रघुनंदन गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत आपण जे जे खेळाडू बघितले त्यामध्ये पॉल मॉर्फीचा अपवाद वगळता बाकी सगळे स्वत:ला बुद्धिबळात झोकून देणारेच होते. हे सर्व खेळाडू बुद्धिबळ हेच जीवन असे मानून स्वत: बुद्धिबळाव्यतिरिक्त काहीही करणारे नव्हते. गॅरी कास्पारोव्हनेही निवृत्त झाल्यावर राजकारणामध्ये उडी घेतली होती. पोलगार भगिनी तर लहानपणापासून परिस्थितीशी लढा देऊन पुढे आल्या. त्याच्या एकदम विरुद्ध दृष्टिकोनातून जीवनाकडे बघणारी जगज्जेती म्हणून आपण एका कुशाग्र बुद्धीच्या खेळाडूची आज ओळख करून घेऊ.२०१५ या वर्षांनंतर फार कमी स्पर्धामध्ये भाग घेऊनही जी मुलगी अजूनही जागतिक क्रमवारीत अव्वल नंबर पटकावून आहे; आणि जंग जंग पछाडूनसुद्धा बाकीच्या खेळाडू तिच्या जवळपासही फिरकू शकत नाही अशा असामान्य खेळाडूचे नाव आहे हू यीफान! सतत हसतमुख असणारी यीफान (तिचं आडनाव ‘हू’ आहे) धूमकेतूसारखी अचानक स्पर्धा खेळायला उतरते आणि प्रतिस्पध्र्याची धूळदाण उडवून देते. माजी विश्वविजेता व्लादिमिर क्रॅमनिक म्हणतो, ‘‘हू यीफानला बुद्धिबळाचा अभ्यास करण्यात स्वारस्य नसेल तर ती कितीही वर्षे अशीच जगातील सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटू म्हणून राज्य करू शकेल; पण तिला पुरुषांमध्ये खेळावयाचं असेल तर बुद्धिबळावर मेहनत घ्यावी लागेल.’’

मी हू यीफानला अजब म्हणतो, कारण तिच्या आवडीनिवडी जगावेगळय़ा आहेत. लहानपणी तिला विचारलं होतं की, ‘‘तुझे छंद काय आहेत?’’ तर ही म्हणाली, ‘‘वाचन आणि अभ्यास.’’अभ्यास? मला नाही वाटत की कोणाचा अभ्यास हा एक छंद असेल म्हणून!! आणि त्यातही गंमत म्हणजे यीफानला जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या बुद्धिबळाचा ती अभ्यास करतच नाही.

