सोलापूर : सोलापूर आणि पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे १२ टीएमसीचे दुसरे आणि तिसरे आकस्मिक आवर्तन सोडण्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजुरी दिली. दुसरे आवर्तन ५.५० पीएमसीचे तर तिसरे आवर्तन ६.५० टीएमसीचे राहणार आहे. जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठक पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात नियोजन भवनात झाली. यापूर्वी गेल्या ४ जानेवारी रोजी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेती सिंचनासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यास मंजुरी देण्यात आली होती. तत्पूर्वी, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उजनी धरणातून सोलापूर व पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला आणि भीमा काठच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही. अनुषंगाने जलसंपदा विभागाने उजनी धरण प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि आवश्यक असलेले पिण्याच्या पाण्याचे आकस्मिक आरक्षण करून ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या. आजअखेर उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ४०.५९ पीएमसी असून अचल पाणीसाठा ६३.६६ पीएमसी याप्रमाणे एकूण पाणीसाठा १०४.२५ पीएमसी इतका शिल्लक आहे.

या बैठकीस सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी या आमदारांसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले, उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर, धीरज साळे आदींची उपस्थिती होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 tmc water to be released from ujani dam for solapur pandharpur amy