सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नागेश गायकवाड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजितदादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५० संघांनी सहभाग नोंदविला आहे. यात ७०० पुरुष आणि २०० स्त्री खेळाडूंचा समावेश आहे.
नेटवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धा भूषणनगर, लिमयेवाडीतील उदय विकास प्रशालेशेजारी मैदानावर होत आहेत. शहरात कबड्डीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी रामवाडी, लिमयेवाडी भागात नेहमीच प्रयत्न केले जातात. कबड्डीचे अस्तित्व याच भागात जाणवते. रामवाडी, लिमयेवाडी, सलगर वस्तीचा भाग पूर्वीपासून माजी गुन्हेगार भटक्या जमातींचा मानला जातो. यात कैकाडी, टकारी, छप्परबंद व अन्य जाती- जमातीचे लोक राहतात. यातूनच कबड्डी खेळाडू निपजले. हिरालाल जाधव यांनी कबड्डीची शान उंचावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही येथील कबड्डीचा खेळ पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्या नजरेत भरलेल्या काही खेळाडूंना राजकारणात येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसह थेट विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.
या पार्श्वभूमीवर भरविण्यात आलेल्या जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्यासह जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मदन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, माजी नगरसेवक तौफिक शेख, देवेंद्र भंडारे, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान आदींची यावेळी उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या विशेष निधीतून उभारण्यात येणाऱ्या गवळी समाज सांस्कृतिक भवनाचे आणि मोची समाजाचे आराध्य दैवत जांबमुनी सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजनही याचवेळी करण्यात आले. यावेळी दोन्ही समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.