काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यात गुरुवारी मुस्लिमबहुल भिवंडी मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघांतच त्यांचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
राहुल बुधवारी सकाळी धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी धुळे ते शिरपूर असा ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी खासदार गुरुदास कामत यांच्या मतदारसंघात वर्सोवा येथे मच्छिमारांशी ते संवाद साधणार आहेत. आपल्या मतदारसंघात कार्यक्रम ठेवावा, असा मिलिंद देवरा व संजय निरुपम यांचा प्रयत्न होता. पण राहुल गांधी यांनी फक्त कामत यांच्या मतदारसंघातील कार्यक्रम स्वीकारला. दुपारी दोन वाजता भिवंडी वळण रस्त्यावरील सोनाले येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.