अहिल्यानगर/कर्जतः कर्जत -जामखेड मतदारसंघातील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊ घातली असतानाच, याच मतदारसंघातील कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपचे विधान परिषद सभापती राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यातील सत्तासंघर्षातून सत्तांतर घडले. हा केवळ योगायोग आहे की ठरवून घडवलेले सत्तांतर याची चर्चा होत आहे. यानिमित्ताने कर्जत नगरपंचायतमधील सत्तांतराचा संदेश राज्यभर गेला आहे. मंत्रिमंडळाची बैठक चौंडीला होण्यासाठी राम शिंदे आग्रही आहेत.

ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे घेण्याचा घाट घातला गेला, त्याचवेळी कर्जतमध्ये रोहित पवार यांच्याविरोधात नगरसेवकांमध्ये असंतोषला सुरुवात झाली होती. त्यापूर्वी कर्जत नगरपंचायतीची आर्थिक कोंडी करण्यात आली होती. दीड वर्षावर आलेल्या निवडणुकीचे वेध स्थानिक पातळीवर लागण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीशिवाय नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे अशक्य आहे.

विधान परिषदेचे सभापती पद मिळताच राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी शिंदे यांचा याच विधानसभा मतदारसंघात अवघ्या काही मतांनी झालेला पराभव जिव्हारी लागला होता. नगरपंचायतीमधील रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेला सुरुंग लावत राम शिंदे यांनी पराभवाची काही प्रमाणात परतफेड केली. कर्जतमधील सत्तांतराच्या घडामोडी सुरू असतानाच अविश्वास ठराव संबंधित कायद्यात राज्याच्या मंत्रिमंडळाने पुन्हा बदल केला, त्याच रात्री तो अमलात आणला गेला, त्याचा फायदाही लगेच राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मिळाला, हाही एक विलक्षण योगायोगच. सत्तांतरासाठी राम शिंदे यांना पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कसे बळ दिले जात होते, हे दर्शवणाऱ्या या घटना आहेत. या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व सभापती राम शिंदे या जिल्ह्यातील दोन सत्ताकेंद्रात सुरू असलेल्या संघर्षातही मुख्यमंत्र्यांकडून शिंदे यांना झुकते माप मिळत असल्याचा संदेशही दिला आहे.

रोहित पवार यांच्या विरोधात धुमसत असलेल्या असंतोषासह निधीअभावी अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नगरसेवकांत लगेच फूट पडली. राष्ट्रवादीचे ८, काँग्रेसचे ३ व भाजपच्या अवघ्या दोन अशा १३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तयार झाल्याने नगराध्यक्ष पदावरून रोहित पवार गटाच्या उषा राऊत यांना राजीनामा देत पायउतार व्हावे लागले आणि आता काँग्रेसच्या रोहिणी घुले नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील व उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संतोष मेहेत्रे नियुक्त होतील. भाजप नगरसेवकांना मात्र कोणताच लाभ मिळाला नाही, ते उपेक्षितच राहिले.

राज्यातील बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्था तीन-चार वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील १५ पालिकांपैकी नगरसेवकांचा कार्यकाल बाकी असलेल्या कर्जत, पारनेर व अकोले अशा अवघ्या तीन नगरपंचायती आहेत. त्यातील कर्जतमध्ये सत्तांतर घडवून आणले गेले. उर्वरित पारनेर ही एकमेव विरोधकांच्या म्हणजे खासदार नीलेश लंके यांच्या ताब्यात आहे. आगामी काळात महायुतीच्या रडारवर पारनेर नगरपंचायत आल्यास नवल वाटणार नाही.

कुरघोड्यांचे राजकारण

कर्जत-जामखेड हा पूर्वीचा भाजपचा बालेकिल्ला. तो दहा वर्षांपूर्वी रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्याकडून हिसकावला. अल्पमताने पवार दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र या दरम्यान दोघात कुरघोड्यांचेच राजकारण रंगले. अपापल्या पक्षाच्या म्हणजे महाविकास आघाडी महायुती सरकारच्या काळात दोघांनी कुरघोड्यांसाठी सत्तेचा पुरेपूर वापर करत परस्परांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नाही. कर्जतसह जामखेड पालिका, बाजार समिती याठिकाणी त्याची झलक वेळोवेळी दिसली आहे. त्याची चर्चा फारशी झाली नाही. मात्र चौंडीला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील सत्तांतर नाट्याची राज्यभरात चर्चा होत आहे.