर्यंत पोहोचवणारा वाटवे यांचा सूर रसिकांना अधिक भावला आणि तो डोक्यावर घेतला गेला. एखाद्या कवितेतले सारे भावविभ्रम रसिकांच्या मन:चक्षूंसमोर जिवंत करण्याची जादू प्रदीर्घ तप:साधनेतून वाटवे यांनी आत्मसात केली होती. त्यामुळेच वाटवे गाऊ लागले की समोरच्या प्रत्येक श्रोत्याच्या मनातील आशाआकांक्षा आणि सुखदु:खे सुरांमधून जिवंत झाल्याचा भास होई. पेटी-तबल्याच्या साथीने कवितेचे ‘गाणे’ करण्याचा अद्भुत प्रयोग वाटवे यांनी यशस्वीपणे केला आणि रसिकांच्या मनावर तो तितक्याच समर्थपणे कोरला. म्हणूनच त्यांच्या आवाजातील ‘राधे तुझा सैल अंबाडा’ त्या काळातील तरुणाईच्या मनाला पुढे वृद्धत्वाकडे झुकल्यानंतरही गुदगुल्या करीत राहिला. तर ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ ऐकताना कुणाच्या विरहवेदना त्यांना अस्वस्थ करू लागल्या. ‘मंद शिशिरातल्या’ वाहणाऱ्या वाऱ्याच्या जाणिवा जिवंत करण्याची त्यांच्या सुरांमधील ताकद अनुभवून त्या काळातील तरुणाई सुखावली. ‘रानात सांग कानात आपुले नाते’- सारख्या कवितांनी प्रेमरंगात बुडालेल्या मनांमध्ये त्यांनी ‘स्वप्नांचा मधुमास’ फुलवला.
मनोरंजन विश्वाची क्षितिजे आज खूप विस्तारली आहेत. आता भावगीतांचा बहर काहीसा कोमेजलेला असल्याने गजानन वाटवे हे नाव काही काळानंतर कदाचित फारसे परिचित राहणार नाही. हे होणे अपरिहार्य असते. एखाद्या जमिनीच्या तुकडय़ावर चुकून कधीतरी वटवृक्षाचे बीज पडते, उन्हाचे चटके सोसत राहते आणि पावसाचा शिडकावा होताच अंकुरते, नंतर जगण्याचा संघर्ष करू लागते आणि त्यात यशस्वी झाल्यावर फोफावते. त्या बीजाचा वटवृक्ष होतो. त्याच्या सुखावणाऱ्या सावलीचा आनंद कुणा पथिकाला मिळतो, त्याला त्यावेळी त्या बीजाची आठवण होतेच असे नाही. आज फोफावलेल्या मनोरंजन विश्वाचा पाया ज्यांनी घातला, त्यांत गजानन वाटवे नावाच्या एका भक्कम विटेचा मोठा वाटा होता. ती वीट दिसत नसली तरी ती आहे.. आणि राहणारच आहे.
दिनेश गुणे  dinesh.gune@expressindia.com