रायगड जिल्ह्यामधील महाड तालुक्यात एकाच शाळेतील १७ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूल नावाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना करोनाची लागण झालीय.
समोर आलेल्या माहितीनुसार या शाळेमधील एकूण १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना करोनाची लागण झाली आहे. या शाळेमधील एक विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अँटीजन चाचण्या करण्यात आल्या होत्या. याच चाचण्यांचे अहवाल समोर आले असून त्यामध्ये १७ जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिलीय.
करोनाचा संसर्ग झालेल्या १७ जणांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांना झालेला हा संसर्ग असम्प्टोमॅटिक आहे, म्हणजेच कोणालाही करोनाची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीय. सर्वांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे.
शाळा बंदनंतर आता महाविद्यालयेही बंद होणार
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद करण्याबाबत कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारच्या बैठकीत मतैक्य झाले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यावर बुधवारी घोषणा केली जाईल. त्यामुळे सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
करोना रुग्ण वाढल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना प्रसारानुसार, अन्य शहरांमधील शाळाही टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. महाविद्यालयेही बंद करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाविद्यालये बंद करावी व ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यावर सर्वाचे एकमत झाले. बुधवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असे सामंत यांनी जाहीर केले.