गेल्या तीन निवडणुकांचा विचार करता यंदा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी सर्वात चांगली होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी व्यक्त केला. तसेच आघाडीत प्रचाराच्या काळात योग्य समन्वय राहावा म्हणून दहा नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. १९९९, २००४ आणि २००९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला खासदारांचा दुहेरी आकडा गाठणे शक्य झाले नव्हते. पण गत तीन निवडणुकांच्या तुलनेत पक्षाची कामगिरी अधिक चांगली होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केल्याने पक्ष दुहेरी आकडा गाठेल, अशी शक्यता पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत योग्य समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या तर आपण राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आघाडीचा धर्म पाळावा, असे आवाहन केले आहे. यानुसार काँग्रेसचा उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून काम केले पाहिजे. याच पद्धतीने राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केले पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री, दोन्ही प्रदेशाध्यक्ष, आपण व काही मंत्र्यांचा समावेश असलेल्या नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. एखाद्या मतदारसंघात प्रचारात काही त्रुटी आढळल्या वा कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले नाही तर ही बाब उभय बाजूने समन्वय समितीच्या निदर्शनास आणून द्यावी, असे पवार यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committee of 10 leaders for coordination