वयाच्या १४ व्या वर्षी ग्रँडमास्टर (पुरुषांचा) किताब मिळवणारी हू यीफान आपल्या आयुष्यात किती तरी विक्रमांची मानकरी आहे. जागतिक विजेती असताना तिनं वयाच्या १७ व्या वर्षी पेकिंग विश्वविद्यालयामध्ये ‘आंतरराष्ट्रीय संबंध आणि घडामोडी’ असा कठीण विषय घेऊन प्रवेश केला. सगळय़ा चिनी बुद्धिबळ जगतात खळबळ उडाली, कारण या मुलीला बुद्धिबळासाठी वेळ कुठून मिळणार अशी सर्वाना शंका होती. तिनं आधीच दोन वेळा महिलांचं जगज्जेतेपद मिळवलं होतंच, पण आपला अभ्यास, इतर उपक्रम सांभाळून नंतर २०१३ आणि २०१६ सालचं महिलांचं विश्व विजेतेपदही पुन्हा मिळवलं. यातील गंमत म्हणजे यीफानचा विम्बल्डनप्रमाणे बाद फेरीची जगज्जेतेपदाची स्पर्धा खेळण्यास तात्त्विक विरोध होता आणि तिला जगज्जेता आणि आव्हानवीर यांच्यात पुरुषांप्रमाणे सामने व्हावेत अशी इच्छा होती. या पठ्ठीनं त्यावर तोड काढली. ती जागतिक अजिंक्यपद सामन्यात खेळत नसे आणि जी कोणी जगज्जेती होईल तिला जागतिक संघटनेच्या नियमाप्रमाणे आव्हान देत असे. या आठ डावांच्या सामन्यात ती हमखास विजयी होत असे आणि पुन्हा जगज्जेतेपदाचा मुकुट स्वत:च्या डोक्यावर मानानं मिरवत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, २०११, २०१३ आणि २०१६ या तिन्ही वर्षी एकही डाव न हरता यीफाननं अजिंक्यपद मिळवलं होतं! नंतर जागतिक संघटनेनं नियमात बदल केल्यानंतर तिनं आता जागतिक स्पर्धात भाग घेणं बंद केलं आहे.
अनेक दगडांवर यशस्वीरीत्या पाय ठेवणाऱ्या यीफानला जगातील अतिशय प्रतिष्ठेची मानल्या गेलेल्या ऱ्होड्स शिष्यवृत्तीची संधी मिळाली. ही किती मानाची गोष्ट आहे याची कल्पना वाचकांना त्याची दोन पुरस्कारप्राप्त नावं सांगितली की कळेल. एक आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि दुसरे आपल्या कठीणोत्तम इंग्रजी बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले खासदार शशी थरूर! महाराष्ट्रासाठी (आणि भारतीय बुद्धिबळासाठी) अभिमानाची गोष्ट म्हणजे मुंबईची माजी शालेय पुरस्कार विजेती प्रियंका डिसोझा हीसुद्धा हू यीफानच्याच बरोबर ऱ्होड्स शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्डमध्ये शिकत होती. अर्थात प्रियंकानं आधी मुंबई आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी घेतलेली होती आणि तिच्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर तिनं ऱ्होड्स शिष्यवृत्ती मिळवली.

बुद्धिबळानं यीफानला इतकी मोहिनी घातली होती की न्यायाधीश असलेल्या तिच्या वडिलांनी तिच्यासाठी लहान वयातच टाँग युआन मिंग या प्रशिक्षकाची नेमणूक केली. यीफान विश्वविजेती झाल्यावर टाँग म्हणाला ‘‘लहान वयातच तिचा जबरदस्त आत्मविश्वास, अफाट स्मरणशक्ती आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता बघून यीफान ही लवकर पुढे जाणार याची खात्री पटायची. पण कोणालाच ती एवढी मोठी झेप घेईल याची कल्पना नव्हती.’’
वर उल्लेख आलाच आहे की, पुरुषांचा ग्रँडमास्टर किताब मिळवणारी हू यीफान ही सर्वात लहान महिला आहे आणि अजूनही तिचा १४ व्या वर्षी केलेला हा विक्रम अबाधित आहे. आता तिचे इतर विक्रम आपण बघू या! वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत भाग घेणारी यीफान ही पुरुष असो वा महिला यामध्ये सर्वात लहान ठरली आहे. रशियातील एकाटेरीनबर्ग येथील महिला जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत असो अथवा इटलीमधील टुरीन येथील ऑलिम्पियाडमध्ये असो- छोटय़ा यीफानचा खेळ सगळय़ा प्रेक्षकांना खेचून घेत असे आणि मंत्रमुग्धदेखील करीत असे. १२ व्या वर्षी ती चीनसारख्या मातब्बर देशाची राष्ट्रीय विजेती होती.

२००३ ला नऊ वर्षांची हू यीफान जागतिक १० वर्षांखालील विजेती झाली आणि पुढच्याच वर्षी तिनं १० वर्षांखालील मुलांमध्ये भाग घेऊन पहिल्या क्रमांकासाठी बरोबरी केली. १२ व्या वर्षी तुरिन (इटली) येथील ऑलिम्पियाड खेळताना छोटय़ा यीफाननं तब्बल १२१ इलो गुणांची कमाई केली. जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत ६४ मध्ये ५६ वी सीडेड असणारी यीफान तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचली.

