‘‘खरं तर, ‘माफिया हेच खरे देशभक्त’ हा विषय घेऊन विशेषांक काढायचं आमच्या मनात होतं. पण आमच्या या नवनियुक्त संपादकांनी आम्हाला सल्ला दिला की, ‘आपल्या अंकात वैचारिक लेख, ललित, कथा, कविता, विनोद, व्यंगचित्रं असा सगळ्या प्रकारचा मसाला भरून आपण एक गोळीबंद अंक काढू या.’ त्यांची ही कल्पना आम्हाला इतकी आवडली की, आम्ही आपल्या अंकाचं नावच ‘गोळीबंद’ ठेवलं.

परवाचीच गोष्ट. लेखकरावांनी या वर्षीच्या दिवाळी अंकांचे काम संपवले. कुठे कथा, कुठे कविता, कुठे वैचारिक लेख, कुठे परिसंवादात सहभाग अशा जवळपास पंचवीस अंकांना मजकूर पुरवून (त्यात बराचसा माल इकडचा तिकडे अन् तिकडचा इकडे करून) लेखकराव दमले होते. जगातील कुठल्याही विषयावर कमीत कमी वेळात अन् नाममात्र मानधनाच्या बदल्यात हुकमी लेख, कथा आणि कविता पाडून देण्याच्या कौशल्यामुळेच ते लेखकराव म्हणून नावारूपाला आले होते. नेहमी घराजवळच्या बागेत मॉर्निंग वॉकला जाणारे लेखकराव त्या दिवशी पहाटेच उठून एकटेच सुमुद्रकिनारी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. अचानक कुठून तरी तीन-चार धटिंगण आले आणि त्यांचे हातपाय बांधून, त्यांचं पूर्ण डोकं काळ्या पिशवीने झाकून त्यांना घेऊन स्पीडबोटीने अज्ञात स्थळी रवाना झाले.

आपलं अपहरण झाल्याचं लक्षात आल्यावर क्षणभर लेखकरावांच्या पोटात भीतीने गोळा आला. मात्र लगेच, आजवर अपहरण होण्याचं जे भाग्य केवळ धनिकांच्या पोरांच्या नशिबी असायचं ते आपल्या नशिबी आल्याने, कुणालातरी आपण अपहरण करण्याइतके महत्त्वाचे वाटत असल्याच्या जाणिवेने लेखकराव मनातल्या मनात सुखावले. सात पिढ्या बसून खातील अशा गर्भश्रीमंत खानदानात आपला जन्म झाला असल्याची टीप मिळाल्याने कदाचित आपले अपहरण झाले असावे. मात्र आपण आपल्या ऐतखाऊ खानदानाच्या, आठव्या लुख्ख्या पिढीचे प्रतिनिधी असल्याचे अपहरणकर्त्यांच्या गावीही नसावे या कल्पनेने लेखकरावांना अपहरणकर्त्यांच्या बुद्धूपणावर हसू आले.

एका मोठ्या वाड्यातील सुरक्षा रक्षकांच्या दोन-तीन चौक्या ओलांडून लेखकरावांना आतील आलिशान दालनात नेण्यात आले. खुर्चीवर बसवून त्यांचे बांधलेले हातपाय सोडण्यात आले. डोळ्यावरील कपड हटविण्यात आला. समोर एक पिकलेल्या जाड मिशांचा गलेलठ्ठ इसम अंगात निळ्या रंगाचा ब्लेझर व डोळ्याला काळा गॉगल घालून बसला होता. त्याच्या समोर डाव्या बाजूला एक चौकड्या चौकड्याचा अर्ध्या बाह्यांचा सदरा घातलेला इसम डोक्याला हेल्मेट घालून बसला होता.

