मुंबईतील एका ६४ वर्षीय व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनं पीडित व्यक्तीला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून तब्बल १७.८ लाख रुपये लुबाडले आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यक्ती ही २०१९ मध्ये एका सरकारी बँकेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ६४ वर्षीय पीडित व्यक्तीला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर अनेक मेसेज आले होते. आरोपी महिलेनं आपण गुजरात येथील रहिवाशी असल्याचं सांगत पीडित व्यक्तीशी मैत्री केली. यानंतर अचानक तिने तक्रारदार व्यक्तीला विवस्त्र (न्यूड) अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. दरम्यान, तिने पीडित व्यक्तीला व्हिडीओ फ्रेममध्ये घेऊन संबंधित कॉल रेकॉर्ड केला. व्हिडीओ कॉलनंतर आरोपी महिलेनं पीडित व्यक्तीला व्हाइस कॉल केला आणि १० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. पण पीडित व्यक्तीने दहा हजार रुपये दिले नाहीत.

या घटनाक्रमानंतर, २२ सप्टेंबर रोजी पीडित व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमधील अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या विक्रम राठोड नावाच्या व्यक्तीचा व्हॉईस कॉल आला. फोनवरील व्यक्तीने पीडित व्यक्तीला सांगितलं की, तुमच्याविरोधात दिल्ली सायबर पोलिसांत एका महिलेनं गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचं पथक लवकरच तुम्हाला मुंबईतून अटक करण्यासाठी रवाना होणार आहे. अटक टाळायची असेल तर मागितलेली रक्कम माझ्या बँक खात्यात जमा करा, अशी मागणी विक्रम राठोड नावाच्या व्यक्तीने केली. यानंतर घाबरलेल्या पीडित व्यक्तीने अनेक ट्रान्झेक्शन्स करत आरोपीच्या खात्यात सुमारे १६.५० लाख रुपये जमा केले.

हेही वाचा- पुणे : हाॅटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक ; आरोपींना मुंबईतून अटकेत

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर राठोडनं पीडित व्यक्तीला पुन्हा फोन केला आणि सांगितले की संबंधित महिलेने संबंधित नग्न व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. काही वेळात तुम्हाला रणवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीचा फोन येईल, रणवीर गुप्ता हा व्हिडीओ युट्यूबवरून काढून टाकेल. यानंतर दोन दिवसांनी पीडित व्यक्तीला रणवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीचा फोन आला. हा व्हिडीओ युट्यूबवरून काढण्यासाठी त्याने १.३० लाख रुपयांची मागणी केली. यादिवशी बँक बंद असल्याने पीडित व्यक्तीनं वांद्रे येथे राहणाऱ्या आपल्या मित्राकडून पैसे घेत, आरोपीच्या खात्यात पैसे जमा केले.

हेही वाचा- १०० रुपयांच्या पेटीएम व्यवहारावरुन पोलिसांनी ४ कोटींच्या चोरीचा छडा लावला, वाचा नेमकं काय घडलं?

यानंतर, आरोपी राठोडने पुन्हा पीडित व्यक्तीला फोन केला, न्यूड व्हिडीओ कॉल करणाऱ्या महिलेनं आत्महत्या केली असून संबंधित महिलेचे वडील पैसे मागत आहेत. त्यांना देण्यासाठी आणखी पैसे पाठवा, असं राठोडने सांगितलं. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित व्यक्तीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.