कराड : ऐतिहासिक वारसा असलेल्या कराड नगरपालिकेचा १७० वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली प्रथमच मोठ्या प्रमाणात कराड नगरपालिकेचा वर्धापनदिन साजरा होत असल्याने पालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला.

मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी फेटा परिधान केला होता. त्यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे पालिकेची संपूर्ण इमारत उजळून निघाली होती. पालिकेच्या प्रवेशद्वारापासून सर्वत्र रांगोळीचा सुरेख सडा घालण्यात आला होता. कराड पालिकेत प्रथमच वर्धापनदिनाचा मोठा उत्साह दिसून आल्याच्या प्रतिक्रिया कराडकरांमधून व्यक्त होत होत्या.

कराड नगरपालिकेतर्फे शहरवासीयांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांबाबतची जनजागृती फेरी शहरातून काढण्यात आली. या फेरीतील पालिकेच्या कचरा संकलन गाड्यांसह सर्व वाहने फुलांनी आकर्षक सजवण्यात आली होती. फेरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, विजय दिवस चौक, कन्या शाळा, चावडी चौक अशी शहराच्या प्रमुख मार्गावरून येत पालिकेच्या आवारात विसावली. फेरीत मुख्याधिकाऱ्यांसह पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच नागरी आरोग्य केंद्र, अग्निशामक दलही सहभागी झाले होते.

या फेरीत ‘स्वच्छ कराड, सुंदर कराड’ व ‘माझी वसुंधरा’, ‘ऊर्जा जपा, प्रदूषण टाळा’, ‘भूमी वाचवा, भविष्य घडवा’ आदी जनजागृतीचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यानंतर नगरपालिकेच्या आरोग्य, बांधकाम, ई गव्हर्नस, सामान्य प्रशासन, कर विभाग, पाणीपुरवठा आदी विभागाच्या स्वच्छता व सजावट या निकषावर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे परीक्षण स्वतः मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी करून गुणानुक्रम काढण्यात आले. यामध्ये ई गव्हर्नस विभाग सर्वप्रथम आला. द्वितीय क्रमांक आस्थापना, तृतीय क्रमांक बांधकाम विभागाला मिळाला. विजेत्या विभागाला मुख्याधिकारी व्हटकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आतापर्यंत नगरपालिकेने मिळवलेल्या बक्षिसांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. महिलांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर म्हणाले, कराड नगरपालिकेचा १७० वा वर्धापनदिन वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याचे समाधान आहे. नगरपालिकेकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यात येत आहेत. यापुढेही सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. पालिकेचा नावलौकिक वाढवण्यास नागरी सुविधा देण्यात कार्यतत्परता दिसून येईल असा विश्वास मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी व्यक्त केला आहे.