मिशीवाला गृहस्थ अत्यंत लाघवी हसत शेकहॅण्ड करण्यासाठी हात पुढे करत म्हणाला, ‘‘नमस्कार लेखकराव. तुम्ही मला ओळखलं असेलच. मी दाऊद इब्राहिम !’’ त्या इसमाचा चेहरा लेखकरावांच्या मनात असलेल्या दाऊद इब्राहिमच्या चेहऱ्याशी अजिबात मेळ खात नव्हता. लेखकरावांच्या चेहऱ्यावरील अविश्वासाचे भाव ओळखून तो म्हणाला, ‘‘लेखकराव, कधी काळी शारजाला मॅच पाहतानाच्या माझ्या फोटोमध्ये तुम्ही आताच्या मला शोधताय. आय हॅव ग्रोन अप, यू टू ग्रो अप मॅन!… हे पाहा माझे आधार कार्ड.’’

लेखकरावांनी ते आधार कार्ड हातात घेऊन पाहिले. आधार कार्डावरील चेहरा आणि समोर बसलेला इसम यांच्या चेहऱ्यात अजिबात साम्य दिसत नव्हते. त्या अर्थी तो इसम दाऊदच असावा; आणि ते आधारकार्ड जेन्युईन असावे अशी लेखकरावांची खात्री पटली.

दाऊदभाई मुद्द्यावर येत म्हणाला, ‘‘हे पाहा लेखकराव, तुम्ही लोकांनी आधी नोटबंदीमुळे आम्हा माफिया आणि अतिरेकी लोकांची कंबर तोडली, मग जीएसटी आणल्यामुळे पुन्हा आमची कंबर तोडली. त्यानंतर मग काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यामुळे आणखी एकदा आमची कंबर तोडली. अशी तीन-तीन वेळा तुटलेली कंबर घेऊन आमचा माफियागिरीचा धंदा करणे आम्हाला अशक्य झाले आहे. आम्ही नवीन बिझनेस लाइनच्या शोधात होतो. महाराष्ट्रात दरवर्षी निघणाऱ्या दिवाळी अंकांच्या संख्येवरून या धंद्यात बऱ्यापैकी पैसा असल्याचे आमच्या बिझनेस डेव्हलपमेंट टीमने आम्हाला सांगितले आहे. सरकारकडून आणि उद्याोगपतींकडून मिळणाऱ्या जाहिरातींचे भरपूर पैसे, लेखक-कवी-चित्रकारांना द्यावे लागणारे नाममात्र मानधन आणि दिवाळी अंकांना वर्षभर मिळत राहणाऱ्या पुरस्कारांमुळे दिवाळी अंकात चांगला पैसा असल्याची आमच्या बिझनेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची खबर आहे. त्यामुळे आपण यावर्षी दणक्यात दिवाळी अंकाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहोत.

तुमच्या बाजूला हे जे सद्गृहस्थ बसलेले आहेत, त्यांनाही तुमच्या सारखेच इथे आणण्यात आले आहे. त्यांच्या विनंतीवरून, त्यांची ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर आम्ही त्यांची, आमच्या दिवाळी अंकाच्या संपादकपदी नेमणूक केलेली आहे. तुम्ही आहात आमच्या अंकाचे मुख्य लेखक आणि साहाय्यक संपादक! आणि मी दाऊद इब्राहिम कासकर या अंकाचा मालक, मुद्रक आणि प्रकाशक!

‘‘खरं तर, ‘माफिया हेच खरे देशभक्त’ हा विषय घेऊन विशेषांक काढायचं आमच्या मनात होतं. पण आमच्या या नवनियुक्त संपादकांनी आम्हाला सल्ला दिला की, ‘आपल्या अंकात वैचारिक लेख, ललित, कथा, कविता, विनोद, व्यंगचित्रे असा सगळ्या प्रकारचा मसाला भरून आपण एक गोळीबंद अंक काढूया.’ त्यांची ही कल्पना आम्हाला इतकी आवडली की, आम्ही आपल्या अंकाचं नावच ‘गोळीबंद’ ठेवलं. त्यायोगे आमच्या जुन्या धंद्याचा नव्या व्यवसायाशी धागा जोडलेला राहील. काय म्हणता! हा हा हा !’’ असे आपल्याच विनोदावर हसत दाऊदभाईंनी टाळीसाठी हात पुढे केला. लेखकरावांनी घाबरत घाबरत त्याच्या हातावर हात टेकवला. पण टाळी काही वाजली नाही.

