सांगली : द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करून १ कोटीची लूट करणारी टोळी २४ तासांत गजाआड

लुटीतील रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती अधीक्षक बसवराज तेली यांनी बुधवारी सायंकाळी दिली.

gang looted grape trader
द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करून १ कोटीची लूट करणारी टोळी २४ तासांत गजाआड (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : द्राक्ष व्यापार्‍याला मारहाण करून एक कोटीहून अधिक रक्कम लुटणार्‍या टोळीला गुन्हा घडल्यानंतर २४ तासांत सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले. लुटीतील रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती अधीक्षक बसवराज तेली यांनी बुधवारी सायंकाळी दिली.

याबाबत माहिती अशी की, द्राक्ष व्यापारी महेश शितलदास केवलाणी (वय ४९ रा. पिंपळगाव, ता. निफाड जि. नाशिक) हे शेतकऱ्यांना द्राक्ष खरेदीचे पैसे देण्यासाठी जात असताना तासगावमधील दत्तमाळ येथे असलेल्या गणेश कॉलनीमध्ये मोटार अडवून लुटण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला होता. या प्रकरणी नितीन खंडू यलमार (वय २२), विकास मारुती पाटील (वय ३२) आणि अजित राजेंद्र पाटील (वय २२ सर्व रा. मतकुणकी, ता.तासगाव) या तिघांना अटक करण्यात आली.

हेही वाचा – “गौतम अदाणींसाठी पंतप्रधान १८-१८ तास काम करतात”, काँग्रेसची मोदींवर घणाघाती टीका

काल रात्री द्राक्ष व्यापारी केवलाणी हे स्कॉर्पिओ (एमएच १५, ०२१५) मधून दिवाणजी राजेंद्र माळी व चालक आकाश चव्हाण यांच्यासोबत एक कोटी १० लाखाची रोकड घेऊन सांगलीहून तासगावमध्ये तात्पुरता निवास असलेल्या गणेश कॉलनीमध्ये निघाले होते. यावेळी वीज पुरवठा बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चालकाच्या बाजूकडील काचेवर हात मारून काच खाली करण्यास भाग पाडले. काच खाली केल्यानंतर तलवारीने धाक दाखवत मागील बाजूस बसलेल्या व्यापार्‍यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी घेऊन त्यांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यापारी व दिवाणजीने अटकाव केला असता त्यांना मारहाण करून ते पसार झाले होते.

हेही वाचा – Karuna Sharma : “कायद्यानुसार मी कोट्यवधींची मालकीण..” धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप

या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. स्थानिक शाखेचे कर्मचारी सागर टिंगरे यांना संशयित लुटलेल्या रोकडसह मणेराजुरीच्या शिकोबा डोंगराच्या पायथ्याला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे निरीक्षक सतीश शिंदे व भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत निशाणदार, संदीप गुरव, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, संदीप पाटील, प्रशांत माळी, अमोल ऐदळे, प्रकाश पाटील आदी कर्मचार्‍यांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी ही वाळवा तालुक्यातील मच्छिंद्रगड येथून चोरलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 17:56 IST
Next Story
Karuna Sharma : “कायद्यानुसार मी कोट्यवधींची मालकीण..” धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप
Exit mobile version