जिल्ह्यातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून शनिवारी नव्याने ३२ रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या १५७ पर्यंत पोहचली आहे.

अमळनेर, चोपडा, जळगाव येथे घशातील स्त्राव घेतलेल्या १०३ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी ७१ तपासणी अहवाल नकारात्मक आले. सकारात्मक आढळलेल्या रूग्णांमध्ये अडावद (चोपडा) येथील एक तर अमळनेर येथील ३१ अशा एकूण ३२ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

चोपडय़ात पाच दिवस कडकडीत बंद

चोपडा शहर आणि तालुक्यात खुर्शिद अळी आणि मल्हारपुरा येथे करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने बुधवारपर्यंत सलग पाच दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. औषधालयांचा त्यात अपवाद आहे. दूध विक्री सकाळी आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळेत सुरु राहणार आहे. व्यापारी आणि ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील ११ मेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणु नये, असे आवाहन सभापती नारायण पाटील यांनी केले आहे.

रावेर रेल्वे स्थानकातून माल पाठविण्याची सुविधा

व्यापाऱ्यांकडून सतत होत असलेल्या मागणीनुसार भुसावळ रेल्वे विभाग प्रशासनाने रावेर स्थानकातून माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याआधी ही सुविधा बंद करण्यात आली होती. आता सहा महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रावेर स्थानकातून मका, ज्वारी, गहू, दाळ इत्यादी जीवनावश्यक वस्तु पाठविता येणार आहेत. टाळेबंदीमुळे २२ मार्चपासून रेल्वेव्दारे कांदा वाहतूक बंद होती. ती नुकतीच सुरू झाली आहे.