‘‘संपादकसाहेबांनी आम्हाला सांगितलं की, हेडमास्तरसारखी छडी घेऊन पाठी लागल्याशिवाय मराठीतील लेखक लोक लिहीत नाहीत. आम्ही म्हटलं, ‘‘छडी घेऊन पाठी लागणारे संपादक जर चांगला दिवाळी अंक काढू शकत असतील तर आपण ग्लॉक-47 घोडा घेऊन लेखकांच्या पाठी लागल्यास कितीतरी उत्तम अंक काढू शकतो. काय म्हणता? हा हा हा !’’ असे आपल्याच विनोदावर हसत दाऊदभाईंनी संपादकांकडे टाळीसाठी हात पुढे केला. संपादकांना त्यांच्या हातावर हात टेकविण्याचीदेखील हिंमत झाली नाही.

दाऊदभाई एकटेच नॉन स्टॉप बोलत होते. संपादक हेल्मेट हलवत होते अन् साहाय्यक संपादक मुंडी हलवत होते. संपादक हेल्मेटची काच किंचित वर करीत हिंमत करून म्हणाले, ‘‘अहो सर, दिवाळी अंक काढणे सोपी गोष्ट नाहीये. अंकासाठी विषय काढणे, त्या विषयावर लिहू शकतील असे लेखक शोधणे, गोडगोड बोलून त्यांना गळाला लावणे, त्यांच्या मागे लागून त्यांच्याकडून वेळेत लिहून घेणे. हे अतिशय जिकिरीचे काम आहे. त्यात बरेच लेखक डेडलाइन पाळत नाहीत. बऱ्याचदा ते आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळंच काहीतरी लिहून देतात. कधीकधी लेखक लेख देत नाहीत आणि शेवटपर्यंत कळवतही नाहीत. अशावेळी कोरी राहिलेली पानं संपादकाला भरावी लागतात. हे जमणार आहे का तुम्हाला? सॉरी आपल्याला?’’

संपादकांच्या या बोलण्यावर प्रतिक्रिया म्हणून भाईंनी आपल्या डोळ्यावरील गॉगल जरासा खाली करताच संपादक सारवासारव करीत म्हणाले, ‘‘का नाही जमणार आपल्याला? नक्की जमेल. करूया आपण. सगळ्यांपेक्षा हटके दिवाळी अंक काढूया आपण!’’

मग लेखकांची बाजू घेत लेखकराव बोलू लागले. म्हणाले, ‘‘भाई, संपादक जे म्हणताहेत ते काही अंशी खरं असलं तरी असे खूप मराठी लेखक आहेत ज्यांना कुणी आमच्या अंकासाठी लेख लिहा असे म्हणतदेखील नाही. अनेक लेखकांना आपले लेख संपादकांकडून साभार परत मिळण्याचा मानदेखील मिळत नाही. काही संपादक लोक ‘तुमचा लेख नक्की छापणार’ असं म्हणतात, पण ऐनवेळी जाहिरात आली म्हणून लेख बाजूला काढून ठेवतात आणि लेखकाला आपला लेख अंकात नाहीये हे दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर स्वत:च्या खर्चाने अंक विकत घेतल्यानंतर कळते. काही त्यातल्या त्यात बरे लिहिणारे लेखक, दिवाळी अंकासाठी लिहायला वेळ खूप जातो आणि लोक वाचतात की नाही हे कळत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर लिहिणे पसंत करतात. आपण दोघेही एक गोष्ट लक्षात घ्या की, गायकाला फर्माईशीनुसार गाता येते, डान्सरला फर्माईशीनुसार नाचता येते, आर्टिस्टला फर्माईशीनुसार चित्र काढता येते, कवी लोकांना तर कविता पाडण्यासाठी असल्या काही बाहेरील मोटिव्हेशनची गरजच नसते. लेखकाला मात्र मागणीप्रमाणे फिक्शन लिहिता येत नाही. ते आतूनच यावं लागतं. तुम्ही भरीस घातल्याने किंवा लेखकाच्या कनपट्टीला घोडा लावून उभे राहिल्याने लेखक मंडळी काहीबाही लिहितीलदेखील. पण त्या लिखाणाला आणि अशा दिवाळी अंकाला दर्जा राहणार नाही. असे दिवाळी अंक आले काय किंवा न आले काय त्याने आपल्या दिवाळी अंकाच्या उदात्त परंपरेला घंटा फरक पडणार नाही. तेव्हा साहित्यिकाला पुरेसा मान आणि योग्य धन देणार असाल तरच मी या अंकाचा साहाय्यक संपादक म्हणून काम करायला तयार आहे.’’

