राकेश खन्ना
भारतीय प्रादेशिक भाषेतील पल्प फिक्शन अथवा लगदा साहित्याचा विचार केला, तर त्यात आंग्ल साहित्यातून कथानकांची उचलेगिरी पाहायला मिळते. पाच-सहा दशकांपूर्वी अशा प्रकारे शेरलॉक होम्स आणि जेम्स बॉण्डचे देशी अवतार सगळ्याच भाषांमध्ये तयार झाले. यातील काही लेखकांनी नावे, ठिकाणे, सांस्कृतिक गोष्टी बदलून देखील कथानके रचली. काहींनी परकीय कादंबऱ्यांतील ओळीच्या ओळी उतरवत कादंबऱ्या लिहिल्या. त्यामुळे प्रादेशिक भाषांतील लगदा साहित्य अनुवाद करण्याआधी त्यांची मुळं तपासावी लागतात. खूप काळजीपूर्वक संशोधनानंतरच आम्ही ती इंग्रजीमध्ये अनुवादित करतो.
भारतीय पल्प फिक्शनमध्ये प्रवाह तयार व्हावा इतके हे क्षेत्र मोठे आहे की नाही, याची मला कल्पना नाही. आम्ही तमिळ, गुजराती आणि उर्दू भाषांतील लोकप्रिय साहित्याचे अनुवाद केले. ‘द ब्लाफ्ट अँथॉलॉजी ऑफ तमिळ पल्प फिक्शन’चा अनुवाद करणाऱ्या प्रिथम चक्रवर्ती यांनी इतर एका प्रकाशनासाठी इंद्रा सौंदर राजन या रहस्य कथाकाराची एक कादंबरी अनुवादित केली. आलेफ प्रकाशनाने अरुणवा सिन्हा यांच्या इंग्रजी भाषांतरासह ‘बंगाली पल्प’ कथांचे एक पुस्तक प्रसिद्ध केले; हिंदीतील काही पल्प पुस्तकांचेही इंग्रजी अनुवाद झालेले आहेत.
आमच्यासाठी, ‘द ब्लाफ्ट अँथॉलॉजी ऑफ गुजराती पल्प फिक्शन’करीता विश्वंभरी एस. परमार यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव थोर होता. कारण प्रिथम यांच्याप्रमाणे त्या साहित्यात-अनुवादात मुरलेल्या नव्हत्या. या क्षेत्रात अगदीच नवख्या आणि तरुण असलेल्या विश्वंभरी यांनी गुजराती लगदा साहित्याचा डोंगर उपसण्याचे काम केले. प्रचंड संशोधन आणि मेहनत घेत त्यांनी आपले नमुना भाषांतर (सॅम्पल) सादर केले. त्यांनी गुजराती पल्प फिक्शनचा ग्रंथ उत्तमरीत्या घडवला आहे.
‘तमिळ पल्प फिक्शन’च्या तीन खंडासाठी आम्ही मुख्यत: प्रिथम के. चक्रवर्ती यांच्या या क्षेत्रातील अभ्यासावर अवलंबून होतो. गुप्तहेरकथा, प्रेमकथा, विज्ञान, भयकथांबरोबर तमिळ साहित्यातील खूपविक्या लेखकांना या प्रकल्पात सहभागी करण्याचा आमचा उद्देश यानिमित्ताने पूर्ण झाला. प्रिथम यांनी राजेश कुमार आणि रमणीचंद्रन यांसारख्या तिथल्या गाजलेल्या लेखकांच्या शेकडो कादंबऱ्या वाचल्या. त्यांचे सारांश आम्हाला पाठविले, त्यातून या खंडाचे काम पुढे सरकले. तिसऱ्या खंडासाठी आमच्याकडे वेगवेगळे अनुवादक होते. काही सूचना लेखकांकडून मिळाल्या; इंद्रा सौंदर राजन यांनी सुचवलेली ‘Olivadhirukku Vazhiyilli’ ही कादंबरी आम्हाला खूप आवडली. पण ती आमच्या कथाखंडात घेण्यासाठी विस्तृत पाने व्यापणारी होती, म्हणून आम्ही ती स्वतंत्रपणे ‘द आयकुडी मर्डर्स’ या नावाने इंग्रजीत आणली.
भारतामधील कोणत्या भाषांतील साहित्य सर्वाधिक इंग्रजीत जाते, तेच कसे जाते, याबाबत मी अधिक सांगू शकणार नाही, कारण या अनुवाद व्यवहाराची ठोस आकडेवारी अथवा तपशील माझ्याकडे नाही. मात्र दीपा भास्ती यांनी केलेला बानू मुश्ताक यांच्या कन्नडमधून आलेल्या कथांचा ‘हार्ट लॅम्प’ हा अनुवाद आणि डेजी रॉकवेल यांनी गीतांजली श्री यांच्या ‘रेत की समाधी’ या हिंदी कादंबरीचे केलेले भाषांतर आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाची मोहर लागल्यानंतर जगभर पोहोचले. या दोन्ही पुस्तकांनी आपापल्या भाषांना प्रतिष्ठा मिळवून दिली.