हू यीफान तेरा वर्षांची असताना तिला ‘वाईक आन झी’ या नेदरलँडमधील विख्यात स्पर्धेत खेळायचा मान मिळाला. त्या वेळी तिची गाठ पडली ती कास्पारोव्हचा आव्हानवीर ठरलेल्या नायजेल शॉर्ट याच्याशी. पांढऱ्या मोहऱ्यांकडून खेळताना तिच्या एका सापळय़ात अनुभवी नायजेल अडकला आणि डाव सुरू असताना यीफान चक्क खुद्कन हसली. नायजेल गोरामोरा झाला आणि थोडय़ाच वेळात त्यानं शरणागती दिली. डाव संपल्यावर यीफानला पत्रकारांनी विचारलं की, ‘‘तू का हसलीस?’’ ती म्हणाली, ‘‘शॉर्टसारख्या महान खेळाडूचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, पण माझ्या सापळय़ात तो अडकला म्हटल्यावर मला हसूच आलं आणि मी स्वत:ला आवरू शकले नाही.’’ बुद्धिबळपटू स्वत:च्या भावनांवर ताबा मिळवून असतात असं म्हटलं जातं, पण हू यीफानची कथाच वेगळी.

२००६ नंतर हू यीफानच्या पराक्रमाचा वारू चौफेर दौडू लागला. तिनं अनेक पुरुष ग्रॅण्डमास्टर्सना हरवून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. यथावकाश ती पुरुषांमधील ग्रँडमास्टर झाली आणि अनेक आघाडीच्या खेळाडूंना तिनं समोरासमोरच्या सामन्यांमध्ये पराभूत करण्यास सुरुवात केली. भारताचा परिमार्जन नेगी आणि चेक प्रजासत्ताकचा डेविड नवारा या दोन प्रमुख खेळाडूंना तिनं धूळ चारली होती.माझ्या मते, तिचा सर्वोत्तम खेळ २०१२ च्या जिब्राल्टरमध्ये झालेल्या प्रतिष्ठित स्पर्धेत झाला. झोलतान अल्मासी, अलेक्सि शिरोव्ह, ली क्वांग लियाम अशा २७०० पेक्षा जास्त रेटिंग असणाऱ्या चार खेळाडूंना हरवून तिनं नायजेल शॉर्टबरोबर संयुक्त विजेतेपद मिळवलं. वरती मी फक्त तीन सुपर ग्रॅण्डमास्टर्सचा उल्लेख केला आहे, पण चौथी होती साक्षात बुद्धिबळसम्राज्ञी ज्युडिथ पोलगार (२७१०). गेली २६ वर्षे जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून राज्य करणाऱ्या ज्युडिथला हा पराभव वर्मी लागला आणि तिनं लवकरच आपली निवृत्ती जाहीर केली.

यानंतर हू यीफाननं एकाहून एक यशाची शिखरं काबीज केली. आपला अभ्यासाचा छंद जपताना चिनी संघासाठी खेळणं तिनं सोडलं नाही. चार वेळा विश्वविजेतेपद मिळवून तिला चार वेळा जागतिक संघटनेकडून दरवर्षीच्या सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूला देण्यात येणारा ग्रीक पुराणातली बुद्धिबळ देवतेच्या नावाचा ‘कैसा पुरस्कार’ मिळाला. मला वाटतं की, या सगळय़ापेक्षा हू यीफानला आवडत असेल ती तिची प्राध्यापिका म्हणून शेंगयान विश्वविद्यालयात झालेली नियुक्ती! वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी हा सन्मान मिळवणारी डॉ. हू यीफान ही चीनच्या इतिहासातील सर्वात तरुण प्राध्यापिका! (गंमत म्हणजे तिच्यासारखीच ऱ्होड्स शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफोर्डला शिकलेली मुंबईकर बुद्धिबळपटू डॉ. प्रियंका डिसोझा हिनेही विद्यादान करायचं ठरवलं आहे आणि ती अमेरिकेतील कोलोरॅडो विश्वविद्यालयात प्राध्यापिका आहे.)

विद्यार्थ्यांच्या कोंडाळय़ात असताना प्राध्यापिका म्हणून ओळखूही न येणारी हू यीफान गरज लागेल त्या वेळेस बुद्धिबळ खेळाडूच्या रूपात येते आणि आपल्या देशाला पदकं मिळवून देते. अशा या प्रखर बुद्धिमत्तेच्या माजी जगज्जेतीला मानाचा मुजरा!

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yifan hu is the best female chess player in the world study of chess amy
First published on: 28-05-2023 at 00:05 IST