साहाय्यक संपादकांच्या या बोलण्यावर प्रतिक्रिया म्हणून भाईंनी आपल्या ब्लेझरच्या बाह्या जरा वर केल्या. ‘‘सत्ताधाऱ्यांनी वाकायला सांगितल्यावर रांगायला लागायचे.’’ या अलीकडील आठ-दहा वर्षांत अंगीकारलेल्या धोरणाला अनुसरून साहाय्यक संपादक यू टर्न घेत म्हणाले, ‘‘भाई, तुम्ही फक्त आदेश द्या. दहा दिवसांत तुम्हाला हवा तसा अंक काढून देतो.’’

दाऊदभाई खूश झालेले दिसले. खुर्चीवरून उठत ते म्हणाले, ‘‘जाहिराती आणायचे काम माझ्याकडे. बाकी अंक कसा काढायचा ह्याचे पूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य मी तुम्हाला देतो. त्यात मी लुडबुड करणार नाही. कुणाला मानधन किती द्यायचे. कोणत्या लेखकाला कसे पटवायचे ते तुमचे तुम्ही बघा. छडीचा धाक दाखवून बालाजी सुतारांची कथा घ्या, ते मानतच नसतील तर अंकात त्यांचे नागराज मंजुळे आणि किशोर कदमसोबतचे फोटो छापण्याचं आश्वासन द्या. विदेशी दारूचं आमिष दाखवून राजा गायकवाडांकडून दणदणीत विनोदी लेख घ्या. चांगले पैसे कबूल करून नितीन थोरातांना धारावाही कादंबरी लिहायला लावा, भाषणाची संधी देतो असं सांगून रवींद्र तांबोळींकडून लेख घ्या. साहित्य संमेलनाच्या आजी-माजी अध्यक्षाची मुलाखत घ्या. ते मुलाखतीला वेळ देत नसतील तर त्यांना निवृत्तीच्या आधी निकाली काढलेल्या फायलींची गोष्ट सांगा. सतत वादग्रस्त विधानं करणाऱ्या एखाद्या सेलेब्रिटीला लेख लिहायला लावा. सध्या फेमस असलेल्या एखाद्या टीव्ही सीरियलच्या कलाकारांच्या, दिग्दर्शकांच्या मुलाखती घ्या. त्यांनी मुलाखती नाही दिल्या तर त्यांच्या नावाने तुम्ही मुलाखती लिहा. कवितांची स्पर्धा घ्या. हवं तर खिडकी-चित्र छापा. एखाद्या उफाड्याच्या अभिनेत्रीचा फोटो मुखपृष्ठावर छापा. पैशाची चिंता करू नका. आपण आपली फेक करन्सी आणि स्टॅम्प पेपर छापणारी प्रिंटिंग प्रेस आठ दिवस दिवाळी अंकाच्या छपाईसाठी तुमच्या दिमतीला देतो. काय वाट्टेल ते करा, पण आपला ‘गोळीबंद’ दिवाळी अंक गोळीबंदच झाला पाहिजे. चला कामाला लागा. आणि हो, पेपरमध्ये आपल्या दिवाळी अंकाबद्दल काय छापूनबिपून आणायचं ते तुम्हीच बघा.’’