मी असे ऐकले आहे की, दक्षिण कोरियात आपल्या भाषेतील साहित्य इंग्रजीतून जगभर पोहोचावे यासाठी खास आर्थिक गुंतवणूक सरकारी यंत्रणेमार्फत झाली. दोन दशकांत यात तेथील सरकारने खूप पैसा ओतला. अनुवादासाठी अनुदान दिले गेले. तेथील सगळ्याच सर्वोत्तम भाषांतरकर्त्यांनी या यंत्रणेचा लाभ न घेताही अनुवाद केले. पण सरकारी आर्थिक पाठबळामुळे अधिकाधिक भाषांतरे इतर देशांमध्ये उपलब्ध होऊ शकली, यात वादच नाही. केवळ याचमुळे जगभरात कोरियन साहित्य नजरेत भरेल, इतक्या वेगात दिसू लागले. त्यांवर चर्चा होऊ लागली. भारतात अनुवादासाठी अशाप्रकारचे सरकारी सहाय्य मिळणे कठीण. कारण परदेशी बाजारात आपले कोणते साहित्य लोकप्रिय ठरेल, याबाबत बुरसट कल्पना आणि एकांगी ज्ञान त्यांना आहे. त्यात बदल करावा ही सांगणारी कुठलीच यंत्रणा नाही. फ्रान्स आणि जर्मनी येथील पुस्तक मेळ्यांमध्ये आपल्या सरकार पुरस्कृत प्रदर्शनांत बिलकूल भूषणावह वाटणार नाहीत, असे ग्रंथ विक्रीस असल्याचे मागे पाहायला मिळाले होते.
दक्षिण कोरियाई सरकारला आपल्या देशातील ग्रंथांना ग्लोबल करण्याची कला पक्की जमली आहे. कादंबऱ्या, विज्ञानकथा, भयकथा, वैचित्रकथा (विअर्ड टेल्स) अशा विविध प्रकारांना सामावून घेणाऱ्या उत्तमोत्तम कादंबऱ्या त्यामुळे इतर जगाला अनुवादातून वाचायला मिळाल्या. उदा. बोरा चुंग यांची ‘कर्स्ड बनी’ आणि ‘युुवर युटोपिया’ किंवा किम उन-सू यांचे ‘द कॅबिनेट’. जपानकडून जगभरात मंगा (चित्रकथा) निर्यात होत आहे, त्यातील बहुतांश ही वास्तववादी नसून पूर्णत: फँटसी आहेत. दक्षिण अमेरिकी साहित्य जादूई वास्तववादासाठी (मॅजिकल रिअॅलिझम) प्रसिद्ध आहे. मला भारतीय भाषिक अवकाशात असे प्रयोग करणारे लेखक फार कमी दिसतात. किंवा असे लेखक असतीलही पण त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी भाषांतरेच झाली नसल्यामुळे ती त्या त्या भाषेच्या वाचक कक्षेतच अडकली आहेत.
आमचे तमिळ पल्प फिक्शनचे तीन खंड आणि नुकताच आलेला गुजराती पल्प फिक्शनचा संग्रह भारत आणि भारताबाहेर यशस्वी ठरतोय. जगभरात तमिळ आणि गुजराती लोकांची स्थलांतरित झालेली दुसरी-तिसरी पिढी वास्तव्यास आहे. त्यांना आपली मातृभाषा वाचता येत नाही, पण आजी-आजोबांचे आवडते लेखक वाचायची इच्छा या खंडांतून पूर्ण होते. शिवाय भारताशी संबंध नसलेल्या इतर देशी आणि भाषिक वाचकांपर्यंतदेखील या कथा इंग्रजी भाषांतरामुळे पोहोचल्या. शेरी लालनुंजिरी छिंगटे या मिझोराम येथील लेखिकेचे ‘मिझो मिथ’ हे आमचे पुस्तकदेखील लोकप्रिय झाले. ईशान्य भारतातील लोककथांना भिन्न पैलू आहेत. तिथल्या राक्षसांच्या कहाण्या, परिकथांसारखी शैली वाचकांना भावली. नुकताच आमचा ‘द ब्लाफ्ट बुक ऑफ अॅण्टी-कास्ट स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ हा ३० कथांचा खंड प्रकाशित झालाय. त्यापैकी बहुतांश कथा इंग्रजीत लिहिल्या गेल्यात. पण आठ प्रादेशिक भाषांतील गोष्टींचे अनुवाद आहेत. बंगाली, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आणि गुजराती भाषांमधून ते झालेत. या पुस्तकाला भारतात आणि परदेशातही चांगली मागणी आहे.
विशेष म्हणजे तेलुगू भाषेतील दोन अनुवाद वाचकांना खूप आवडले. गोगू श्यामला यांची ‘द फॅण्टम लॅडर’ ही भूतकथा असून परदेशी वाचकांना इथल्या समाजाच्या जातिची उतरंड, त्याबाबतचा इतिहास याबाबत भरपूर तपशील पुरवते. त्याचबरोबर व्ही. चंद्रशेखर राव यांची ‘द लास्ट रेडिओ प्ले’ ही कथा जातीवादामुळे कलाकारांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते, यावर प्रकाश टाकते. आणखी एक मराठीतील लक्षवेधी पुस्तक आम्ही पुढील महिन्यात इंग्रजीत आणत आहोत. ‘परिव्राजक’ हा गौतमीपुत्र कांबळे यांचा कथासंग्रह २००४ साली मराठीत प्रकाशित झाला होता. सायरस जे. लिबेरी यांनी त्याचा इंग्रजीत अनुवाद केला असून त्याच्या यशाची आम्हाला खात्री आहे.
(लेखक ‘ब्लाफ्ट पब्लिकेशन’ या संस्थेचे संचालक आणि समूह संपादक आहेत.)
Rakesh@blaft.com