‘‘त्याची काळजी करू नका भाई. पेपरवाल्यांना आपल्या अंकाची एक प्रत पाठवली की ते लोक अनुक्रमणिकेच्या पलीकडील पानही न फिरवता ‘स्वागत दिवाळी अंकांचे’ किंवा ‘ओळख दिवाळी अंकांची’ या सदराखाली आपल्या संग्राह्य, दर्जेदार, वाचायलाच हवा असा’ अशा विशेषणासहित आपल्या अंकावर लिहितील याची जबाबदारी आमची. भाई, आपण जसे परंपरा म्हणून दिवाळी अंक काढतो तसेच पेपरवालेदेखील परंपरा म्हणूनच दिवाळी अंकांची माहिती छापतात. वाचकांच्या लेखी पेपरमधील दिवाळी अंकांची माहिती आणि राशिभविष्य यांचं मोल सारखंच असतं. डोन्ट वरी भाई!’’

भाई हसत हसत उठले. केबिनबाहेर जात म्हणाले, ‘‘मी जरा वॉशरूमला जाऊन येतो तोवर तुम्ही दोघे आपला हा बिझनेस प्लॅन पाहून ठेवा. आणि जाहिराती आणण्याव्यतिरिक्त बाकी सगळं टार्गेट तुम्हाला अचीव्ह करायचं आहे हे लक्षात असू द्या.’’

पाठीमागे असलेल्या व्हाइट बोर्डाकडे लेखक आणि संपादक यांची पहिल्यांदाच नजर गेली. त्यावर लिहिले होते-

मराठी माणसांची लोकसंख्या १४ करोड.

चौदा व्यक्तींपैकी एकाने अंक घेतल्यास अंकाची विक्री एक करोड प्रती.

रुपये ३०० प्रति अंक या दराने एकूण विक्री रुपये तीनशे करोड. जाहिरातीचे उत्पन्न रुपये सव्वादोनशे करोड.

छपाई आणि संपादकीय खर्च रुपये पंचवीस लाख

निव्वळ उत्पन्न रुपये पाचशे करोड.

व्हाइट बोर्डावरील ते आकडे पाहून लेखकरावाला आकडी आली आणि संपादकाचा जीव हेल्मेटच्या आत गुदमरू लागला.

दाऊदभाई पुन्हा केबिनमध्ये आले तेव्हा त्या दोघांना गारठून गेलेले पाहून म्हणाले, ‘‘हे टार्गेट अचीव्ह झालं नाही तर मी तुम्हा दोघांना इथेच ठोकणार,’’असं म्हणत त्यांनी आपल्या कमरेचं पिस्तूल काढून टेबलवर ठेवलं.

संपादकांनी अवसान गोळा करून विचारलं, ‘‘आणि समजा आम्ही हे टार्गेट अचीव्ह केलं तर?’’

संपादकांच्या या आत्मविश्वासाला लेखकाने मनातल्या मनात सॅल्यूट ठोकला. ‘‘तरीही मी तुम्हाला ठोकणार!’’ दाऊदभाई निश्चयी चेहऱ्याने उत्तरला.

‘‘पण का?’’ दोघे एका सुरात ओरडले.

‘‘दर्जेदार, दर्जेदार म्हणून गाजविलेल्या दिवाळी अंकात, जाहिरातींचा भडिमार सोसून एकही वाचनीय लेख मिळत नाही म्हणून; आणि तेच तेच लेखक अनेक अंकांत वर्षानुवर्षे एकाच प्रकारचं कंटाळवाणं लिहित राहतात म्हणून महाराष्ट्रातल्या वाचकांनी, वर्गणी काढून, दळभद्री संपादक आणि कुचकामी लेखकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हा दोघांचा गेम वाजविण्याची सुपारी मला दिली आहे. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की, ‘‘दिवाळी अंक प्रसिद्ध करणारी आणि दिवाळी अंक वाचणारी आपली शेवटची पिढी!’’ तुमचं हे वक्तव्य मी निदान तुमच्या पुरतं खरं करणार आहे. न रहेगा बांस न बजेगी बांसुरी!’’

sabypereira@gmail.com